डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

लहान मुलांच्या बाबतीत घडणारे लैंगिक शोषणाचे प्रसंग पाहता, लहानग्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक तिऱ्हाईत माणसाविषयी संशयाची भावना पालकांच्या मनात निर्माण होते. वाईट अनुभवांपासून दूर ठेवण्यासाठी मुलांना अधिकाधिक सुरक्षितता द्यावी असा पालक प्रयत्न करतात. पण त्यांना लैंगिक शिक्षण देण्याबद्दल तितकासा सकारात्मक बदल घडलेला नाही. ‘लैंगिक शिक्षण कोणत्या वयात द्यायचं?’पासून ‘नको त्या वयात माहिती दिल्यानं मुलांची निरागसता संपेल का?’ इथपर्यंत संभ्रमच पसरलेला आहे. यातल्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न..

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

स्पर्शज्ञान हे पंचेंद्रियांत मोडणारं. जन्मानंतर लगेच अनाम स्पर्श, ते आईच्या छातीचा, तिच्या श्वासाचा हवासा स्पर्श, हा प्रवास बाळ झटकन अनुभवतं. ‘‘बाळ आता ओळखतंय हं तुला!’’ हे म्हणजे आता स्पर्श घट्ट होत चाललाय, हे सांगणारं. याच सुरुवातीच्या काळात मेंदू काही नोंदी करतच असतो. प्रेम, माया, वात्सल्य याचा स्पर्श, तसंच राग, चिडचिड, हतबलता यातून होणारे स्पर्श. होणाऱ्या स्पर्शातून नेमकं काय समजतंय ही जाण, ज्याला जन्मजात म्हणू अशी.  नवजात बाळाच्या जगण्यासाठी काही प्रक्रिया अंगभूत असतात, जसं की चोखणं- ज्यामुळे बाळ स्तन्यपान करू शकतं. जनुकांवर जवळपास कोरली गेलेली ही वर्तणूक, सवय, किंवा बाब.  स्पर्शाचंही तेच. आपलं अस्तित्व टिकवून ठेवताना जीव वाचवण्यासाठी वेगवेगळय़ा स्पर्शाची समजही गरजेचीच नाही का!

अगदी तीन-चार वर्षांची मुलंसुद्धा अनोळखी व्यक्तीकडे सहजासहजी जाणं टाळतात. कुणी अचानक उचलून घेतलं, तर कावरीबावरी होतात. हळूहळू आपणच पालक म्हणून सर्व पातळय़ांवर त्यांच्या मनात विश्वास निर्माण करत राहतो. असं असताना अचानक एखाद्या लहान मुलाच्या लैंगिक शोषणाची, अत्याचाराची घटना समोर आली, की मात्र अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागतात. अशा वेळेस, आज साठ-सत्तरच्या वयोगटात असलेले काही लोक स्वत:च्या बालपणाविषयी बोलताना हमखास म्हणतील, ‘‘आमच्या वेळी असलं काही नव्हतं!’’

तर इथे प्रतिप्रश्न असा, की खरंच नव्हतं का?.. याविषयी नंतर बोलू.

एक मात्र नक्की, की पूर्वी बिनधास्त शेजारीपाजारी जाऊन, लहान-मोठय़ा कोणत्याही व्यक्तीशी खेळणं हे सहज घडायचं. मग ते मित्र-मैत्रिणीच्या बाबांनी अंगाखांद्यावर खेळवणं असेल, किंवा आत्या, मामा, मावशी यांच्या गावी गेल्यावर ‘‘अग्गोबाई, कधी आली छकुली/ बबडय़ा?’’ म्हणत  कुणीतरी पापी घेणं, जवळ ओढणं असेल. यातून काहीतरी विपरीत घडू शकतं, अशी शक्यताही कोणाच्या मनाला शिवत नसे.

आता मात्र मुलांना सर्वतोपरी सुरक्षित ठेवताना ही सहजता बऱ्याच अंशी कोलमडून पडलीय. शाळांमध्येसुद्धा शारीरिक शिक्षण, खेळ या प्रकारासाठी पुरुष शिक्षक असतील, तर तिथेही शंका मनात डोकावतायत. किंवा ते नकोत, असं पालकांकडून शाळांना सांगितलं जातंय. (इथे स्त्रियांकडूनही लैंगिक शोषण घडू शकतं हे आपण साफ विसरून जातो!) त्याही पुढे जाऊन, मुलांना लैंगिक शिक्षण द्यावं लागतंय, याबाबत अनेक पालक फार चिंतेत असल्याचं दिसतं.

‘‘हे काय ‘टच’विषयी सांगायचं? यातून नको त्या  कल्पना आपण त्यांच्या डोक्यात टाकतोय, त्यांची निरागसता जपायला हवी,’’ असाही एक मतप्रवाह आहे. त्याच वेळेस एकंदर ‘माणसाचा स्पर्श’ याचविषयी मुलांच्या मनात प्रचंड अविश्वास निर्माण व्हावा, याहीप्रकारे लैंगिक शिक्षण देताना, सारासार विचार न करता विचित्र बाबी मुलांवर ठसवत त्यांना ‘सुरक्षित’ ठेवू पाहणारेसुद्धा काही पालक आहेत. या दुफळीत नेमकं काय योग्य-अयोग्य? मुलांच्या निरागसतेचं काय? लैंगिक शिक्षण इतक्या कोवळय़ा वयापासून खरंच गरजेचं आहे का? त्यांच्या भावविश्वात किती तरी नकोशा बाबींची भर पडत चाललीये का? हे सगळेच प्रश्न आहेत.

‘गुड टच- बॅड टच’ या शब्दांचा इतका बागुलबुवा करण्याची गरज नाही. खरंतर याला ‘अप्रोप्रिएट टच’ (योग्य स्पर्श) आणि ‘नॉन अप्रोप्रिएट टच’ (अयोग्य स्पर्श) असं म्हटलं जातं. जितक्या सहजपणे आपण मूल्यशिक्षण, दैनंदिन शिक्षण किंवा आरोग्यासाठीच्या उत्तम सवयी, हे सांगतो, शिकवतो, तसंच याकडे पाहिलं पाहिजे. ‘ते अपरिहार्य आहे’ यापेक्षा ‘हे शिक्षण मुलांना लैंगिकतेकडे डोळसपणे बघायला शिकवेल’ ही मानसिकता असायला हवी.

लैंगिक शिक्षण का? कधी?

मूल जन्मतानाच इतर भावनांप्रमाणेच लैंगिक भावना घेऊन जन्माला येतं. त्याविषयी उत्सुकता, आकर्षण हे सगळं निर्माण होणं हेसुद्धा साहजिक. म्हणूनच मुलांना सुरुवातीपासूनच याविषयी सजग करणं हे पालक म्हणून आपलं काम. याची सुरुवात आपल्या शरीराची संरचना त्यांना समजेल अशा भाषेत सांगण्यापासून होते. स्त्री-पुरुष यांच्यात असणारा फरक हासुद्धा सोप्या भाषेत, मर्यादित स्वरूपात स्पष्ट करता येतो.  उदा- आपण अगदी लहान बाळांबरोबर हा खेळ खेळतो- ‘तुझे डोळे दाखव..’ ‘कान कुठायत दाखव..’ तिथे आपण त्यांना शरीराची ओळखच करून देत असतो. तसंच ३-४ वर्षांच्या मुलांमध्ये आंघोळीच्या वेळेस त्यांच्या अवयवांना त्यांना स्वत:लाच स्पर्श करायला सांगून, त्याचं काम काय, हे सोप्या भाषेत सांगता येईल. मात्र इथे फार बालिश शब्द न वापरता, योग्य शब्द वापरले, तर त्या अवयवांविषयी, शब्दांविषयी पुढे बोलताना अवघडलेपण राहात नाही.

उदा. ‘‘ही काय आहे? तुझी छाती. ही काय आहे? तुझी ‘शू’ची जागा. मुलांमध्ये- म्हणजे बाबा-काका-दादा यांच्यात ही जागा तुझी आहे तशी असते. मुलींमध्ये तिथे त्रिकोणी जागा आणि बारीक रेघ असते. आपण ते बाळ बघायला गेलो होतो ना, त्या मुलीला आपण बघितलं ना- तशी.’’ हेच मुलींच्या बाबतीतही सांगता येईल. पुढे चित्रं-तक्ते यांचा आधार घेऊन तेच पुढे समजावणं आणखी सोपं. हे करताना कुठेही हे आपण फार काहीतरी वेगळं शिकवतोय किंवा गंभीर आहे असा आविर्भाव न ठेवता, मुलांची इतर चित्रांची- फुलं-फळं-प्राणी-गाडय़ा ही जशी पुस्तकं असतात, ती जशी बघायला देतो, तसेच हे तक्तेसुद्धा तितक्याच सहजपणे समोर ठेवायला हवेत. अशी सुरुवात झाली, तर पुढे वय वाढेल तसे त्यातले, ठळक फरक, स्त्री-पुरुष संरचना आणि प्रजनन हेसुद्धा सहज सांगता येतं.

इतक्या लवकर लैंगिक शिक्षणाची सुरुवात अशा पद्धतीनं व्हायला हवी. इथे पालक सांगतात, की मुलं पुढे बरेच प्रश्न विचारतात, त्याचं काय करायचं? तर परिस्थिती-वय-समज यानुसार योग्य उत्तरं द्यायची. प्रत्येक प्रश्न आणि त्यावर काय उत्तर असावं, अशी सूची इथे देणं अवघड आहे. अनेकदा ‘‘तू थोडासा मोठा  झालास/ झालीस की अजून सांगेन,’’ हेसुद्धा मुलांना पटतं. स्पर्शासंबंधी असा पाया तयार झाला, की स्पर्शाविषयी हळुवारपणे बोलायला हवं. उदा- ‘‘आईच्या कुशीत तुला कसं वाटतं?’’, ‘‘तू त्या अमुक एक काकांसोबत का नाही गेलास/ गेलीस? काय वाटलं तुला?’’, ‘‘बाबा तुला ढुंगणावर चापट मारतात ती मजेत असते.’’ इथे मूलसुद्धा त्याला काय आवडतं, काय जाणवतं, हे बोलायला लागतं. ‘‘मला नाही आवडलं/ घाण वाटलं/ कसंतरी झालं.’’ अशा कोणत्यातरी मार्गानं ते त्याला होणाऱ्या स्पर्शाच्या जाणिवा आपल्यापर्यंत पोहोचवत राहतं. तिथे ते संपूर्ण ऐकणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं, हे आपलं काम. तिथेच मग कुठे हात लावलेला चालतो/कुठे नाही, त्यातले संभाव्य धोके काय, इत्यादी त्याला समजावून सांगणं सहज होतं.

मुलांचं भावविश्व आणि लैंगिक शिक्षण

मुलांचं भावविश्व, निरागसता याच्यावर त्यांना मिळत असलेल्या लैंगिक शिक्षणाचा विपरीत परिणाम घडू शकेल, ही शक्यताच रद्दबातल आहे. आपण त्याकडे वेगळय़ा दृष्टिकोनानं पाहतोय म्हणून आपल्याला तसं वाटू शकेल. बाकी जशी भाषा, गणित, इतिहास, विज्ञान, इत्यादी विषय मुलं शिकत जातात, त्यात अनुभव घेत राहतात, कधी प्रयोग करतात, ते सगळंच लैंगिक शिक्षणासाठीसुद्धा लागू आहेच. मुलं अमुक एका वयाची आहेत, म्हणून त्यांना लैंगिक कुतूहल-ओढ नाही, हा तर गोड गैरसमज! जिथे पालकांशी बोलायची चोरी आहे, तिथे मुलं बऱ्याचदा आपल्याला काहीच कळत नाही असं बेमालूम दाखवतात. मग तेच मूल नैसर्गिक हस्तमैथुन करताना आढळलं किंवा या विषयाबाबत कुणाशी तरी रंजक पद्धतीनं गप्पा मारताना दिसलं, की पालकांना धक्का बसतो!

मुलांचा भवताल अनेकविध गॅजेट्स, इंटरनेट यांनी भरलेला आहे. त्यामुळे आपण याविषयी संवाद साधला नाही, तर अर्थातच त्यांना हव्या त्या पद्धतीनं ते त्यांच्या कुतूहलाचा निचरा करू पाहतील. मग त्यांच्यातली निरागसता संपली असं म्हणणार का आपण? ते ज्या नवेपणानं या विषयाकडे पाहतायत, त्यांना शंका येतायत, तिथेच त्यांची निरागसता दडलेली आहे ना! त्यांचं भावविश्व ते पाहत असलेल्या कितीतरी कार्टून्सनी कधीच बदललंय, त्यामुळे मुलांना लैंगिक शिक्षण दिलं जातंय म्हणून हे बदल होतायत असा टाहो फोडायची आवश्यकता नाही!

आता सुरुवातीला विचारलेला प्रश्न- ‘‘आमच्या वेळी हे असलं नव्हतं हं काही!’’ असं म्हणणाऱ्या व्यक्तींसाठी-त्यांना त्यांच्या लहानपणी असे विचित्र स्पर्शाचे अनुभव आलेच नाहीत? की आले, पण बोलायला जागाच नव्हती? की कदाचित सगळय़ांबरोबर असंच घडत असेल, अशी समजूत होती? की हे आई-बाबांना सांगायचीच भीती वाटत होती? की आपलीच चूक आहे असं वाटत होतं? की नेमकं काय झालं-घडलं हे वयाच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यावर कळलं, कारण त्याबाबत संपूर्ण अज्ञान होतं?.. हे मोठय़ा माणसांनी स्वत:ला नक्की विचारून बघावं. असं असेल, तर मुलांना आपण या बाबत सज्ञान करतोय हे फारच उत्तम!

(लेखिका होमिओपॅथिकतज्ज्ञ असून मानसोपचार व लैंगिक समस्याविषयक समुपदेशक आहेत.)