लीना माटे

मुलगा म्हणून बाल्यावस्थेपासून वाढत असताना सुरू झालेला तुझा माझ्यासोबतचा प्रवास, मुलगा, मित्र, नवरा, बाप या वेगवेगळ्या अंगांनी मी उलगडतेय. मला खूप काही शिकवलंस, समृद्ध केलंस आणि आता एक पूर्ण पुरुष!  तुझ्या बाबांपेक्षा- माझ्या जवळच्या पुरुषापेक्षा कितीतरी वेगळा. खरं तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या, सर्वच पुरुषांपेक्षा तू खूप वेगळा!

तू माझ्या आयुष्यात आलास तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस होता. नर्सने तुला दुपटय़ात गुंडाळून माझ्यापाशी पलंगावर आणून ठेवले. इवलुसा तू, तुझ्या लुकलुक डोळ्यांनी माझ्याकडे पाहात होतास. एवढय़ा छोटय़ा, पिटुकल्या तुला कसं उचलून घ्यायचं तेही मला समजत नव्हतं. तुझे दोन्ही आजी-आजोबा कौतुकाने तुला पाहात होते. त्यांचा पहिला नातू होतास तू. त्या चौघांच्या डोळ्यांतून वाहणारं कौतुक पाहून मी सुखावले.

तासाभरापूर्वी प्रसववेदनांनी तळमळणारा माझा देह शांतावला, तृप्तावला होता. पण तेवढय़ात टॅहॅ ऽऽ टॅहॅ ऽऽ करत तू तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीस. मी भांबावले. तुझा आवाज ऐकून नर्स लगेच खोलीत आली. म्हणाली, ‘‘बाळाला भूक लागलीय. पाजायला घ्या.’’ तिनेच तुला माझ्या कुशीत दिले. तुला कसं पाजायचं तेही मला कळलं नव्हतं. अवघी तेवीस वर्षांची होते रे मी तेव्हा. तुझं टॅहॅ ऽऽ टॅहॅ ऽऽ अगदी वरच्या पट्टीत चालू होतं. नर्सच्या अनुभवी नजरेने क्षणात सगळं ओळखलं. मला पहिलटकरणीला बाळाला पाजताना कसं घ्यायचं ते शिकवलं. तू पिऊ लागलास आणि रडणं विसरलास. एक अनामिक ओढ, जवळीक तुझ्या-माझ्यात निर्माण झाली.

अं.अं..ऊ..ऊ असे उच्चार तुझ्या चिमुकल्या ओठातून उमटू लागले. सगळे टप्पे पार करत तू उभं राहायला, दुडकी पावलं टाकायला लागलास. तीन वर्षांचा झाल्यावर तुला शिशुवर्गात घातलं तेव्हा पहिल्या दिवशी तुला एकटय़ाला सोडून घरी आले आणि रड रड रडले. तू मात्र तिथे मस्त मजेत रमला होतास. भरपूर खेळणी, रंगीत चित्रांची पुस्तकं, बरोबरीची दोस्तमंडळी.. दररोज शाळेतून घरी आल्यावर शाळेतल्या बाई, त्यांनी म्हणून दाखवलेली गाणी, सांगितलेली गोष्ट असा सगळा ‘खजिना’ माझ्यापुढे ओतायचास. पण खरं सांगू? या सगळ्याचं कौतुक जरी वाटलं तरी कुठेतरी मनातून थोडी दुखावलेही होते मी तेव्हा. आतापर्यंत तुझं माझ्याशिवाय पान हलत नव्हतं. पण आता मात्र तुला शाळा, शाळेतल्या बाई यांचं  कौतुक वाटू लागलंय हे जाणवलं. मला डावललं जाण्याची भावना उगीचच मनाला डसली.

तू मोठा होत होतास. शाळेचे एकेक टप्पे पार करत होतास. तुझ्याबरोबरीने मीही मोठी होत होते. वयाने, विचारांनी आणि जाणिवेनेही. तुझा मित्रपरिवार वाढला होता. मित्रांच्या घरी खेळायला, अभ्यासाला जाणं सुरू झालं होतं. कधीतरी तुम्हा मित्रांच्या गप्पा सुरू असताना मी कॉफी वगैरे देण्याच्या निमित्ताने तुझ्या खोलीत आले तर तुम्ही मित्र विषय बदलायचात. अशा वेळी तुझ्या डोळ्यातली नाराजी मी नजरेने टिपायचे. पण एक खरं, मला तुला कधीसुद्धा कुठल्याच कारणावरून रागवावं लागलं नाही. तसा मुळात तू शांत, समंजस, हुशार आणि अभ्यासूपण होतास. शाळेत पहिलीपासून दहावीपर्यंत तू तुझा पाचच्या आतला नंबर कधी सोडला नाहीस. स्वभावाने तू भोळा होतास. तुझं अक्षर छान होतं. तुझ्या सगळ्याच वह्य़ा टापटीप असायच्या. परीक्षेच्या वेळी तुझे मित्र तुझ्या वह्य़ा मागायला यायचे आणि तू त्यांना द्यायचास. त्या वेळी मला तुझा खूप खूप राग यायचा. परीक्षेच्या वेळी आपल्या वह्य़ा मित्रांना घरी न्यायला देणं हे मला पचनी पडत नसे. माझं अंतर्मन तुझ्या निकालाच्या गुणांभोवती रुंजी घालत असे. पण तू मात्र शांत असायचास. तुझा अभ्यास तुझ्या ‘डोक्यात’ पक्का असतो. परीक्षेच्या काळात वही डोळ्यासमोर असली तरच अभ्यास होतो असं नाही हे तू जाणून असायचास. हळूहळू मीसुद्धा ते तुझ्याकडून शिकत गेले. एकदा समजून घेतलेली गोष्ट ‘डोक्यात’ पक्की बसली पाहिजे. शिकलेलं ज्ञान हे फक्त पुस्तकी आणि परीक्षेपुरतं मर्यादित नाही हे मला मग उमजू लागलं.

नववी, दहावी.. वर्ष सरत होती. तुझ्या ओठावर मिसरूड आणि हनुवटीवर दाढी फुटू लागली. माझ्या लक्षात आलं, आता तुला मुलगा-मुलगी हा भेद जाणवून द्यायला हवा. कदाचित तुला हे माहीत असण्याची शक्यताही होती. पण तरीही एक आई म्हणून तुझ्याशी याबद्दल बोलणं मला माझं कर्तव्य वाटत होतं. मात्र कसं सांगावं, बाबांनाच सांगायला सांगावं का या विचारात मी त्या वेळी दोन-तीन आठवडे घालवले. तुझे बाबा म्हणाले, ‘‘कळेल आपोआप त्याला. आम्हाला कुठे कुणी सांगितलं होतं?’’ मला त्यांचं म्हणणं पटलं नव्हतं. त्याला कारणही होतं. आम्ही शाळा-कॉलेजमध्ये असताना आमचे मित्र-मैत्रिणी, त्यांच्या घरी जाणं-येणं, बिनधास्त वावरणं असं कुठे होतं? तू दहावी, बारावी होऊन महाविद्यालयात जायला लागला होतास. तुझं क्षितिज विस्तारलं होतं. एकमेकांच्या नोट्स शेअर करणं, एकत्र सिनेमाला जाणं, ट्रेकिंगला, सहलीला जाणं होत होतं. अशा वेळी निसरडय़ा वाटा लागण्याची भीती माझ्या मनाला स्पर्शून जाई. तुझ्यावर विश्वास नव्हता असं मुळीच नाही. पण काही गोष्टी तुला सांगणं, माहीत करून देणं गरजेचं वाटलं होतं. मुलींच्या शरीराची वेगळी रचना, त्यांना येणारी मासिक पाळी असं सर्व काही तुला समजावून सांगितलं. तुला कितपत आकळलं माहीत नाही. पण आपण ‘जाणते पुरुष’ झाल्याची झाक मला त्या वेळी तुझ्या डोळ्यात दिसली आणि मी निश्चिंत झाले एवढं खरं.

तू आणि तुझ्याबरोबर मी आपण हळूहळू सुजाण होत होतो. तू तुझ्या कॉलेजच्या गोष्टी, मित्र-मैत्रिणींच्या गमतीजमती मला सांगत होतास. मी अचंबित होत होते, पण लवकरच मलासुद्धा तुम्हा मुला-मुलींची निखळ, निर्व्याज मैत्री जाणवू लागली होती. मैत्रीकडे पाहण्याचा हा नवा दृष्टिकोन तूच तर दिला होतास मला.

तू कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला असताना बँकेच्या, रेल्वेच्या परीक्षा देण्यासाठी तुझ्या पाच-सहा मैत्रिणी आपल्या घरी दोन दिवस मुक्कामाला आल्या होत्या. त्यांचं परीक्षा केंद्र आपल्या घरापासून जवळ होतं म्हणून आपल्याकडे राहिल्या होत्या त्या. तर त्या वेळी तू स्वत:च ठरवून तुझ्या मित्राकडे झोपायला गेला होतास आणि बाबांनाही काकांकडे झोपायला जायला सुचवलं होतं. त्या मुलींना आपल्या घरात दोन पुरुषांसह वावरणं अवघड वाटू नये, जड जाऊ नये असं तुला वाटलं होतं. मी न सांगताच तू हे कसं रे जाणलंस माझ्या मनातलं त्या वेळी? मला खूप कौतुक वाटलं होतं तुझं आणि लक्षात आलं, आपलं ‘पिल्लू’ वयात आलं.

कॉलेजची तुझी शेवटच्या वर्षांची फायनल परीक्षा झाली होती. निकाल लागायचा होता. पण लगेचच तू तुझ्या मैत्रिणीच्या काकांच्या फॅक्टरीत कामाला जायचा तुझा मानस सांगितलास. कामाचा अनुभव मिळेल आणि महिन्याचा पॉकेटमनी सुटेल असं म्हणालास. मल्टीनॅशनल कंपनीत वरच्या हुद्दय़ावर असलेल्या तुझ्या बाबांना हे फारसं रुचलं नव्हतं. आणि ‘आई’ म्हणून मला आपली काहीतरी ‘वेगळी’च शंका आली होती त्या वेळी. पण तसं काही नव्हतं. मला माझ्या ‘बुरसटलेल्या चाकोरीबद्ध’ विचारांपासून तू असं वेळोवेळी बाहेर काढत होतास. आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन विस्तारत होता. माझ्याही नकळत तू माझी वाटचाल प्रगल्भतेकडे नेत होतास.

तुझ्या महाविद्यालयीन मैत्रिणीशी तू लग्न ठरवलंस. तिला लग्नाबद्दल विचारण्यापूर्वी तू मला आधी तशी कल्पना दिलीस. आमच्या नकाराचा प्रश्न नव्हता. पण त्या वेळी बँकेत नुकताच नोकरीला लागलेला तू म्हणाला होतास, ‘माझ्या पगारात आमच्या दोघांचा महिन्याचा खर्च मला भागवता आला पाहिजे. त्यासाठी आम्हा दोघांना अजून दोन वर्ष लग्नासाठी थांबावं लागेल.’’ तुझा हा बाणेदार निर्णय आणि त्यावर ठाम राहिलेला तू. तुझ्या बाबांपेक्षा आणि कधी माझ्याहीपेक्षा खूप खूप वेगळा भासणारा तू. मी किती किती आणि काय काय शिकत होते तुझ्याकडून. आपल्या घरात येणाऱ्या मुलीला तू खूप जपशील, सुखात ठेवशील ही जाणीव तत्क्षणी मनात निर्माण झाली आणि ती तू सर्वार्थाने सार्थ केलीस. तुझ्या मुलाच्या जन्मानंतर नोकरी, संसार, घर, मुलाची जबाबदारी सांभाळून तू ‘मास्टर्स’ केलंस. नामांकित महाविद्यालयात त्यासाठी प्रवेश मिळवल्यानंतरची तुझी ती दोन वर्ष जिद्दीची आणि तेवढीच संघर्षांची होती. त्या तुझ्या संघर्षांला माझा सलाम! आपल्या नातेवाईकांशी तू सलोख्याचे संबंध जोपासलेस. फक्त आपल्याकडच्याच नाही, तर तुझ्या बायकोच्या माहेरच्या-तुझ्या सासरच्या माणसांशीही तू अगदी प्रेमाचे संबंध राखून आहेस याचा खूप अभिमान वाटतो मला. चिडणं, रागावणं तुझ्या स्वभावात नाही. मी स्वत: किंवा तुझे बाबा, आम्ही दोघेही थोडेफार रागीट, हेकेखोर आहोत. मग तुझ्यात हा समंजसपणा कुठून आला हे मला न उकललेलं कोडं आहे.

तू आहेस हा असा आहेस. बाल्यावस्थेपासून सुरू झालेला तुझा माझ्यासोबतचा प्रवास, मुलगा, मित्र, नवरा, बाप या वेगवेगळ्या अंगांनी मी उलगडतेय. मला खूप काही शिकवलंस, समृद्ध केलंस. आताचा तू एक पूर्ण पुरुष. पण तुझ्या बाबांपेक्षा- माझ्या अगदी सगळ्यात जवळच्या मला भेटलेल्या पुरुषांपेक्षा कितीतरी वेगळा. खरं तर मला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या, माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वच पुरुषांपेक्षा तू खूप वेगळा. परिपूर्ण पुरुषाचा शोध घेत असलेल्या माझ्या अंतरंगातल्या स्त्रीत्वाने मनात जपलेली पुरुषाची अनेक रूपं, अनेक नाती उलगडत त्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या मला गवसलेला किंवा कदाचित मी घडवलेला. नक्की खरं काय, हा प्रश्न पडलाय मनाला. पण मनाला पडलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही. कधी कधी उत्तरं न शोधण्यातच शहाणपण असतं आणि ते शहाणपण उतारवयात मी करतेय.

leenashining@gmail.com

chaturang@expressindia.com