माधवी मसुरकर

मालवण या निसर्गरम्य शहरातली सुप्रसिद्ध ‘टोपीवाला हायस्कूल’ ही माझी शाळा. माझ्या जीवनाचं एक अविभाज्य अंग. या शाळेतल्या स्मृती नेहमीच खूप हळव्या करतात मला. अनेक शिक्षकांचं मला मिळालेलं निरतिशय प्रेम हा अमोल ठेवा आहे माझ्यासाठी. त्यातले एक माझ्या अत्यंत जिव्हाळय़ाचे शिक्षक जिनेंद्र देवप्पा रुगे सर.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

‘टोपीवाला हायस्कूल’मध्ये ते ३२ वर्ष शिक्षक होते. १९९८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आपल्या गावी, इचलकरंजीला स्थायिक झाले. नंतर खूप प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. चोवीस वर्ष मी त्यांचा फोन नंबर शोधत होते. अचानक अगदी अलीकडेच त्यांचा संपर्क क्रमांक माझ्या एका ‘मालवण ग्रुप’नं मिळवून दिला आणि गेल्या महिन्यात त्यांना इचलकरंजीला जाऊन भेटण्याचा सुवर्णयोग आला. ‘मी भेटायला येतेय’ एवढंच सरांना सांगितलं, तर ते एवढे आनंदित झाले, की त्यांनी प्रश्नांची अगदी सरबत्तीच सुरू केली. ‘‘तू कशी आहेस? कुठे असतेस? काय करतेस? नोकरी करतेस की रिटायर झालीस? मुलं काय करतात?’’ असे किती तरी प्रश्न. मी म्हटलं, ‘‘सर, मी येतेच आहे तुम्हाला भेटायला. सर्व सांगते आरामात.’’ ‘‘हो हो.. ये नक्की ये. मी वाट पाहतो.’’

‘भेटी लागे जीवा लागलीसे आस..’ अशीच काहीशी अवस्था माझी झाली होती. मी इचलकरंजी गाठली तर त्यांचा मुलगा जीवन गाडी घेऊन आमच्या स्वागताला तयार होता. घरी गॅलरीमध्ये सर माझी वाट पाहत उभे होते. वयाची ८२ वर्ष त्यांनी ओलांडली आहेत, पण सरांच्या दिसण्यात काहीच फरक जाणवला नाही मला. अगदी शाळेत दिसायचे तसेच वाटले. नंतर त्यांच्या पत्नीकडून कळलं, की त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आणि आता-आताच ते त्या दुखण्यातून थोडे बरे व्हायला लागले आहेत. सर मात्र त्यांच्या वागण्याबोलण्यातून अजिबात त्याची जाणीव होऊ देत नव्हते.
खूप गप्पा झाल्या आमच्या. शाळेतल्या आठवणींना उजाळा मिळाला. मराठी विषय सर उत्तम शिकवायचेच, पण भूगोलसारखा रटाळ विषयसुद्धा अतिशय मनोरंजक पद्धतीनं ते शिकवायचे. बेशिस्त असणं मात्र त्यांना अजिबात खपायचं नाही. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता त्यांच्या वर्गात असायची. कुणी दुर्लक्ष करतोय असं त्यांच्या लक्षात आले तर ते डस्टर फेकून मारायचे. अर्थात ते कधीच कुणाला लागलं नाही, पण धाक राहावा म्हणून ते तसं करायचे. मी त्यांना याविषयी विचारलं, ‘‘सर, तुम्ही एवढे मृदू स्वभावाचे आहात, तर डस्टर फेकणं कसं काय जमायचं तुम्हाला?’’ त्यावर त्यांचं म्हणणं होतं, ‘‘मुलांनी अयोग्य गोष्टी टाळाव्यात, आदर्श वागावं हाच हेतू असतो. शिक्षकाचं काम नुसतं शिक्षण देणं नाहीये. आदर्श नागरिक घडवणं हे आहे. मग मुलांकडून त्यासाठी वाईटपणा मिळाला तरी चालेल.’’ डॉ. राधाकृष्णन हेच म्हणाले होते- kThe importance of education is not only in knowledge and skill but it is to help us to live with others. सरांचं आजही अनेक विद्यार्थ्यांशी अतूट नातं आहे. ते नातं आदराचं आहे, विश्वासाचं आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी मुलांच्या विकासासाठी वाहून घेतलं. शालीनतेनं, सहनशीलतेनं, संयमानं कठीण प्रसंगाला तोंड कसं द्यायचं हे सरांकडून शिकावं. शाळेमध्ये असताना मला निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत जे असंख्य पुरस्कार मिळाले त्याचं श्रेय रुगे सरांना जातं. निबंध कसा मुद्देसूद लिहावा किंवा वक्तृत्व कसं असावं- ज्यानं श्रोत्यांची मनं जिंकता येतील, याचे सर्व धडे मला रुगे सरांनीच दिले होते. त्याचा उपयोग मला आताही होतो आहे. मी करोनाकाळात ललित लेखनाला सुरुवात केलीय हे सरांना सांगितल्यावर ते खूप खूश झाले. ‘मला हे अपेक्षित होतं,’ असं ते म्हणाले. सर स्मार्टफोन वापरत नाहीत. त्याबद्दल विचारलं तर म्हणाले, ‘‘स्मार्ट फोनचं वेड मला नाही. त्यात निरुपयोगी गोष्टीच जास्त येतात. आपला बहुमूल्य वेळ वाया जातो. मला अजूनही पुस्तकवाचनच आवडतं. त्यात जो आनंद आणि खरं ज्ञान आहे ते या मोबाइलमध्ये नाही! खूपशा गोष्टी दिशाभूल करणाऱ्याच असतात. तू मात्र लिहीत राहा. आनंदी राहाशील.’’ रुगेबाईंनी वरच्या मजल्यावर असलेली त्यांची पुस्तक लायब्ररी दाखवली. छान ओळीनं पुस्तकं लावलेली होती. जुन्या-नव्या पुस्तकांचा तो छान संग्रह होता.

आदर्श शिक्षक व्हायला पीएच.डी. मिळवावी लागत नाही. रुगे सरांनीही ती मिळवलेली नाही; पण त्यांचं वागणं आणि त्यांचं अद्ययावत ज्ञान त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला काही तरी शिकायची प्रेरणा देतं. अनेक उत्तम विद्यार्थी सरांनी घडवले, जे आज मोठमोठय़ा पदांवर कार्यरत आहेत. कुणी स्वत: पुस्तक लिहिलं आणि त्यावर प्रस्तावना मागितली, तर सर ती आवर्जून देतात. ‘टोपीवाला हायस्कूल’च्या प्रा. अशोक बाबर यांनी सेवानिवृत्तीनंतर ‘गरुडझेप’ हा छान काव्यसंग्रह काढला. त्याला सुरेख प्रस्तावना रुगे सरांनी दिली आहे. आजही सरांच्या निवृत्तीनंतर बरेच विद्यार्थी त्यांना भेटायला येतात आणि सरांनी शिकवलेल्या गोष्टी ते आजही विसरलेले नाहीत हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा राहत नाही. ते म्हणतात, ‘‘हीच माझी कमाई आणि हीच माझी पुण्याई. मी धन्य आहे!’’

शिस्तप्रिय, क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष असे माझे सर माझ्यासाठी आदर्श शिक्षक आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त माझे तिसरे पालक, जिव्हाळय़ाचे मित्र, माझी प्रेरणा, माझे मार्गदर्शक, माझे शुभचिंतक.. सर्व काही होते आणि आहेत. त्यांना निरोगी आणि सुखी संपन्न दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

कडक शिस्तीतलं घडणं

गौरी सहस्रबुद्धे

‘‘हात धुवायला जाताना आपले आपले डबे घेऊन जायचे आहेत.’’ आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलं. रांग करून आम्ही मुलंमुली उभे राहिलो. तळमजल्यावर हौद होता, तिथे जाऊन हात धुऊन मग रांगेत बसून, श्लोक म्हणून झाल्यानंतर डबा खायचा, ही शाळेची पद्धत होती. जिना उतरल्यावर समोरच केळकरबाई प्रत्येकाचे डबे तपासत होत्या. डबा प्लास्टिकचा नको आणि डब्यावर नाव हवंच, हा दंडक. माझा स्टीलचा डबा नवीन होता, पण त्यावर नाव घातलेलं नव्हतं. नाव न घालता डबा शाळेत आणायचाच नाही, हा नियम असतानादेखील माझ्याकडून तो मोडला गेला होता. कदाचित आईनं घरातला दुसरा डबा दिला असेल, आठवत नाही. माझी वेळ आली आणि बाईंनी डबा मागितला. माझ्या आईनं नाव घातलेला डबा दिलेला नाही, म्हणून बाईंनी मला यथेच्छ ऐकवलं. मला वाईट वाटलं त्या वेळी; पण आईवडिलांनी नियम पाळले तर मुलंही पाळतील असं काहीसं सांगायचं असेल त्यांना. अर्थात ही घटना आहे चाळीस वर्षांपूर्वीची!

किती तरी छोटय़ा गोष्टींतून वेळ, नियम, शिस्त अशा सगळय़ांची सांगड घालायला शिकवलं ते आमच्या अवंतिकाबाई केळकर यांनी. सोलापूरच्या ‘बाल विकास मंदिर’च्या जनक आणि मुख्याध्यापिका अवंतिकाबाई केळकर आणि बाईंना तितक्याच समर्थपणे साथ देणारे त्यांचे पती ज. वा. केळकर सर. अत्यंत साधी, स्वच्छ राहणी, पण कर्तृत्व खूप मोठं. आज ते दोघंही नाहीत, मात्र आठवणींत आहेतच. आयुष्यात मी आज काही कमावलं असेन, ताठ मानेनं जगत असेन ते केवळ आईवडील आणि असे शिक्षक यांच्यामुळेच. माझी ही शाळा सातवीपर्यंतच असल्यानं शिंगे फुटण्याआधीच मनावर झालेले संस्कार घट्ट बिंबवले गेले ज्याचा उपयोग नंतरच्या आयुष्यात झाला.अगदी कोवळय़ा वयापासून फक्त पुस्तकी नाही, तर जगात सक्षमपणे जगण्याचं ज्ञान नकळत देणाऱ्या केळकरबाई. शाळा म्हणजे साक्षात सरस्वतीचं मंदिर ही भावना पक्की मनात रुजावी म्हणून या मंदिरात प्रवेश करताना चप्पल घालायची नाही असा नियम होता. बाहेरील खुल्या कपाटाच्या कप्प्यात ती नीट काढून ठेवावी लागायची. मादाम माँटेसरी यांचा मोठा फोटो लावलेल्या हॉलमध्ये पहिली प्रार्थना व्हायची. ज्यांचा वाढदिवस असे त्यांना शुभेच्छा दिल्या जायच्या. त्या वेळी वर्तमानपत्रातलं एखादं महत्त्वाचं सदर, माहिती बाई स्वत: मुलांना वाचून दाखवायच्या. एक आदर्श पिढी घडवावी, ज्ञानार्जन व्हावं, ही त्यांची तळमळ प्रत्येक गोष्टीतून दिसायची. विनाअनुदानित शाळा एकटीनं समर्थपणे चालवणं सोपं काम नक्कीच नव्हतं, पण त्यांनी ते पार पाडलं. बाईंचा एक पाय अधू होता. त्यामुळे एका पायात सपाट चप्पल तर दुसऱ्या पायात उंच चप्पल असायची. पण ते त्यांच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही. ज्या काळात त्यांनी शाळा सुरू केली असेल त्या काळीसुद्धा त्या किती घट्ट आणि करारी असतील हे त्यांच्या देहबोलीतूनच कळायचं. बाई कधी तरी अचानक मुलांच्या वह्या तपासायला मागायच्या. मला आठवतंय, पाचवीत असताना एकदा वहीवरच्या नटीच्या चेहऱ्याला मी दाढीमिशा काढल्या होत्या. ते बघून बाईंचा भरपूर ओरडा खाल्ला होता. एकदा केलेली चूक त्या ओरडतील या भीतीनं पुन्हा व्हायची नाही.

शाळेत ग्रंथालय होतं. मुलांना मधल्या सुट्टीत पुस्तके वाचायला मिळायची. शाळेची शिस्त कडक होती. अगदी मधल्या सुट्टीतसुद्धा उगाच इकडून तिकडे मुलं व्हरांडय़ातून पळापळी करताहेत असं दृश्य कधी दिसलं नाही. पाणी पिण्यासाठी प्रत्येक मजल्यावर मोठे हौद, त्यात नियमित पोटॅशियम परमँग्नेट मिसळलं जायचं. साखळीला लावलेलं स्टीलचं फुलपात्र, पाणी पिऊन झालं की आपापलं विसळून ठेवायचं, हाही नियम. रस्त्यावरचे पदार्थ, गोळय़ा, चॉकलेट न खाणं हे नियम होतेच. इतक्या छोटय़ा वयात इतकं शिस्तबद्ध शिक्षण आणि जीवनमूल्यं मिळणं ही आजकालच्या जमान्यात दुरापास्त गोष्ट बनली आहे. एका वर्गात केवळ पंचवीस ते तीस विद्यार्थी. एका बाकावर एक मुलगा, एक मुलगी बसायचे. डब्यात पोळी-भाजीच हवी. अगदी श्रावणी शुक्रवार आहे म्हणूनही पुरणपोळी आणलेली चालायची नाही. शाळा सुटल्यावर सातवीत शिकणाऱ्या मुलांनी तिथल्या बागेला पाणी घालायचं, तर मुलींनी वर्गात स्वच्छता करायची, अशी पद्धत. याचा उद्देश मुलांना सर्व कामांची सवय लागावी हाच. मुलांचे पालक व्यवसायानं कुणीही असोत. शाळेसाठी ते एकसमान. जातपात, धर्म यांचा चुकूनही कधी उल्लेख होत नसे. शाळेचा वाढदिवस असो, स्नेहसंमेलन असो किंवा गणपती उत्सव, सगळे साधे, भपका नसलेले, पण भारतीय परंपरा जपणारे असायचे. अभ्यास तर हवाच, पण बाहेरील जगाची ओळख होण्यासाठी फलक लिहिले जायचे. ते मुलांनी नियमित वहीत उतरवून घ्यायचे अशी पद्धत होती. मला वर्गात दंगा केला, खोडय़ा काढल्या म्हणून भरपूर शिक्षाही झालेली आहे, पण त्या वेळी कधी आईबाबा मध्ये पडायचे नाहीत.

बाई आणि सरांना आठवताना त्यांनी मनात रुजवलेल्या तत्त्वांचा आणि विचारांचा पाया किती भक्कम आहे हे जाणवतं. जेव्हा माझ्या मुलांकडे बघते तेव्हा आपसूक वाटतं, की आधीची शिकवण पुढील पिढीकडे देण्यात आपण काही टक्के तरी नक्कीच यशस्वी झालो आहोत. गेली अनेक वर्ष गणिताच्या शिकवण्या घेताना आपल्या मनात रुजलेल्या चांगल्या काही गोष्टी या मुलांना सांगू शकते याचं समाधान वाटतं. जग झपाटय़ानं बदलत चाललं आहे. पालक वर्गासमोर मुलांची संस्कारमुळं घट्ट बनवण्याचं खूप मोठं आव्हान आहे. शिस्त, समानता, वेळेला महत्त्व, आदर, स्वावलंबन, साधेपणा ही मूल्यं महत्त्वाची. अशा वेळी बाई आणि सरांची आठवण येऊन त्यांचे ऋण फेडता येतील असं काही कार्य माझ्याही हातून घडावं, असा माझा सतत प्रयत्न सुरू असतो. अशा या माझ्या गुरूंना प्रणाम.

madhavimasurkar@gmail.com
gaurisahasrabudhe72@gmail.com