scorecardresearch

पुरुषी नजर

पनी आणि बॉस नावाजलेला. एवढय़ा एका विश्वासावर तिनं शहर सोडलं. कामाला सुरुवात झाली

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रणिता मारणे

जेव्हा स्त्री-शरीराकडे वासनेच्या नजरेनं पुरुष बघतो तेव्हा आपण स्त्री आहोत याची जाणीव तिला प्रकर्षांने होते. बाईपणाच्या अस्तित्वाची चांगल्या आणि वाईट प्रकारे आठवण करून देण्यासाठी पुरुषच कारणीभूत ठरू  शकतो, ही एक पुरुषी अहंकाराच्या चौकटीत सोयीस्करपणे केलेली उकल आहे. पण तिच्या आयुष्यात चांगल्या-वाईट प्रकरणात स्व-जागृती करून देणारेही पुरुषच होते. त्या शहरात स्थिरावण्यासाठी पदोपदी कोणत्याही वेळेला तिची मदत करणारा तिचा एक मित्रही पुरुषच होता. त्यामुळे पुरुषांच्या या नजरांचं वैश्विक उत्तर काढायचं कसं? हा पण एक मोठा प्रश्न आहे.

नोकरी लागून तिला बरेच दिवस झाले होते. उंबऱ्याबाहेरचं जग ती अनुभवत होती. कंपनी आणि बॉस नावाजलेला. एवढय़ा एका विश्वासावर तिनं शहर सोडलं. कामाला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे मालक सदाचारी आणि विवेकी होता, पण भिरभिरणारे डोळे आणि बावरलेलं मन समाजमान्य पुरुषी फूटपट्टय़ांचा सामना करत होतं.

आजूबाजूच्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर ती हळूहळू स्थिरावत होती. पुरुषी वासनेचा प्रत्यक्ष अनुभव अजून तरी तिला आला नव्हता. तिचं कामाचं स्वरूप लोकाभिमुख होतं. त्यातही तिला आवडीचं काम मिळालं. शहरातले मागास रस्ते अंगवळणी पडले असले तरी नजर अजून नवखी होती. हीच नजर एका वखवखलेल्या सापाने हेरली. आतापर्यंत अनेक पुरुषांनीच स्थिरावण्यासाठी मदत केल्यानं तिनं निरागसपणे विश्वास टाकला. कामामुळे तिचा त्याच्याशी रोज संपर्क येऊ लागला. त्याची बदनामी ती सगळीकडून ऐकून होती. अनेक जणी त्याच्या नजरेच्या शिकार झाल्या होत्या. अनेकांनी तिला सावध केलं, पण तिचा स्वत:च्या डोळ्यांवर जास्त विश्वास होता. पण एक दिवस त्या सापाने तिला गाठलंच. चारचौघांतही शरीरसुख किंवा तत्सम बोलण्याची त्याची मजल जायची. एके दिवशी कामानिमित्त ती त्याच्याकडे गेली. तो नखशिखांत तिला वखवखलेल्या नजरेनं बघू लागला. तिच्याकडून त्याला काय हवंय हे त्याच्या वासनेने डबडबलेल्या डोळ्यातून वाहत होतं. त्या अर्थाचं तो तिच्याशी बोललाही. तिला काही समजेना. एकदा लहानपणी बसमध्ये कोवळ्या अंगावरून एकानं हात फिरवला ती नजर. गर्दीत असताना एका दारुडय़ाने हात लावला ती नजर,  कॉलेजला असताना एकानं भर रस्त्यात अडवलं ती नजर आणि आता या नराधमाची नजर!

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिनं ही नजर कधी ना कधी अनुभवलीच होती. तिला काही समजायच्या आतच ती कशी बशी तिथून निघाली. त्याची नजर आणि त्याचे शब्द ऐकून कानात शिसे ओतल्यासारखी तिची अवस्था झाली. तिला तिच्या वडिलांची लगेच आठवण झाली. नोकरीला निघाल्यावर तिच्यावर असलेल्या विश्वासाची त्यांची नजर खूप काही सांगून जात होती. आश्चर्य म्हणजे या वासनेने भरलेल्या पुरुषी नजरेतून सावरण्यासाठी तिला खंबीर आणि नैतिक पुरुषांचीच नजर आठवली आणि ती सावरली, पण तरीही एवढय़ा विवेकी मालकाच्या छत्राखाली असली बांडगुळं जन्माला तरी कशी येतात,असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले. किंबहुना तिनं अज्ञानातच सुख मानलं. लहानपणापासून स्त्री म्हणून आपल्या शरीराची जाणीव अशाच नजरांमधूनच होते.

जेव्हा आपल्या शरीराकडे वासनेच्या नजरेनं पुरुष बघतो तेव्हा आपण स्त्री आहोत याची जाणीव होते. कित्येक मुलींना काम आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टी सांभाळताना कसरत करावी लागते. अनेक जणींचं मानसिक संतुलन बिघडतं. तिचंही मन या प्रकारामुळे सैरभैर झालं होतं. बाईपणाच्या अस्तित्वाची चांगल्या आणि वाईट प्रकारे आठवण करून देण्यासाठी पुरुषच कारणीभूत ठरू शकतो ही एक पुरुषी अहंकाराच्या चौकटीत सोयीस्करपणे केलेली उकल आहे. पण गम्मत म्हणजे तिच्याही आयुष्यात चांगल्या वाईट प्रकरणात स्व-जागृती करून देणारे पुरुषच होते. नवीन शहरात येण्यासाठी संधी देणारे तिचे शिक्षक पुरुषच होते. ती ज्या मालकाच्या जीवावर नवीन शहरात आली होती तोही एक पुरुषच होता. त्या शहरात स्थिरावण्यासाठी पदोपदी कोणत्याही वेळेला तिची मदत करणारा तिचा एक मित्रही पुरुषच होता. त्यामुळे पुरुषांच्या या नजरांचं वैश्विक उत्तर काढायचं कसं? हा पण एक मोठा प्रश्न होता.

तिलाही हा प्रश्न स्वाभाविकपणे पडला होता. जगातल्या सगळ्या पुरुषांची नजर तिच्याकडे खिळलीय असा भास होत होता. शरीराव्यतिरिक्त स्वत:च्या ओळखीसाठी, अस्तित्वासाठी मनात अनेक प्रश्नांनी तळ गाठला. या विचारात असतानाच मित्राचा फोन आला, त्यानंतर तिला हायसं वाटलं. पण समोर फोनवर बोलणाऱ्या मित्राला मात्र ती कुठे तरी हरवल्यासारखी वाटली. त्यानंतर तो ताबडतोब तिला भेटला. स्वत:ला हरवल्याची तिची कैफियत त्याला आपोआपच समजली. तिच्या अस्तित्वाच्या पुनशरेधासाठी तिला मदत करायला हवी याची जाणीव त्याला झाली. आणि तो खऱ्या पुरुषार्थाला जागला. मनाला वाटेल तेव्हा मनसोक्त फिरणं, भर पावसात नुसती गाडी चालवणं, वाटेल तेव्हा आणि वाटेल तेवढा चहा पिणं, तासन् तास कॅफेमध्ये बसून राहणं, पाऊस सुरू असताना नुसतं बसून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करत राहणं. तिचं हरवलेलं जग स्वत:च्या नजरेतून एखाद्या दिवटीप्रमाणे तो तिला दाखवत होता. आणि तिला नव्यानं काही तरी उमगत होतं. त्याच्या मैत्रीचे हे ऋण ती आयुष्यभर फेडू शकणार नव्हती. ‘तू स्वच्छंदी आहेस’, तुझ्या मनाइतका वेग जगात दुसऱ्या कशाचाच नाही. कोणाचाही विचार न करता त्यानं तिला स्वत:ला न्याय द्यायला शिकवलं. नेमकं सांगायचं म्हणजे ‘क्वीन’मधली कंगना व्हायला शिकवलं. तिच्या डोक्यात असलेल्या विचारांचा निचरा झाला आणि पाणी वाहतं झालं.

आता ती स्वच्छंदी होती. कुठल्याही बंधनांचा पाश तिला नव्हता. त्या नराधमांच्या वासनेची उत्तरं तिला मिळाली. आता तिची नजर कुठल्याही वासनाधीन पुरुषापुढे झुकत नव्हती, ती आणखी भेदक झाली होती. प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वाची छोटी-मोठी गोष्ट असते. आणि ती असणंही महत्त्वाचं आहे. पुरुषी नजर प्रत्येकीच्या अस्तित्वाच्या जडणघडणीसाठी प्रत्येक टप्प्यावर कुठेना कुठे कारणीभूत असते. वासनेची आणि विश्वासाची पुरुषी नजर कधी तरी येतेच. पण कुठल्या नजरेचे प्रश्न अनुत्तरित ठेवायचे आणि कुठल्या नजरेमुळे आयुष्य आणखी बळकट करायचं हे ‘तिच्या’वरच अवलंबून आहे.

pranita.marane27@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व तिच्या नजरेतून तो ( Tichya-najretun-to ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about men vision for women%e2%80%8e

ताज्या बातम्या