scorecardresearch

तारतम्य

हरीश सदानी आणि त्याच्या ग्रूपसोबत जरा राहिले, काम केले आणि गे पुरुषांची गोची लक्षात येऊ लागली.

मनीषा कोर्डे mkspostbox@gmail.com

पुरुषसत्ताक विचारसरणीत आणि कंडिशनिंगमध्ये ‘तो’ही अडकलेला आहे, त्याची ही फरफट होतेय, दिसतंय, जाणवतंय. आणि म्हणूनच तोही प्रयत्न करतोय या बेडीतून बाहेर पडण्याचा. त्याला मी कसं बघतेय? तो ते सारे जुने ठसे पुसू बघतोय आणि मी मात्र तेच ठसे घोटीत बसले आहे? माझ्या भवतालाकडे बघणारी माझी नजर इतकी पूर्वग्रहदूषित कशी? शोषण झालेल्या मुली मोकळ्या स्वरांनी त्यांच्या अत्याचारांना वाचा फोडताहेत, हे आत्यंतिक गरजेचं आहे, पण मी माझ्या नजरेतलं तारतम्य टिकवू शकणार आहे का, असा प्रश्न माझा मीच मला विचारते.

कायदे बदलले म्हणून माणसं बदलली, की माणसं बदलली म्हणून कायदे बदलले? आणि दोन्ही बदलले असले, तरी त्यांच्याकडे बघणारी मी बदललेली आहे का? हा माझ्यासाठी, माझ्यापुरता मोठा प्रश्न आहे. पुरुष बदलतो आहे आमूलाग्र, माझ्या अवतीभवतीचा. माझी नजर, माझी आकलनशक्ती आणि माझी अनुकंपा कमी कमी, अधिकाधिक कमी होऊ लागली आहे त्याला समजून घेण्याची, मला खोल खंत आहे.   आधी सगळं ठरलेलं होतं. तो पुरुष होता, मी स्त्री होते. निसर्गाच्या दोन टोकांवर आम्ही आणि तरीही पूरक, सहायक. माझा संघर्ष काय होता, माझी मुक्ती कुठे होती, सगळं आखलेलं होतं. सुसह्य़ होतं, असं नाही, पण माहिती होतं यापासून मुक्ती हवी आहे. हा, हा, हाच तो शतकानुशतके छळ करणारा, जुलूम करणारा, खलनायक हाच तो. थोरामोठय़ांनी मशाली पेटवून दिल्या होत्या, दिशा ठरवून दिल्या होत्या. पुढे चालू जाता, मागे वळून पाहिले, तर ज्याच्या विरोधात पदर खोचला होता, त्याचे रूप बदलले आहे. चेटकिणीच्या गोष्टीतल्या पाखरासारखं.. आता माझी गोची झालीय.

लग्न जमवणाऱ्या पोर्टलवर ओळख झाली त्याची. बुद्धिमान, दोन-तीन देशांत शिकलेला, परदेशात स्थायिक, विचार व्यापक, नजर संशोधक, हृदय मऊ, डोळे आश्वासक. उत्साहाने सळसळणारे खांदे. आमचं काम करण्याचं क्षेत्र एक. लग्न करण्याविषयी ठाम. पाच बहिणींवर हा एकटा. आई भारतात. सोबत असताना धमाल. पुढे जाण्याआधी एका मैत्रिणीला भेटवला. (तिने चार पावसाळे जास्त पाहिले होते.) तिघांचाही छान वेळ गेला. तो गेल्यावर ती म्हणाली, ‘‘वेडी आहेस का? तो गे आहे.’’ विश्वास बसेना. त्याचं फेसबुक अभ्यासलं. आमच्यात जे कॉमन फ्रेंड होते, त्यांच्यासोबत बोलून अंदाज घेतला. कोण इतकं लपवून काय ठेवेल? मी विचारलं नव्हतं आणि त्यानं उघडपणे सांगितलं नव्हतं. मग माझा जो संताप झाला, कालीमातेचा अवतार. मला फसवायला निघाला काय? माझ्यापासनं लपवतोयस काय? अरे, जातीचा कलाकार असशील तर दाखव थोडा प्रामाणिकपणा! तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून माझं आयुष्य खुंटीला टांगायला निघालास? चिडचिड, अपमान, संताप, फसवणूक, थमान. त्याला भोवऱ्यासारखा माझ्या जिभेच्या पट्टय़ाला बांधला आणि पीळ देत लांब फेकून दिला. आता तो आयुष्यात कधी विसरणार नाही. आज काही वर्षांनंतर जेव्हा गे मित्र वाढले, मावा (मेन अगेन्स्ट व्हॉयलन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रेशन) संस्थेसोबत काम वाढलं, हरीश सदानी आणि त्याच्या ग्रूपसोबत जरा राहिले, काम केले आणि गे पुरुषांची गोची लक्षात येऊ लागली. समाजाकडून स्वीकार नाही, सतत कुचेष्टा, कौटुंबिक अपेक्षा – एक ना अनेक! ते जीवन आजही सोप्पं नाही, काही वर्षांपूर्वी तर अधिकच कठीण होतं. ‘‘तू कलाकार असशील तर..’’ असा बाण मी त्याच्याकडे फेकला होता. तोच बाण परतून आज माझ्यावर चालून येतो माझ्या एकांतात. ‘‘माझंही हृदय कलाकाराचं आहे, असं मी म्हणते तर मला त्याच्या असत्याचा स्वीकार खेळकरपणे का नाही करता आला? मी त्याला त्याच्या प्रकटनावर का नाही सोडलं? त्याचं जगणं कठीण आहे, याचा विचार करून त्याला माफ का नाही केलं? सतत धुत्कारले गेल्यामुळे होणारी त्याच्या जिवाची तगमग नुसती तगमग; थोडी कल्पनाशक्ती ताणली असती मी; तर समजणं काय कठीण होतं? त्याला धडा शिकवण्याची गरज; त्याला माफ करण्यापेक्षा जास्त होती का? वेळ आली की नेमकी कोणत्या गटारात वाहत जाते माझी अनुकंपा?’’ हे प्रश्न मला छळतात, लाज आणतात. माझ्या अवतीभवतीचा ‘तो’ बदलला होता. त्याच्या सोबतीने मी बदलले नव्हते. किंबहुना, आपल्यातल्या एका विचक्षण सत्याचा स्वीकार करत, त्याच्या कठीण आंतरिक लढाया त्याने जिंकल्या होत्या. मी त्याचा आदर केला नाही. तो पुढे निघून गेला होता. मला सरपटायलासुद्धा जमले नाही.

एक छोटेखानी कार्यक्रम. कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी थोडी पावसात भिजत, ओढणीने चेहरा, घाम पुसत खुर्चीवर बसली. सोनेरी कानातले, गळ्यात काहीतरी माफक. वीसही नखांना नेलपॉलिश. चेहऱ्याला स्थर्य देणारी टिकली. तिचे अनुभव ऐकायला जमलो होतो, एका टुमदार  बंगल्यात. अडनिडं वय होतं, तेव्हापासून तिने आयुष्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. भटक्या जमातीतला मुलगा. पण वाचनाची, कवितेची आवड. स्त्रण असल्याने होणारा छळ आणि कोवळ्या शरीरातले जाणते-अजाणते, पेलणारे-न पेलणारे संघर्ष. कोण्या एका सद्गृहस्थाकडे राहायला जागा अन् वाचायला आंबेडकर-फुले-ढसाळ मिळाले आणि त्याचं (आता हिचं) जीवन बदललं. कष्टाचं जीवन. त्यात मार्ग वेगळा. आपण पुरुष नाही, स्त्री आहोत, हे तिला आतून ठाम माहिती होतं. पण समाजाची नजर वेगळी होती. आपल्यातील स्त्रीत्वाला शरण जाणं आणि समाजाला त्याचा स्वीकार करायला लावणं – अशी दुहेरी लढाई होती. ती कथा ऐकताना आम्ही हसलो, रडलो, प्रेरित झालो, सकारात्मक ऊर्जेने भरून गेलो आणि कार्यक्रमानंतरच्या चहापानाच्या वेळी त्या तरुण प्रमुख पाहुण्यांशेजारी आम्ही जमा झालो. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ‘‘सध्या तू काय करतोयस?’’, ‘‘तुझा पत्ता काय रे पण?’’ तिने शांतपणे प्रश्नांची उत्तरे दिली, पण सुधारणा करत. ‘‘माझ नाव दिशा आहे.’’ आधीचा तो आणि आताची ती, सूचकपणे आम्हाला हा बदल सुचवत होती आणि आम्ही गेले दीड तास तो ऐकतही होतो, पण ते आमच्यात झिरपत होतं का? जन्माने ती काय होती, माहीत नाही, पण डॉक्टरांनी तिला पुरुष घोषित केलं होतं. परंतु आंतरअनुभवाने तर ती स्त्रीच होती. ती बदलली. संघर्ष करून, जीव आणि पसा पणाला लावत तिने तिच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली होती. पण आम्ही बदलली होती का? (जमलेल्या अधिकतर बायका होत्या आणि त्यात मीही होते.) किती वेगाने आणि किती अकल्पितरीत्या जग बदलतंय. आमूलाग्र बदल. एकेक जाणीव, धारणा रुजवू पाहता पाहता नवे वारे येते, नव्या बिया घेऊन. वाऱ्याचा वेग पकडताना त्रेधातिरपीट होते. स्त्री-पुरुष आणि चौकातले ‘अधलेमधले’ इथवर तिच्या नजरेला माहीत होतं. आता लिंगप्रवाहितता येऊ घातलीये. परदेशामधे जन्मत: डॉक्टरांनी दिलेले लिंगनिदान आणि मोठे झाल्यावर त्या व्यक्तीला आपले वाटणारे लिंगनिदान यातला फरक केला जाऊ लागला आहे. जन्माला आलेल्या काही बाळांमधे लिंग विकसित झालेलं नसतं, तेव्हा डॉक्टर ठरवतात त्या त्या वेळेला अंदाज बांधून, मुलगा का मुलगी ते. पण अशी अनेक बालके आहेत, ज्यांना ‘मुलगा’ घोषित केल्यावर (हो, परदेशातही तिकडे कल जास्त असतो, असं ती डॉक्युमेंटरी बघून तरी मला वाटलं) काही वर्षांनी तो मुलगा म्हणून जगायला स्पष्ट नकार देतो आणि ६-७, १०-१२ वर्षांची मुले आपापले लिंग निवडीचे अधिकार मागून घेत मुलगी होतात किंवा मुलीचा मुलगा होतात. हे आपल्याकडेही होईलच आज ना उद्या, कारण ही वाट मोकळी आणि मुक्ततेची आहे. अधिकाधिक स्वातंत्र्याची आहे. मग अशा वेळी माझ्या चौकटग्रस्त नजरेने मी काय करणार आहे, असा मला प्रश्न पडतो, कारण आताही जी परिस्थिती आहे, तिला तरी कुठे मी निरपेक्ष बघू शकतेय?

एखादे निर्भया प्रकरण झाले की हमखास ‘लिफ्टवाला’ मेसेज येतो. तुम्ही जर लिफ्टमध्ये एकटय़ा असाल आणि एक पुरुष शिरला. तर? तुम्ही प्रत्येक मजल्याचे बटन दाबा म्हणजे प्रत्येक मजल्यावर लिफ्टचं दार उघडेल आणि तुम्ही सुरक्षित राहाल. वर वर बघता ‘काळजीपोटी लिहिलेल्या’ या मेसेजमधे किती काय काय भयंकर गोष्टी गृहीत धरल्या आहेत आणि त्या भयंकर गृहीतकाच्या काळ्या चष्म्यातूनच मी माझ्या अवतीभवतीचे पुरुष बघते आणि शांतपणे रांगेत उभ्या असलेल्या पुरुषावर दरारा दाखवते किंवा खास हक्काची जागा म्हणजे परप्रांतीय ऑटोवाले, त्यांच्यावर वैतागते. या गृहीतकग्रस्त नजरेनेही घात होत असतील, अपाय होत असेल; असं मला का वाटत नाही?

झाडांवर केलेला एक प्रयोग सगळ्यांना माहिती झालाय आजकाल. दोन सारखी रोपे. दोन सारख्या कुंडीत. बाकी हवामान, खोली, पाणी टाकण्याच्या वेळाबिळा सगळं तेच. पण पाणी घालतानाची भावना वेगळी. एका रोपटय़ाला सकारात्मक भावना देत, प्रेम देत पाणी घातलं जातंय, तर दुसऱ्याला दु:स्वास करत. पहिलं फुलतं, दुसरं करपतं. माझ्या अवतीभवती जवळपास सगळी पुरुष मंडळी (हो, परप्रांतीयसुद्धा) चांगली आहेत. भली आहेत. माझा विचार करणारी आहेत. हे माझे सुदैव नाही, त्रिवार नाही. असे असतातच पुरुष. आणि तरी जेव्हा एखाद्या हृदयभंगानंतर मी मानसोपचारतज्ज्ञांकडे मन मोकळं करते, तेव्हाचे मला माझे शब्द आठवत नाहीत, पण माझे शब्द ऐकल्यानंतरचे त्या बाईच्या चेहऱ्यावरचे भाव जरूर आठवतात. अचंबित.

‘‘त्याला काहीच त्रास होत नसेल?’’

‘‘छे छे, पुरुषांना कसला त्रास होतो?’’

(तोच तो – मी आता सांगितलेला अचंबित चेहरा)

‘‘त्यांना भावना नसतात?’’

‘‘नसतात.’’

‘‘त्यांना दु:ख होत नसेल?’’

‘‘नाही. ते गुंततात ना कुठेही दुसरीकडे. त्यांना काही फरक पडत नाही.’’

‘‘तुमचे काही आवडते लेखक व कवी पुरुष आहेत.’’

‘‘असतील. पण तेही प्रत्यक्षात कसे असतील, कोण जाणे.’’

लाडाकोडात वाढलेली मी. घरच्यांनीच नाही तर बाहेरच्यांनीही बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या देशात काळजी घेतलेली मी! हा ठामपणा माझ्या स्वरांमध्ये येतो कुठून? पुरुषसत्ताक विचारसरणीत आणि कंडिशनिंगमधे तोही अडकलेला आहे, त्याची ही फरफट होतेय, दिसतंय, जाणवतंय. आणि म्हणूनच तोही प्रयत्न करतोय या बेडीतून बाहेर पडण्याचा. त्याला मी कसं बघतेय? तो ते सारे जुने ठसे पुसू पुसू बघतोय आणि मी मात्र तेच ठसे घोटीत बसले आहे? माझ्या भवतालाकडे बघणारी माझी नजर इतकी पूर्वग्रहदूषित कशी? कोणत्या रोपटय़ाला मी काय धारणेने पाणी घालते आहे आणि माझे कोणते रोपटे उमलणार आहे; कोणते करपणार आहे? पिकलेल्या बोरासारखी टपाटप नावं गळून पडताहेत, आरोप होताहेत, शोषण झालेल्या मुली मोकळ्या स्वरांनी त्यांच्या अत्याचारांना वाचा फोडताहेत, हे आत्यंतिक गरजेचं आहे, पण मी माझ्या नजरेतलं तारतम्य टिकवू शकणार आहे का, असा प्रश्न माझा मीच मला विचारते, तेव्हा पुढचा चढ मला दिसतो, चाचपडायला होतं. ही वाट सोपी नसणार आहे, पण मला भान आले की नजर येईल अशी आशा आहे.

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व तिच्या नजरेतून तो ( Tichya-najretun-to ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Men against violence and aggression

ताज्या बातम्या