The seasons bloom will continue bloom Government Arts College Aurangabad sweet moments ysh 95 | Loksatta

ऋतू पुन्हा फुलतील, फुलतच राहातील..

गेलेले दिवस इतके कसे आवाज देत असतात माणसाला, कायम? राहून गेलेल्या, जगता न आलेल्या काही गोष्टी आपल्या आसपास त्या संदर्भाच्या लहरी ठेवून जातात की काय? असं म्हणतात, की पूर्वी आपण जे काही बोललेलो असतो ते अनंतात कुठं तरी भरून राहातं.

ऋतू पुन्हा फुलतील, फुलतच राहातील..
ऋतू पुन्हा फुलतील, फुलतच राहातील..

मनोहर मंडवाले

गेलेले दिवस इतके कसे आवाज देत असतात माणसाला, कायम? राहून गेलेल्या, जगता न आलेल्या काही गोष्टी आपल्या आसपास त्या संदर्भाच्या लहरी ठेवून जातात की काय? असं म्हणतात, की पूर्वी आपण जे काही बोललेलो असतो ते अनंतात कुठं तरी भरून राहातं. म्हणूनच ‘अतीतची बाँसुरी’ कानांशी सतत वाजत राहाते, अन्  आपलं मन त्या मधुर क्षणांशी गुंतवून ठेवते..

   ‘शाकम’च्या (शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद) पाच वर्षांतील त्या काळ नावाच्या वळणावर भेटलेले किती तरी चेहरे, असेच पुन:पुन्हा नजरेसमोर तरळून जातात. त्यातील काही मित्र-मैत्रिणींची पावलं माझ्या पावलांशी ताल धरत ‘शाकम’च्या त्या भारदस्त वास्तूत विहरलीदेखील, पण काहींचे हात मात्र हातातून सुटले ते कायमचेच! पण परवाच्या त्या भेटीत पुन्हा नव्या दमानं, श्रावणी उत्साहानं काही जिवलग भेटले, गळाभेटीही झाल्या. गप्पागोष्टींना नुसता ऊत आलेला. हास्याचे फवारे, टाळय़ांवर टाळय़ा.. धम्माल नुस्ती! खूप वर्षांनी इतकं खळाळून हसत होतो मी. वेळ जात होता तशा डोळय़ांच्या कडा अधूनमधून पाणावत होत्या..

   बोलता बोलता नकळत जाणीव झाली, तेव्हाचे ते सतरंगी ऋतू किती काही केलं तरी पुन्हा फिरून येणार नाहीएत आणि खरं तर; हेच वास्तव मनाला पचवता येत नव्हतं. कधी कधी वाटतं, चाळीस, बेचाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ, सरसरत्या तारुण्याचा तो मौसम पुन्हा नव्याने जगता यायला हवा. जगाचं ओझं डोक्यात न भिनलेले अन् जात-धर्माची कीड न लागलेले आम्ही, एखादी जादू झाल्यासारखं पुन्हा एकत्र यायला हवं. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आपल्याच मित्र-मैत्रिणींवर पडणारे ते मिश्कील फिशपॉण्ड, उत्साहात झुलणारं ते वार्षिक कला प्रदर्शन, नाटकांची ती अरेरावीची तालीम, गाण्यांच्या त्या रिहर्सल्स एवढंच नाही तर; ‘जी. एस.’ बनण्यासाठीच्या एकमेकांवरच्या त्या कुरघोडय़ा, मुलांना व्होटिंगसाठी आपल्याकडे वळविण्यासाठीच्या त्या नाना शकला, हे सगळं सगळं आठवलं आणि मन अगदी खूश झालं. आम्हा तरुणाईचे हिरो किन्हा (सुमित), पंडित भीमसेन जोशींसारख्या खडय़ा आवाजात गाणारा गिरीश गोसावी, गबरू व्ही. टी. कुलकर्णी, गझलेत रंग भरणारा डोंगरी, हरफनमौला आणि अर्ध्या शाकमकरांचा क्लासमेट बिलिग्रामी, हसमुख गोविंद गोंडे पाटील, चीअर अप बाळय़ा, सव्वा पाच फुटी टाकळय़ा, मोठ्ठाल्या डोळय़ांची नीलिमा आणि कित्येक जणी..

 गेला जन्म आठवावा तसं सगळंच आज नजरेसमोर फेर धरतंय. त्या वास्तूतील वाऱ्याची ती हळुवार झुळूक, तीही आता आम्हाला शोधत असेल का? कॉलेजच्या पहिल्याच दिवशी कुणाकुणाशी ओळख करायला भीतभीतच हात पुढे करणारी ती ‘अनामिका’.. मनात असूनही कधी तिच्याशी ओळख काढू शकलो नाही. आपल्या येण्या-जाण्याच्या वाटेवरल्या कॉलनीत ती राहायची. नजरभेट व्हायची, तितकंच. अजूनही वेचत असेल का ती- आपल्या अंगणात पडलेली चांदण्यांची ती शुभ्र फुलं? आपल्याच खुळय़ा स्वभावाचं आता येत असेल तिला हसू? माहितीये मला तीही आता साठीची झाली असेल. पण भावनांना कुठं वय असतं? 

 नाही बोलता आल्या कित्येक गोष्टी आम्हाला.. पण आमच्यासारखे खूप असतील, नव्हे आहेतच! ज्यांची स्वप्नं कधीच सफल होऊ शकली नाही. ज्यांनी ‘त्या कुणा’साठी महिनोन्  महिने वाट पाहिली. आपलं नातं कधी तरी जुळेल ही आशाच चैतन्य ठेवून होती त्यांच्या जगण्यात. पुढे कॉलेज सुटलं, नोकरी लागली, सुंदर-सुशील बायको मिळाली, संसाराचं सुखही ओसंडून वाहात राहिलं; पण.. पण ‘ती कुठं असते रे आता? भेटते का रे ती कधी कुणाला’ हा प्रश्न आमच्या टाळक्यात आजही घिरटय़ा घालतोय. बाळय़ानं नाही का,परवाच तो किस्सा सांगितला. जवळजवळ पंचेचाळीस वर्षांनंतर एका मित्राच्या लग्नात शाळेतले बारा-तेरा मित्र अचानक भेटले, तेही औरंगाबादेतील फेमस हॉटेलमध्ये! इतक्या वर्षांनी भेटल्यानं सगळय़ांनाच खूप आनंद झालेला. इतका, की थ्री स्टार हॉटेलमधलं ते लग्न सोडलं आणि हे आपले बाजूच्या टपरीवजा हॉटेलमध्ये जाऊन गप्पांमध्ये रंगले. मात्र, गप्पांच्या आधी सगळय़ांचा पहिला प्रश्न होता, ‘ती भेटली का रे कधी?’ कमाल आहे ना, शाळेतली तेव्हाची ती बारा-तेरा वर्षांची मैत्रीण, पंचेचाळीस वर्षांनंतरही नुकत्याच फुललेल्या एखाद्या फुलासारखी, सगळय़ांच्या काळजात कशी ताजी टवटवीत होती. कुणी आर्ट डायरेक्टर झालंय, कुणी प्रोफेशनल फोटोग्राफर, कुणी कमिशनरही.. पण त्यांच्या ओठून आपल्या त्या शाळामैत्रिणींची आठवण कशी, एखाद्या माळेतून मोती घरंगळावा इतक्या सहजतेनं येत होती. काय असतं हे आकर्षण? निव्वळ शारीर आकर्षण नक्कीच नाहीए हे! ऋणानुबंध असतात जन्मांचे. त्या व्यक्तीसोबत जगलेला तो अनवट काळ, निरागसपणे कचकचून मारलेल्या त्या गळाभेटी, जिथं जिथं आपण खेळलो, बागडलो ते उनाड ऋतू, हेवेदावे, ते नाटुले रुसवे.. हे सगळंच आपल्याला अगदी आतून हाक देत असतं.  बायकोसमोरही आपण सहज बोलून जातो, बायकोही मग मिश्कील हसते.

    काळ खूप पुढे सरकलाय, तो पुन्हा फिरून कधीच येणार नाहीये. त्याच्या मधुर आठवणी मात्र, अधूनमधून मित्र-मैत्रिणींना भेटत जागवता येणारेत, तेव्हाच्या त्या अविस्मरणीय स्मरणांचे सोहळे होतील. मैत्रीचे, जिव्हाळय़ाचे ऋतू पुन्हा फुलतील, फुलतच राहतील..

manoharmandwale@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2022 at 00:07 IST
Next Story
व्हेगन एक आहारशैली