विजयश्री पेडणेकर

सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्याच अपुरी असताना स्वच्छतागृहांची रचना आणि दररोजची देखभाल या दोन्ही गोष्टींबाबत कमालीची असंवेदनशीलता आहे. स्त्री आणि पुरुषांनी स्वच्छतागृह वापरण्यात असलेला फरक लक्षात घेऊन संवेदनशीलतेनं स्वच्छतागृहांचं डिझाईन करणं गरजेचं आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरतानाचे शिष्टाचारही आपल्याला शिकून घ्यावे लागणार आहेत. हे सर्व शक्य झालं, तरच बाहेर गेल्यानंतर ‘स्वच्छतागृह वापरावं लागलं तर?’ ही भीती स्त्रिया मनातून दूर करू शकतील..

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

सार्वजनिक स्वच्छतागृह वापरायला लागणार आहे म्हटल्यावर बहुतांशी स्त्रियांच्या अंगावर काटाच येतो. आपल्याकडची सार्वजनिक स्वच्छतागृहं वापरण्यासाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं कौशल्य म्हणजे तुम्ही किती लांब श्वास रोखू शकता? आजूबाजूची दरुगधी ‘पाहाणं’ कसं टाळू शकता? आणि आपली मूळ क्रिया कमीत कमी वेळेत पार पाडून सुरक्षितपणे बाहेर कसे येऊ शकता? हे वाचायलासुद्धा एखाद्या ‘अॅडव्हेंचर गेम’सारखंच वाटतं. पण हा सार्वजनिक स्वच्छतागृह वापरणाऱ्यांच्या- विशेषत: स्त्रियांच्या दिनचर्येचा अपरिहार्य भाग आहे. आपली सार्वजनिक स्वच्छतागृहं अशा दयनीय परिस्थितीत का आहेत आणि ही परिस्थिती बदलू शकते का? त्यासाठी आपण काय करू शकू? हा खरा मुद्दा.

सध्या देशात अनेक ठिकाणी ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे स्वच्छतागृह आणि स्वच्छता या विषयांवर काम झालं आहे आणि लोकांमध्ये जागरूकता आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची आधी कमतरता होती, त्यांची आकडेवारी हळूहळू वाढत आहे. ‘सॅनिटेशन’ क्षेत्रात काम करताना असं लक्षात आलं, की जरी नवी स्वच्छतागृहं उभी राहात असली तरी बहुतांश ठिकाणी काहीच काळात या स्वच्छतागृहांची दुर्गती सुरू होते. मग पुन्हा त्या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह बांधण्याचं कंत्राट दिलं जातं. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी समस्येचं मूळ शोधण्याची गरज असते. काही वर्ष या विषयावर अभ्यास करून आणि मुंबईतल्या शेकडो स्वच्छतागृहांचं सखोल सर्वेक्षण करून हे लक्षात आलं, की फक्त स्वच्छतागृहांची आकडेवारी वाढवून आणि जुनी स्वच्छतागृहं तोडून नवी उभारून वर दिलेल्या ‘अॅडव्हेंचर गेम’ला आळा घालता येणं शक्य नाही. दीर्घकालीन चांगल्या बदलांसाठी, काही विषयांवर काम होणं गरजेचं आहे. त्यातले काही मुख्य मुद्दे आहेत स्वच्छतागृहांचं डिझाइन (रचना), दैनंदिन देखभाल आणि वापराचा शिष्टाचार.

स्वच्छतागृहांचं डिझाइन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एकदा स्वच्छतागृह बांधल्यावर ते बदलणं जवळपास अशक्य असतं. स्वच्छतागृह वापरतानाची सुरक्षितता (प्रायव्हसी), पुरेसा उजेड, खेळती हवा इत्यादी गोष्टी डिझाइनवरच अवलंबून असतात. स्वच्छतागृहातील दरुगध कमी करण्यासाठी ही एक महत्त्वाची बाब आहे. स्वच्छतागृहाचं डिझाइन आणि त्यात वापरलेल्या साहित्यावरच त्याची दैनंदिन देखभाल व वापर किती सोयीस्कर वा असोयीस्कर होणार आहे हे ठरतं. अगदी मूलभूत गोष्टी- उदा. स्त्रिया आणि पुरुषांसाठी प्रवेशाची व्यवस्था कशी आहे? तृतीयपंथीयांसाठी खास सुविधा, ‘बेबी चेंजिंग बोर्डस’- हे दोन्हीही स्वच्छतागृहांमध्ये हवेत, कारण काही वेळा पुरुषांबरोबरही लहान मूल असू शकतं. या गोष्टींची दखल घेणं अपरिहार्य असायला हवं.

एका ओळखीच्या माणसानं मला काही दिवसांपूर्वी सांगितलं, की तो त्याच्या ४-५ वर्षांच्या मुलीबरोबर वस्तुसंग्रहालय पाहायला गेला होता. त्याला शंका होती, की त्याला स्वच्छतागृहात जावं लागलं तर मुलीला कुठे सोडणार आणि तिला स्वच्छतागृहात घेऊन जायचं असेल, तर कुठल्या स्वच्छतागृहात नेणार- पुरुषांच्या की स्त्रियांच्या? म्हणजे प्रश्न फक्त दरुगधी किंवा स्वच्छतागृहाची वाईट अवस्था, एवढाच नसून उपलब्ध स्वच्छतागृहंसुद्धा वेगळय़ा परिस्थितीत िलगाधारित दृष्टिकोनातून संवेदनाक्षम विचार करून बांधलेली नसतात, असाही आहे.

चुकीचं डिझाइन, स्वच्छता किंवा सुविधांच्या अभावामुळे अनेक लोक (मुख्यत: स्त्रिया) सार्वजनिक स्वच्छतागृह वापरणं टाळतात आणि तासंतास स्वच्छतागृह न वापरता काम चालू ठेवतात. त्याचे दुष्परिणाम बऱ्याच तज्ज्ञांनी अनेक मंचांवर मांडले आहेत. विशेषत: स्त्रियांना लघवीसाठी कमोडवर बसावं लागतं तेव्हा जंतूसंसर्गाची संभावना वाढते. हे टाळण्यासाठी अनेक स्त्रिया उभ्यानं किंवा ‘स्क्वॉट’सारखं म्हणजे गुडघे मुडपून अधांतरी बसून ती क्रिया करतात, नंतर फॉसेट पंपनं पाणी मारून ‘टॉयलेट सीट’ साफ करतात. मात्र यामुळे काही वेळा पुढच्या माणसाच्या वापरण्याच्या वेळी स्वच्छतागृह अस्वच्छ होतं. स्त्रियांना प्रवासात वापरण्यासाठी पुरुषांप्रमाणे उभं राहून लघवी करता यावी अशी ‘डिस्पोझेबल कोनिकल्स’ नव्यानं मिळू लागली आहेत. पण समाजाच्या सर्व स्तरांसाठी ती परवडणारी आहेत का? स्त्रियांसाठी युरिनल्सची काही नवीन डिझाइन्स विकसित होणं गरजेचं वाटतं. स्वच्छतागृहाच्या क्यूबिकलमध्ये छोटा हूक, व्यवस्थित बंद होणारी कडी/ लॅच, कचऱ्याचा डबा, सॅनिटरी पॅड टाकायला डबा, बाहेर आल्यावर हात धुवायला द्रवरूप साबण, स्वच्छतागृहात एक्झॉस्ट फॅन या अगदी लहानसहान गोष्टी आहेत, परंतु त्यांचा अभाव असेल तर स्वच्छतागृह वापरण्याचा अनुभव त्रासदायक होऊ शकतो.

स्वच्छतागृहांकडे एक सार्वजनिक सुविधा म्हणून न बघता उकिरडा म्हणून बघितलं जातं. यात सर्वस्वी लोकांचा दोष नाही, बहुतांश स्वच्छतागृहांच्या परिसरात कचऱ्याचे ढिगारे/ कचऱ्याचे मोठाले डबे असतात. स्वच्छतागृह आणि कचऱ्याचं जे हे दृश्य नातं आहे, ते बदलण्याची अत्यंत गरज आहे. यात स्वच्छतागृह आणि त्याच्या परिसराचं योग्य डिझाइन यांचा मोठा हातभार लागू शकतो.

सार्वजनिक वापराच्या जागांचं डिझाइन चांगलं असण्याचं महत्त्व आपल्याला अद्याप समजलेलं नाही. सध्या सार्वजनिक सुशोभीकरणाची लाट आहे, पण त्यात भारतीय वातावरणात वापरण्याजोग्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसारख्या गोष्टींच्या डिझाइनचा प्रश्न तसाच राहातो. असं का होतं, याचा विचार केल्यास असं दिसतं, की आपल्याकडे जे लोक सार्वजनिक स्वच्छतागृहांची रचना कशी असावी हे ठरवतात, त्यांना स्त्री व पुरुष यांनी स्वच्छतागृह वापरण्यात असलेल्या फरकामुळे उद्भवणाऱ्या समस्या, दररोज होणारा वापर, स्वच्छतागृह वापरावंसं वाटणं आणि तिथली स्वच्छता या गोष्टींबद्दल काही माहिती नसते, कारण हे लोक डिझायनर्स नसतात. प्रत्यक्ष वापरकर्त्यांला स्वच्छतागृहात कशाची गरज आहे, याबद्दल ते संवेदनशील नसतात. चुकीच्या पद्धतीनं बांधलं गेलेलं सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणजे देखभालीच्या दृष्टीनं कठीण, वापरासाठी असुरक्षित, त्याचा गैरवापर होणं मात्र सोपं. अनेकदा त्याचा काहीच वापर होत नाही किंवा सरकारला नंतर त्यात सुधारणा करणं गरजेचं होऊन बसतं. या सगळय़ात झळ बसते, ती नागरिकांना- आपल्याकडे प्रामुख्यानं स्त्रियांनाच. स्वच्छतागृहांच्या डिझाइनचं मूल्यमापन केवळ ते बाहेरून चांगलं दिसतंय का, यावरून करता येणार नाही, लिंगाधारित वापर लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून स्वच्छतागृह बांधलेलं आहे का, ते महत्त्वाचं. ही संवेदनशीलता वाढीस लागायला हवी.सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या संदर्भात दैनंदिन देखभाल (रोजचा ‘मेन्टेनन्स’) हा विषय खूप दुर्लक्षित असलेला आढळून येतो. कितीही सुखसोयींनी युक्त स्वच्छतागृह बांधलं, तरी दैनंदिन देखभालीशिवाय त्याची परिस्थिती दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निरुपयोगी होऊन जाते. स्वच्छतागृहाची निगा कशी राखावी, याचं प्रशिक्षण तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांना नसतं. अनेकदा सफाई साहित्य आणि साधनं मर्यादित असतात. संरक्षक साधनांच्या अभावानं या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. जेवढय़ा महत्त्वाच्या स्वच्छतागृहातल्या पायाभूत सुविधा आहेत, तेवढीच महत्त्वाची त्याची देखभाल आहे. ‘टॉयलेट ऑपरेटर्स’चं काम फक्त पैसे गोळा करणं नसून लोकांनी त्यांना स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठीही जबाबदार धरलं पाहिजे.

डिझाइन आणि देखभालीप्रमाणेच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छतागृहात पाळायचे शिष्टाचार. खरंतर स्वच्छतागृह वापराच्या शिष्टाचारांचं प्रशिक्षण लहान वयापासूनच मुला-मुलींना द्यायला हवं. घरचं स्वच्छतागृह वापरण्याचं प्रशिक्षणसुद्धा दुर्मीळ असताना सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना शिष्टाचाराची अपेक्षा कशी करावी हा मोठा प्रश्न आहे, विशेषत: जेव्हा त्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची सर्वसाधारणपणे उपेक्षाच केली जाते. वापराच्या प्रशिक्षणाच्या अभावामुळे प्रसंगी इच्छा असूनदेखील वापरणाऱ्याकडून अपेक्षित प्रकारे त्याचा वापर होऊ शकत नाही. यात किती आणि कोणते शिष्टाचार पाळायचे यावरही वाद आहेतच, पण अतिशय सोप्या शब्दांत तुम्हाला स्वच्छतागृह जसं मिळणं अपेक्षित असतं, अगदी तसंच आपण वापरल्यानंतर दुसऱ्याला मिळेल असं पाहायला हवं. याचं अनुसरण केल्यास बऱ्याचशा समस्या सुटतील.

जर एखादी वास्तू किंवा परिसर टापटीप असेल, तर सामान्य जनताही त्या जागेचा वापर स्वच्छतेनं करते. परंतु एखाद्या अस्वच्छ जागेचा वापरही गलिच्छपणेच होण्याची शक्यता जास्त असते. वापरण्यायोग्य स्वच्छतागृह- म्हणजेच स्वच्छतागृह वापरण्यासाठी व्यक्तीला काहीही विचार करावा न लागण्याकरिता सक्षम डिझाइन, देखभाल यांबरोबरच वापराच्या शिष्टाचाराची जोड अत्यावश्यक आहे.
vijayshri10 @gmail.com