|| श्वेता चक्रदेव

विश्वाच्या उत्पत्तीपासून स्त्री-पुरुष यांच्यात असलेला मूलभूत फरक तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. बायोलॉजी १०१, केमिस्ट्री १०१ सारखा पुरुष १०१-स्त्री १०१ असा कोणता क्लास किंवा कोर्स नसल्याने, तिला किंवा त्याला ओळखण्यासाठी आयुष्याची बरीच किंवा सगळीच वर्षे चाचपडण्यातच जातात. भिन्नलिंगाचा अंदाज येतोय असे वाटेपर्यंत काहीतरी नवीनच कळतं आणि पुन्हा जिथून सुरुवात केली होती; तिथेच आलोय की काय असे वाटायला लागते. तो नक्की कसा होता किंवा कसा आहे याचा आढावा घ्यायला गेले आणि वाटले की, काहीही म्हणा, मागच्या १२-१५ वर्षांत सगळ्याच ‘तो’ वर्गाने आपल्या वागण्यात, असण्यात जबरदस्त प्रगती केली आहे.

बाबा-काका लोकांची पिढी आणि आताची नवरा-दीर किंवा मित्र, भाऊ लोकांची पिढी पहिली की हा फरक अधिकच जाणवतो. मुळातच समोरची ती आणि आपण हे फार काही वेगळे नाहीत हे लहानपणापासून ऐकत आलेल्यांच्या हळूहळू वर्तणुकीत यायला लागलंय. स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलतच नाहीये मी, पण मुळातच बरोबरीने वागवणे एवढा मुद्दा घेतला तरी हा अत्यंत स्वागतार्ह बदल दिसतोय आणि खरे तर सुशिक्षित वर्गाला आता तो हळूहळू सवयीचा झालाय. मागच्या काही वर्षांत पुरुषांच्या झालेल्या या लक्षणीय प्रगतीस बायकाच कारणीभूत आहेत असे वाटते. घरातल्या बायका आधी जे गुपचूप ऐकून घेत होत्या, आतल्या आत, माजघरातून बाहेरही येऊ देत नव्हत्या, त्याच वेळी त्या सगळ्या लपवल्या जाणाऱ्या गोष्टी चुकीच्या आहेत ही जाणीवही त्या तिथेच लोळत असणाऱ्या लहान मुलं-मुलींना देत होत्या. त्यामुळे ही पिढी मोठी झाली तीच मुळी, हे असे वागणे, असणे चुकीचे आहे आणि मी मोठा/मोठी झाल्यावर असे करणार नाही/ होऊ  देणार नाही हा विचार करत. छोटीशी वाटणारी ही बाब खरे तर एक सुजाणत्वाकडे जाऊ पाहणारी ‘तो’ ची पिढी घडवत होती आणि एका सजग ‘ती’ची पिढीदेखील.

खरे तर हा अव्याहतपणे होणारा त्याच्यातला बदल ‘तो’ थोडा जाचक झालाच असणार, नव्हे होतोच कारण बदल हा नेहमीच सोपा असतो असे नाही कितीही गरजेचा असला तरीही. पण जाचक वाटला तरी त्या बदलाला विरोध केला जात नाही यातच हा बदल गरजेचा आहे हे ‘तो’ला पटलंय ही किती छान गोष्ट आहे. आधी घरातल्या त्याने जेवायचे मग तिने हे आता बघायलाही मिळत नाही. मुळात पुरुष म्हणून मला प्राधान्य मिळायला हवे ही बाबच पुरुषांसाठी कमी महत्त्वाची व्हायला लागली आहे. घरातल्या बाईच्या बरोबरीने उभे राहून स्वयंपाकापासून ते मुलांना वाढवण्यापर्यंत दोघांनी करायच्या गोष्टी आहेत. एवढेच नव्हे तर कधी एकटेच उभे राहून रांधून घरातल्या लोकांना (घरातल्या बाईसकट) खायलाही घालायचे आहे त्यामुळे हे सगळे करता आले पाहिजे किंवा जमले पाहिजे, हा सगळ्यात मोठा बदल झाला असे मला वाटते. घरातले आपण एक ‘टीम’ आहोत हा खूप मोठा बदल माझ्या पिढीने पाहिला. मला वाटतं माझ्या पिढीतील अनेक पुरुष खूप चांगले काम करत आहेत त्यांचे कौतुक केले पाहिजे.

मला तर वाटते की, मला पुरुष परदेशात आल्यावर अधिकच कळला. परदेशात आल्यावर, इथे वावरल्यावर, आपण बघतो, वागतो आणि पाहतो ते आणि तसेच बरोबर असते हा मोठा भ्रम सगळ्यात आधी दूर होतो (अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता) आणि हे बऱ्याच जणांच्या आणि बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत होत असते. आपल्या सुरक्षित छोटय़ाशा तळ्यातून बाहेर येऊन बाहेरचे जग पाहिल्याचा हा खरे तर खूप मोठा फायदा असतो आणि तेही कळायला थोडा वेळ जावा लागतो.

मला परदेशात आल्यावर अत्यंत ‘सुरक्षित’ वाटले. उगाच तुमच्या कपडय़ांकडे कोणी बघतेय, तुमचा कोणी पाठलागच करतोय किंवा कोणी छेडच काढतोय या सर्रास चालणाऱ्या गोष्टींना आपल्यातल्या प्रत्येक बाईला कधीतरी तोंड द्यायला लागते. कोणीही उठावे आणि पटकन बाईची छेड काढावी हे सगळे नव्हतेच इथे. कायद्याची भीती असणे फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे यांच्यात, जो दुर्लक्ष करून चालणार नाही. अगदी एक-दीड दशकापर्यंत भारतातला ‘तो’ आणि विकसित परदेशातला ‘तो’ यांच्यातला फरक स्पष्ट कळत असे. तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीने सगळे जग एकमेकांच्या जवळ आणले आणि त्यातून झालेले संस्कृतीचे आदान-प्रदान हे लक्षणीय ठरले, या सगळ्याच सामाजिक बदलांसाठी यात शंका नाही.

‘डोर’ नावाचा एक चित्रपट आहे, त्यातला बहुरूपी झीनतला (या चित्रपटातले मुख्य पात्र) तिच्या प्रवासात मदत करतो. ज्याला तडफदार, करारी झीनत आवडायला लागते पण म्हणून तो काही हात धुऊन पिसाटासारखा तिच्या मागे लागत नाही की, उगाच चित्रपटाची मिनिटे वाढवायची म्हणून त्यांचे लफडे वगैरे दाखवलेले नाही. अगदी एकाच झोपडीत राहतात, बाजू बाजूच्या खाटांवर झोपून गप्पा मारतात अगदी जुने मित्र भेटल्यावर जशा गप्पा मारतील तसे. मला तर झीनत आणि त्या बहुरुपीमधली स्त्री- पुरुष मैत्रीचे उत्तम उदाहरण वाटते आणि बदललेल्या ‘ती’चे आणि ‘त्या’चेही.

आता आपण ग्लोबल झालोय, हे खरे असले तरी ही पूर्ण गोष्ट नाहीये, ती पूर्ण गोष्ट कोणी तरी कधीतरी सांगायला हवी आहे. सुशिक्षित, सुजाण वर्गातल्या ‘तो’ने केलेली प्रगती अतिशय आशादायक असली तरीही, आजही मुलगी होऊ नये म्हणून मारून टाकणारी, हुंडाबळी, किंवा कोणत्याही प्रकारे ‘ती’वर अन्याय करणारे, करू पाहणारे ‘तो’ कमी नाहीत. इतक्यातच कधीतरी मी फेसबुकवर व्हिडीओ पहिला होता ज्यात आबालवृद्ध आपल्या इथे होणाऱ्या बलात्कारांना बायकाच कशा कारणीभूत आहेत हे ठणकावून सांगत होते. त्यात लहान मुलींपासून ते पार म्हाताऱ्या आजोबांपर्यंत म्हणजे तमाम स्त्री-पुरुषांनी सगळ्यांनीच बाईवर रोष आणला होता. तेव्हा नक्कीच वाटले की, जग एकमेकांच्या जवळ येतंय खरे पण; श्रीमंत-गरीब यांच्यातल्या दरीसारखी, पण दोन ‘तो’ मधली दरी इतकी वाढत चाललेय का? एकाच देशात राहणारी, एकाच मातीत वाढलेली पण इतक्या दोन टोकाच्या भूमिका असलेले ‘तो’ या मार्गात कुठेतरी भेटणार का एकमेकांना की, हा प्रवास असाच चालू राहणार विरुद्ध टोकांना?

मग यातून मार्ग कसा काढायचा? एकंदरीतच मागच्या दशकातल्या तिच्या आणि त्याच्या मधल्या या अमूलाग्र बदलाला सोशल मीडियाचाही तितकाच हातभार आहे. आपली खंत, व्यथा, अडचण कधी सरळ मोठय़ाने ओरडून तर कधी गुपचूप आपले नावही न कळू देता सगळ्या जगापुढे मांडता येणे ही मोठी गोष्ट आहे. हा सुरू झालेला मुक्त संवाद हे खूप मोठे वरदानच इथून आपल्याला पुढे घेऊन जाईल. ‘तो’ आणि ‘ती’ यांचा खुला संवाद एक उत्तम आणि सजग पिढी घडवू शकतो किंबहुना घडवू पाहतोय. आणि हाच संवाद ‘ती’ न दिसणाऱ्या सगळ्या ‘तो’ना जागे करायला वापरता येऊ शकते आणि वापरलाच जावा.

काळ बदलेल, वेळ बदलेल, ती बदलेल, तो बदलेल आणि तिच्या नजरेतून तोही बदलेल. बदलाच्या या वाटेवरून तिने किंवा त्याने एकमेकांच्या वाटेत न येता आणि समांतर चालताना, येणारे खाचखळगे मात्र एकमेकांचा हात धरून पार केले की जिंकल्यातच तर जमा आहे सगळं. असेलही अवघड पण अशक्य मुळीच नाही.

भर संध्याकाळी कुठूनतरी तिला आवडतात म्हणून मूठभर शुभ्र मोगऱ्याच्या कळ्या घेऊन येणारा तो, तिच्या समाजाच्या कोणत्याच चौकटीत न बसणाऱ्या पण सच्च्या वर्तनाला ‘दॅट्स माय गर्ल’ असं अभिमानाने म्हणणारा तो, आणि तिचाच स्वत:वरचा विश्वास कमी झाल्यावर, खबरदार तुझ्या ध्येयापासून हटलीस तर म्हणून प्रेमाने धमकवणारा तो. तिचे नुसते नाव ऐकले तरी तिच्यावरचे प्रेम चेहऱ्यावर आणायचे न थांबवू शकणारा तो, नाही म्हणायला वागतो कधी कधी एकदम मॅडसारखा, पण तेवढी सूट तर तिला आणि त्यालाही मिळायलाच हवी ना?

shweta.pharmacy@gmail.com

chaturang@expressindia.com