– वीणा गोखले

बरोबर २८ वर्षांपूर्वी ध्यानीमनी नसताना मी माझ्या पर्यटन कंपनीचा पाया घातला. खरं तर कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसताना घेतलेला हा निर्णय नक्कीच धाडसी होता. लोकांना पर्यटनातून आनंद देण्याची आस होती आणि महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या क्षमतांवर विश्वास होता. म्हणून या व्यवसायात पडले आणि समृद्ध झाले.

मात्र व्यवसाय करत असताना कधी कधी किती विचित्र परिस्थितीला, घटनांना तोंड द्यावं लागतं, ते ‘जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे’, असं होतं. ‘होळी स्पेशल’ सहल होती. कोकणात दापोलीला जवळपास ५० पर्यटक निघाले होते. पहिला दिवस छान पार पडला. होळी पूजा, पुरणपोळीचे जेवण, रात्रीची समुद्रकिनाऱ्यावरची चांदण्यातली भटकंती… सगळं कसं उत्साहात, आनंदात, शिस्तीत पार पडलं. दुसऱ्या दिवशीच्या सूचना पर्यटकांना दिल्या आणि मी झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘ब्रेकफास्ट’ची तयारी कुठपर्यंत आलीये, ते बघायला मी खाली आले. तितक्यात माझ्या बसचा ड्रायव्हर चेहरा पाडून माझ्यासमोर आला आणि बसच्या तुटलेल्या किल्लीचे दोन तुकडे दोन हातात दाखवत म्हणाला, ‘‘आत्ता बस नाही बाहेर काढता येणार. बसची किल्ली तुटली.’’ क्षणभर मला काही समजेच ना. ऑ? किल्ली हरवते, गहाळ होते, पण तुटते? मी तरी पहिल्यांदाच अशी दोन तुकडे झालेली किल्ली बघत होते. त्या सकाळी ब्रेकफास्ट करून ९.३० वाजता हर्णे बंदर वरून आणि आंजर्ले गणपतीच्या दर्शनाला जायचा कार्यक्रम होता. पण आता जायचं कसं? बस चालू करायची कशी? बरं, त्या दिवशी तिकडे न जाता दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम करावा, तर तेही शक्य नव्हतं. कारण दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास होता. त्यामुळे ताबडतोब रिसॉर्टच्या कार्यालयात गेले. व्यवस्थापकाला जे झालं ते सांगून, ‘दापोली गावात कुठे नवीन किल्ली बनवून मिळेल का?’ विचारलं. तो म्हणाला, ‘‘छे, आज इथं कुठलंच दुकान उघडं असणार नाही. इथं होळीचा सण मोठा असतो. आज सगळं बंद.’’ मग मी म्हटलं, ‘‘दुकान मालकाच्या घराचा पत्ता सांगता का? त्यांच्या घरी जाऊन विनंती करते त्यांना.’’ पण व्यवस्थापक म्हणाला, ‘‘खरंच शक्य नाहीये ते. कोणीही काम करत नाही आज इथं. किल्ली उद्याच बनवून मिळेल.’’

वेळ हळूहळू पुढे सरकत होती आणि नवीन किल्ली बनवून आणण्याची शक्यता धूसर होत होती. इकडे पर्यटक ब्रेकफास्टसाठी रेस्टॉरंटमध्ये जमायला लागले होते. लगेच तसंच बाहेर पडायचं असल्याने सगळे अगदी तयार होऊन आले होते. माझी धावपळ चाललेली ते बघत होते. त्यांनी काही विचारायच्या आतच मी त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती ठेवली आणि म्हटलं, ‘‘माझे प्रयत्न चालू आहेत. आपला कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडेल, फक्त आजच्या दुपारच्या जेवणाची वेळ थोडीशी पुढे जाऊ शकते. तेव्हा भरपूर ब्रेकफास्ट करून घ्या.’’ पर्यटकांशी हे बोलत असतानाच मला अचानक एक कल्पना सुचली आणि पुन्हा मी धावतच कार्यालयात गेले. दापोलीचे नगरसेवक माझ्या दूरच्या ओळखीचे होते. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ऑफिसमधून मिळवला आणि त्यांना फोन लावला. काय घडलंय ते सांगून म्हटलं, ‘‘दादा, मला ताबडतोब ८ सुमो किंवा ट्रॅक्स गाड्या हव्या आहेत, ३ तासांसाठी. माझ्या पर्यटकांना मी शब्द दिलाय, कोणत्याही परिस्थितीत आपला ठरलेला कार्यक्रम होणारच म्हणून. आता तुम्हीच वाचवू शकता मला. पाठवू शकाल गाड्या?’’ त्यांनी मोठ्ठा सुस्कारा सोडलेला फोन मधूनही स्पष्ट ऐकू आला मला. म्हणाले, ‘‘ताई, आज होळीचा दिवस नसता ना, तर ८ काय, १८ गाड्या पाच मिनिटांत उभ्या केल्या असत्या तुमच्यासमोर. पण तुमची अडचण समजतेय मला. बघतो, काही जमतंय का ते.’’

मी अस्वस्थपणे कार्यालयासमोर येरझाऱ्या घालतेय आणि माझे पर्यटक मला धीर देताहेत, कुणी पाणी आणून देतंय, कुणी कॉफी प्यायचा आग्रह करतंय, कुणी दोन घास खाऊन घे म्हणतंय… माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी जमा व्हायला लागलं. पर्यटकांना विश्वासात घेऊन खरी परिस्थिती सांगितलीत ना, त्याचं हे फळ. अशी पंधरा मिनिटं जेमतेम गेली असतील, तोच एक एक करत सुमो गाड्या समोर यायला लागल्या आणि पर्यटकांनी एकच जल्लोष केला, जोरजोरात टाळ्या वाजवून माझं कौतुक केलं. आम्ही सगळे बसऐवजी त्या ‘सुमो’मध्ये बसलो आणि ठरल्याप्रमाणे स्थळ दर्शन पार पडलं. त्या दिवशी संध्याकाळी रिसॉर्टमध्येच पर्यटकांसाठी कार्यक्रम होते, त्यामुळे बसची गरज नव्हतीच. ज्यांच्या एका शब्दामुळे सणाच्या दिवशी ८ जणांनी त्यांच्या सुमो गाड्या आमच्यासाठी हजार केल्या त्या दापोलीच्या नगरसेवकाचा आम्ही संध्याकाळी छानसा सत्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच ड्रायव्हरला दापोलीत पाठवलं, नवीन किल्ली बनवून घेतली आणि आम्ही पुण्याकडे प्रस्थान ठेवलं. या प्रसंगापासून पुढे कायम, ड्रायव्हरने ‘डुप्लिकेट’ किल्ली बरोबर ठेवली आहे ना, याची खबरदारी मी घ्यायला लागले. न जाणो. पुन्हा अशी किल्ली तुटली तर?…

पर्यटन व्यवसायाच्या प्रवासात वेगवेगळ्या मानसिकतेचे पर्यटक भेटले… कोणी सतत वाढत्या वयातल्या गुडघ्यांसारखे कुरकुरणारे, तर कोणी अगदी आनंदी, खुशालचेंडू, कोणी स्वत:मध्येच मग्न, तर कोणी सतत दुसऱ्याचा विचार करणारे, कुणी अखंड बडबडत राहणारे, तर कोणी अगदी मूग गिळून गप्प बसणारे – निसर्गाच्या सान्निध्यातही न खुलणारे, कोणी वाढत्या वयात कसं वागावं, याचा वस्तुपाठ घालून देणारे, तर कोणी कसं वागू नये, याविषयी सावध करणारे …इतकी विविधता असूनसुद्धा एका बाबतीत एकता होती, ती म्हणजे माझ्यावरचा विश्वासङ्घ या माझ्या विस्तारलेल्या कुटुंबात अगदी रमून गेले. प्रत्यक्ष रक्ताच्या नात्यांनी दिली नसेल इतकी जवळीक, इतकं प्रेम, इतका स्नेह या कुटुंबाने मला दिला.

सहलीत पावभाजीचा मेनू असेल तेव्हा मी ब्रेड खात नाही म्हणून आधीच किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी पोळी आणणाऱ्या आजी, सहलीचं खूप छान आयोजन केलंस म्हणून निघताना घट्ट मिठी मारणारी मावशी, कुठेही गेल्या, तरी आठवणीने माझ्यासाठी छानसं गिफ्ट आणणाऱ्या एक मावशी, मला पित्ताचा त्रास आहे, म्हणून ट्रीपमध्ये माझ्यासाठी हमखास आवळा सुपारी आणणाऱ्या काकू, पती दिलीप अचानक गेल्यानंतर काही काळाने माझ्यासाठी खास आंबा घाटात सहल आयोजित केलेला गट – एकच अट घालून, की तू काहीही करायचं नाहीस… गाडी, रिसॉर्ट, मेनू सगळं आम्ही ठरवणार. तू फक्त दिलेल्या वेळी गाडीत येऊन बसायचंस, बाकी सगळं आमच्यावर सोडायचं. करोनाकाळात जेव्हा पर्यटन पूर्णपणे ठप्प होतं, तेव्हा, ‘माझी नोकरी व्यवस्थित चालू आहे, पण तुझी परिस्थिती मी समजू शकते. माझ्याकडून तुला शक्य ती सगळी- अगदी आर्थिकसुद्धा- साथ द्यायला मी तयार आहे’, असं आस्थेनं सांगून मला आश्वस्त करणारी माझी ‘पर्यटन सखी’… स्वत:ची पर्यटन कंपनी चालवणाऱ्या किती जणांना असं भाग्य मिळालं असेल? ‘देणे समाजाचे’ या माझ्या सामाजिक उपक्रमातून समाजसेवी संस्थांना जी मदत केली जाते, त्यात बराच मोठा वाटा माझ्या पर्यटकांचा आहे. पर्यटकांबरोबरच काही घटनाही अशा घडल्या की आपला कस लागेल. अशीच एक घटना. ‘न दिसणाऱ्या’ ड्रायव्हरची.

‘‘उद्याच्या ट्रीपला मी नाही येऊ शकत. माझा काका वारलाय. सहल रद्द करा.’’ रात्री साडेअकरा वाजता आलेल्या माझ्या ड्राइव्हरच्या या फोननं माझं अवसानच गळालं. दुसऱ्या दिवशी एका गटाला घेऊन सकाळी ६ वाजता दिवेआगर, हरिहरेश्वर, रायगड असं निघणार होतो. नाशिकहून आठ लोक रात्री पुण्यात येऊन एका लॉजमध्ये रात्रीपुरती राहिलेले, सगळी तयारी झाली होती आणि आता अशा अवेळी हा सांगतोय की, मी येत नाही म्हणून. मी विचारात पडले. बरं, इतक्या रात्री दुसरा कोण ड्रायव्हर शोधणार आणि इतक्या अचानक येणार तरी कोण? अशा परिस्थितीत ठरलेली ती सहल रद्द करणंच शहाणपणाचं होतं.

नाशिकहून आलेल्या पर्यटकांना खरं काय घडलंय ते सांगितलं, पुण्यातला राहण्याचा, जेवणाचा आणि जाण्या-येण्याचा जास्तीचा खर्च दिला की विषय संपणार होता. पण सहजी हार मानण्याचा माझा स्वभावच नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सहल रद्द करायची नाही, हे आधी ठरवलं, मग नवीन ड्राइव्हरचा शोध सुरू झाला. पण प्रयत्न करूनही कोणी ड्रायव्हर मिळेना, मग मी माझा भरवंशाचा साथीदार, नवरा दिलीपला विचारलं, ‘‘तू जाशील का ट्रीप घेऊन?’’ मला खात्री होती की तो नक्की जाईल. पण नेमके पुढचे दोन दिवस त्याला रजा घेता येणं शक्य नव्हतं, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये काही परदेशी पाहुणे येणार होते. आता मात्र माझा धीर सुटायला लागला. रात्र सरत चालली होती आणि ड्रायव्हरचा प्रश्न सुटत नव्हता.

इतक्यात माझ्या अंगावर बॉम्ब पडला. दिलीप सांगत होता, ‘‘तूच का नाही घेऊन जात ही ट्रीप? तू उत्तम ‘सुमो’ चालवतेस. जमेल तुला. बघ, विचार कर.’’ मी अवाक… म्हटलं, ‘‘अरे, काही तरी काय? इतक्या लांब कोकणात मी अजून गेले नाहीये गाडी चालवत, रस्त्यात काही अडचण आली तर? रस्ता माहितेय ना तुला ताम्हिणी घाटातला? (२२ वर्षांपूर्वीचा) त्यातून इतक्या लोकांची जबाबदारी, आपल्या मुली एवढ्याशा (तीन वर्षांच्या). त्या कशा राहतील?’’ प्रश्नांची सरबत्तीच केली मी त्याच्यावर. पण तो ठाम होता आणि मी स्वत: ‘सुमो’ चालवत ती सहल करावी याबाबत आग्रहीसुद्धा होता. त्यासाठी इकडच्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करायची त्याची पूर्ण तयारी होती. आता पुढे जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. सगळं धैर्य गोळा करण्यात रात्र घालवली आणि सकाळी ५.३० वाजता मोठ्या आत्मविश्वासाने गाडीला स्टार्टर मारला.

ठरल्याप्रमाणे ६ वाजता लॉजच्या दारात सगळे पर्यटनाला जायच्या उत्साहात हॉटेलबाहेर उभेच होते. गाडी जसजशी लॉजच्या जवळ येत होती, तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव मला स्पष्ट दिसायला लागले. त्याचं कारणही माझ्या ध्यानांत लगेच आलं, कारण मी गाडी चालवत असताना, माझ्या बेताच्या उंचीमुळे, समोरून बघताना ड्रायव्हर सीटवर कोणीच दिसत नसे. आत्ताही नेमकं असंच घडलं होतं. ‘आपोआप’ चालणारी गाडी त्यांना दिसत होती. अखेर मी गाडीतून उतरून त्यांच्याजवळ गेले. ड्रायव्हरची अडचण सांगून, तुमची हरकत नसेल तर मी जायला तयार आहे आणि तशी खात्री वाटत नसेल तर तुमचे सगळे पैसे- जास्तीच्या खर्चासकट द्यायलाही मी तयार आहे, असं त्यांना सांगितलं. त्यांची चुळबुळ सुरू झाली. ही अशा छोट्या चणीची बाई, ‘सुमो’सारखी गाडी चालवत आपल्याला सांभाळून नेईल, याची खात्री वाटेना त्यांना. मग मीच म्हटलं, ‘‘तुमची अवस्था समजू शकते मी. पण एक सुचवते, बघा पटतंय का. आपण ‘डेक्कन’पर्यंत एक छोटीशी चक्कर मारून येऊ या गाडीतून. तुम्हाला जर वाटलं की, आपण यांच्या हाती सुरक्षित आहोत, तरच पुढे जाऊ, नाही तर इथेच थांबू.’’ एकमेकांच्या तोंडाकडे बघत मोठ्या उत्सुकतेनं सगळे गाडीत बसले. आणि हो… माझं ड्रायव्हिंग त्यांना पसंत पडलं आणि पुढचे दिवस अत्यंत मजेत, सगळ्या ठिकाणांचा आनंद घेत, मला प्रोत्साहन देत अगदी खेळीमेळीने पार पडले. सगळे खूप खूश होते. इतके की, निघताना निरोप घेताना त्यांच्या डोळ्यात दाटलेलं पाणी जणू ‘शब्देविण संवाद’ साधत होतं. आणि माझ्या प्रवासाच्या आठवणीत आणखी एक मोरपीस जमा झालं होतं.