मूल म्हणजे निरागसता आणि स्वर म्हणजे आश्वासकता! या दोन्हीच्या मेळातून उमलेलेलं बालस्वर ! मुलांचं उद्याचं जग सुंदर, समृद्ध व्हावं असं समाजातील प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला वाटतं.. त्यामुळेच तयार करण्यात येत आहे एक गीत जे १४ भाषांतील नामवंत कवींच्या लेखणीतून साकारणार असून १४०० बालगायक ते गाणार आहेत. या प्रकल्पाची सुरुवात येत्या १४ नोव्हेंबरच्या बालदिनानिमित्ताने होत आहे, त्याविषयी..  
     शील, विनय, आदर्श, श्रेष्ठता  तार बिना झंकार नही है
शिक्षा क्या स्वर साध सकेगी  यदी नतिक आधार नही है
कीर्ती कौमुदी की गरिमा में  संस्कृती का सम्मान न भूले
निर्माणों के पावन युग में  हम चरित्र निर्माण न भूलें  
गेले काही दिवस या सुंदर कवितेच्या ओळी मनात िपगा घालतायत.. तसं बघायला गेलं तर या गीतातून प्रत्येक ओळीच्या अखेरीस नकार येतो. पण त्या नकारामागची सकारात्मक शक्ती इतकी विलक्षण आहे की त्यामुळेच तिचे शब्द मनात रुंजी घालू लागतात.
ही कविता किंवा तिचा आशय मनात घोळत राहण्याचं खरं कारण वेगळंच आहे.. काही दिवसांपूर्वी माझी एक छोटी विद्याíथनी वेदा हिने मला तिची स्वत:ची सांगितलेली गोष्ट! आणि त्यानंतर माझ्या गाणं शिकणाऱ्या मुलांकडून उमटला एक सामाजिक बालस्वर! त्याचं असं झालं..
  ‘जगबुडी काही आता लांब नाही.. काय चाललंय हे. एक गोष्ट धड नाही, ना शिक्षण व्यवस्था, ना रस्ते, ना भरपूर वीजपुरवठा, ना पाणी, अज्ञान, अस्वच्छता, भ्रष्टाचार, अत्याचार.. हे काही संपणार नाही.. आता प्रलय होणार, नष्ट होणार सर्व..’ अतिशय सात्विक संतापाने एक ज्येष्ठ नागरिक सद्य सामाजिक परिस्थितीवर ताशेरे ओढत होते. शिवाजी पार्कच्या कठडय़ावर बसून आपल्या मित्रमंडळीसमवेत सकाळची ताजी हवा खाता खाता त्यांचा वार्तालाप चालू होता. इतक्यात त्यांची चिमुरडी नात धावत धावत तिथे आली आणि त्यांना म्हणाली, ‘आजोबा, चला ना आता घरी आणि माझा केक खाऊन झालाय, हा कागद कुठे टाकू?’
‘कुठे काय, टाक त्या झाडात!’ आजोबा वदले.
मुलीने म्हणजे आमच्या वेदाने आजोबांनी सांगितल्याप्रमाणे कचरा झाडात टाकला आणि त्याच वेळी आजोबा मात्र सामाजिक स्वच्छतेच्या गप्पा मारण्यात गुंग होते. काय हा विरोधाभास ?
त्या दिवशी मुलगी दुपारी शाळेत गेली. तिच्या लाडक्या कुसुमबाई आज आल्या तेव्हा मुलांना त्यांनी छान खाऊ आणला होता. त्यांना आज एक पुरस्कार मिळाला होता. त्याबद्दल त्यांनी मुलांना सांगितले आणि आनंद व्यक्त करण्यासाठी खाऊ दिला. मुलांनी खूप टाळ्या वाजवल्या. कुसुमताईंचे अभिनंदन केले. त्यानंतर मुलांचा खाऊ खाऊन झाल्यावर कुसुमताई स्वत: एक टोपली घेऊन प्रत्येक मुलाजवळ गेल्या आणि खाऊचे कागद त्या टोपलीत टाकायला सांगितले. वेदाच्या जवळ त्या आल्या पण त्यापूर्वीच वेदाने तो कागद तिच्या बाकाखाली टाकलाही होता. बाईंनी तिला तो उचलून टोपलीत टाकायला सांगितला आणि कचरा असा कुठेही टाकायचा नसतो. शाळा, घर, बाग, रस्ता आपणच सुंदर ठेवला पाहिजे हे खूप जाणीवपूर्वक त्यांनी मुलांना समजावले. वेदाच्या डोक्यात मात्र आजोबा आणि बाई यांच्यातलं कुणाचं बोलणं खरं मानायचं या विचाराने गोंधळ माजला. संध्याकाळी वेदा आमच्या संगीत अकादमीत, कलांगणमध्ये आली. तेव्हा तिने तो गोंधळ मला सांगितला.
वेदाच्या त्या गोष्टीनंतर गाण्यासाठी आलेली मुलं हिरीरीने मोठय़ा माणसांचं बोलणं आणि वागणं यातला विरोधाभास रंगवून रंगवून सांगू लागला. त्यांच्या कथा आणि किस्से जरी माझ्या ही रोजच्या पाहण्यातले असले तरी मुलांची निरीक्षणशक्ती बघून मला जरा नवलच वाटलं.
प्रणव म्हणाला, ‘मावशी, मला एक प्रश्न विचारायचाय तुला.. अगं, आमचा शहरातला भाग खूप जुना आहे ना? तरी पण मस्त घरं आहेत अजून.. अगदी डौलदार, टुमदार आहेत.. मध्यंतरी एके दिवशी शेजारचे काका तावातावाने आले आणि म्हणाले, अरे वा रे वा.. हा परिसर म्हणे जतन करा.. हेरीटेज म्हणे!!! तुम्ही तिकडे बांधा टॉवर.. कमवा पसा.. आणि आम्ही म्हणे जतन करा.. गम्मत म्हणजे बाबा पण काकांशी सहमत झाले. मावशी, इतकी छान घरं मोडून तोडून टॉवर का बांधतात गं लोक? म्हणजे अगदी मोडकळीला आलं असेल घर, गळत असेल, पडझडीची भीती असेल तर ठीक आहे. पण जुनी दणदणीत मजबूत घरं कशाला पडायची? आणि हल्ली आपण बघतो ना, कितीतरी वेळा नव्या बििल्डग्ज, नवे पूलसुद्धा कोसळतात..आणि हे टॉवर तर किती विचित्र दिसतात..’
‘हो रे, अगदी खरे आहे तुझं प्रणव आणि काही काही ठिकाणी बििल्डग्ज इतक्या जुन्या झालेल्या असतात.. बििल्डग पडून अगदी माणसं मरेपर्यंत वाट बघतात.. पण नवीन नाही बांधत.. असं तरी का असतं गं मावशी?’ नववीतली सीमा म्हणाली.
‘मोठी माणसं असं का वागतात याचं उत्तर मला माहीत आहे..’ राघव एकदम मोठेपणाचा आव आणून म्हणाला. ‘मावशी मोठय़ा माणसांना उगो असतो.. तो आपल्याला दिसत नाही पण त्यांना उगो असतो.’
‘उगो? म्हणजे?’ मी गोंधळून विचारलं, ‘मला पण आहे का? मी मोठी आहे ना?’ राघव म्हणाला,  ‘तुझं मला माहीत नाही.. पण तुलाही असणार.. किंवा नसूही शकेल..’ मी आणि जरा मोठे असलेले आमचे मित्र जरा चक्रावून राघवकडे पाहात होतो आणि अचानक समीरला हास्याची उकळी फुटली. तो राघवकडे बघून जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, ‘अरे लेका तुला इगो म्हणायचंय का?’ मग मात्र सगळेच हसत सुटले..
हिरमुसलेल्या राघवकडे बघून समीर म्हणाला, ‘राघोबा, तुझा शब्द चुकला असला तरी तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. अरे मी ना परवा ‘नारबाची वाडी’ सिनेमा बघायला गेलो होतो. सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू झालं, पण माझ्या शेजारचा माणूस चुळबुळ करत होता. मी जरा डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं त्याच्याकडे तर तो चक्क  राष्ट्रगीत चालू असतानाच पॉपकॉर्न खात होता.. राष्ट्रगीत संपल्यावर मी त्याला म्हणालो, ‘काका, तुम्ही राष्ट्रगीत चालू असताना खाऊ कसं शकता?’ तर एकदम मोठे डोळे करून म्हणाला, ‘गप रे.. मला नको सांगू तुझ्या त्या राष्ट्रगीताचं कौतुक!’ पुढे तो अजून काय काय बोलला .. मला खूप कसंतरी झालं.. सगळीच मोठी माणसं लहानपणी कितीतरी र्वष शाळेत राष्ट्रगीत म्हणतात.. मला तर बाबा नेहमीच राष्ट्रगीत म्हणताना सॉलिड भारी वाटतं.. त्याला का नाही वाटलं? आपण अतिशहाणे आहोत असं कसं वाटू शकतं या मोठय़ा माणसांना?’
   समीरच्या या बोलण्यावर मग एकच गोंगाट सुरू झाला. त्यात मोठय़ा माणसांचं रस्त्यात थुंकणं, प्लास्टिकच्या पिशव्यांचा नियमबाह्य़ वापर आणि त्यांचा रस्त्यावर, पाण्यावर, झाडावर, गल्लीबोळात पडलेला घाणेरडा कचरा, लबाडय़ा, बुवाबाजी या अनेक विषयांवर एकाच वेळी सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली. मला अगदी हताश वाटायला लागलं.. मुलांचं म्हणणं अगदीच खोटंही नव्हतंच! पण त्याचं इतकं टोकाला जाऊन फक्त वाईट बाजूचं वर्णन करत राहाणं ही मनाला पटत नव्हतं.. प्रश्न प्रत्येक पिढीसमोर असतात.. या मुलांच्या समोर असलेले प्रश्न नक्कीच अधिक तीव्र आहेत, बिकट आहेत असा ही विचार मनात चमकून गेला.
मी मुलांना म्हटलं, ‘बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. काही मोठी माणसं चुकीचं वागतायत असं आपण मान्य करू.. पण ही चुकीचं वागणारी माणसं जेव्हा या जगातून निघून जातील तेव्हा त्यांची जागा घेतील दुसरी मोठी माणसं.. म्हणजे तुम्ही..  हो ना?’ काही क्षण शांतता पसरली. मग समीर म्हणाला, ‘असं का वाटतं मावशी तुला? आम्ही चांगल्या मोठय़ा माणसांची जागा घेऊ ना.’ मी म्हणाले, ‘हो.. पण त्यासाठी मग तुम्हाला आत्तापासून प्रयत्न करायला हवेत. कारण उद्या तुमचा आहे. तो सुंदर करायचा की आजपेक्षाही अधिक वाईट हे तुम्हीच ठरवायचं.. यावर मात्र कुणीच काही बोललं नाही. आपल्याच विचारात मुलं घरी गेली आणि मी मात्र जगातल्या सगळ्याच मुलांच्या भविष्याचा विचार करत बसले बराच वेळ! याच विमनस्क अवस्थेत दिवस संपला. मुलांनी मला अनेक गोष्टींवर विचार करायला भाग पाडलं होतं..
 लहान मुलांच्या सांगीतिक विश्वात मी गेली १६-१७ वष्रे काम करतेय. त्यांच्याबरोबर, त्यांच्यातलीच एक होऊन त्यांच्या मनापर्यंत पोचायचा प्रयत्न करत असताना गाण्याबरोबरच माणूस म्हणून घडण्यासाठी मी त्यांना काय देऊ शकते त्याचा ही विविध प्रयोगांतून प्रयत्न करत असते. एकाच वेळी त्यांची गुरू आणि मत्रीण होणं मला जमतं, कारण गुरूपेक्षा कधी कधी त्यांची मत्रीण होणं जास्त गरजेचं असतं हे मी मनापासून मान्य केलंय. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यामुळेच मुलांना गाणं आवडायला लागलं पाहिजे, निदान तशी उत्सुकता त्यांना वाटली पाहिजे. यासाठी काय करावं याचा विचार मी सतत करत असते. त्या दिवशीची रात्रही त्याच विचारात संपली.
 पहाटे प्रसन्न जाग आली तेव्हा एक अत्यंत सुंदर विचार मनात उमलत होता.. बालस्वर! त्या विचाराचा मागोवा घेत राहिले.. मला एक छानसा रस्ता सापडला होता. मुलांचं विश्व सजग करणारा.. बालस्वर म्हणजे मुलांचा आवाज.. बालस्वर हा मुलांचं भविष्य आनंदमय व्हावं यासाठी प्रयत्न करणारा एक प्रेरणेचा मंत्र. एक असं गीत जे मुलं स्वत:च गातील स्वत:च्या प्रगल्भ आणि सकारात्मक उद्यासाठी. प्रेरणागीतातून मिळणारी स्फूर्ती आपण सर्वानीच आपल्या बालपणापासून अनुभवली आहे. हे स्वयंस्फूर्तीचं बीज जेव्हा संघटित स्वरूपात ‘एक स्वर एक ताल’ होऊन बालस्वरातून व्यक्त होईल तेव्हा हाच स्वर उत्तम मूल्यनिर्मिती करणाऱ्या उद्याच्या संघटित विश्व-समाजाची नांदी ठरू शकेल, हे असेल त्या दिशेने घडणाऱ्या सामाजिक उन्नतीचं पहिलं शक्तिमान पाऊल! किती रम्य आणि किती स्वाभाविक विचार होता हा.. मग मी पाठ नाही सोडली. ठरवलं हा विचार प्रत्यक्षात आणूयाच!
मूल म्हणजे मूल असतं.. कुठल्याच मर्यादेत न अडकलेलं.. आणि स्वर ही तसाच.. अमर्याद, भाषेचं बंधन नसलेला.. मूल म्हणजे निरागसता आणि स्वर म्हणजे आश्वासकता! या दोन्हीच्या मेळातून उमललेलं बालस्वर! मुलांचं उद्याचं जग सुंदर, समृद्ध व्हावं असं समाजातील प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला वाटतं.. त्यामुळेच हे गीत असेल प्रत्येक मुलाचं, प्रत्येक मुलाच्या पालकाचं, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षकाचं!
जेव्हा ही कल्पना माझ्या मनात स्पष्ट झाली तेव्हा मी ती अनेक मुलं, संगीतज्ञ, समाजधुरीण, साहित्यिक, शिक्षण संस्था, हितचिंतक यांच्यासमोर व्यक्त केली. आज त्या कल्पनेला एका भव्य प्रकल्पाचं स्वरूप आलं आहे. १४ नोव्हेंबर २०१४ या दिवशी प्रकाशित होईल विश्व संपन्नतेच्या संकल्पाचं एक प्रेरणागीत! १४०० बालगायकांच्या संघटित समूहात १४ भाषांतील नामवंत कवींच्या लेखणीतून साकार होणारा हा चतन्यमय प्रकल्प!!
२०१४ साली प्रत्यक्षात येणाऱ्या याच बालस्वर संकल्पनेचे पाहिले पाऊल म्हणजे या वर्षी बालदिनाच्या निमित्ताने साकार होणारे दोन कार्यक्रम! १३ नोव्हेंबर २०१३ या दिवशी एन.सी.पी.ए. आयोजित ‘उडान’ या कार्यक्रमात आणि १४ नोव्हेंबर १३ रोजी सावरकर स्मारक दादर येथे बालस्वर  the half note हा ९ ते १३ या वयोगटांतील बाल गायकांचा शास्त्रीय बंदिशींवर आधारित अभिनव कार्यक्रम!   
कलांगण निर्मित या भव्य प्रकल्पाला मुंबईतील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, सांगली शिक्षण संस्था आणि अलिबाग परिसरातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणारे चित्रा पाटील यांचे झेप फाऊंडेशन यांचे विविध पातळ्यांवर सहकार्य होते आहे. अनेक नामवंत कवींच्या कविता, अनेक शाळांमधील बालगायक, प्रायोजक, सामाजिक संस्था, प्रत्येक पालकाचा आíथक मदतीचा खारीचा वाटा, बालस्वर आणि बालकांचा विचार व्यक्त होणाऱ्या विविध स्पर्धा या आणि अशा अनेक आघाडय़ांवर कलांगणचा ‘बालस्वर’ कसून कामाला लागला आहे, पुढच्या पिढीचा स्वर अधिक सक्षम, बलशाली आणि सकारात्मक ऊर्जेने भरण्यासाठी!            
kalavarshab@gmail.com