शुभांगी चेतन

आज ‘तो’चं नातं इथपर्यंत आलं आहे की, न बोलताही माझ्या मनातलं त्याला कळतं. आणि प्रत्येक नातं या पावलापर्यंत येतच. केवळ त्यात ‘आम्ही’ सोबतच, ‘ती’ आणि ‘तो’चंही स्थान हवं. ‘आमचं’ या भावनेसोबतच ‘त्याचं’ आणि ‘तिचं’ समज आणि भानही हवं. हे ‘तो’ही शिकला आणि ‘मी’ पण. त्याने माझ्या कोणत्याही क्षणावर ‘स्वामित्व’ मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मी व्यक्ती म्हणून स्वत:लाही समजू शकले.

तसा तर ‘तो’ मला अनेकदा भेटला. वेगवेगळ्या रूपात, भूमिकेत, वाढण्याच्या, घडण्याच्या वयात, विविध वळणावर ‘तो’ भेटत राहिला. कधी त्याने अनेक प्रश्नांमध्ये जखडलं, तर कधी उत्तरांच्या सोबत तो दिसत राहिला.

तू जेव्हा प्रथम भेटलास, तेव्हा प्रेम म्हणजे माझ्यासाठी चंद्र, तारे वगैरे होते. त्या स्वप्नमय दुनियेतून तू लवकरच मला जमिनीवर आणलंस.. नव्हे चांगलंच आपटलंस. तू माझी चूक होतास की, त्या वळणावर मला समज यावी म्हणून मिळालेला धडा होतास?

पण या पहिल्या ‘त्याने’, त्याच्या वागण्याने मी प्रश्न विचारायला लागले, त्याच्या एकूणच ‘पुरुषी’ (जे समाजाने ठरवून दिलेलं आहे) वर्तणुकीने मला प्रश्न पडायला लागले.

त्याच्याबद्दलही आणि मुख्यत्वे ‘स्वत: बद्दलही’.. मला मीच नव्याने कळत होते. हा ‘तो’ त्याच्या आयुष्यातून मी निघाले.. त्याला ‘बायको’ हवी होती.. आणि त्यानेच मला शिकवलं की, ‘मला मित्र हवा आहे’..

आता मला माझ्या वळणाचं चित्र स्पष्ट होत होतं. मला काय करायचं आहे, कोणत्या पद्धतीचं काम करायचंय, त्या कामातून माझा आर्थिक प्रश्न आणि कामाचा आनंद मिळणार आहे का? अशा अनेक प्रश्नांनी दिवसाची सुरुवात होत होती. अशा वेळी मला एका आर्ट कॉलेजमध्ये अध्यापकाची नोकरी मिळाली. आर्थिक बाजू जेमतेम असली तरी, कामाचा आनंद भरपूर होता. कॉलेजची नुकतीच चाहूल लागलेल्या

२५ उत्साही चेहऱ्यांना वस्तुचित्र आणि कला- इतिहास मी शिकवणार होते. सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. नंतर मात्र विचित्र ‘तो’ भेटला. वयाने खूप मोठा, भरपूर अनुभव असलेला. पण बहुतेक अनुभव जमा करता करता, वागणूक हरवून बसलेला. ‘तो’ आम्हाला सीनिअर होता. प्रत्येक दिवशी काय घ्यायचं हे थोडक्यात सांगायचा. सांगता सांगता हात खांद्यावर यायचा. पहिल्यांदा वाटलं, सीनिअर आहे आणि बोलता बोलता हात ठेवणं होत असावं..पण मी चुकीची होते.. असं सलग चार-पाच वेळा झालं.. आणि मी तोंड उघडलं.. ‘सर, असाइनमेंट सांगताना तोंडाचाच वापर होतो. हे सारखं भोज्ज्या करायची आवश्यकता नाही. हात न लावताही सांगितलेलं कळतं मला.’’  हे कदाचित त्याला अनपेक्षित होतं. ‘मी काहीच केलं नाही आणि ही काहीही बोलते’, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता आणि तसंच त्याने ते इतरांना सांगितलंही.. मी मात्र मोठय़ा मॅडमना सांगून त्या कॉलेजमधून माझं बस्तान आवरलं. मुलं हिरमुसली, पण दुसरा पर्याय नव्हता. अशा गढूळ वातावरणात मला राहायचं नव्हतं, ते शक्यच नव्हतं.

या ‘तो’च्या अनुभवानंतर मी काही काळ काहीच न करण्याचा निर्णय घेतला. केवळ चित्रं रेखाटायची, फिरायचं, लिहायचं आणि वाचायचं. लहानसहान कामातून या सगळ्यासाठी लागणारं आर्थिक गणित सोडवलं होतं मी.. वाचताना, फिरताना असे अनेक ‘तो’ भेटले, दिसले, जाणवले. काहींसोबत केवळ ओळख झाली, काहींसोबत मैत्री झाली. त्यातून ‘त्या’च्या नवनवीन छटा कळत होत्या. कधी त्या रंगीत होत्या तर कधी अगदीच करडय़ा, तर कधी अगदीच रंग उडालेल्या, फिकट. पण इथूनच ‘त्या’च्याबद्दल प्रश्न पडायला लागले. ‘तो’ नक्की कसा असतो. फक्त पुरुषी? की मग अजून काही. ‘तो’ संवेदनशील नसतो?..‘तो’ फक्त स्वार्थी असतो?.. ‘तो’ फक्त शरीरावर प्रेम करतो?.. अशा अनेक प्रश्नांनी ‘तो’ साकारला जात होता. आत्तापर्यंत आलेले अनुभव चांगले नक्कीच नव्हते. पण म्हणून सगळ्यांच्या बाबतीत तेच प्रमेय लागू पडतील असंही नव्हतं, हेही कळत होतं. त्यातूनच नजरेसोबतच बुद्धीही पाहू लागली.. पाच-सहा महिन्यांच्या भटकंतीनंतर पुन्हा काही काम करूया, असं मनात असतानाच ‘युनिसेफ’शी संलग्न असलेल्या एका संस्थेसोबत काम करण्याची संधी आली आणि मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

हे खूप महत्त्वाचं वळण ठरणार होतं, याची मला कल्पना नव्हती आणि बऱ्याचदा ती तशी नसतेही. या संस्थेत काम सुरू करण्यापूर्वी मला एका व्यक्तीला माझं काम घेऊन भेटायचं होतं. त्याने माझं काम पाहिलं, त्याला आवडलं. त्याने मला एकच प्रश्न विचारला, ‘‘तुला हे काम करायला आवडेल?’’ मी म्हटलं, ‘‘हो, पण यापूर्वी अशा स्वरूपाचं काम केलं नाही. सो आवडेल पण जमेल की नाही..’’

यावर तो म्हणाला, ‘‘आवडलं की, जमवता येतं. शिकतो आपण ते. आम्ही आहोत.’’ हा ‘तो’ मला खूप आश्वासक वाटला. खूप वेगळा. इतरांपेक्षा. आत्तापर्यंत भेटलेल्यांहून अगदी निराळा. आणि ‘तो’ तसाच होता. आम्ही ‘स्त्री- पुरुष समानता’, ‘मुलींचं शिक्षण – आरोग्य’ या क्षेत्रात काम करायचो. त्यासाठी लागणारी सगळी चित्रं, त्यांची रचना हे काम माझं आणि प्रशिक्षणा दरम्यान डॉक्युमेन्टेशन करणंही.

या संस्थेत हा ‘तो’ सोबत त्याची ‘ती’पण होती. तीन महिने उलटले, एकत्र काम करूनसुद्धा मला हे कळलं नव्हतं की ते दोघं नवरा-बायको आहेत. ते तसे नव्हते. त्यांची परस्परांबद्दलची वागणूकही तशी नव्हती. ‘तशी’ म्हणजे इतर बहुतांशी सर्वच नात्यांमध्ये असते तशी. ते दोघे एकमेकांचे मित्र होते. त्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘जीवनसाथी’. यात कुणी एक-दुसऱ्याहून वरचढ नसतो. दोघं समान असतात. दोघेही लहान असतात, दोघेही मोठे. दोघंही चुकतात. दोघंही समजून घेतात. दोघंही रागावतात पण दोघं मिळून हसतातही. त्या दोघांची ‘आम्ही’ ही भावना वेगळी होती. जी मलाही नवीन होती आणि पटत होती. त्यांचं आपापसातलं नातं पाहून, माझंही ‘तो’बद्दलचं मत बदलत होतं. ‘सगळेच एकसारखे नसतात’ हे जे कळत होतं, त्या माझ्याच मताबद्दल मी ठाम झाले. खऱ्या अर्थाने मी स्वत:लाही इथे नव्याने भेटले. इतरांना प्रश्न विचारताना, आपण ते स्वत:लाही विचारायचे असतात आणि त्याची प्रामाणिक उत्तरंही शोधायची असतात, द्यायची असतात हे मी इथेच शिकले.. ते दोघं एकही असतात, पण त्याच्याशिवायही ‘तिचं’ही एक अस्तित्व असतं. तिचं स्वातंत्र्य हे तिचं असतं, ते ‘तो’ तिला देत नाही. किंबहुना ते कुणीच कुणाला देत नाही. ‘तो’ तिला उगीचच प्रश्न विचारून भंडावून सोडत नाही, ‘तो’ तिच्यावर प्रेम करतो पण त्याहूनही त्याला तिच्याबद्दल, तिच्या कामाबद्दल आदर आहे, त्यांचे वाद होतात तसेच, त्यापेक्षाही अधिक संवाद होतात.. त्यात एखाद्या वळणावर तो माघारही घेतो. ‘तो’ माझं चुकलं असंही म्हणतो.. हा असा एक वेगळाच ‘तो’ मला इथे भेटला.. पण हा ‘तो मला अस्वस्थही करत होता. कारण या ‘तो’ला पाहून माझ्या मनात एक चित्रं उभं राहत होतं. आदर्श वगैरे नाही, कारण तसं काही नसतं. पण ते चित्र त्या एका ‘तो’चं होतं, ज्याची वाट मी पाहत होते. ज्याची सोबत मला हवी होती.. आणि हे असं कुणीच शोधून सापडत नाही हेही कळत होतं. कामानिमित्त प्रवास वाढत होता. एकूणच माझे हे दिवस शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रवासाचे होते. त्यात मनाचे थांबे होतेच पण मनाविरुद्ध येणारी स्टेशन्सही होती.. परंतु आता त्यांचा त्रास होत नव्हता. मला ‘डील’ करणं जमत होतं. लेखन, वाचन असा आमचा एक गट होता. विविध क्षेत्रातले आम्ही तिथे कलेसाठी म्हणून एकत्र यायचो, कार्यक्रम करायचो, ट्रेक करायचो.. पुन्हा इथेही अनेक ‘तो’ भेटत होते. मी त्यांना पाहत होते. कुणी अगदीच उथळ, तर कुणी फारच गंभीर, कुणी फार वैचारिक तर कधी बालिश.. या साऱ्यांना भेटल्यावर माझं एक मत तयार होत होतं.. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि पुन्हा त्या प्रत्येकाच्या जागी तो प्रत्येक जण योग्य.

..हो, पण एकाच प्रश्नाची अनेक उत्तरं असू शकतात आणि ती सगळीच योग्यही असू शकतात, ‘या त्याच्या विचाराने माझी इतरांपेक्षा अधिक चांगली मैत्री ‘याच्या’सोबत झाली. विविध विषयांवर चर्चा व्हायच्या, त्यातून मैत्री पण मोठी होत होती. वाढत होती. या अशा अनेक संवादातून मला असं वाटलं की, मी या ‘तो’चा सोबती म्हणून विचार करू शकते. परंतु जितका सहज हा निर्णय घेतला होता, त्याची पूर्तता तितकी सहज-सोपी नव्हती, झालीही नाही ती तशी. पण कोणत्याही प्रसंगी त्याने ती साथ सोडली नाही. मी पण एक व्यक्ती आहे आणि नंतर माझ्या इतर भूमिका हे त्यालाही समजत होतं. घरासंबंधीचे- घरातल्या व्यक्तीसंबंधीचे कोणतेही निर्णय त्याने परस्पर घेतले नाहीत.

लग्न तर केलं.. आता पुढे.. प्रश्न तर आणखी वाढणारच होते ते. तसे त्यांचं स्वरूपही दाखवत होते. लग्नानंतर घर पाहणं, त्यासाठी लागणारी साधनं आम्ही दोघंही वेचत होतो. ते घर खऱ्या अर्थाने ‘आमचं’ होतं. स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ करण्यापासून ते किराणा माल आणण्यापर्यंत सारं काही माझ्यासोबत ‘तो’ही करत होता. मी शिकत होते. तसंच ‘तो’ही शिकत होता. ‘त्याची’ आणि ‘तिची’ अशी कामं विभागलेली नव्हती. प्रत्येक काम ‘तिचं’ही होतं आणि ‘त्याचं’ही. इथे प्रत्येक क्षणी पुन्हा वेगळाच ‘तो’ भेटला. प्रेम करणारा, भांडणारा, वाद घालणारा पण या साऱ्याहूनही अधिक समजून घेणारा. त्याने माझं ‘असणं’ स्वीकारलं होतं. जे मला प्रिय होतं. पहिल्या ‘तो’ ने, माझं हेच असणं पुसण्याचा प्रयत्न केला होता. याने माझं हेच असणं जपलं होतं.

प्रत्येक नात्यात वादविवाद असतातच, त्यातून रुसवेफुगवे येतात. पण याने आमच्या नात्याच्या सुरुवातीलाच मला सांगितलेलं, ‘कितीही भांडण झालं तरी अबोला ठेवायचा नाही’. मलाही ते पटलं आणि तोही हे मनापासून सांभाळत होता. आज ‘तो’चं नातं इथपर्यंत आलं आहे की, न बोलताही माझ्या मनातलं त्याला कळतं. आणि प्रत्येक नातं या पावलापर्यंत येतच. केवळ त्यात ‘आम्ही’ सोबतच, ‘ती’ आणि ‘तो’चं ही स्थान हवं. ‘आमचं’ या भावनेसोबतच ‘त्याचं’ आणि ‘तिचं’

समज आणि भानही हवं. हे ‘तो’ही शिकला आणि ‘मी’ पण. त्याने माझ्या कोणत्याही क्षणावर ‘स्वामित्व’ मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मी व्यक्ती म्हणून स्वत:लाही समजू शकले.

या ‘तो’ने माझी साथ दिली. मला अनेकदा लोक म्हणतात, ‘‘तू हे जे काही करू शकतेस ते फक्त ‘तो’ सोबत आहे म्हणून.’’ हा ‘फक्त’ तो शब्द मला टोचतो. लागत राहतो. एकदा हा म्हणाला, ‘तेवढंच कारण नाहीए. तिच्यात ती क्षमता आहेच.’ मला म्हणाला, ‘‘आपण एकमेकांसोबत एकमेकांना सांभाळणं, हेच तर नातं आहे ना.’’ हा अजूनही प्रत्येक क्षणी मला वेगळा ‘तो’ म्हणून भेटतो. एखाद्या कटू अनुभवातून ‘सारेच एकसारखे’ हे तात्पर्य नसतंच कधी, हे त्याला भेटल्यावर मला अधिक कळलं. त्याचंही एक विश्व असतं. ज्यात तो हळवा असतो. त्याचं हसू असतं तसंच आसूही असतात. त्यालाही आवडतं मनमोकळं रडायला, त्यालाही आवडतं लहान व्हायला आणि मग हवी असतेच कुणीतरी ‘ती’ व्यक्त व्हायला. हे ‘त्या’च्या सहवासात मला उमजलं.

मी एकदा त्याला म्हटलं होतं, माझ्या स्वप्नांवर मात करण्याचा प्रयत्न करशील तर ‘नवरा’ होशील.. माझ्या स्वप्नांना स्वत:ची स्वप्नं समजून पूर्ण करायला पाहशील तर ‘प्रियकर’ होशील.. पण माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सोबत उभा राहशील तर ‘मित्र’ होशील.. ‘तो’ आजही माझा ‘मित्रच’ आहे.

shubhachetan@gmial.com