प्रा. डॉ. अशोक वाडेकर
खूप जुनी गोष्ट आहे ही. मी पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातून ‘एम.बी.बी.एस.’ झालो होतो. स्वत:चा दवाखाना टाकण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे पुढे वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाकडे वळण्याला पर्यायच नव्हता. पण पुण्यातच तसं करण्यात अडचण अशी होती, की मी स्थानिक अधिष्ठाता असलेल्यांची काही कारणानं खप्पामर्जी ओढवून घेतली होती आणि त्यांनी मला खुलेआम धमकीच दिली होती, की ‘‘पदव्युत्तर शिक्षणासाठी तू इथे येशीलच ना, तेव्हा मी तुझं हे सर्व देणं चुकतं करीन!’’ त्या काळी असं सर्रास चालत असे आणि त्यामुळे किती जणांचं तरी भविष्य काळोखलं होतं. मी माझं सोवळं भांडं मुंबईला टाकलं. शिवाय त्या काळी पुण्याच्या आणि मुंबईच्या पदव्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असल्याचं मानलं जात असे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांपैकी कमीत कमी दोन वर्ष तरी मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यालयाशी संलग्न रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून त्या त्या विषयाच्या वॉर्डात काम करणं आवश्यक असतं. त्या काळच्या नियमाप्रमाणे मुंबईबाहेरच्या विद्यापीठातून एम.बी.बी.एस. झालेल्या डॉक्टरांना पहिलं वर्ष ‘विना स्टायपेंड’ काम करावं लागे, जे माझ्यासाठी खडतर होतं. माझी आर्थिक चणचण कमी व्हावी, म्हणून मी त्या काळी ‘भारत ज्योति’ या रविवारच्या आवृत्तीत ‘अॅटिकस’ (ग्रीक नाटय़देवता) नावाने नाटय़परीक्षण करत असे. मुळात निवासी डॉक्टर म्हणून दिवसभर मरमर काम असतं, त्यातून हे ‘अॅटिकस’चं खेकटं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना! शिवाय मी मुंबईच्या ‘जे.जे.’ रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होतो, तरी अधिकृतपणे मी पदव्युत्तर विद्यार्थी होतो परळच्या ‘के.ई.एम.’ रुग्णालयाचा. (असे का, ते सांगत बसत नाही.) परिणामी जे.जे.मध्ये मी तसा उपराच होतो.
माझी काय कुतरओढ होते आहे कुणाला सांगू? असं मला होत असे. जे.जे.मधील मानद प्राध्यापक डॉ. सी.(चंद्रकांत) जी. सरैय्या यांच्या चाणाक्ष नजरेत हे भरलं. (तत्कालीन एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष आर. जी. सरैय्यांचे ते धाकटे बंधू.) माझ्या लवकरच ध्यानात आलं, की आपली इथे धडगत लागायची असेल, तर सी.जी. यांचा पाठपुरावा करण्याशिवाय पर्याय नाही. अगदी लोचटपणे मी त्यांच्या मागे मागे करत असे. कारणही तसंच होतं- माझ्या ‘के.जी.’पासून ‘पी.जी.’पर्यंत मला ‘सी.जी.’पेक्षा वरचढ शिक्षक मिळाला नव्हता! अगदी किचकटात किचकट विषयही त्यांनी असा समजावून सांगितला, की माझं मलाच समजत नसे, की ‘अरे, हे मला आतापर्यंत का समजत नव्हतं?’ पण सी.जी.ना खूश करणं सोपं नव्हतं. ते गुजराथी असले, तरी त्यांच्यावर इम्प्रेशन टाकण्यासाठीही त्यांच्याशी गुजराथी बोलणं त्यांना चालत नसे.
त्यांचं इंग्लिश म्हणजे ‘राणी’पेक्षाही र्फड! या सर्व खस्ता खात मी त्यांना चिकटून राहात असे. बाह्य रुग्ण विभाग किंवा शस्त्रक्रिया दिवस नसला की मानदवृंद आपापल्या कक्षात राऊंड घेतल्यावर ‘फरारी’ होत असे. पण सी.जी.? अंहं! सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या नियमाच्या वेळेत ते जे.जे.मध्येच राहणार. जादाची लेक्चर्स घेत, नाही तर ग्रंथालयात. तेव्हाच त्यांनी माझी ओढाताण पाहिली. माझ्याकडे स्वत:ची पुस्तकं घ्यायलाही पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी जे.जे.च्या ग्रंथालयातली पुस्तकं त्यांच्या नावावर घेऊन मला वापरायला दिली. खरं तर मी काही त्यांचा पदव्युत्तर विद्यार्थी नव्हतो. त्यांच्या युनिटमध्येही काम करत नव्हतो.
त्या काळी मराठी-गुजराथी यांचे संबंध (‘मुंबई बळकावली’ म्हणून) खूपच ताणले गेले होते. भरीत भर, मी ‘सी.जी.’ यांच्या प्रतिस्पध्र्याचा अधिकृत विद्यार्थी. आणि आणखी वाईट म्हणजे मी मुंबईचा एम.बी.बी.एस. नाही!
‘एम.डी.’च्या मुख्य परीक्षेला बसण्याची पूर्वअट म्हणून एक प्रबंध विद्यापीठानं स्वीकारणं विद्यार्थ्यांवर बंधनकारक असतं. तेही माझ्या कार्यबाहुल्यामुळे जमणं कठीण होत होतं. सी.जी.नी हे चाणाक्षपणे जाणलं आणि न बोलतासवरता त्यांनी सर्व ‘भट्टी’ जमवून देऊन तयार ‘भात’ माझ्याकडे सुपूर्द केला. नाही तर माझं काही खरं नव्हतं. श्रीरामाची सेवा मारुतीनं करायची, तर इथे मारुतीसाठी श्रीरामच धडपडत होता!
मनावर खोलवर ठसा उमटवणारी ती घटना.. स्त्रीरोगतज्ज्ञांची अखिल भारतीय वार्षिक सभा आग्रा इथे होती आणि सी.जी. या सभेचे उपाध्यक्ष होते. स्थानिक स्वागत समितीनं सर्व पदाधिकाऱ्यांना ताजमहाल कोरलेली चांदीची तबकं दिली. ते तबक घेऊन सी.जी. व्यासपीठावरून उतरले आणि पहिल्या रांगेत आपल्या आसनाकडे न जाता त्यांनी पाचव्या रांगेत बसलेल्या माझ्याकडे ते तबक सोपवलं. कोण मी? एक सामान्य कृमी-कीटक! त्यांच्या या कृतीमुळे मला अश्रू अनावर झाले होते. जे.जे.मध्ये मात्र सी.जी.ना टीकेचा भडिमार सहन करावा लागला. ‘तबक द्यायला जे.जे.चा कुणी ‘अधिकृत’ विद्यार्थी सापडला नाही का?’ म्हणून!
पुढे मीही वैद्यकीय मास्तर झालो, परीक्षक झालो. अन्य गावी परीक्षक असताना तोंडी परीक्षा उरकल्यावर काय करायचं, हा माझ्यासमोर पेच असतो, कारण मी टी.व्ही. बघत नाही, ‘पीत’ नाही. मग मी स्थानिक अधिष्ठात्याच्या अनुमतीनं तिथल्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स घेतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अन्यत्र काय चाललं आहे याची थोडीफार कल्पना यावी आणि माझीही वेळ कसा घालवायचा ही विवंचना मिटावी.
अशीच एकदा कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधली चार दिवसांची तोंडी परीक्षा संपली. मला परतीचे वेध लागले. माझं शेवटचं लेक्चर झालं अन् एका मुलीनं माझ्याकडे येऊन म्हटलं, ‘‘सर, मला तुम्हाला काही द्यायचंय.’’
मी उत्तरलो, ‘‘माझे विद्यार्थी, रुग्ण आणि हाताखालचे लोक यांच्याकडून मी काही स्वीकारत नाही. कारण तो नजराणा ठरतो.’’
तिनं माझ्यासमोर एक बंद पाकीट ठेवलं. उद्गारली, ‘‘सर, संशय निर्माण करणारं काहीच नाही. पण तुम्ही परतीच्या प्रवासातच हे पाकीट उघडा.’’ ती मुलगी, रिमा कपूर रडण्याच्या बेतात होती. मी पाकीट स्वीकारलं आणि गाडीत बसल्यानंतर ते उघडलं. तिनं लिहिलं होतं, ‘‘आज तक मैं परीक्षार्थी थी। आपने मुझे विद्यार्थी किया!’’ आता मी रडत होतो. कारण मला या प्रसंगात आमच्या ‘सी.जी.’शिवाय दुसरं कुणी आठवणंच शक्य नव्हतं.
बाळ कोल्हटकरांच्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातलं एक पद आहे- ‘आई, तुझी आठवण येते।’
त्या धर्तीवर मी म्हणतो, ‘सी.जी.’ तुझी आठवण येते!
chaturang@expressindia.com