शिल्पा गडमडे -मुळे shilpa.gadmade@gmail.com

तुला वाटेल, काय आज ही दु:खाचं गाठोडं उघडून बसली, पण कधीतरी व्यक्त होणं गरजेचं असतंच ना डायरी.. माझं त्याच्याशी भांडण नाही, राग वगैरे तर नाहीच नाही. मला माझं ‘मी’ असणं आवडतं. ‘तो’ असल्यामुळे मिळणारी स्पेशल वागणूक न मिरवणारा तो देखील आवडतो.. माझ्या नजरेत तो केवळ ‘तो’ आहे.. त्याचे जगणे समरसून जगणारा, छंद जोपासणारा.. आणि तो केवळ ‘तो’ आहे म्हणून वरचढ नाही हे जाणून असणारा..

प्रिय डायरी,

आज उगाचच मन ढवळून निघालं आहे बघ. उगाचच काहीबाही आठवणी डोकं वर काढू लागल्या आहेत.. का, कशा, कशासाठी काही कळत नाहीय.. बरं या आठवणी कधीच्या? तर कधीच्याही.. अगदी लहानपणापासून तर काल परवापर्यंतच्या.. आपल्याला माहीतच नसतं या आठवणींना एवढय़ा मागेपर्यंत जाण्याची ताकत असते ती. आठवणी माझ्याच.. माझ्या नजरेतून माझ्या प्रवासाच्या.. या आठवणींमधून मीच डोकवतेय.. कधीतरी हिरमुसलेली, कधीतरी लढणारी, कधीतरी नकोच हा वाद म्हणून दुर्लक्ष करून पुढे जाणारी..

प्रिय डायरी, मला नं प्रश्न पडलाय की, हे जे मी तुझ्याजवळ मनमोकळेपणाने बोलते (खरंतर लिहिते) ते असं दुसऱ्यांना वाचायला द्यावं का? वयाच्या वेगळ्यावेगळ्या टप्प्यात ‘मला’ आलेले अनुभव उधळून टाकावेत का अनोळखी पण आपल्याच लोकांसाठी? तुझ्याजवळ व्यक्त झालेली मी वाचून कोणाकोणाला अजून काहीकाही आठवेल का? तू म्हणशील किती गं प्रश्न पडतात तुला? (तसं बघायला गेलं तर हा देखील एक प्रश्नच).. प्रश्नांची जंत्रावळ अशी सहज पाठ सोडत नसतेच बघ! आपण आणि आपलं आयुष्य कुठल्याही टप्प्यावर असलं तरीही..

मी लहान असताना म्हणजे फार तर आठ-नऊ  वर्षांची असेन. तिसरीत की चौथीत होते हे नक्की आठवत नाहीये आता. आमच्या शाळेत वार्षिक क्रीडास्पर्धा होत्या. लहान मुलं म्हणून स्पर्धाही साध्याच होत्या. लिंबू चमचा, संगीत खुर्ची, गोणपाट उडी वैगेरे.. त्यावर्षी पहिल्यांदा ‘स्लो सायकलिंग’ची स्पर्धा देखील आयोजित केली होती. सगळ्या स्पर्धामध्ये सगळ्यात पुढे कोण तो विजेता असा नियम असतो पण या स्पर्धेत सगळ्यात मागे कोण असणार तो जिंकणार असं वर्गात बाईंनी सांगितलं तेव्हा मज्जा वाटली होती. सगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायचाच हे मी मनाशी ठरवलं होतंच पण विशेष लक्ष होतं ते ‘स्लो सायकलिंग’ या स्पर्धेकडे. घरी आल्यावर पाठीवरचं दप्तर काढता काढताच मी आईला स्पर्धाविषयी सांगितलं. घरात फक्त दादाकडे सायकल असल्यामुळे तो घरी येईपर्यंत धीर धरावाच लागणार होता. तोवर घरात अडगळीत पडलेलं पोतं शोधून, ते झटकून मी पोत्यात शिरले आणि घरातल्या घरात इकडून तिकडे टुणूक टुणूक उडय़ा मारत गोणपाट उडी स्पर्धेचा सराव सुरू झाला. थोडय़ावेळाने थकल्यावर मी छोटय़ा प्लेटमध्ये खाऊ घेऊन खिडकीत जाऊन बसले. खिडकीतून बाहेर बघितलं तर माझ्याच वर्गातील शेजारी राहणारी मैत्रीण स्लो सायकलिंगची पॅ्रक्टिस करत होती. तिच्याकडेही सायकल नव्हतीच. तिने तिच्या भावाची सायकल घेऊन सराव सुरू केला होता. मला आता दादा कधी घरी येतो आणि मी कधी एकदा सायकल घेते असं झालं होतं. प्रिय डायरी, तुला वाटत असेल ना की त्या सायकल स्पर्धेसाठी किती हा आतुरपणा? पण त्यावेळेला तसं झालं होतं खरं..

संध्याकाळी उशिरा दादा घरी आला. मी त्याला दारातच अडवून सायकलसाठी  विचारलं तेव्हा त्याने माझी मागणी धुडकावून लावली. मला वाटलं आज मूड नाही म्हणून असेल उद्या विचारूया, पण दुसऱ्या दिवशी पण नकार.. आईचं ऐकेल म्हणून आईमार्फत विचारले तर तिलाही सपशेल नकार मिळाला. स्पर्धा जवळ येत होत्या, कधी मी थेट, कधी आईच्या आडून रोज भावाची विनवणी करत होते, पण तो काही आमच्या विनंतीला अजिबात बधला नाही. मी रुसून खिडकीत येऊन बसे, तेव्हा समोरच्या अंगणात मला दिसत असे सायकल घेऊन सराव करणारी माझी मैत्रीण आणि त्याच अंगणात माझ्या भावाची कुलुपबंद केलेली सायकल..

स्पर्धेच्या दिवशी मला सायकल मिळाली. पण माझा पहिला नंबर आला नाही. माझ्या मैत्रिणीने मात्र पहिला नंबर मिळवला होता. त्या दिवशी मी खूप हिरमुसले.. घरात सायकल असूनही ती माझ्यासोबत शेअर न करणारा ‘तो’ आणि बहिणीला रोज सायकल देणारा ‘तो’.. असे कसे वेगळे आहेत असा प्रश्न खूप दिवस पडत राहिला बघ..

तुला हे मी आधी कधीतरी सांगितलं असेलच डायरी.. मला कॉलेजमध्ये असताना नाटक बघायला, गाण्यांच्या मैफिलींना जायला खूप आवडत असे. पण आमच्या घरातल्या कोणाला विशेष नाटकाची आवड नव्हती. नाटकांचे जवळपास सगळे प्रयोग रात्री उशिरा असल्यामुळे मला नाटक बघायला जाता येत नसे. कारण नाटक संपून घरी यायला उशीर होत असे. आणि ‘मुलीच्या जातीने’ रात्री उशिरा एकटीने यायची परवानगी नसे. (‘मुलीच्या जातीने’ काय करावे आणि काय करू नये याबद्दल आजवर ऐकलं त्याची यादी करायला घेतली ना तर ‘गिनिज बुक’मध्ये सगळ्यात मोठी यादी म्हणून नाव देखील येईल या यादीचं) सोबत जाणाऱ्या मित्रमंडळीपैकी कोणी घरी आणून सोडणार असेल तर कधीतरी जायला परवानगी मिळत असे. उशीर होताना नाटक किंवा एखादी महफिल रंगत जाई, पण घडय़ाळाचा काटा पुढे सरकताना माझं लक्ष मात्र आपोआप घडय़ाळातच जास्त गुंतून राही. उशीर झाल्यावर रात्री सुरक्षितपणे सगळ्या मैत्रिणींना घरी सोडण्याची जबाबदारी ‘मित्रांवर’ येत असे, पण त्यांना जमणार नसेल तर कधीतरीच आमच्या शहरात येणाऱ्या नाटकांना मुकावे लागे. घरच्यांची काळजी समजत असे. रात्री मुलींना सुरक्षितपणे घरी पोहचण्याच्या काळजीपायी कार्यक्रमांना मुकावे लागल्यावर तर माझी चिडचिड होई. सुरक्षितपणे पोहचवणारा ‘तो’, आणि सुरक्षितपणे पोहोचण्याच्या मार्गात येऊ शकणारा ‘तो’ एकाच समाजाचे घटक..

लग्न झाल्यावर नवऱ्यासोबत कितीही उशिरा नाटक असलं तरी जाता येणे, हा एक मुद्दा मी ‘लग्नाचे फायदे’ या सदराखाली नोंदवून ठेवला होता. (नवऱ्याला नाटकाची आवड असेल का? असे रिआलिटी चेकवाले प्रश्न माझ्या स्वप्नाळू मनाला कधी पडले नाही ही गोष्ट वेगळी.)

प्रेमात पडायच्या वयात प्रेमात पडले. त्याबद्दल तुझ्याजवळ कबुलीदेखील दिली होती मी डायरी.. आम्ही एकमेकांना आवडतोय मग आता लग्न करायला हरकत नाही, असा विचार करून लग्न करूयात असं आम्ही ठरवलं. संसाराची स्वप्नं रंगवली, असं करू या, तसं करू या, काय काय बोललो आम्ही.. ते तसे स्वप्नाळू डोळे घेऊन प्रेमाबद्दल घरी सांगितले. होकार-नकार सगळ्या पायऱ्या पार करत शेवटी गोष्टी लग्नाची बोलणी करण्यापर्यंत आल्या. त्यातला व्यवहार आला. नाती जोडताना मनं बघून नाती जोडावीत असं सुविचारवजा वाक्य बरेचदा कानी पडलं होतं.. तोवरच्या आयुष्यात मित्रमंडळी जमवताना ते अनुभवलं देखील होतं. पण आयुष्यभर नाती जोडताना व्यवहार इतक्या चोखपणे कसा बघितला जातो ते काही कळेना. पुन्हा एकदा ‘मुलीच्या जातीने’ काय करावे, काय करू नये याच्या अपेक्षांची यादी झालीच. मी मुलगी आहे म्हणून आमच्या लग्नाचा खर्च माझ्या आई-बाबांनी करायचा आणि ही रीत आजवर सगळ्यांनी पाळली म्हणून, पुढच्या लोकांनीदेखील डोळे, विचार, कान या सगळ्यांवर झापड लावून ती पुढेही पाळायची हे मला नव्यानेच कळले.

आजवर मी ज्याच्या सोबतीने माझ्या भावी आयुष्याचं स्वप्न बघत होते तो माझा ‘सोबती’ नव्हे तर केवळ ‘तो’ असल्यामुळे ‘तिच्या’ वरचढ ठरतो हे कळले. ‘तो’ आणि ‘ती’चा संसार सोबतीने सुरू असला तरी त्यांना एकच दर्जा असणार नाही हे कळून पचवणे (किंवा बदलणे) अजून अंगवळणी पडले नाहीय.

प्रिय डायरी, तुला माहिती आहे माझ्या मुलीला शीळ घालत घालत आपल्या बाहुल्यांशी खेळायला आवडतं. मी तिला अडवत नाही. किंवा ‘मुलीच्या जातीने अशी शिट्टी वाजवत फिरू नये’ असे पालुपद लावत नाही. आता दुसरा चान्स घे कारण वंशाला दिवा हवाच बघ.. अशा सल्ल्यांकडे मी दुर्लक्ष करते.  पण तुला खरं सांगू डायरी, यात माझी फार दमछाक होते. कधी तरी मला मी हरवले आहे असा भास होतो. मीच मला सापडत नाहीय असं वाटायला लागतं. माझ्या नजरेत माझा भाऊ फक्त भाऊ असावा, मित्र फक्त मित्र असावा, नवरा फक्त नवरा असावा अशी आशा असते. त्याचे अस्तित्व वगळून मला पुढची वाटचाल करायची नसते. त्यांच्यात आणि माझ्यात फरक नसून आम्हाला एक ‘व्यक्ती’ म्हणून बघण्यात यावं एवढीच अपेक्षा असते. मला ‘तो’ वेगळा आहे हे जाणवून देणारे लोक जेवढय़ा जास्त प्रमाणात भेटत जातात तेवढय़ाच पोटतिडकीने मी स्वत:ला शोधू लागते.

तुला वाटेल काय आज ही दु:खाचं गाठोडं उघडून बसली, पण कधीतरी व्यक्त होणं गरजेचं असतंच ना डायरी.. माझं त्याच्याशी भांडण नाही, राग वगैरे तर नाहीच नाही. मला माझं ‘मी’ असणं आवडतं. ‘तो’ असल्यामुळे मिळणारी स्पेशल वागणूक न मिरवणारा तो देखील आवडतो.. माझ्या नजरेत तो केवळ ‘तो’ आहे.. कुठल्याही तिच्यासारखा वेगळी ओळख तयार करण्यासाठी धडपडणारा, त्याचे जगणे समरसून जगणारा, छंद जोपासणारा.. आणि तो केवळ ‘तो’ आहे म्हणून वरचढ नाही हे जाणून असणारा..

आजचा तुझ्यासोबतचा संवाद भरकटलाय फार.. पण कधीतरी असं भरकटणं हवंच.. नाही का?

माझं एवढं ऐकून घेतलंस त्यासाठी तुला एक जादूची झप्पी..

लवकरच भेटू डायरी..

तुझीच

नावाची गरज आहे का?

chaturang@expressindia.com