scorecardresearch

बदलाच्या दिशेने..

विधवा होणे ही वर्षांनुवर्षे स्त्री जीवनातील एक आपत्तीच होती. काळानुसार आता अनेकींच्या आयुष्यात बदल घडला असला तरीही ‘सौभाग्यवती’ असताना सुवर्णालंकार आणि किमती कपडय़ांनी सजणाऱ्या स्त्रीच्या वाटय़ाला पती जाताच अपमान येण्याचे प्रसंग आजही घडत राहतात.

cha2 तुळसाबाई गायकवाड
विधवा प्रथा बंदीचे अनुकरण करणाऱ्या तुळसाबाई गायकवाड यांना ‘ताराराणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

दयानंद लिपारे

विधवा होणे ही वर्षांनुवर्षे स्त्री जीवनातील एक आपत्तीच होती. काळानुसार आता अनेकींच्या आयुष्यात बदल घडला असला तरीही ‘सौभाग्यवती’ असताना सुवर्णालंकार आणि किमती कपडय़ांनी सजणाऱ्या स्त्रीच्या वाटय़ाला पती जाताच अपमान येण्याचे प्रसंग आजही घडत राहतात. त्या अपमानाची सुरुवातच पतीचे निधन झाल्यावर स्त्रीचे मंगळसूत्र काढून घेणे, कुंकू पुसणे, बांगडय़ा फोडणे, जोडवी काढून घेणे, अशा प्रकाराने होते. विशेषत: ग्रामीण भागात तिच्या कपाळावरील हिरवे गोंदण, दागिन्यांविना ओकाबोका दिसणारा गळा आणि एकूणच झालेली केविलवाणी अवस्था तिच्या पुढच्या आयुष्यातील हालअपेष्टांचे जणू प्रतीकच असते. मात्र काही ठिकाणी का होईना, विधवेच्या वाटय़ाला हीन जगणे आणणाऱ्या प्रथा बंद व्हाव्यात यासाठी क्रियाशील पावले पडू लागली आहेत. विशेष म्हणजे त्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गाव हे त्याचं उत्तम उदाहरण.

 हेरवाड गावात विधवा प्रथा बंदी ठराव करण्यात आला आणि शिरोळ तालुक्यातील हेरवाडसह तीन गावांतील विधवांच्या आयुष्यात सन्मानाची पहाट उगवली, असेच म्हणावे लागेल. विधवा सन्मान आणि संरक्षण कायदा राज्यात आणून विधवांना भारतीय घटनेने व्यक्तींना दिलेल्या अधिकारांप्रमाणे जगण्याचा हक्क मिळावा यासाठी चळवळ उभारली जात आहे. त्यासाठी राज्यात जागोजागी बैठका आणि कार्यशाळा घेऊन समाजमन तयार केले जात आहे.

 असंख्य विधवांच्या वाटय़ाला येणाऱ्या हालअपेष्टांचा इतिहास वेदनादायकच होता. त्याविरोधात सर्वच समाजधुरीणांनी पावलं उचलली, ठोस निर्णय घेतले गेले, कायदे केले गेले याचा इतिहासही आपण वेळोवेळी वाचतो आहोतच. त्याचा फायदा अनेकींना नक्कीच झाला आहे. यंदा शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्त वेगवेगळे विधायक उपक्रम राबवले जात आहेत. शाहू महाराज यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन हेरवाड गावाने विधवा प्रथा बंदीचा ठराव केला. याविषयी गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितले, ‘‘आमच्या गावात स्त्रियांना सन्मान दिला जातो. विधवा आणि झाडू कामगार स्त्रियांना ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला होता. शिरोळ तालुक्याला नेहमी महापुराचा सामना करावा लागतो. अशा वेळी करमाळा येथील ‘महात्मा फुले सामाजिक सेवा’ संस्थेकडून मदत केली जाते. या संस्थेचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी अन्याय्य विधवा प्रथा बंदीविषयी मोहीम सुरू केल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. गावसभा आयोजित करून विधवांसाठीच्या अनिष्ट प्रथा बंदी करण्याचा ठराव मंजूर केला. मुक्ता संजय पुजारी, सुजाता केशव गुरव या ठरावाच्या सूचक, अनुमोदक होत्या.’’

यानंतर काही दिवसांनी जेव्हा गावातील विष्णू गायकवाड यांचे निधन झाले, तेव्हा गावातील प्रमुखांनी गायकवाड कुटुंबीय, नातेवाईकांशी चर्चा केली आणि त्यांना या प्रथा बंदी ठरावाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर विष्णू गायकवाड यांच्या पत्नी तुळसाबाई यांनी पुन्हा कुंकू लावले, बांगडय़ा घातल्या. पाठोपाठ घोसरवाड गावातही अशाच प्रकारे विधवेचे प्रबोधन घडवून आणले गेले. ही प्रथा गावोगावी रुजू लागली आहे, असेही पाटील नमूद करतात. यात प्रमोद झिंजाडे यांचे योगदान उल्लेखनीय आहे. हेरवाड गावाने असा ठराव केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गावाला भेट देऊन सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला, त्यांची उमेद वाढवली. विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव करणाऱ्या हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतींना ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ ‘सामाजिक प्रेरणा पुरस्कार’ दिला आहे.

अर्थात कोणत्याही बदलासाठी समाजमन तयार करणे हे सहजसाध्य नाही. प्रमोद झिंजाडे यांना हा प्रवास करताना धमक्यांनाही तोंड द्यावे लागले; पण त्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे. करमाळा तालुक्यात त्यांनी ‘महात्मा फुले समाज सेवा मंडळ’ ही स्वयंसेवी संस्था सुरू केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी आणून त्याची अंमलबजावणी कशी व्हावी यासाठी ते गावोगावचे सरपंच, ग्रामपंचायती यांच्या संपर्कात असतात. मानहानीकारक विधवा प्रथा बंद व्हाव्यात, असे त्यांना वाटण्यास एक कारण घडले. प्रमोद झिंजाडे सांगतात, ‘‘करोनाच्या काळात गावातील एका व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला गेलो असताना घडलेल्या प्रसंगाने नवी दृष्टी मिळाली. शेजारी पतीची चिता रचली जात असताना त्यांच्या पत्नीचे कुंकू पुसले जात होते, मंगळसूत्र खेचले जात होते, बांगडय़ा फोडल्या जात होत्या. विधवांकडून हे काम केले जात असताना विवाहित स्त्रियाही पडद्याआड चेहरा लपवून ते विदारक दृश्य सहन करत होत्या. ज्या पद्धतीने हे केले जात होते त्यात होणारी विधवांची अवहेलना पाहून त्यांना मानाचे जगणे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे मी ठरवले. बऱ्याचदा विधवांना समाजात सन्मानाने तर वागवले जात नाहीच, उलट प्रसंगी घरच्यांकडून मारहाण केली जाते, ‘पांढऱ्या कपाळाची’, ‘पांढऱ्या पायाची’ अशी अवहेलना केली जाते. हे सारं थांबवावं यासाठी सरपंच, महिला गटांना पत्रे पाठवून विधवा प्रथा बंदी ठराव करावा, असे आवाहन केले गेले. काही भागांतून प्रतिसाद मिळाला. या कामाची व्याप्ती वाढावी यासाठी सुरुवात स्वत:च्या घरापासूनच करण्याचे ठरवले. शंभर रुपयाचे प्रतिज्ञापत्र तयार केले आणि त्यात तहसीलदारांच्या नावे लिहून दिले, की माझे निधन झाल्यानंतर पत्नीला विधवांसाठीच्या अनिष्ट प्रथा लागू करू नयेत. त्यासाठी कोणी दबाव आणू नये. असे कृत्य करण्यास कोणी भाग पाडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी.’’ त्यांची ही कृती नक्कीच स्फूर्तीदायक असल्याने सोलापूरचे पोलीस अधीक्षक हर्षल बैजल यांनी या निमित्ताने झिंजाडे यांचा सत्कार घडवून आणला. झिंजाडे यांच्यासोबत विधवा प्रथा निर्मूलनाच्या राज्य समितीत राजू शिरसाठ, कालिंदी पाटील, अशोक पिंगळे हे कार्यकर्ते काम करत आहेत.

प्रमोद झिंजाडे यांनी आपले हे काम पुढच्या टप्प्यावर नेण्याचे ठरवले आहे. अनेक गावांना महापूरकाळात त्यांच्या संस्थेने मदत केली होती. तेथील अनेक सरपंचांशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क होता. त्यातून प्रारंभी त्यांनी हेरवाड गावातील स्त्रियांशी चर्चा करून मानहानीकारक विधवा प्रथा बंदीबाबत मानसिकता तयार केली. हेरवाड ग्रामसभेने केलेले ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला बालकल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पाठवून विधवा प्रथा बंदी ठराव राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मंजूर करावा, अशी मागणी केली. आमदारांनी याप्रश्नी अधिवेशनात आवाज उठवावा, अशा आशयाची पत्रे पाठवली. या उपक्रमाची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना दिली. त्यांनी  महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. त्यातून महाराष्ट्रातील सर्व २८ हजार ग्रामपंचायतींनी या अन्याय्य विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाडचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याला पहिला प्रतिसाद कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सकारात्मकरीत्या दिला. त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व ३५ ग्रामपंचायतींमध्ये असा ठराव संमत करून घेतला.

आता हे लोण राज्यभर पसरत आहे. याखेरीज या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिक, औरंगाबाद, करमाळा यासह अनेक भागांमध्ये कार्यशाळा घेतल्या गेल्या आहेत. या माध्यमातून विधायक उपक्रमाची चर्चा सुरू झाल्यानंतर कर्नाटक, छत्तीसगड, गोवा आदी राज्यांतून सामाजिक संस्था, पत्रकार यांच्याकडूनही झिंजाडे यांना निमंत्रणे येत आहेत. हळूहळू हे कार्य राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाल्याचे दिसते. हिंदु स्त्रियांप्रमाणे मुस्लीम, ख्रिश्चन धर्मातीलही अनेक विधवांना अशाच प्रकारची अन्याय्य वागणूक मिळत असल्याचे एका चर्चेतून पुढे आले. त्यांच्यातीलही अशी त्रासदायक विधवा प्रथा बंद व्हावी या दृष्टीने नियोजन केले जात आहे.

अनिष्ट विधवा प्रथा बंदीपाठोपाठ विधवा पुनर्विवाहालाही स्त्रियांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. हेरवाड गावातील तुळसाबाई गायकवाड यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. याच तालुक्यातील यड्राव येथील सासूने सुनेचे मतपरिवर्तन करत तिचा पुनर्विवाह करून दिला. कला शाखेची पदवीधर असलेली दीपा अंगणवाडी मदतनीस. प्रमोद टिपुगडे या युवकाशी तिचा पुनर्विवाह झाला. सासू, सासरे यांनी दीपाला मुलगी समजून तिचे लग्न लावून दिले. सासू चलनादेवी नावलगी म्हणाल्या, ‘‘मुलाच्या निधनामुळे सुनेच्या संसाराचे स्वप्न अधुरे राहिले होते. आताचे सासरच तिचे आता कायमचे माहेर झाले आहे.’’ हेरवाडचा प्रभाव राज्यातही दिसू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुगंधाबाई चांदगुडे या ७६ वर्षांच्या स्त्रीने पतिनिधनानंतर आता कुंकू लावण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा मुलगा कृष्णा हे ‘अंनिस’चे कार्यकर्ते. त्यांनी बाजारातून मंगळसूत्र, जोडवी आणून आईला घालण्यास सांगितले. ‘‘स्त्रियांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. अशा विधायक उपक्रमांची सुरूवात स्वत:पासूनच केली पाहिजे,’’ असे कृष्णा यांचे म्हणणे आहे.

  विधवांसाठीच्या अनिष्ट प्रथा प्रतिबंधक कायद्याचा प्रचार असा वाढत चालला आहे. या चळवळीला बळ मिळून राज्यात किंवा देशभरात कायदा होईल आणि विधवांची परिस्थिती पालटेलच, पण याची वाट न पाहाता समाजाने व्यक्तिगत पातळीवर, घराघरांतून विधवांचा सन्मान करण्यास सुरुवात केली पाहिजे. धार्मिक कार्य, पूजा विधी तसेच कुटुंबातील मंगल कार्यात अहेव स्त्रियांच्या बरोबरीने त्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. साडय़ा, अलंकार देऊन, कुंकू लावून किंवा बांगडय़ा घालायला लावून समाजाची, कुटुंबाची जबाबदारी संपत नाही. तर त्या स्त्रीच्या कौटुंबिक कार्यक्रमांतील सहभागामुळे त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी मिळेल. त्यासाठी शुभाशुभ, शकुन-अपशकुन अशा अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याची मानसिकता तयार करावी लागेल. याशिवाय ज्यांना आपला पुनर्विवाह करायचा आहे त्या स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आत्तापर्यंत अनेक विधवांच्या आयुष्यात आणले जाणारे अन्याय्य जगणे अशा बदलामुळे नक्कीच बदलेल. मात्र त्यासाठी गरज आहे ती सामूहिक मानसिक बदलाची; समाजबदलाची!

dayanand.lipare@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Towards change widow female life insult occasion ysh

ताज्या बातम्या