डॉ. बी. टी. लहाने

अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून मी इंग्रजी विषय ऐच्छिक घेऊन पदवी प्राप्त केली आणि मराठवाडा विद्यापीठात ‘एम.ए. इंग्रजी’ साठी मानव्य विद्याशाखेच्या दुमजली इमारतीतील प्रवेश केला. सुदैवानं मला मुलांच्या वसतिगृहातही प्रवेश मिळाला. नियमित वर्ग सुरू झाले आणि एकापेक्षा एक विद्वान शिक्षकांच्या सान्निध्यात अस्खलित इंग्रजी भाषा आणि वाङ्मयाचा अभ्यास सुरू झाला. तेव्हा विभागप्रमुख होते प्रोफेसर रवींद्र किंबहुने.  सडपातळ बांधा, साडेपाच फूट उंची, धारदार नाक, तेजस्वी डोळे, पांढरी दाढी, झुपकेदार मिशा, अंगावर खादीचा बुशशर्ट, साधी पॅन्ट, खांद्याला लटकवलेली खादीची शबनम आणि शबनममध्ये केवळ नव्यानं प्रकाशित झालेली पुस्तकं. एक पाय अपंग. सरांचं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होतं. चारही भाषांमधल्या समग्र साहित्याचा सखोल अभ्यास होता. विषयाची मांडणी तर जणू खळाळता झराच!

Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप
pune university, pune city of universities
वर्धापनदिन विशेष : विद्यापीठांचे पुणे
in Kalyan student beaten for playing cricket
कल्याणमध्ये क्रिकेट खेळण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण
salary criteria of postgraduate doctors
खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर डॉक्टरांच्या विद्यावेतन निकषाला छेद! निवासी डॉक्टर संतप्त…

सरांची भेट झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं प्रभावित झाला नाही असा विद्यार्थी मला पाहायलाच मिळाला नाही. पहिल्या वर्षी ते आम्हाला शिकवायला नव्हते, पण दुरून दर्शन होताच आम्ही धन्य व्हायचो. नव्हे, त्यासाठी त्यांच्या केबिनसमोरून दर्शन होत नाही तोपर्यंत चकरा मारायचो! एकदा डोळे भरून त्यांना पाहिलं, की कुणी तरी दैवी पुरुष भेटल्याचा आनंद आम्हाला व्हायचा. ‘एम.ए.’ प्रथम वर्ष परीक्षेचा निकाल लागला. भयभीत होऊन मी निकाल पाहिला, कारण त्या काळी ‘बी. प्लस’ म्हणजे ५५ टक्के गुण मिळवणं दुरापास्त होतं. ८०० पैकी केवळ दोन-चार विद्यार्थ्यांनाच बी प्लस मिळवता येई. मला चक्क  ६२ टक्के गुण होते आणि प्रथम श्रेणी. माझा आनंद गगनात मावेना.

  दुसरं वर्ष सुरू झालं आणि पहिल्याच दिवशी मला निरोप आला, की किंबहुने सरांनी भेटायला बोलावलं आहे. माझी भंबेरी उडाली. माझं काही चुकलं की काय? हिंमत होईना! मी भीत भीत ‘मे आय कम इन सर’ म्हणत सरांच्या कक्षात गेलो. सर खुर्चीत वाचन करत बसले होते. खाली पाहूनच त्यांनी आत यायला सांगितलं. मी लटपटत त्यांच्या पुढय़ात उभा राहिलो आणि ओळख सांगितली. सर म्हणाले, ‘‘अरे हो! तू लहाने का?’’ माझ्या कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीची जाणीव त्यांना माझ्या कपडय़ांवरूनच झाली! त्यांनी गुणांबद्दल माझं अभिनंदन केलं आणि अडचण आल्यास भेट म्हणून सांगितलं. एके दिवशी त्यांचा निरोप आला. भेटायला गेलो, तर सरांनी माझ्यासाठी नवीन ड्रेस आणला होता. त्या दोन वर्षांत आणि मला नोकरी मिळेपर्यंत सरांनी आपल्या दोन मुलांबरोबरच मलाही कपडे आणि पादत्राणं घेतली. तेव्हा मी शिकलो, की शिक्षक हा केवळ शिक्षक नसतो तर तो मायबापही असतो आणि आजपर्यंतच्या सेवेत मी ते व्रत जपण्याचा प्रयत्न करत आहे.

एकदा इंग्रजी विभागात एका चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. प्रमुख पाहुणे होते वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. एजाज अहमद. चर्चासत्राचं प्रास्ताविक करण्याचं काम किंबहुने सरांकडे होतं.  सर डायसवर आले आणि सुरू झाला विद्वतेनं काठोकाठ भरून वाहणारा धबधबा! सर्व सभा शांत झाली होती. प्रमुख पाहुणे पाहातच राहिले. त्यांच्या मुख्य भाषणास त्यांनी सुरुवात केली आणि म्हणाले, ‘‘प्रो. किंबहुने यांच्यासारखे विद्वान या विद्यापीठात असताना माझ्यासारख्या व्यक्तीस कशास बोलावले?’’ त्यांनी सरांना वाकून नमस्कार केला. ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ या सुभाषिताचा अर्थ तेव्हा मला समजला. तेव्हापासून आजतागायत मी एकही क्षण रिकामा घालवत नाही. सदैव वाचत राहातो.  एकदा माझी तब्येत बरी नव्हती. हे सरांना जेव्हा कळलं तेव्हा ते तडक वसतिगृहात माझ्या खोलीवर आले. सर्व मुलं अवाक् झाली. सर मला दवाखान्यात घेऊन गेले. अर्थात डॉक्टरांची फी, औषधं, सर्व खर्च त्यांचाच. माझी परीक्षा फी त्यांनीच भरली आणि मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.

एकदा बाजारात गेलो, तर सरांच्या हातात सामानाच्या दोन पिशव्या. मी धावत जाऊन त्यांच्या हातातल्या पिशव्या घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी साफ इन्कार केला. म्हणाले, ‘कॅरी अवे माय स्कॉलरशिप, नॉट लगेज!’ (अर्थात ‘माझी विद्वता वाहून ने, सामानाचं ओझं नको.’) त्याचा एक भाग म्हणून मी आता ‘साधना’ साप्ताहिकाच्या बालकुमार अंकाच्या शंभर प्रती दरवर्षी विविध शाळांत वाटतो. आज त्याला बारा वर्ष पूर्ण झाली. विद्वतेचा प्रचार झाला पाहिजे ही शिकवण मला मिळाली.  किंबहुने सरांनी आम्हाला शेक्सपिअर शिकवला. ते हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लियर, मॅकबेथ, अ‍ॅन्टनी आमच्यासमोर उभे करायचे. एकदा त्यांनी सांगितलं होतं, की त्यांनी शेक्सपिअरचं प्रत्येक नाटक किमान तीस वेळा वाचलं आहे आणि दहा-दहा वेळा छोटय़ा पडद्यावर पाहिलं आहे. शिक्षक कसा व्यासंगी असावा हे सरांकडून शिकलो. म्हणूनच मी विषयाची पूर्वतयारी केल्याशिवाय वर्गात जात नाही. सरांची क्वार्टर होती पाच खोल्यांची. त्यापैकी तीन खोल्या पुस्तकांनी भरलेल्या होत्या. त्यातले सर्वच्या सर्व ग्रंथ सरांनी वाचलेले होते. घरात भांडी फक्त दररोजच्या वापराइतकी. सोफा नाही, दिवाण नाही, ‘ए.सी.’ नाही. घर फक्त विद्यार्थी आणि पुस्तकांसाठी!  अशा विद्वान, विद्यार्थिप्रिय शिक्षकाच्या मी अनेक वर्ष सहवासात राहिलो आणि धन्य झालो. २०१८ मध्ये सरांचं हृदयविकाराच्या आजारानं निधन झालं. त्यांची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. पंढरीचा राणा तर आहेच, पण माझे तीर्थरूप आईवडील आणि रवींद्र किंबहुने सर हे तीन देव मी साक्षात अनुभवले आहेत!

‘थिअरी’पलीकडचं शिक्षण

डॉ. सुजाता मोरे चव्हाण

शाळा आणि पदवीपर्यंतच्या शिक्षणात मला कायम स्मरणात राहतील असे शिक्षक भेटले नव्हते; पण पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या वेळच्या दोन शिक्षिकांचा प्रामुख्यानं उल्लेख करावासा वाटतो त्या म्हणजे फ्रेनी इटालिया आणि विनीता चितळे.  मी समाजसेवा शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. समाजसेवा शास्त्र या विषयाची तत्त्व आणि कौशल्यं ही थिअरीमध्ये शिकवली जातात; पण ती वापरताना तितकी सोपी नसतात. आपल्या मनातले समज- गैरसमज जाणून घेऊन ते बाजूला ठेवणं, मिळालेली माहिती गोपनीय ठेवणं, वस्तुनिष्ठ विचारसरणी असणं, व्यक्तींचा आदर करणं, या तत्त्वांचा त्यात समावेश असतो. ती प्रत्यक्षात आचरणात आणताना कित्येक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आपल्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या बाजूला ठेवून समस्याग्रस्त व्यक्तीला मदत करायची असते. सहानुभूती दाखवतानाच तटस्थ राहाणं गरजेचं असतं. मदत मागणाऱ्या व्यक्तीनं समस्या सोडवण्यासाठी निवडलेला पर्याय आपल्याला पटला नाही, तरी त्याचा आदर राखून त्या पर्यायाच्या परिणामांची जाण त्या व्यक्तीस शांतपणे करून देणं हे समुपदेशकाचं कार्य असतं. समुपदेशनात बऱ्याचदा वैयक्तिक माहिती विचारली जाते. जेव्हा समुपदेशन खूप काळ चालतं तेव्हा समस्याग्रस्त व्यक्तीही समुपदेशकाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल प्रश्न विचारतात. अशा वेळी खूप सावधतेनं आणि माहिती न देताही त्या व्यक्तीस वाईट वाटणार नाही अशी उत्तरं द्यावी लागतात. मुलांबरोबर काम करताना त्यांच्या वयाचा विचार करून खेळातून, गप्पांतून समुपदेशन करावं लागतं. माझ्या या दोन शिक्षिकांनी या प्रवासात मला खूप शिकवलं. 

शांत आणि शिस्तप्रिय अशा फ्रेनी मॅडमनी शिकवलेलं इतकं अंगात मुरलं, की त्यानंतर आजपर्यंत मी ते वापरत आहे. एक वर्ष त्या मला शिकवायला होत्या, पण आजसुद्धा त्यांच्याशी माझा संपर्क आहे. मुलांचं समुपदेशन या क्षेत्रात त्या कित्येक वर्ष कार्यरत होत्या. माझं भाग्य, की मला त्यांच्याकडून मुलं व पालक यांच्याबरोबर कसं काम करावं हे शिकायला मिळालं. आता त्या निवृत्त झाल्या आहेत, पण त्यांच्याशी संभाषण केल्यावर आनंद मिळतो. ‘समोरची व्यक्ती कुणीही असो, व्यक्ती म्हणून त्याचा सन्मान राखलाच पाहिजे,’ ही शिकवण विनीता चितळे बाईंकडून मला मिळाली. अल्कोहोलिक व्यक्तींसोबत खूपदा बाईंबरोबर काम करायची संधी मला मिळाली होती. त्याचबरोबर ‘आपणही चूक करू शकतो आणि ती मान्य करून सुधारणा करावी’ ही शिकवणही त्यांच्याकडून मला मिळाली. त्या माझ्यापेक्षा वयानं खूप मोठय़ा, पण कधी एखादी चूक त्यांच्याकडून झाली, तर स्वत:हून त्या ती मान्य करत. ही मोलाची शिकवण त्यांनी दिली. समुपदेशनात मदत मागणारी व्यक्ती कोणत्याही वयाची असली, तरी त्या तिला एकेरी नावानं कधी संबोधत नसत. त्यांची शिकवण होती, की मदत मागणारी व्यक्ती आज काही समस्या घेऊन आली असली, तरी समुपदेशनानं ती त्यातून बाहेर यावी आणि भविष्यात कोणतीही समस्या स्वत: सोडवू शकण्यास सक्षम व्हावी, हे आपण पाहायला हवं. क्लिष्ट विषय सोपी उदाहरणं देऊन समजावून देण्याची त्यांची हातोटी होती. समस्येचं विश्लेषण त्या उत्तम प्रकारे करत. त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला व करायला आवडत. मला कधी काही नवीन करायचं असलं की अपयशाची भीती वाटायची. मी ते करू शकीन का, असं वाटायचं. पण मला काही नवीन प्रयोग करायला त्या प्रोत्साहन देत. यश-अपयश हे सापेक्ष असतं. शिवाय आज नाही आलं तरी प्रयत्न चालू ठेवायचे, पुढे एक ना एक दिवस आपण जे साधायचं ते साधणारच, असा मनात विश्वास बाळगायचा. प्रत्येक जण प्रयोग करूनच शिकत असतो, हे मी त्यांच्याकडून घेतलं. त्यांचा पाठिंबा मला अनेकदा नवीन साहसी निर्णय घेताना मिळाला. त्यांचा स्वभाव मवाळ आणि प्रेमळ होता. आज त्या या जगात नाहीत, पण त्यांची शिकवण मनात आहे. 

या दोन्ही शिक्षिकांनी थिअरी तर शिकवलीच, पण पुस्तकात नसलेल्या, आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या. त्यांची शिकवण केवळ परीक्षेपुरती नव्हती. बऱ्याचदा न सांगता, त्यांच्या देहबोलीतून त्यांनी शिकवलं. त्यांची मी कायम ऋणी आहे.