भारतात पहिली महिला बँक आणि स्त्रियांसाठीची पहिली श्रमिक संघटना उभी करणाऱ्या इलाबेन भट यांचं नुकतंच वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. रोज दहा रुपये कमावणाऱ्या बायाही बचत करू शकतात हे सांगत अगदी छोटा व्यवसाय, भाजीविक्री, घरकाम करणाऱ्या स्त्रियांनाही त्यांनी बँकेची ओळख करून दिली. भारतभरातल्या कष्टकरी स्त्रियांपर्यंत ही बँक पोहोचवण्यात इलाबेन यांचा मोठा वाटा आहे.. इलाबेन यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या आणि त्यांच्या प्रेरणेमुळे माणदेशी असंघटित कामगार स्त्रियांसाठी बँक उघडणाऱ्या चेतना गाला-सिन्हा यांचा खास लेख..

अहमदाबादच्या फायनान्शियल सेंटरमधील ‘एलिस ब्रिज’मध्ये एक मोठी इमारत आहे. तिथल्या ‘सेल्फ एम्प्लॉइड विमेन्स असोसिएशन’च्या (SEWA- ‘सेवा’) प्रवेशद्वारापाशी मी थांबले होते. आजूबाजूला इतर बऱ्याच बँकांच्या इमारती आहेत. ‘बँक ऑफ बडोदा’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘एचडीएफसी बँक’ आणि तिथेच एक मोठी इमारत ‘सेवा’ची!  

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात

सगळय़ा बँकांच्या प्रवेशद्वारांपाशी ‘सिक्युरिटी गार्ड’ होते आणि त्यांची मदत घेऊन गाडय़ांचं पार्किंग केलं जात होतं, पण मी ‘सेवा’मध्ये प्रवेश केला आणि वेगळंच चित्र दिसलं. काही स्त्रिया सायकलवरून येणाऱ्या, काही स्त्रिया हातगाडी घेऊन येणाऱ्या आणि काही तर ऑटोरिक्षा चालवत येणाऱ्या! आपापल्या गाडय़ा त्या ‘पार्क’ करत होत्या. इतर इमारतींमध्ये ‘टू व्हीलर’ आणि ‘फोर व्हीलर’ दिसत होत्या; पण सायकल, हातगाडी आणि रिक्षा असलेली हीच मोठी इमारत! प्रवेशद्वारापाशी एक पारंपरिक घागरा-चोळी परिधान केलेली स्त्री होती. तिनं विचारलं, ‘‘तुम्ही कुठून आलाय? मुंबईहून?’’ मी हो म्हणताच, त्या म्हणाल्या, ‘‘चला, मी तुम्हाला आत नेते. ही आमची बँक आहे.’’ त्या होत्या राधाबेन. त्या भाजीपाल्याचा व्यवसाय करत होत्या आणि ‘सेवा’मध्ये स्वत:ची बचत ठेवायला आल्या होत्या. बँकेपाशी आम्ही थोडा वेळ थांबलो, मी बघितलं, बँकेचे दोन काऊंटर होते, तिथे माइकवरून पैसे घ्यायला किंवा भरायला खातेदाराचं नाव पुकारलं जात होतं. बँक स्त्रियांनी गच्च भरलेली. सेवा देणाऱ्याही स्त्रियाच होत्या. घागरा-चोळी घातलेल्या, हातावर आणि गळय़ावर मोठं गोंदण असलेल्या अनेक स्त्रिया दिसत होत्या. सगळ्या मुक्तपणे तिथे वावरत होत्या, मोकळेपणानं आर्थिक व्यवहार करत होत्या.

याच ‘सेवा महिला बँके’च्या संस्थापक इलाबेन भट यांचं अलीकडेच (२ नोव्हेंबर) निधन झालं. हा लेख लिहिण्यामागचं कारण असं, की माझाही हाच प्रांत असल्यानं मार्गदर्शनाच्या निमित्तानं अनेकदा मी इलाबेन यांना भेटले आहे. त्यांच्या अनुभवांचा मला माझा अनुभव समृद्ध करण्यासाठी उपयोग झाला आहे. ९० च्या दशकात मी प्रथम ‘सेवा’मध्ये गेले होते, कारण इलाबेन यांनी मला एका सेमिनारसाठी बोलावलं होतं. मला एक ‘प्रेझेंटेशन’ करायचं होतं. ‘जेपीं’च्या (जयप्रकाश नारायण) बोधगया चळवळीमध्ये ज्या स्त्रियांना जमिनी मिळाल्या आणि त्यांचा मालकी हक्क त्यांना मिळाला, तो कसा मिळाला, काय घडलं, ते इलाबेनना समजून घ्यायचं होतं, त्या विषयावर बोलायला त्यांनी मला निमंत्रित केलं होतं. मला आधी शंका आली, की एका बँकेची स्थापना करणाऱ्या स्त्रीला माझ्याकडून कोणती माहिती घ्यायची असणार? मी त्यांना तसं म्हटलंसुद्धा, ‘‘मी तुम्हाला काय सांगणार?’’ त्यावर त्या म्हटल्या, ‘‘अगं, बिहारमध्ये मजुरी करणाऱ्या स्त्रियांना मालकी हक्क मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. या सगळय़ात तू जे केलं आहेस ते कमी महत्त्वाचं नाहीये. तेच मला समजून घ्यायचं आहे.’’ मला इलाबेनच्या सालसपणाचं आश्चर्य वाटत राहिलं. ज्या स्त्रीनं पहिली महिला बँक स्थापन केली आणि एवढंच नव्हे, तर कष्टकरी स्त्रियांची जगातली पहिली कामगार वा श्रमिक संघटना स्थापन केली, त्यांना दुसऱ्या विषयांमध्येही किती रस आहे!  

  इलाबेन ‘बी.ए.’-‘एल.एल.बी.’ झालेल्या; वकील. ‘लॉ’ केल्यानंतर त्यांचं रमेश भट यांच्याशी लग्न झालं. एक वर्ष त्या ग्रामीण भागात राहिल्या. त्या स्वत: शालेय जीवनापासून गांधीजींच्या चळवळीमध्ये होत्या. गुजरात येथील ‘टेक्स्टाइल लेबर युनियन’मध्ये वकील म्हणून काम करू लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की तेथील स्त्रियांना पुरेसा भत्ता मिळत नाही. म्हणून त्या स्त्रियांची बाजू मांडू लागल्या आणि त्याच वेळी त्यांना असंही वाटू लागलं, की स्त्रियांचीही एक संघटना (युनियन) असायला हवी. त्यावर ‘टेक्स्टाइल लेबर युनियन’चं असं म्हणणं होतं, की तुम्ही ‘महिला विंग’ काढा, स्त्रियांची वेगळी युनियन स्थापन करण्याची गरज नाही. पण इलाबेन आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी स्वतंत्र महिला संघटना स्थापना केली; पण त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं, की ही फक्त कापड कामगार स्त्रियांसाठी आहे, पण त्याचबरोबरीनं ज्या स्त्रिया भाजीपाला विकतात, निरनिराळे छोटे व्यवसाय करतात, त्यांनाही या यंत्रणेत आणलं पाहिजे. तीच ‘युनियन’ची संकल्पना होती. जे असंघटित क्षेत्रात आहेत त्यांना कुणीच वाली नाही, म्हणून त्यांनी १९७२ मध्ये ‘सेल्फ एम्प्लॉइड विमेन्स असोसिएशन ऑफ इंडिया’ची (SEWA) स्थापना केली. ज्या वेळी ‘सेवा’ची सदस्यसंख्या आणि कार्याची व्याप्ती वाढवण्याचं काम सुरू होतं, तेव्हा या स्त्रियांनी सांगितलं, ‘आम्ही कमावतो, पण आम्हाला बचतही करायची आहे.’ इलाबेननी विचार केला, की बचत करणं हे स्त्रियांच्या स्वभावातच आहे आणि त्यांना तशी सुरक्षित जागा मिळाली पाहिजे. म्हणून त्यांनी ‘सेवा महिला को-ऑपरेटिव्ह बँक’ सुरू केली, तशा बऱ्याच सहकारी संस्था सुरू केल्या; पण स्त्रियांना बचत करण्यासाठी महिला सहकारी बँकेची केलेली स्थापना आणि त्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचा परवाना मिळवणं महत्त्वाचं ठरलं. त्या वेळी ‘फायनान्शियल इन्क्लुजन’ या शब्दाची कुणी चर्चासुद्धा करत नव्हतं, पण इलाबेननी बँक स्थापित केली आणि स्वत: अहमदाबादमध्ये गावोगावी फिरून रस्त्यावर छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सांगितलं, ‘‘ही बँक तुमच्यासारख्या स्त्रियांच्या बचतीसाठी आहे. तुम्ही यात सहभागी व्हा.’’ हे सर्व १९७० च्या दशकात, ज्या वेळी जगात कुणीही ‘मायक्रो फायनान्स’बद्दल विचारसुद्धा करत नव्हतं. त्या वेळी इलाबेन यांनी त्याची सुरुवात केली. इलाबेन नेहमी सांगायच्या, ‘घराचं अर्थनियोजन स्त्रियांच्या नियंत्रणात असलं पाहिजे, तरच त्यांचं कुटुंब समृद्ध होईल.’  

 माझी इलाबेन यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली ती १९८० च्या दशकात. मी मुंबईत शिक्षण घेत होते आणि ‘सर्वोदय मंडळा’च्या ऑफिसमध्ये काम करत होते. तिथे त्या आल्या आणि विचारलं, ‘‘हेच सर्वोदय मंडळ आहे का? गांधीयन संस्था?’’ मी ‘हो’ म्हणताच, त्या म्हणाल्या, ‘‘मी इलाबेन. अहमदाबादवरून ‘सेवा’मधून आले आहे.’’ हे एकून मी क्षणभर  थक्कच झाले. अगदी साध्या, सरळ, नम्र आवाजात त्या बोलत होत्या. त्यांनी मला विचारलं, ‘‘तू ग्रॅज्युएशन करते आहेस का? लहान दिसतेस. तू ‘संघर्ष वाहिनी’मध्ये काम करतेस का?’’ मी म्हटलं, ‘‘हो. मी मुंबईच्या झोपडपट्टीतल्या स्त्रियांसाठी काम करते.’’ त्या म्हटल्या, ‘‘एकदा अहमदाबादमध्ये ‘सेवा’चं काम बघायला ये.’’ आता काय, इलाबेननी त्यांच्या घरीच बोलावलेलं. मग मी अहमदाबादला जाऊन धडकले. इलाबेन यांच्या घरी त्या, त्यांचे पती रमेशभाई यांना भेटले. ते म्हणाले, ‘‘तू जुनी ‘सेवा बँक’ बघून ये, मग आम्ही ‘सेवा युनियन’मध्ये तुला घेऊन जातो.’’

मी ‘सेवा बँके’त आत गेले, तिथे इतकी गर्दी होती, की माइकवरून पुकारा करून लोकांना बोलवावं लागत होतं. ज्या वेळी मी ‘सेवा बँके’च्या ‘एलिस ब्रिज’ इमारतीत गेले, तेव्हा भिंतीवर लावलेली इलाबेन यांची मोठमोठी कृष्णधवल छायाचित्रं पाहिली. इलाबेननी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेले फोटो, ‘टेक्स्टाइल युनिट’च्या स्त्रियांबरोबरचे फोटोही त्यात होते. ग्रामीण भागातल्या स्त्रियांनी इलाबेनबरोबर संघटित होऊन ही युनियन स्थापन केल्याचं त्यात स्पष्ट दिसत होतं. 

   ‘सेवा’ ही असंघटित कामगार स्त्रियांसाठीची जगातली पहिली महिला बँक मानली जाते. मात्र फक्त ‘सेवा’ची स्थापना करून इलाबेन थांबल्या नाहीत, तर त्यांनी जागतिक बँकेबरोबर चर्चा करून ‘विमेन वर्ल्ड बँके’ची स्थापना करण्यासाठी प्रयत्नही केले आणि वर्ल्ड बँकेनं याला मान्यताही दिली. जगभरातील स्त्रिया, ज्या मोठय़ा बँका, सहकारी किंवा छोटय़ा बँका, को-ऑपरेटिव्ह बँका, क्रेडिट युनियन, यामध्ये काम करत होत्या त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उभं केलं, तीच ‘विमेन वर्ल्ड बँक ’. या सगळय़ा स्त्रिया या बँकेच्या सदस्य व्हाव्यात आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्रीविषयक बँकिंगचे

जे निर्णय आणि धोरणं आखली जातात, ती सर्व बँकांनाही लागू व्हावीत, तसंच त्याची अंमलबजाबणी होते की नाही हे पाहाण्यासाठी ‘विमेन वर्ल्ड बँक’असावी, असा उद्देश यामागे होता.  हे इलाबेन यांचं मोठं यशच. प्रत्येक देशात, ‘विमेन वर्ल्ड बँक’ शाखा काढू शकत नाही, म्हणून ‘फ्रेंड्स ऑफ विमेन वर्ल्ड बँकिंग’ (FWWB) स्थापन करण्यात आली. त्याचं ऑफिस अहमदाबादमध्ये असून लॅटिन अमेरिकेतही त्याची शाखा आहे. ही बँक महिलांच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य करते.

त्यांच्या या सर्वच कामाची दखल घेत भारत सरकारनं इलाबेन यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यांना राज्यसभेमध्ये सदस्यत्वही दिलं. तसंच त्या नियोजन मंडळामध्ये सदस्यही होत्या.  त्यांनी आणखी एक मोठं काम केलं, ते म्हणजे भारतातल्या सर्व असंघटित क्षेत्रांमधील लोकांसाठी स्वतंत्र धोरण असावं यासाठी प्रयत्न केले. ‘आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन’मध्ये स्त्रियांना सदस्यत्व मिळावं यासाठी त्यांनी अग्रेसर भूमिका घेतली आणि त्यात यश मिळवलं. आज इलाबेन यांच्या ‘सेवा’चं जाळं फक्त अहमदाबाद, गुजरातमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात आहे. स्त्रियांना घर मिळण्यासाठी, ते त्यांच्या नावावर असण्यासाठी तसंच त्यासाठी कर्ज मिळावं यासाठी त्यांनी ‘सेवा हाऊसिंग महिला फायनान्स कंपनी’चीही स्थापना केली. इलाबेनसारख्या स्त्रिया आपल्या देशात दुर्मीळच! स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रयत्न करणारी स्त्री म्हणून इलाबेनना रिझव्‍‌र्ह बँकेनं ‘बोर्ड मेंबर’म्हणून सन्मानित केलं.

 इलाबेन यांच्या आईचं माहेर गांधीवादी. त्यांचे आजोबा, आजी महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले होते. त्यामुळे गांधीवादाचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. इलाबेन यांचं प्रमुख योगदान होतं ते जगाच्या पातळीवर स्त्रियांच्या घरगुती कामाला किंमत मिळवून देणं. त्या नेहमी असं म्हणायच्या, की घराबाहेर, अर्थकारणात ज्या स्त्रिया सहभागी आहेत, त्यापलीकडे जाऊन स्त्रिया जे घरी काम करतात, तेसुद्धा एका प्रकारे अर्थकारणात सहभागी होणंच आहे. त्यांनी घरात केलेल्या कामाला मूल्य प्रदान केलं पाहिजे. कारण स्त्रिया आधी घरात काम करून कुटुंब जगवतात आणि मग कामाला जातात आणि घरातलं कामही अर्थकारणात उत्पादन वाढवतं, कारण तरच त्याचं कुटुंब व्यवस्थित जगू शकतं. हा विचार त्यांनी ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ला दिला. तत्पूर्वी ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’मध्ये ‘स्त्रियांचा आर्थिक सहभाग’ यात घरकामाची वेगळी अशी व्याख्या कधी केली गेली नव्हती आणि त्याला वेगळं काम म्हणून धरलंही गेलं नव्हतं; परंतु तज्ज्ञ समितीचा भाग म्हणून इलाबेन या जगातल्या पहिल्या स्त्री होत्या, ज्यांनी हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेस मान्य करायला लावलं.  इलाबेन यांचं आणखी एक महत्त्वाचं योगदान म्हणजे या कामगार स्त्रियांना नाटकाच्या माध्यमातून एकत्र आणणं. त्या स्वत: नाटक लिहायच्या आणि या स्त्रियांकडून नाटक बसवून रंगमंचावर सादर करायच्या. अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या नाटकांचा खूप उपयोग झालाच. शिवाय या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासही मदत झाली.

भारतीय स्त्रियांना अर्थप्रवाहात सहभागी करून घेण्यात इलाबेनचं योगदान फार मोठं आहे. विशेष म्हणजे हे सर्व आपल्या भारतात घडलं आणि इथून जागतिक स्तरावर काही महत्त्वाचे पायंडे पाडले गेले, हे इलाबेनचं कर्तृत्व. त्यांचं हे कार्य नवीन पिढीलाही प्रेरणादायी ठरो आणि स्त्रियांमधून केवळ अर्थसाक्षरच नव्हेत, तर अर्थक्षेत्रातील धोरणकर्त्यां तयार होवोत, हीच सदिच्छा!

chetna@manndeshi.org.in