पल्लवी चेंबूरकर
लेखासोबतचं छायाचित्र पाहिलंत? कोण आहेत या ललना? काय असतील त्यांची वयं, त्यांचा व्यवसाय, कशी असेल त्यांची जीवनशैली? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे? अजिबातच नाही… निळ्याशार अथांग समुद्राकडे पहात पाठमोर्या उभ्या असलेल्या आम्हा मैत्रिणींच्या मनात आहे तो भरभरून वाहणारा उत्साह आणि आनंद…
नुकत्याच आम्ही मैत्रिणी समुद्र सफरीवर (cruise) गेलो होतो. वर्षांतून एक- दोनदा आम्ही सहलीला जातोच. प्रत्येक वेळी सगळ्यांनाच यायला जमतं असं नाही, पण ज्यांना शक्य होतं तेवढ्याजणी दोन दिवस किंवा आठवडाभराच्या सहलीला निघतो. घरसंसार, काम तेवढ्यापुरतं बाजूला ठेवून मस्त हुंदडतो, भरपूर खिदळतो, पोटभर गप्पा मारतो आणि ताजंतवानं होऊन, परत येऊन आपआपल्या कामाला लागतो. यावेळी एकत्र जमायचं खास कारण होतं, ती म्हणजे आमची षष्ट्यब्दीपूर्ती. निमित्त जरा वेगळंच असल्यानं ही सहल ठरवली. एक वेगळा अनुभव, वेगळं वातावरण, खरंच खूप धमाल केली. सहलीवरून परतल्यावर ते फोटो पाहून पुन:प्रत्ययाचा आनंद होत होता. ते पाहूनच आमच्यापैकी एकीला तिच्या कर्मचारी वर्गासाठी,‘स्त्रिया, त्यांची मैत्री आणि पिढ्यान्पिढ्यांचा वारसा : सत्य की मिथक’ या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्याचं सुचलं. त्या परिसंवादाला मी उपस्थित होते. परिसंवादानंतर माझ्या डोक्यातही स्त्रिया, त्यांचे एकमेकींशी असलेले संबंध याविषयी विचार सुरू झाले.
आमची मैत्री महाविद्यालयापासूनची, १९८२ पासूनची. आपापल्या नोकरी, व्यवसायात स्थिरस्थावर होण्याचा, मुलांच्या संगोपनात व्यग्र असण्याचा काही काळ सोडला तर आम्ही सतत संपर्कात होतो, तेही आजच्यासारखी सहज संपर्काची साधने उपलब्ध नसताना. आमच्यातही थोड्याफार कुरबुरी, मतभेद होत असतात, नाही असं नाही. तरीही आम्हाला एकमेकींशी बोलायची, भेटायची उत्सुकता असते. काय बरं असावं याचं गुपित?
मला वाटतं, सगळ्याच जणींना मैत्रिणी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय असावा. का बरं? तसं पुरुषांचंही मित्रमंडळ असतंच की, पण जेव्हा चार पुरुष जमतात तेव्हा बहुधा ‘सुरापान’ हाच मुख्य उद्देश असतो आणि तोंडी लावायला चकण्याबरोबर राजकारण (मुख्यत: देशाचं आणि कधी तरी कार्यालयातलं), आर्थिक गुंतवणूक, खेळ आणि तोही फक्त क्रिकेट आणि फुटबॉल, बस्स. (असं आपलं आम्हाला वाटतं!) पण आम्हा मैत्रिणींच्या गप्पांमध्ये तुम्ही डोकावलात तर कळेल की, आम्हाला जगातील कोणताही विषय वर्ज्य नसतो. एका विषयावरून दुसर्या विषयाकडे सतत उड्या मारणं चालू असतं. अखंड गप्पा. अगदी नेहमीच्या सौंदर्यसल्ला, वस्त्रप्रावरणे, पाककृती, शाळा, महाविद्यालयीन आठवणी, मुलांच्या शाळा, त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या आया, घर, शेजारीपाजारी, नातेवाईक, चित्रपट, मालिका त्यातील कलाकारांपासून आजकालची पिढी… काहीही. आणि हो, आणि अगदी चावट विषयही चर्चिले जातात, पण अर्थात सभ्यतेला धरून. एखाद्या फुलपाखरांप्रमाणे आम्ही मैत्रिणी या विषयावरून त्या विषयावर हुंदडत असतो आणि उगीचच खिदळत असतो.
हल्लीच्या बदलत्या जमान्यात संपर्कात राहायला एवढे सगळे ‘डिजीटल चव्हाटे’ असताना, बायकांना का बरं प्रत्यक्ष भेटायची ओढ असते. अगदी मिनिटामिनिटांची खबरबात मिळत असते तरीही सहलीचं किंवा नुसतं भेटायचं जरी ठरलं तरी आम्हा मैत्रिणीत वेगळंच चैतन्य जागृत होतं. सगळ्यांचं तसंच होत असेल का? म्हणजे आमच्या आधीच्या पिढ्यांचं?
माझ्या पंचवीस वर्षांच्या भाचीची एक मैत्रीण एकदा घरी आली होती, गप्पांच्या ओघात तिनं सांगितलं की, तिची आजी कशी इमारतीमधल्या बायकांशी तासन् तास बोलत उभी राहायची, ‘गॉसिपिंग’ करत. त्याच तिच्या मैत्रिणींनी, नंतर स्वत: सगळ्या वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असताना तिच्या या दृष्टिदोष असलेल्या आजीला, नर्मदा परिक्रमा करवून आणलं. अशा असणारच सगळ्यांना मैत्रिणी. मग त्याही आधीच्या पिढ्यांचं काय असेल, म्हणजे आता साठीत असलेल्यांच्या आया, आज्या, पणज्या किंवा त्याही आधी कथा, काव्य, पुराणात?
शकुंतलेच्या सख्या अनसूया व प्रियंवदा तर आपल्याला माहीत आहेतच, पण सीता, द्रौपदी, दमयंती यांच्याबरोबर त्यांच्या सख्यांचादेखील उल्लेख येतो. अगदी आटपाट नगरातील राजकन्येच्याही आजूबाजूला तिच्या सख्याच तर असायच्या. पूर्वीच्या काळी अगदी लहान वयात लग्न होत, शाळा नाही म्हणजे तिथल्या मैत्रिणीही नाहीत. लग्नानंतर माहेरच्या सोबतिणी तुटत, मग सासरी नवीन मैत्रिणी मिळत. अगदी कितीही सासुरवास असला तरी पाणी भरण्याच्या, धुणं धुण्याच्या निमित्तानं बायका पाणवठ्यावर जमत. त्यांच्यातही होतच असणारच की सुख-दु:खाच्या गोष्टी. हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसं इत्यादीच्या निमित्तानं आजूबाजूच्या, नात्यातल्याच ्त्रिरयांमध्ये त्यांना त्यांच्या मैत्रिणी मिळत असाव्यात. माझ्याच अनुभवावरून सांगते, एखादी समवयस्क किंवा थोडी लहान नणंद देखील आपली छान मैत्रीण होऊ शकते.
आता आठवून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की, माझ्या पणजीचीही एक मैत्रीण होती. माझी पणजी म्हणजे आजोबांची आई, तिला मोठ्याई म्हणत. रात्रीची जेवणं झाली, झाकपाक, शेणपोतेरं आटपलं की, ती छोटा रॉकेलचा दिवा घेऊन निघायची आणि म्हणायची जरा पडवीतल्या ताईकडे जाऊन येते. पडवीतली ती ताई म्हणजे घराशेजारीच एका खोलीत राहणारी तिची विधवा चुलत जाऊ. मग दोघीजणी निवांत पान खात गप्पा मारीत. पणजी वारल्यावर आम्ही जेव्हा आजीबरोबर गावी जायचो तेव्हा मग माझ्या आजीशी तिच्या गप्पाटप्पा चालायच्या.
माझी आजी लग्नानंतर मुंबईला आली. तिच्या कोणी मैत्रिणी असल्याचं माझ्या ऐकण्यात नाही. पण आमची एक नातेवाईक होती जी तिची नणंद लागे. तिच्याशी आजीच्या फोनवरून खूप गप्पा चालत. नंतर माझ्या आईची पिढी. तिच्या शाळा महाविद्यालयातल्या मैत्रिणी काही मला एवढ्या माहीत नाहीत. पण हो, तिच्या ऑफिस आणि ट्रेनच्या मैत्रिणी मला माहीत आहेत. ‘ट्रेन मैत्रिणी’ ही एक वेगळीच गंमत आहे आणि ती फक्त मुंबईतील नोकरी करणार्या सख्यांनाच ठाऊक. रेल्वेला मुंबईची जीवनवाहिनी म्हणतात, तिच्या चाकावर मुंबई चालते, सात तेरा, आठ अकरा, नऊ तेवीस, अशी मुंबई लोकलची ओळख. म्हणूनच मुंबई घड्याळाच्या काट्यावर चालते असं म्हणत असावेत. घरातलं स्वयंपाकपाणी आटोपून बायका लोकल ट्रेन पकडायला धावायच्या. रोज लोकलनेच परतायच्या. ओळखी व्हायच्या, बंध जुळायचे. ‘‘पुढील स्टेशनवर माझी मैत्रीण चढणार आहे तिच्यासाठीच ठेवा सीट, दुसर्या कोणाला देऊ नका,’’, असं सांगून मैत्रिणींसाठी जागा ‘रिझर्व्ह’ व्हायच्या. गप्पाटप्पांबरोबर विणकाम, भरतकाम शिकवणं, काही खास पदार्थ केला असेल तर त्याचा नमुना चाखण्यास आणणं, संध्याकाळी परतताना एकत्र असतील तर गप्पा मारत एकमेकींच्या भाज्या निवडून देणंही चालू असायचं. या मैत्रीला वयाचं बंधन नसतं. वर्षापूर्वीच नोकरीला लागलेली एखादी निवृत्ती जवळ आलेल्यांच्या ग्रुपमध्ये सहज सामावली जाते. आता माझ्या आईचं वय सत्त्याऐंशी आहे, अजूनही ज्या कोणी थोड्या लहान आहेत, हिंडत्याफिरत्या आहेत त्या तिला येऊन भेटतात. आहे की नाही मैत्रीचा घट्ट बंध.
आता मात्र हे चित्र बदलत चाललं आहे, कारण आता ट्रेनमधल्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन आणि जो तो त्याच्यामध्ये गुंतलेला. असो. तर एकदा आमच्या मैत्रिणींच्या भूतकाळातल्या गप्पा चालल्या असताना आमच्याबरोबरच्या महाविद्यालयातल्या मुलांचा विषय निघाला. अमकातमका कसा वागायला चांगला होता, कसा मदत करायचा वगैरे. वर्गातील मुलांबरोबर आमचं आताही बोलणं, भेटणं होत असलं तरी आमच्यापैकी एकीचाही खास मित्र नाही. हल्लीची पिढी कदाचित याला अपवाद असावी. पण खरंच भिन्नलिंगी मैत्री असूच शकत नाही का? आता परिस्थिती बदलत असली तरीही आपला समाज भिन्नलिंगी मैत्रीला स्वीकारण्यासाठी परिपक्व झालेला नाहीये, असंच आमच्या अनुभवातून निघालं. मनातला कृष्णसखा खरोखरीच्या जीवनात लाभणारी द्रौपदी किंवा राधा एखाददुसरीच.
तर ही अशी मैत्री खरंच स्त्रियाच का करतात? आपण कधी आजारी पडलो, अडचणीत सापडलो तर उपयोगी पडतील अशी अपेक्षा असते का? हे काही ्त्रिरयांच्या मैत्रीचं एकमेव कारण नसावं. अशा मैत्रीमागे मन मोकळं करणं, एकमेकींना मदत करणं या गोष्टी असतातच. प्रत्यक्ष मदत नेहमीच अपेक्षित नसते, नुसते सहानुभूतीचे चार शब्ददेखील पुरेसे असतात. पण त्याला एक दुसरी बाजूही असते. खरंतर जेव्हा ्त्रिरया एकत्र भेटतात, हसतात, मजा करतात तरीही त्यांच्या मनात घराचे, मुलाबाळांचेच विचार असतात. आता मी नाही तर घरी सगळं नीट चाललं असेल ना? असे विचार अधूनमधून डोकावतच असतात. मला वाटतं, निसर्गाने स्त्रीला जन्मत:च भावनाप्रधान, प्रेमळ बनवलं आहे. जेणेकरून ती आपल्या घरसंसाराच्या जबाबदार्या नीटपणे पार पाडू शकेल. आणि मग या सगळ्या पाशांतून, जबाबदार्यांतून थोड्यावेळासाठी का होईना बाहेर पडावं असं तिला वाटत असतं. कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून, कोणाची तरी आई, आताच्या काळात अमक्यातमक्या हुद्द्यावर असलेली, अशी ओळख थोड्यावेळासाठी बाजूला ठेवून तीच पूर्वीची लहान अवखळ मुलगी होऊन जगावं असं तिला वाटतं…
असं काही मनात आलं, की एखादी मैत्रीण ग्रुपवर टाकते, ‘‘ए आपण भेटायचं का?’’ आणि मग सूचनांनी, मेसेजेसनी, ग्रुप एकदम तरतरून उठतो… आणि वरील फोटोसारख्या रम्य आठवणी तयार करण्यासाठी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो!
pallavirchemburkar@gmail.com
