scorecardresearch

ते अनोळखी पुरुष!

मी या साऱ्या अनोळखी पुरुषांवर पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांनी तो सार्थकी लावला.

मुक्ता चैतन्य muktaachaitanya@gmail.com

माझ्या अनेक मत्रिणी मला म्हणतात, तू नशीबवान आहेस म्हणून प्रवासात तुला भेटलेले अनोळखी पुरुष सज्जन असतात. मला मात्र तसं वाटत नाही. माझा माणसांच्या खरेपणावर पूर्ण विश्वास आहे. भेटलेला प्रत्येक अनोळखी पुरुष आपल्याकडे ‘तेवढय़ा’ एकाच नजरेतून बघतो हा पूर्वग्रह घेऊन वावरणं मला जमत नाही. असा विचार मनात बाळगून सतत असुरक्षित मनानं फिरणं मला गुदमरून टाकणारं आहे. ते पुरुषांवरही अन्यायकारक वाटतं.

पुरुष म्हणजे नक्की कोण?

वडील, भाऊ, मित्र, प्रियकर आणि नवरा की अजून काही?

या अजून काहीचा शोध आपण क्वचितच घेतो. पुरुषांना आखून दिलेल्या पारंपरिक भूमिकांमध्ये बघायची आपल्याला सवय असते. सवय असते म्हणा किंवा लहानपणापासून पुरुष म्हणजे फक्त एवढय़ाच चौकटी हे मनात पक्कं असतं. आपलं कुटुंब, आजूबाजूचा समाज सगळ्यांनीच फक्त या आणि एवढय़ाच चौकटी आपल्या मनात उभ्या केलेल्या असतात. आपण इतर कसलाही विचार न करता आपण या चौकटी जोपासत असतो. पण यापलीकडे पुरुषांशी इतर संदर्भ तयार होतात, होऊ शकतात हे आपण गृहीतच धरत नाही. पुरुष जातीकडे बघताना एकतर तो रक्षणकर्ता, तारणहार, प्रेम, मैत्री, आकर्षण नाहीतर शिकारी इतकंच आपण का बघतो असा अनेकदा प्रश्न पडतो. ओळखीच्या आणि अनोळखी पुरुषांना इतर कुठलीही शेड आपण देत नाही. कित्येकदा तर प्रेम आणि मैत्रीपर्यंत पोचण्याआधी स्त्रिया संशय, भीती आणि असुरक्षिततेने ग्रासलेल्या असतात. आजूबाजूचा प्रत्येक परपुरुष हा आपला गैरफायदा घेण्यासाठी टपलेला असतो, असू शकतो या गृहीतकावर वावरणाऱ्या अनेक जणी असतात. त्यात त्यांची चूक नाही, ‘योनिरक्षण’ आणि ‘योनिशुचिते’च्या विचित्र कल्पनांमुळे माणसाची मानवी व्यवहारांची मूलभूत प्रेरणा मारली जाते.

पण परपुरुष मैत्री, प्रेम, लैंगिक आकर्षण किंवा शिकारी या सगळ्यापलीकडे असू शकतो, असतो याचा अनुभव मी कामाच्या निमित्ताने अनेकदा घेतलेला आहे. पत्रकार म्हणून गेली वीस वर्षे काम करत असताना अनेकदा परप्रांतात एकटीने फिरण्याचा प्रसंग येतो. अनोळखी प्रदेश, अनोळखी भाषा, अनोळखी अन्न आणि अनोळखी माणसं आजूबाजूला असताना भेटणारे अनोळखी पुरुष हा कधीही त्रासदायक आणि निराशाजनक अनुभव नसतो. आजवर नाहीये.

कोण असतात हे पुरुष? तर कुणीही! अगदी रिक्षावाल्यापासून फुटबॉल टीमकोचपर्यंत आणि कॅफे चालवणाऱ्या तरुणापासून खेडय़ातल्या शेतकऱ्यापर्यंत. विविध आर्थिक, सामाजिक गटातले पुरुष कामाच्या निमित्ताने संपर्कात येतात. भरभरून मदत करतात. स्वत:ची आयुष्यं उलगडून सांगतात. सहजतेनं वावरतात. त्यांच्याशी एक वेगळंच नातं तयार होतं. ज्याला नाव देता येणं खरंच खूप कठीण आहे. हे असं कुठलंही नाव नसलेलं नातं अनेकदा आपल्या आयुष्यात येतं पण आपण त्याला नावाच्या कोंदणात कोंबायला बघतो आणि त्या नात्याची नजाकत घालवतो. अशी बेनामी नाती सगळ्यांच्याच वाटय़ाला येत असतात. त्यात ना प्रेम असतं, ना मैत्री असते, ना आकर्षण असतं ना अजून काही. ते खऱ्या अर्थाने माणुसकीचं नातं असतं. भेटल्यावर, काम संपल्यावरही हे पुरुष संपर्कात असतात. आपुलकीने विचारपूस करतात. खरंतर यातल्या बऱ्याच जणांना मी पुन्हा कधीही भेटत नाही. तशी शक्यता बऱ्याचदा नसते, तरीही नाती तयार होतात जी पारंपरिक चौकटीत बांधता येत नाहीत.

उदाहरणार्थ, एकदा एक स्टोरी करायला रांचीला गेले होते. रांचीजवळच्या आदिवासी गावात ‘युवा’ नावाची संस्था काम करते, ज्यांनी आदिवासी मुलींची फुटबॉल टीम तयार केली आहे. या मुलींनी जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलं तेव्हा अचानक या संस्थेविषयी आणि या मुलींविषयी जगाला समजलं. या मुलींवर लेख लिहायचा होता. रांचीमध्ये काहीही संपर्क नव्हता. तिथल्या फुटबॉल असोसिएशनला फोन लावला आणि त्यांनी सोनू छेत्रीचा नंबर दिला. सोनू हा आदिवासी फुटबॉल टीमचा कोच. सोनूला फोन करून मी येणार असल्याचं कळवलं, तारखा नक्की केल्या आणि रांचीला जाऊन पोचले. सोनू दिसतो कसा, तो विश्वास ठेवावा असा माणूस आहे की नाही हेही तेव्हा मला माहीत नव्हतं. फक्त त्याचा फोन नंबर जवळ होता. रांचीला जाऊन पोचले आणि सोनूला भेटले. अतिशय उमदा तिशीतला तरुण. फुटबॉलवर आतोनात प्रेम. आदिवासी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ. त्यातूनच जन्माला आलेला उत्तम कोच. तळमळीचा कार्यकर्ता आणि अप्रतिम गायक. स्वत:चा बँड आहे. गिटार अफलातून वाजवतो. पहिल्यांदा भेटले तेव्हा अर्थातच यातली एकही गोष्ट मला माहीत नव्हती. पण चार दिवसांत ओळख झाली ती कायमची.

मला जे काम करायचं होतं, ज्या आदिवासी फुटबॉल खेळणाऱ्या मुलींना भेटायचं होतं त्यांचं गाव, मु.पो. हुतुप-इरबा, ओरमानजी ब्लॉक, जिल्हा रांची, झारखंड. हुतुपला पोचायचं तर रांचीपासून तीस-चाळीस मिनिटांचा प्रवास करावा लागतो. तिथे जायचं कसं म्हटल्यावर, ‘माझ्या टूव्हीलरवर जाऊ या, चालेल का तुम्हाला?’ अतिशय सहजपणे सोनूनं विचारलं. पुढचे चार दिवस मी रांची-हुतुप-सिलदरी हेसातू जे हुतुप अजून पुढे आहे तिथे सोनूच्या टूव्हीलरवरून ये- जा करत होते. रांची आणि आजूबाजूला आदिवासी गावात मी त्याच्याबरोबर फिरत होते. एके दिवशी तिथल्या एका लोकल न्यूज चॅनलसाठी या मुलींची मुलाखत करायची होती, त्याला म्हटलं मी बरोबर आले तर चालेल का? तोही तयार झाला. संध्याकाळी सात ते रात्री १०.३० त्या मुलींबरोबर तो आणि मी टीव्ही चॅनेलमध्ये होतो. मी गेले त्याच काळात रांचीत काही िहसक घटना घडल्या होत्या. संध्याकाळ बाहेरच्या माणसाच्या मनावर ताण आणणारी असायची. या सगळ्या काळात एका परप्रांतात, जिथे मला स्थानिक भाषेचा गंधही नव्हता मी सोनूवर संपूर्ण विश्वास टाकला होता आणि चार दिवस उत्तम काम करून, एका चांगल्या व्यक्तीशी कायमचा संपर्क तयार करत मी परतले होते.

हाच अनुभव मला पंजाबमध्येही आला. कामानिमित्ताने आठ दिवस पंजाबच्या ग्रामीण भागात फिरत असताना माझा संपर्क फक्त पुरुषांशी येत होता. यातले सगळेच अनोळखी होते. इथून जाताना साध्या फोनवरही त्यातल्या कुणाशीही संपर्क झालेला नव्हता. खरं सांगायचं तर ही माणसं मला भेटतील हेही मला तिथे जाईस्तोवर माहीत नव्हतं. फाझिल्काच्या ‘कॅफे र्रिटीट’मध्ये भेटलेले शिवांश कामरा आणि सावंत थिताई, फिरोजपूरमध्ये भेटलेले मंगलसिंग असोत नाहीतर अमृतसरमध्ये मला रिक्षातून हवं तिथे घेऊन जाणारे सोनूजी असोत. हे सारे पुरुष अनोळखी होते. मी या साऱ्या अनोळखी पुरुषांवर पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांनी तो सार्थकी लावला. सोनूजींबरोबर पंजाबच्या अशा दुर्गम भागातून फिरत होते जिथे मोबाइलला रेंज नव्हती. मूळ रहदारीचा रस्ता कित्येक मल दूर होता. अमृतसरच्या सीमेलगत असलेल्या पूल कंजारी गावात गेल्यावर तिथे मला कुलदीपसिंग भेटले. शेतकरी माणूस. आयुष्यात पहिल्यांदा भेटलो. गावातल्या एका कोपऱ्यात असलेल्या घरी मला आग्रहाने घेऊन गेले, चहा दिला, स्वत:ची कहाणी सांगितली. पन्नाशीचे, धडधडत्या बुलेटवरून फिरणारे फिरोजपूरजवळच्या खेडय़ातले मंगलसिंगजी मला आजही महिन्या-दोन महिन्यांतून एखादा फोन करतात. हालहवाल विचारतात. दोनएक मिनिटं बोलून फोन ठेवून देतात. कुलदीपसिंगजीसुद्धा ‘कैसी हो’ म्हणत कधीतरी फोन करतात. सीमेलगत अतिशय कठीण परिस्थितीत शेती करणाऱ्या या माणसाला त्या अर्ध्याएक मिनिटाचा फोन तरी परवडत असेल का असा विचार अनेकदा मनात येतो. पण ते फोन करतात. शिवांश आणि सावंतने मला फाझिल्कात केलेली प्रचंड मदत मी कधीही विसरू शकणार नाही. फिरोजपूरचेच नरेंद्रजी शर्मा फेसबुकवरच्या मित्र यादीत आले आहेत. मेसेंजरवर त्यांनी केलेल्या नव्या कामाची माहिती शेअर करत असतात. फिरोजपूरलाच भेटलेला तरुण ड्रायव्हर गौरव शर्मा अधूनमधून व्हॉट्सअ‍ॅपवरून फॉर्वर्डचा खेळ खेळत असतो. गमतीजमती सांगत असतो.. मागे एकदा एका प्रॉजेक्टसाठी वर्ष-दीड वर्ष महाराष्ट्रभर फिरत होते, अनेक अनोळखी पुरुषांना भेटत होते, जे आजही संपर्कात आहेत..

कधी कधी वाटतं गेल्या अनेक वर्षांच्या प्रवासात भेटलेल्या या पुरुषांचा आणि माझा काय संबंध? नेमकं काय नातं तयार होतं? खूप विचार केल्यानंतरही या नात्याला द्यायला मला कधीही नाव सुचत नाही. मग वाटतं ते हवंच कशाला? काही नाती निनावी राहिलेली बरी! यात आहे स्नेह आणि माणुसकीचा धागा. तेवढं पुरेसं आहे. स्त्री-पुरुष असण्यापेक्षा माणूस म्हणून एकमेकांशी कनेक्ट होणं आहे. जे अधिक आनंददायी आहे.

माझ्या अनेक मत्रिणी मला म्हणतात, तू नशीबवान आहेस म्हणून प्रवासात तुला भेटलेले अनोळखी पुरुष सज्जन असतात. मला मात्र तसं वाटत नाही. माझा माणसांच्या खरेपणावर पूर्ण विश्वास आहे. भेटलेला प्रत्येक अनोळखी पुरुष आपल्याकडे ‘तेवढय़ा’ एकाच नजरेतून बघतो हा पूर्वग्रह घेऊन वावरणं मला जमत नाही. असा विचार मनात बाळगून सतत असुरक्षित मनानं फिरणं मला गुदमरून टाकणारं आहे. ते पुरुषांवरही अन्यायकारक वाटतं.

का असा विचार करायचा आपण?

मी गेली पंधरा ते अठरा वर्ष प्रवास करतेय. इतक्या वर्षांच्या प्रवासात एकही वाईट अनुभव येऊ नये हा योगायोग आणि नशीब असू शकत नाही. आपण नशीबवान असू तरच परपुरुष आपल्याशी चांगलं वागतात नाहीतर आपली काही खैर नाही या चौकटी फोडून जरा पुरुषांकडे बघायला हवंय! त्यांच्यात होणारे बदल स्वीकारायला हवे आहेत. पुरुष बदलतोय. तो बदलला आहे. त्याच्या बदलाचा वेग निराळा आहे. स्त्री आणि पुरुषांच्या बदलाचा आणि जगण्याचे नवीन आयाम स्वीकरण्याचा वेळ निराळाच असणार आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. कालपर्यंत हा वेग समान नाही याचा मला राग यायचा. वाटायचं हा वेग समान नसल्याने संघर्ष होतो आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. पण जसं वय वाढतं, प्रवास वाढतो, माणसांशी अधिकाधिक संपर्क येतो, स्त्री-पुरुषांचा बदलाचा वेग निराळाच असणार आहे हेही उमगत जातं. ज्यांची जडणघडण मुळात समान नाही, त्याच्या बदलाचा वेग समान असला पाहिजे हा आग्रहच निर्थक आहे.

निरनिराळ्यासंदर्भात प्रवास करताना आणि अनेक अनोळखी पुरुषांना भेटताना कॉलेजच्या काळात केलेली किरण पोत्रेकर यांची ‘प्रासंगिक करार’ ही एकांकिका आठवते. त्यात एक प्रसंग आहे. बसमध्ये ती त्यांच्या शेजारी येऊन बसल्यावर दोघांच्या मध्ये स्वत:ची पर्स ठेवते. तो नक्की स्त्रीलंपट आहे का, त्याच्यापासून आपल्याला काही धोका आहे का हे माहीत नसूनही लहानपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या परपुरुष प्रतिमेमुळे ती तशी वागते. दोघांच्या मध्ये पर्स ठेवून ती त्या परपुरुषाविषयी अविश्वास दर्शवते आहे, त्याच्या चारित्र्यावर शंका घेते आहे हेही तिच्या लक्षात येत नाही. शेजारी पुरुष बसला आहे म्हणजे तो काहीतरी नकोसं वागणार हे गृहीत धरून स्वत:चा बचाव करायला ती दोघांच्यामध्ये पर्स ठेवते.

खरंतर तिने पर्स दोघांच्या मनांच्या मधोमध ठेवलेली असते. ती पर्स तिच्या पूर्वग्रहांना अधोरेखित करत असते. अशी पर्स आपण बायका दररोज ठेवत असतो. परपुरुष म्हणजे धोका या समीकरणातून स्वरक्षणासाठी अशी दृश्य-अदृश्य पर्स आपण बाळगून असतो. परपुरुषापासून स्वत:चा बचाव करणं, त्यासाठी जागरूक असणं निराळं आणि भेटलेल्या प्रत्येक पुरुषाविषयी मनात संशय ठेवून वागणं निराळं. ही पर्स सतर्कता आणि अविश्वास यातला फरक पुसून टाकते आणि आपलं म्हणजे स्त्रियांचं मन पूर्वग्रहांनी प्रदूषित करते. पुरुष बदलला आहे का, बदलतोय का याची चर्चा करत असताना आपण बायका नेमक्या कशा बदललो आहोत, बदलत आहोत याचाही विचार आवश्यक आहे. कारण बदलणाऱ्या पुरुषांना स्वच्छ मनाने स्वीकारण्याची, त्यांच्या बदलाच्या प्रक्रियेकडे मोकळेपणाने बघण्याची नितांत गरज आहे.

(सदर समाप्त)

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व तिच्या नजरेतून तो ( Tichya-najretun-to ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author mukta chaitanya article about good experience with strangers

ताज्या बातम्या