कौटुंबिक पाश्र्वभूमी व्यावसायिकच. अमेरिकेत आर्थिक विषयातील उच्च शिक्षण घेऊनही भारतात आणि तेही खेळासारख्या क्षेत्राची नाळ न सोडता त्याला उलट फॅशन, रिटेल यांची जोड देणं. वयाच्या तिशीतच एका कंपनीची संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी होणं आणि अशा कंपनीत सचिन तेंडुलकरसारख्या अव्वल खेळाडूंना गुंतवणूकदार म्हणून स्थान मिळणं. स्वत:च तयार केलेल्या उत्पादनांसाठी ऐन पडतीच्या कालावधीत विराट कोहलीला करारबद्ध करणं. अशी एकूणच व्यावसायिक खिलाडूवृत्ती जोपासणाऱ्या अंजना रेड्डी यांच्याविषयी.

दाक्षिणात्य चेहरामोहरा. चालणं अगदी रुबाबदार. आवाजही अगदी भारदस्त. एखादी अंगरक्षक, प्रशिक्षक वाटावी अशी अंगकाठी. नाव अंजना रेड्डी. दक्षिणेतील भारदस्त व्यावसायिकांच्या तिसऱ्या पिढीचं हे तरुण नेतृत्व! वयाच्या २४ व्या वर्षी शिकता शिकता स्वतंत्र व्यवसायाचं खूळ काय मनात येतं आणि बघता बघता तिशीच्या आत १०० कोटींहून अधिक उलाढालीच्या कंपनीचं नाव अव्वल खेळाडूंच्या ओठांवर काय रुळू लागतं.. सारंच स्वप्नवत!

मूळच्या सायबर सिटी अर्थात हैदराबाद येथील अंजना यांचं उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण येथे भारतातच झालं. पुढे लेखा (अकांऊंट) व अर्थशास्त्र विषयातील पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी अमेरिकेत घेतलं. तिथे काही महिने आघाडीच्या बँक-वित्तसंस्थेत वरच्या पदावर कामही केलं. विदेशातील वास्तव्यात बास्केटबॉलसारख्या खेळात नैपुण्य त्यांनी प्राप्त केलं.

बॅटमिंटनपटूही असलेल्या अंजना यांनी भारतात राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये सायना नेहवालला ‘डबल’मध्ये साथ दिली आहे. खेळासारख्या क्षेत्राशी निगडित राहून वैयक्तिक स्तरावर विश्वनाथ आनंदच्या बरोबरीने बुद्धिबळासारख्या अनेक स्पर्धाचं आयोजन करणं, ऑलिम्पिककरिता खेळाडूंना अर्थसाहाय्य म्हणून क्रीडावस्तूंचा लिलाव करणं आदी कार्यही अंजना करतात.

व्यावसायिक कौटुंबिक पाश्र्वभूमी असताना अनोख्या क्षेत्राकडे वळण्याचा प्रवास सांगायला अंजना सहजपणे सुरुवात करतात. ‘‘माझं अमेरिकेतलं उच्च शिक्षण संपतच होतं. स्वत:चा व्यवसाय करण्याचं माझ्या डोक्यात होतंच. पण शिक्षणामुळे अर्थ विषयाशी संबंध आला. म्हणून मी अमेरिकेत सुरुवातीला बँकेतही मोठय़ा जबाबदारीचं काम पेललं. पण मूळ विचार स्वस्थ बसू देत नव्हता. आपल्याला भारतातच काही तरी करायचंय या ध्येयाने मला पछाडलं होतं. माझ्यापुढे तीन पर्याय होते. एक म्हणजे वडिलांच्या व्यवसायात सहभागी व्हायचं किंवा अमेरिकेत वित्तीय क्षेत्रात कार्य करायचं आणि तिसरं म्हणजे आपल्याला जे हवं, ज्याची आवड आहे त्या क्षेत्रात काही तरी करायचं. अर्थात मी तिसरा पर्याय स्वीकारला.’’

‘‘अमेरिकेत खेळाशी संबंध येत असताना मी थोडीफार चाचपणी केली होती. काहींशी त्या दृष्टीने संपर्कही झाला होता. भारतात खेळाशी निगडित वस्तू, कपडे आदींची विक्री वगैरे माझ्या दृष्टीने भन्नाट वाटणाऱ्या कल्पना मी मांडल्या. ‘युनिव्हर्सल’ची स्थापन केली आणि तिच्या ‘कलेक्टअ‍ॅबिलिया’ या ऑनलाइन मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गुंतवणूकदार म्हणून अवतरणं हे सारंच प्रेरणादायी होतं. २०१२ मध्ये सचिननं कंपनीत २७ कोटी डॉलरची गुंतवणूक केली. लगेचच अमेरिकेतील ‘एक्सल पार्टनर’नं ५० लाख डॉलर ओतले. ‘एक्सल’ही फ्लिपकार्ट, फेसबुकसारख्या कंपन्यांची अर्थसाहाय्यकार आहे.’’ अंजना सांगत होत्या.

‘युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ’चा ‘कलेक्टअ‍ॅबिलिया’ हा स्वत:चा ऑनलाइन विक्री मंच आहे. याशिवाय व्राँग, इमारा या अनुक्रमे पुरुष व महिलांसाठीच्या तयार वस्त्रप्रावरणांच्या नाममुद्रा आहेत. यासाठी विराट कोहली, श्रद्धा कपूर हे कंपनीच्या उत्पादनांकरिता प्रचार-प्रसार करतात. ‘‘२०१४ च्या उन्हाळ्यात लंडन दौऱ्यात विराट क्रिकेटमध्ये अयशस्वी ठरत होता. त्याची कारकीर्द संपते की काय, अशी भीती क्रिकेटप्रेमींमध्ये होती. अशातच त्याला आमच्या ‘व्राँग’साठी करारबद्ध केलं. थोडी काळजी होती. पण तो अन् आमचा ब्रॅण्डही सावरला,’’ अंजना आठवण सांगतात.

कार आणि कुत्रा यांची आवड असलेल्या अंजना खेळाबद्दल ध्येयवेडय़ा आहेत. खांदेदुखीने सध्या या क्षेत्रात निरंतर राहू शकत नसल्याची खंत त्यांना नाही. उलट जे आहे ते आणि जे स्वीकारलं. त्यात मन रमवणं हे महत्त्वाचं आहे, असं त्या मानतात. त्या म्हणतात, ‘‘खेळ ही काही पुरुषी मक्तेदारी नाही. मला तर या क्षेत्रात कार्य करायला काही गैर वाटत नाही आणि महिला ‘कार्ड’ म्हणून मला स्वत:लाही मिरवायला आवडत नाही. आजच्या जमान्यात तर तसं कुणी गृहीतही धरू नये. तुम्हाला फक्त तुमचं म्हणणं आणि कर्तृत्वावर विश्वास असायला हवा. कामाच्या ठिकाणी कधी तरी आव्हाने येतात; पण त्यावर मात करायला हवी. तीच गोष्ट धरून बसलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. वेळेचा वेग प्रचंड आहे आणि या अल्पावधीत काही सिद्ध करायचं असेल तर आव्हानं ही संधी म्हणून बघायला हवी, हे मी विशेषत: माझ्या विदेशातील वास्तव्यात शिकलेय.’’

वेगावर नितांत प्रेम असलेल्या अंजना या व्यवसायातही त्याला अनन्यसाधारण महत्त्व देतात. उत्पादनांची मागणी दिलेल्या वेळेत पूर्ण होण्याच्या कालावधीत त्यांची अस्वस्थता प्रचंड वाढलेली असते. ‘‘ग्राहक हा त्याला हव्या त्या वस्तूंकरिता खूपच सजग असतो. त्यासाठी तो अनेकदा वस्तू, त्याची किंमत, उत्पादित कंपनी, बाजारपेठ यांचा अभ्यासही करत असतो. या साऱ्यानंतर तो अमुक एक वस्तू पसंत करत असेल तर ती त्याला कोणत्याही अडथळ्यांविना मिळणे आवश्यक आहे,’’ अशी त्यांची ‘फिलॉसॉफी’ आहे.

व्यवसायाविषयी अंजना यांची स्पष्ट भूमिका आहे. त्या म्हणतात, ‘अभी तुमने दुनिया ही क्या देखी है’ असं म्हणून खोडा घालणारे अनेक असतात. पण तरुणवर्गाने हे सारे दुर्लक्षून नवउद्यमी बनावे. तुम्ही एखाद्या गोष्टीत ‘पडणार’ नाही तर तुम्हाला अनुभव तो काय मिळणार?’ म्हणूनच आपल्या आवडत्या खेळामुळेच उद्भवलेल्या किरकोळ आजारावर मात करत अंजना यांनी हीच आवड अन्य मार्गाने जोपासण्याचा प्रयत्न केला. व्यवसायही खिलाडूवृत्तीने करता येतो हे ‘युनिव्हर्सल’च्या प्रगतीप्रवासावरून अधोरेखित होतं.

युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ

खेळ आणि फॅशन यांची सांगड घालणारी देशातील ही अनोखी कंपनी असावी. क्रीडासाहित्यांचा लिलाव, त्यांची विक्री आणि खास तरुणवर्गासाठीची वस्त्रप्रावरणे हे सारे एकाच मंचावर उपलब्ध आहे. या उत्पादनांसाठी देशभरातील १०० हून अधिक दालनांमध्ये कंपनीचं अस्तित्व आहे.

३५- मनुष्यबळाच्या जोरावर अवघ्या पाच वर्षांत १२० कोटी रुपयांची उलाढाल नोंदविणारी या गटातील युनिव्हर्सल ही एक ‘युनिक’ कंपनी आहे.

अंजना रेड्डी

वडिलांचा पारंपरिक व्यवसाय आणि अमेरिकेत आघाडीच्या बँकेत मिळालेले वरचे स्थान सोडून स्वत:चा उद्योग उभारणाऱ्या अंजना या ‘थर्टीज् सीईओ’ यादीत अव्वल आहेत. ‘युनिव्हर्सल’च्या पाच वर्षांच्या स्थापनेच्या कालावधीत १२० कोटींची उलाढाल पार केल्यानंतर आता आणखी पाच वर्षांत ती पाचपट करण्याचा अंजाना यांचा मानस आहे. ‘आयपीएल’सारख्या ‘कॉर्पोरेट’ क्रीडा स्पर्धा, क्रीडा संघ तयार करण्यातही त्या अग्रेसर आहेत.

वीरेंद्र तळेगावकर

veerendra.talegaonkar@expressindia.com