स्वप्ना चव्हाण
जय हिंद, कोरडे सर!..




त्यांना अभिवादन करताना हेच शब्द सुचतात! खरं तर त्यांच्यासाठी ‘आदरणीय’ हा शब्दही मला तोकडा आणि कृत्रिम वाटतो. त्यांचं जगणं, त्यांचं असणं, त्यांचा कण न् कण आदर्श होता.
ते ‘आपल्यातून निघून गेले’ हेही खरं नाही. कारण ते जनसामान्यांत, आपल्यात नव्हतेच कधी. त्यांच्या विचारांची उंची आणि त्याचं पावित्र्य यांनी कधीच पारलौकिकाची पातळी गाठली होती, असं माझं मत.रमेश कोरडे सर- गोरा, हसतमुख चेहरा. उंच, धिप्पाड. राजिबडं, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. उच्चशिक्षित, कायद्याची पदवी सुवर्णपदकासह मिळवलेली. अर्थात हे आम्हाला दुसऱ्या कुणाकडून तरी कळलं. सरांच्या वागण्यात, बोलण्यात त्याचा कधीच लवलेश दिसला नाही. असं निगर्वी व्यक्तिमत्त्व. पांढरा सुती किंवा खादीचा झब्बा, ढगळ पायजमा ते घालत. पांढरी दाढी आणि स्वच्छ हसू! ऐटीत सायकल चालवणारे सर मला आठवतात. तेवढयाच ऐटीत भर बाजारात ‘जय हिंदू’ म्हणून अभिवादन स्वीकारायचे.
खरंतर चांगली पदवी, उत्तम इंग्रजी आणि अप्रतिम शिकवण्याच्या जोरावर त्यांना बक्कळ पैसा कमावता आला असता. पण त्यांच्या दृष्टीनं पैसा ही क्षुल्लक बाब होती. त्यांचं ध्येय त्याहून उंचीवरचं होतं. त्यांनी फक्त ज्ञानाचं बीज पेरलं.. जिथे आणि जसं जमेल तसं. त्यातला एखादा दाणा माझ्या इवल्याशा पोथीतही आला आणि जीवनाचं सोनं झालं. मंत्रालयात काम करत असताना ‘आय.ए.एस.’, ‘आय.पी.एस.’ मंडळी जेव्हा म्हणतात, ‘‘अरे, आपकी स्कूलिंग कहाँ से हुईं? आपकी इंग्लिश तो बहुत ही अच्छी हैं!’’ तेव्हा बुलाढाण्याच्या भारत शाळेत इंग्रजी गिरवणारे कोरडे सर माझ्या मनात मंद हसत असतात.
सहावीत असू आम्ही तेव्हा.. सर इंग्रजी शिकवत आणि थेट धडा वाचून घेत. आताशी तर पाचवीत आमची इंग्रजी बाराखडीशी ओळख झालेली. मग आमचे चिंतातुर चेहरे आणि तोंडाचा चंबू पाहून सर डोळे बारीक करून मिश्कील हसायचे, पण वाचन पुढे रेटायचे. मग कठीण शब्दाला पेन्सिलनं ‘अंडरलाइन’ करायची आम्हाला सवय लागली. त्याचे अर्थ शोधून लिहून ठेवण्यात मजा वाटू लागली. सर वर्गात शेवटच्या बाकापर्यंत फिरत फिरत शिकवायचे. त्यांची भीतीही तितकीच वाटायची. त्यांनी सोपं करून इंग्रजी आमच्या चिमण्या चोचींमध्ये व्याकरणासकट उतरवलंच! आणि आमच्याही नकळत जगभर कुठेही आत्मविश्वासानं वावरण्याचं शस्त्रच आमच्या हाती दिलं.
शनिवार-रविवारी घसरगुंडी, झोके खेळायला किंवा राणीच्या बागेत जाण्याचा ‘शॉर्टकट’ म्हणून आम्ही शाळेत जायचो. तर हा ‘गोल्ड मेडलिस्ट’ तपस्वी शाळेच्या माळय़ाबरोबर उन्हात घामाघूम होऊन कुदळ, फावडं घेऊन झाडांसाठी खड्डे करणं, कुठे खुरपणं, पाणी देणं करत असल्याचं दृश्य दिसायचं. ते मनावर संस्कार बनून कोरलं गेलं. श्रमाचं महत्त्व, वृक्षारोपणाचं महत्त्व त्यांनी भाषणातून नाही, स्वत: कृतीतूनच शिकवलं. पण त्यांच्या जवळ जाऊन विचारायची कधी हिंमत नाही झाली, की ‘सर हे काय करताय आणि का?’ तेवढा दरारा होता त्यांचा. सर्वधर्मसमभाव, प्रेम, त्याग, साधी राहणी- उच्च विचारसरणी ही तत्त्वं आता फक्त ‘व्हच्र्युअल’ बनून राहिली आहेत असं वाटतं. पण ही तत्त्वं खरीही असू शकतात आणि त्यानुसार जगणं खूप छान असू शकतं, याचं प्रत्यक्ष उदाहरण आमच्या शाळेत आमच्या पिढीला कोरडे सर आणि काका सर (मुकुंद लिखिते सर) यांच्या रूपानं बघायला, अनुभवायला मिळालं हे आमचं अहोभाग्य.
समाज म्हणजे काय, सामाजिक जीवन कसं असावं, समाजाभिमुख कसं वागावं, हे पाचवीच्या वर्गातल्या चिमुकल्या मेंदूंत उतरवणं हे काका सरांचं विशेष कसब. ‘ऑनेस्टी स्टोअर’चा अनोखा प्रयोग त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतला आणि प्रामाणिकपणाचा संस्कार इतरांबरोबर माझ्यातही रुजवला. यात एका पेटीत शालोपयोगी पेन-पेन्सिल-खोडरबर अशा वस्तूंचं दुकान एका उघडय़ा ट्रंकेत टेबलावर मांडलं जात असे. पण वैशिष्टय़ हे, की या दुकानाला दुकानदार नसे! किमतीची यादी लावली जाई. जी वस्तू हवी, तिची किंमत पेटीत टाकायची आणि वस्तू घ्यायची. साहजिकच प्रामाणिकपणा मुलांना शिकवला जाई.. न बोलता. तीन-चार वर्षांपूर्वी कोरडे सरांची मी घरी जाऊन भेट घेतली होती. ज्ञानाचे चार दाणे टिपणारी मी, इतक्या पाखरांच्या थव्यातून एक पाखरू त्यांना कसं ओळखू यावं? मीही तशी अपेक्षा नव्हती केली. पण त्यांना सगळं आठवलं.
मग ज्ञानपूर्ण, अभ्यासपूर्ण गप्पा रंगल्या. चार्वाकाबद्दल बोलले सर. त्यानंतरही मला खूप वेळा जाता आलं असतं, कारण पुणे तसं जवळच. पण काका सरांना भेटल्यानंतर मात्र मला धाडसच झालं नाही. काका सरांना आता दिसत नव्हतं. अगदी अंधूक दिसे. ऐकूही येत नव्हतं. विद्यार्थिनी आलीय भेटायला, पण आपण पाहू शकत नाही, याची वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटली होती. माझे हे दीपस्तंभ वार्धक्यानं असे तेजोभंग झालेले पाहण्याचं धाडस माझ्यातही नव्हतं. जातानाही ते विरक्तीचं, त्यागाचं उदाहरण देऊन गेले. कोरडे सरांनी सैनिकी मेडिकल कॉलेजला देहदान केलं. मृत्यूनंतर पार्थिवही विद्यार्थ्यांना शिकवेल, डॉक्टर बनवेल अशी त्यांची शेवटची इच्छा! काय बोलावं? फक्त हात जोडून नतमस्तक व्हावंसं वाटतं!
स्वआचरणातून संस्कार!
श्रीकृष्ण एकनाथ आगटे, साताऱ्यातलं एक सुसंस्कृत व ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व. माझा सर्वप्रथम सरांशी परिचय १९७५ मध्ये अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीच्या प्रवेशाच्या वेळी झाला. त्यानंतर जवळपास तीन दशकांहून अधिक काळ अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याचमुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची माझी दृष्टी अधिक समृद्ध होत गेली.
साताऱ्यात १९७० ते १९९९ पर्यंतच्या दशकांमध्ये समाजरचनेत सुसंस्कृत पिढय़ा घडवण्याची एक रचना शिक्षण संस्थांमधील अनेक शिक्षकांनी उभी केली होती. याच रचनेत श्रीकृष्ण आगटे सर अग्रस्थानी होते. याच काळात साताऱ्यात रामकृष्ण आश्रमामध्ये विविध नामवंत, विचारवंत व्याख्यात्यांच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रं भरवून समाजाला वैचारिक दिशा देण्याचं महत्त्वाचं कार्य घडलं. त्यात आगटे सरांचा पुढाकार होता. त्यामुळेच माझ्यासारख्या विद्यार्थ्यांची पिढी घडत गेली. होतकरू विद्यार्थ्यांनी आश्रमात संस्कार वर्गाला यावं असा त्यांचा आग्रह असे. प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळात रामकृष्ण आश्रमामध्ये चालणारी सामूहिक प्रार्थना आणि त्यानंतर विवेकानंदांच्या साहित्यावरील चर्चासत्रात आम्हा विद्यार्थ्यांच्या सहभागाबरोबरच तज्ञ शिक्षकांचं विवेचन, यामुळे वैचारिक परिपक्वता आली. सामाजिक रचनेचा भाग होताना तत्त्वनिष्ठता पाळण्याची पद्धत अनेक वेळा सरांनी समजावून सांगितल्यामुळे वैचारिक बैठक स्पष्ट झाली. रामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीसूक्त आदी अनेक गोष्टीही आगटे सरांनीच आम्हाला शिकवल्या.
रामकृष्ण आश्रमात रामकृष्ण जयंती, शारदा जयंती, विवेकानंद जयंती, या विशेष दिवसांमध्ये प्रात:समयी होणारं होम-हवन हे बहुजन वर्गातल्या कोणत्याही जातीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत असे. अदालत वाडय़ामध्ये होणाऱ्या रामकृष्ण आश्रमाच्या बैठकींच्या निमित्तानं सर्व नियोजन करण्याची जबाबदारी मला आगटे सर देत असत. अशा गोष्टींमुळे कार्यक्रम नियोजनासाठी मी विद्यार्थीदशेपासूनच घडत गेलो. रामकृष्ण परमहंस यांची वचनं, श्री. शारदा आणि स्वामी विवेकानंदांचं साहित्य वाचण्याची सवय, तसंच त्यावरील विश्लेषणात्मक टिपणं आणि जीवनात अंगीकारण्याची तत्त्वं, असा अनोखा मेळ साऱ्या संस्कार वर्गातून विविध तज्ञांच्या उपस्थितीनं घातला. शाळेच्या वर्गात इतिहास, इंग्रजी, भूगोल शिकवण्याची सरांची हातोटी, तसंच खडू-फळय़ावरील लेखनाची मांडणी पद्धत त्यानंतरच्या काळात आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये एक आदर्श वस्तूपाठ म्हणून वापरली.
साताऱ्यात दरवर्षी सलगपणे २००० ते २०१० दरम्यान ‘शोध अंतरिचा.. शोध भविष्याचा’ हा करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम मी राबवला. तो थांबवण्याचं ठरवलं, तेव्हा आगटे सरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणात ‘कोठे थांबणे आवश्यक आहे?’ याविषयी केलेलं विवेचन मूलभूत आणि समर्पणवादाचं प्रतीक व मार्गदर्शक होतं. ‘अनंत इंग्लिश स्कूल’मधील उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर आगटे सरांनी साताऱ्यात अनेक ग्रामीण भागात जाऊन विवेकानंदाचं साहित्य आणि विचारधारा या विषयावर भाषणं आणि कार्यशाळा स्वखर्चानं आयोजित केल्या. त्याही आम्हा विद्यार्थ्यांसाठी आदर्शच. ग्रामीण भागातल्या अशा काही भाषणांच्या वेळी मी उपस्थित होतो. वैचारिक क्षमतेची शिकवण आम्हाला त्यांनी स्वआचरणातून परिपूर्ण पद्धतीनं दिली. कोणत्याही गोष्टीचा कार्यप्रसार आणि कार्यप्रचार यातली धूसर सीमारेषा ओळखण्याची कला सरांनी आम्हाला शिकवली.
गरीब, गरजू व झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची पेरणी करण्याचं त्यांचं प्रशिक्षण हे तर अत्यंत प्रगत आणि प्रभावी होतं. उपाशी पोटाला तत्त्वज्ञान समजावू नये, हे त्यांचं प्रमुख तत्व पाळताना अशा विद्यार्थ्यांना स्वखर्चानं प्रथम उपाहार देऊनच ते उपक्रमाची सुरुवात करत असत.एखाद्या कुटुंबावर कर्ता पुरुष गेल्याचं संकट कोसळल्यानंतर धावून जाण्यासाठी आणि मदतीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांची एक फौज तयार केली. त्यामुळेच साताऱ्यातल्या अनेक कुटुंबांना संकटकाळी मदतीचा हात मिळाला आणि ही कुटुंबं स्वत:च्या पायांवर उभी राहिली. माझं कुटुंबही वडील वारल्यानंतर १९८० मध्ये अशाच मदतीमुळे उभं राहिलं, यात आगटे सरांचा मोठा वाटा आहे. समाजघटकांना उभं करण्याची, सुसंस्कृत शहररचनेची मांडणी वैयक्तिक कार्याद्वारे आगटे सरांनी केली.
आगटे सरांनी वैचारिक मतभिन्नतेमध्ये वैयक्तिक सहृदयता जपल्याचे अनेक प्रसंग आम्ही विद्यार्थ्यांनी जवळून पाहिले. त्यामुळे नकळतच हा संस्कारही आम्हाला घडवण्यात अनेक वेळा महत्त्वपूर्ण ठरला. स्वत:च्या उत्पन्नातला काही भाग समाजकार्यासाठी खर्च करण्याचं अद्वितीय कार्य त्यांनी अनेक वर्ष केलेलं आम्हा विद्यार्थ्यांनी जवळून पाहिलं. स्वआचरणातून संस्कार निर्मिती, हे त्यांचं जीवनतत्त्व आहे. इतिहास हा विषय संग्रहालय भेटीद्वारे शिकवण्याचं कसब त्यांनी त्या काळी विकसित केलं होतं. संग्रहालयांच्या माध्यमातून इतिहासाचे धडे त्यांनी ‘वस्तुसंचय ते ज्ञानसंचय’ याद्वारे दिले. विविध इंग्रजी पुस्तकांची मराठी अनुवादित प्रकरणं तयार करून ती वर्गात विद्यार्थ्यांना ते वाचून दाखवत. त्यावर चर्चा घडवून आणण्याचा तास म्हणजे बौद्धिक मेजवानीच असे. पश्चिम महाराष्ट्रात २००४ ते २००७ दरम्यान मी राबवलेला ‘विज्ञान संस्कार’ हा उपक्रम आगटे सरांच्या कार्यप्रेरणेतूनच निर्माण झाला होता. कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आणून देऊन तो सर्वंकष बनवण्याचं मोठं योगदान त्यांचं. आगटे सर निवृत्त होऊन अडीच दशकांचा काळ लोटला. अनेक विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क ठेवून आस्थेनं चौकशी करणं मात्र चालू आहे. त्यांना पुढील आयुष्य सुख, शांती, समृद्धीचं, आरोग्यदायी जावो हीच शुभेच्छा!