‘शॉपक्लूज डॉट कॉम’ ही मोठय़ा स्वरूपातील भारतातील पहिली मार्केटप्लेस कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. महिन्याला

१० कोटी भेटकर्ते आणि एक अब्ज डॉलरचा व्यवसाय हे या ऑनलाइन कंपनीच्या मुकुटातील चमचमते तुरे. ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये स्थान मिळवलेल्या ‘शॉपक्लूज डॉट कॉम’च्या सहसंस्थापिका व मुख्य व्यवसाय अधिकारी राधिका अगरवाल यांच्याविषयी..

उत्सव, सणांचा मोसम सध्या सुरू आहे. खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. तेवढीच वर्दळ ई-कॉमर्सवरही आहे. ऑन लाइन शॉपिंगचा धमाका सुरू आहे. अशातच ‘शॉपक्लूज डॉट कॉम’च्या राधिका अगरवाल यांना प्रतिष्ठित ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये स्थान मिळाल्याची बातमी येऊन धडकली. का आणि कितपत महत्त्वाची आहे ही बातमी?

कंपन्यांचं मूल्य त्या भांडवली बाजारात नोंदणीकृत असतील तर दिवसाखेरीस आणि तेही ठोस आकडेवारीसह स्पष्ट होतं. अन्य कंपन्यांचा आर्थिक आकार त्यांच्या वर्षांखेरीजच्या वार्षिक ताळेबंदातून अधोरेखित होतो. आकडेवारीचा बुडबुडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ई-कॉमर्समधील कंपन्यांच्या संकेतस्थळावरील मिनिटागणिक व्यवहाराच्या रूपात त्याचं मोठेपण नोंदलं जातं. म्हणूनच सवलतींचं पर्व संपताच ई-कॉमर्स कंपन्यांचा ‘आमच्या मंचावर मिनिटाला अमुक वस्तूंची विक्री’ अशी दावेदारी स्पर्धा सुरू होते. त्या सर्व व्यवहाराच्या उलाढालीत  १ अब्ज डॉलरची उलाढाल नोंदविणारी ई-कॉमर्स कंपनीच्या मालक म्हणून राधिका या ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये गणल्या गेल्या आहेत. ‘बिल बिलियन डे’ साजरा करणाऱ्या काल-परवा आलेल्या विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांनाही हे जमलं नाहीय, ते राधिका यांनी करून दाखविले. त्याचमुळे ही बातमी महत्त्वाची आहेच.

राधिका तशा आर्थिकदृष्टय़ा स्थिरावलेल्या कुटुंबातल्या. त्यांचं शिक्षण दिल्ली, उत्तर भारतातच झालं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत, वॉशिंग्टन विद्यापीठातून एमबीए केलं. जाहिरात व जनसंपर्कातील पदव्युत्तर पदवीही त्यांनी प्राप्त केली. सुरुवातीच्या टप्प्यात काही वर्षे त्या अमेरिकेतच राहिल्या. तिथे त्यांनी ‘गोल्डमॅन सॅक’, ‘नॉर्डस्ट्रॉम’, ‘लिंटास’सारख्या कंपन्यांमध्ये काम केलं. माहिती तंत्रज्ञान, विपणन, किरकोळ विक्री आदी अनेक विभाग त्यांनी या काळात हाताळले. दरम्यान, अमेरिकेत, सिलिकॉन व्हॅलीत असताना ‘शॉपक्लूज डॉट कॉम’ची कल्पना त्यांना सुचली. त्यासाठी त्यांनी सोबतीला घेतलं पती संदीप अगरवाल आणि संजय सेठी यांना. सेठी ‘ई-बे’ या अन्य ई-कॉमर्स कंपनीत होते. तर पती संदीप यांनाही याच क्षेत्राचा अनुभव होता. संदीप यांची स्वत:ची ‘ड्रम’ ही वाहन क्षेत्रातील स्वतंत्र ई-कॉमर्स कंपनीही आहे.

राधिका सांगतात, ‘‘शॉपक्लूज डॉट कॉम’ सुरू करताना नवं आणि स्वत:चं काही तरी करायला मिळणार याचा आनंद होता आणि त्यामुळे प्रचंड उत्साहही. हा उद्योग म्हणजे डॉलरमधल्या सर्व गप्पा. पण हे क्षेत्रच तसं आहे. सतत रिफ्रेश आणि साइन इन, ऑनलाइन राहण्याचं. त्याचमुळे ‘शॉपक्लूज डॉट कॉम’ची उभारणी जशी कुटुंबाच्या पाठबळामुळे यशस्वी झाली; तेवढंच श्रेय कंपनीला मोठा आर्थिक हातभार लावणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांचंही आहे.’’

भारतातील पहिली मार्केटप्लेस (ई-कॉमर्सचंच दुसरं क्षेत्र नाव) म्हणून ‘शॉपक्लूज डॉट कॉम’ प्रसिद्ध आहे. आता खरेदीदाराच्या ओठांवर रुळणाऱ्या कंपन्या ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘स्नॅपडील’ या त्यानंतर काही वर्षांनी भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या. महिन्याला १० कोटी भेटकर्ते, एक अब्ज डॉलरचा व्यवसाय हे कंपनीच्या मुकुटातील चमचमते तुरे आहेत. जीआयसी (विदेशी निधी कंपनी), टायगर ग्लोबल, नेक्सस व्हेंचर पार्टनर्ससारख्या कंपन्यांनी ‘शॉपक्लूज डॉट कॉम’मध्ये कोटय़वधी डॉलर ओतले आहेत. पेटीएमसारखं ग्राहकांना खरेदी सुलभ करणाऱ्या आणखी एका माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादाराची जोड ‘शॉपक्लूज डॉट कॉम’ला आहे.

‘शॉपक्लूज डॉट कॉम’मध्ये त्या आता मुख्य व्यवसाय अधिकारी असल्या तरी विपणनाची जबाबदारी त्या स्वत: हाताळतात. ई-कॉमर्ससारख्या मंचावर तर हे अधिक जोखमीचं आणि तेवढय़ाच तत्परतेचं काम. मंचावर वस्तू विक्रीस ठेवणाऱ्या लघु व मध्यम उद्योजक, बडय़ा नाममुद्रेच्या कंपन्या, वाहतूक व्यवस्था, भांडारगृह अशा साऱ्यांना एकाच साखळीतलं व्यवस्थापन त्यांना करावं लागतं. त्याचबरोबर कंपनी, योजना, विशेष सवलती यांच्या प्रसार-प्रचाराचं कार्य, ग्राहकांची मानसिकता, त्यांच्यासाठीच्या सेवा-सुविधा याकडेही लक्ष द्यावं लागतं. त्याच वेळी तणावाचे प्रसंगही येतातच, जसं ‘मायक्रोसॉफ्ट-याहू’ खरेदी व्यवहारात पती संदीप यांचं नाव येणं आणि ‘शॉपक्लूज डॉट कॉम’वरील ‘रे-बॅन’च्या विक्रीदरम्यानचा गोंधळ अशा प्रसंगांनाही राधिका यांना सामोरं जावं लागलं. पण त्या साऱ्यांवर मात करून ई-कॉमर्समधील त्यांचा वेगवान प्रवास अद्यापही कायम आहे.

या व्यवसायातील व्यवधान पातळ्याबाबत राधिका काहीशा गंभीर होतात. त्या म्हणतात, ‘‘वस्तू विक्रेते आणि खरेदीदार यांना एकत्र आणणारं आमचं व्यासपीठ आहे. येथे थेट आमचा संबंध येत नाही. पण जबाबदारी तेवढीच असते. ग्राहकांच्या अपेक्षांना काही कारणाने आम्ही कमी पडत असू. पण या व्यवसायातील वैविध्य पाहता ती एक तारेवरची कसरतच आहे. शिवाय निर्णयाला लागलेला मिनिटाचा विलंब व्यवयासावर विपरीत परिणाम करणाराही ठरू शकतो.’’

राधिका यांची ‘शॉपक्लूज डॉट कॉम’ ही व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने सध्या उल्लेखनीय हालचाल करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया राबवून ‘शॉपक्लूज डॉट कॉम’ला भांडवली बाजारात स्थान मिळवून देणं, कंपन्यांच्या ताबा आणि विलीनीकरण प्रक्रियेत सहभाग नोंदविणं, असे काही उपक्रम आहेत. याबाबत ई-कॉमर्स बाजारपेठेत जोरदार चर्चा आहे. राधिका मात्र त्याबाबत आताच काही सांगण्यास तयार नाहीत.

‘‘मला स्त्रियांसाठी काम करायला खूप आवडतं. ‘शॉपक्लूज डॉट कॉम’च्या माध्यमातून जिथे संधी वाटेल तिथे ती त्यांना देण्याचा माझा अग्रक्रम असतो. हल्ली स्त्रियांचं अमुक एक क्षेत्र असं काही राहिलेलं नाही. उलट त्यांची दुर्मीळ संख्या असलेल्या विविध क्षेत्रांत ती वाढविण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी कामाच्या ठिकाणी त्यांच्याकरिता सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात,’’ असं त्या आवर्जून सांगतात.

उद्योगासाठी ऊर्जा, स्फूर्ती कुठून मिळते हे सांगताना राधिका आजोबांचं उदाहरण देतात, ‘‘व्यवसायात माझा आदर्श माझे आजोबाच आहेत. ते ब्रिटिश सैन्यात होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांना अपंगत्व आलं. पण उर्वरित आयुष्यात ते कधीही पंगू म्हणून वावरले नाही. उलट त्यावर मात करत आनंदात त्यांनी आयुष्य घालवलं. कठीण प्रसंग आला म्हणून मोडून न पडता त्यावर मात करणंच आपल्याला यशस्वी करतं, हेच आजोबांनी शिकवलं.’’

‘शॉपक्लूज डॉट कॉम’ ही मोठय़ा स्वरूपातील देशातील पहिली मार्केटप्लेस कंपनी म्हणून गणली जात असली तरी वस्तू विक्रीत ती विदेशी स्पर्धकांमध्ये, विशेषत: भारत आणि दक्षिण आशिया बाजारपेठेत क्रमांक एकवर असावी, असे ध्येय ठेवून राधिका यांची या जगतातील मुशाफिरी सुरू आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!

व्यवसायाचा मूलमंत्र

अमुक एक क्षेत्र आपलं होऊ शकत नाही, असा समज बाळगणंच मुळात चुकीचं आहे. व्यवसाय म्हटला की जोखीम ही आलीच, पण तुम्हाला त्या कामात आनंद मिळत असेल तरी अपयशाची कारणमीमांसा करून त्याचे तोडगे शोधले पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे.

आयुष्याचा मूलमंत्र

जे उडी घेतात तेच पडू शकतात. काहीही हालचाल न करणाऱ्यांना अपयश, जोखमीचं काय पडलंय? जीवनात बिकट प्रसंग आले म्हणून खचून जाऊ नका. त्यावर मात करायला शिका. येणाऱ्या अडचणींवर मात करून आनंदी जीवन जगा. सातत्य, अचूकता, सचोटी यांच्याशी तडजोड करू नका.

शॉपक्लूज डॉट कॉम

‘शॉपक्लूज डॉट कॉम’ ही देशातील पहिली ई-कॉमर्स कंपनी आहे. महिन्याला १० लाख ग्राहक त्याद्वारे व्यवहार करतात. २०११ ची स्थापना असलेल्या या मंचावर ३.५० कोटींहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. ३ लाखांहून अधिक कंपन्या, विक्रेत्यांच्या वस्तू येथे आहेत. कंपनीतील मनुष्यबळ हजाराहून अधिक आहे.

राधिका अगरवाल

जाहिरात, जनसंपर्क, व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणप्राप्त राधिका यांनी ‘शॉपक्लूज डॉट कॉम’च्या माध्यमातून ई-कॉमर्स क्षेत्रातील पहिली मोठी थेट गुंतवणूक आणण्यात यश मिळविलं. स्पर्धक ‘फ्लिपकार्ट’सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या टायगर ग्लोबलसारख्या विदेशी निधी सहकाऱ्यांबरोबरची भागीदारी यशस्वी केली.

veerendra.talegaonkar@expressindia.com