बालपणीची एक मजेशीर आठवण मला नेहमी येते, खरं तर असे प्रसंग आता दुर्मीळ झाले आहेत. मुलगी वयात आली, म्हणजेच तिला मासिक पाळी सुरू झाली की आणि नंतर लग्न झाल्यावर जेव्हा तिला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा कुटुंबात खूप मोठा सोहळा केला जात असे. फार पूर्वी मुलींची अगदीच बालवयात लग्नं व्हायची, त्यामुळे लग्नापूर्वी पाळी येण्याचे प्रकार बहुदा कमी होते. पण माझ्या आठवणीप्रमाणे, संमती वयाचा (विवाह वयमर्यादेचा) पहिला कायदा झाला तेव्हा मुलींचं लग्नाचं वय किमान १६ वर्षं होतं. नंतर ते १८ वर्षं इतकं झालं. तेव्हाचा एक सोहळा माझ्या छान लक्षात आहे. माझ्या एका मावस बहिणीला लग्नानंतर पहिल्यांदाच पाळी आली तेव्हाचा तो सोहळा.
अशा प्रसंगांसाठी एक मखर तयार करतात. मखर म्हणजे काय ते आता पाहायला मिळणार नाही. परंतु गावामधली त्यावेळची कासार बाई बहुदा ते करायची. ५ बाय ५ चा एक चौकोन, म्हणजे लाकडी पट्ट्यांची चौकट उभी करायची. हिरव्या काचेच्या बांगड्या, ज्याला चुडा म्हणतात त्या बांगड्या एकमेकाला जोडून रंगीत दोर्याने बांधून त्याची पडद्यासारखी चौकट तयार करायची, म्हणजेच तीन बाजूंनी ती चौकट त्या बांगड्यांनी बांधून टाकायची आणि पुढची बाजू तोरणं वगैरे लावून सजवायची. त्या ५ बाय ५ चौकोनाच्या मधोमध दोन चौरंग ठेवले जायचे. एकावर पाळी आलेल्या मुलीला, म्हणजे ‘न्हाणवली’ला बसवलं जायचं. समोरच्या चौरंगावर तिच्यासाठी काही खाद्यपदार्थ ठेवले जायचे.
या जेवणाच्या सोहळ्याला ‘वाढणं’ म्हणायचे. सासरची, माहेरची मंडळी, ओळखीची, नात्यातली मंडळी तिच्यासाठी निरनिराळे खाद्यपदार्थ घेऊन यायची आणि तिचं कौतुक करायची. त्यासाठी गाणी म्हटली जायची. त्याला ‘न्हाणवलीची गाणी’ असं म्हणतात. मध्यंतरी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यावेळेस मी एक गाणं दिलं होतं आणि त्यांनी ते वापरलंही होतं. त्या गाण्याची ओळ अशी आहे, ‘‘रुक्मिणीसी नहाण आले…’’ जणू काही रुक्मिणीला पहिल्यांदा नहाणं आलं त्यावेळची भावावस्था चित्रित केली गेली होती. मुलीची मासिक पाळी सुरू झाली की त्याला ‘नहाणं येणं’ असं म्हणतात. लोकभाषेमध्ये त्याला ‘पदर येणं’ म्हणतात.
‘पदर येणं’ हा शब्द कुठून आला असावा? तर मुलगी आठ वर्षांची झाली की आईच्या मनामध्ये धास्ती असते, ही कधी वयात येईल सांगता येत नाही. अगदी बालपणी तिला झबलं घातलं जायचं. नंतर ‘फ्रॉक’ म्हणजे त्या काळात ज्याला ‘झगा’ म्हणायचे तो घातला जायचा. मुलगी आठ वर्षांची झाली की तिला परकर-पोलकं नेसवलं जायचं आणि १० वर्षांनंतर तिला साडी नेसवली जायची. पण ती साडी कशी नेसवायची? तर तीन-चार वाराचा कापडाचा छोटासा तुकडा कमरेभोवती गुंडाळायचा, त्याला निर्या घालायच्या आणि पुरुष जसं धोतर नेसतात तसं तिला त्या निर्या घालून पुढे खोचायच्या. पहिल्यांदा पदर अंगावर द्यायचा नाही. ज्या वेळेला तिला ‘नहाणं’ येतं, त्या वेळेला मात्र मोठी साडी पद्धतशीर पदर घेऊन नेसवायची. पदर न घेता नेसवल्या जाणार्या साडीला ‘उप्परवट्या लुगडं’ किंवा ‘चिरडी’ म्हणतात.
उप्परवट्या म्हणजे ओटी अर्थात समोरचं पोट. ते झाकलं जाईल अशी साडी नेसवली जायची आणि वयात येईल त्या वेळी तिला पदर दिला जायचा, म्हणून ‘मुलीला पदर आला’ अशा प्रकारची परिभाषा होती. मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी शास्त्रानुसार तिला डोक्यावरून स्नान घातलं जातं, म्हणून त्याला ‘नहाणं- नहाणे’ म्हटलं जायचं. म्हणून त्या गाण्यामध्ये म्हटलंय, ‘‘रुक्मिणीसी नहाण आले…’’ पाळीच्या काळामध्ये केसामध्ये फुलं माळायची बंदी होती. चौथ्या दिवशी तिचं डोक्यावरून स्नान झालं की केसामध्ये फुलं माळायला परवानगी असायची. कारण आता ती ‘पुष्पवती’ झाली आहे. फलधारणा (गर्भधारणा) करण्यास निसर्गत: योग्य झाली हे एक प्रकारे प्रकट केलं जायचं.
संस्कृतमध्ये या अवस्थेला ‘पुष्पवती’ असाच शब्द आहे. स्त्री प्राधान्य असलेली ही परंपरा. तिला भरतकाम केलेली विशिष्ट प्रकारची साडी-चोळी द्यायचे. कारण वयात आल्यानंतर लगेच तिला अपत्य झालं पाहिजे अशी निकड असायची. मुलींना शिकवणं, आपल्या पायावर उभं करणं हे फार नंतरच्या काळामध्ये आलं. परंतु स्त्रीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता कुठे, तर पहिल्यांदा तिला नहाणं येणं आणि नहाणं आल्यानंतर तिचं लगेच लग्न होणं किंवा कधी कधी आधीच लग्न झालेलं असायचं त्या वेळी तिनं गरोदर राहाणं. नहाणं आलं की लगेचच तिच्या गरोदरपणातली गाणी सुरू व्हायची. ज्याला आपण ‘ओटी भरणं’ म्हणतो ते. गाण्यामध्येही पोपट वर्णन केलेला असला की तिला मुलगा होईल किंवा मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते. जर मुलगा झाला तर लोकांना प्रचंड आनंद व्हायचा, ‘पुत्र झाला तो हरपली चिंता…’ असे त्यातले शब्द असत. नहाणं आलेल्या काळामध्ये जी चोळी शिवली जायची, त्या चोळीवर भरतकाम केलं जायचं.
भरतकाम ही स्त्रियांची खास कला. निरनिराळ्या प्रकारची भरतकामं असायची. पोपटाचं चित्र तिच्या बाहीवर आणि पाठीवर मोराचं चित्र, असं रंगीबेरंगी धाग्यांनी त्या चोळीवर भरतकाम केलं जायचं. भरतकामाचे खूप नमुने स्त्रिया निरनिराळ्या निमित्ताने काढायच्या. विशेषत: स्त्रियांच्या चोळीवर आणि कधी कधी तर साड्यांवरच रेशमी धाग्यांनी भरतकाम केलं जायचं. लहान बाळांची झबली, टोपडी, कुंची यावरही काही लोक आजही करत असतील, पण आता बरंचसं यंत्रावर काम होतं. ज्याला ‘एम्ब्रॉयडरी’ म्हणतात. प्रत्येक प्रांतपरत्वे भरतकामाच्या त्या धाग्यांची आणि टाक्यांची पद्धत वेगळी होती. कर्नाटकामध्ये ‘कर्नाटकी कशिदा’ हे खास वेगळं प्रकरण आहे, ते फार कौशल्याचं काम असतं.
आतासुद्धा तो कर्नाटकी कशिदा लोकप्रिय आहे, पण तो मशीनवर केलेला असतो. साडीच्या ज्या भागावर आपल्याला भरतकाम करायचंय, ते धागे मोजून दर पाच धाग्यांनंतर एक टाका, असं करत करत चौकोन करायचा असे ते धागे घालत जायचं आणि ती नक्षी तयार करायची. उलटसुलट दोन्ही बाजूंना सारखं दिसणं हे कर्नाटकी कशिद्याचं वैशिष्ट्य असतं. त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची फुलं, पानं वगैरे काढली जातात. विशेषत: विवाहोत्तर, पहिल्या संक्रांतीच्या वेळी नवरी मुलगी काळ्या साडीवर कर्नाटकी कशिदा काढून त्यावर बुंदके काढायची, म्हणजे मध्ये मध्ये त्या कशिद्याच्याच टाक्यांनी चांदण्यासारखी छोटी छोटी फुलं काढायची. ही साडी अनेकांच्या कौतुकाचा भाग असायची.
कर्नाटकातील बेळगावमध्ये मी स्वत: अशा साड्या पाहिलेल्या आठवताहेत, एका आजींनी त्यांच्या नातसुनेसाठी कर्नाटकी कशिद्याचं भरतकाम असलेल्या मोजून १० साड्या स्वत: केल्या होत्या. हे इतकं बारीक काम आहे की डोळे फुटायचे कदाचित. दुसरा प्रकार म्हणजे, त्या भरतकामाचे साखळीचे टाके. साखळीचे टाके आजही आहेत आणि ते बहुधा मशीनवरच घालतात. नंतर टॅकिंग, म्हणजे एक टाका मोठा, एक लहान, एक मोठा, एक लहान असं करत करत भरतकाम करत जायचं. आणखी एक प्रकार असतो आपल्याकडे, विशेषत: काश्मीरमध्ये शालींवर जे नक्षीकाम असतं ते. तेही हाताने करणं आणि विशेषत: तिथं लहान मुलींकडून ते करून घेतलं जातं. कारण ते भरतकाम करण्यासाठी अतिशय नाजूक बोटं लागतात, असं म्हटलं जातं. आता तेही काम मशीनवर होत आहे, परंतु काश्मीरमध्ये ते काम करण्यासाठी सात-आठ-दहा वर्षांच्या छोट्या छोट्या मुलींना प्रशिक्षण दिलं जायचं. आणखी एक प्रकार म्हणजे ‘सॅटिन स्टिच’ किंवा ‘काश्मिरी टाका.’
असे विविध प्रकारचे टाके आणि त्यांनी काढलेला कशिदा भारताच्या निरनिराळ्या भागांमध्ये आणि निरनिराळ्या वस्त्रांवर स्त्रिया काढत असत. ते खूप कौशल्याचं काम असायचं. राजस्थान-गुजरातकडे ‘कच्छी टाका’ हे वैशिष्ट्य. त्यात छोटे आरसे (म्हणजे बादला) जडवतात.लग्नानंतरचा स्त्रीच्या आयुष्याचा पुढचा टप्पा स्त्री गरोदर राहिल्यानंतरचा. बाळ येणार म्हणून पुढची तयारी व्हायची. बाळासाठी निरनिराळ्या प्रकारची अंगडी, टोपडी शिवणं असायचं. गोल, चौकोनी टोपडी शिवणं, त्यावर निरनिराळ्या प्रकारचे रंगीबेरंगी गोंडे लावले जायचे. गोल टोपडं असेल तर त्याला पुढच्या बाजूला झालर लावली जायची. आज तयार टोपडी मिळतात परंतु तेव्हा स्त्रिया हाताने ते करायच्या.
आणखी एक प्रकार म्हणजे बाळासाठी कुंची तयार करायची. विशेषत: दक्षिणेकडे जे खण मिळतात, त्याला ते ‘धारवाडी’ खण म्हणतात किंवा इरकली साडीचे खण, त्या खणाची कुंची शिवायची आणि त्या कुंचीला मधोमध निरनिराळ्या प्रकारचे गोंडे लावून सजावटही केली जायची. ‘गजनी’ नावाचं रेशमसारखं कापड असायचं, त्या कापडाची कुंची इतिहासकाळामध्ये फार प्रसिद्ध होती. आता ते गजनीचं कापडच मिळत नाही. अगदीच कधी तरी ऐतिहासिक काळातल्या काही वस्तू, संग्रहालयात एखादी गजनीची कुंची दिसते. त्यावेळच्या भरतकामाच्या साड्याही दिसतात. हैदराबादच्या वस्तू संग्रहालयामध्ये मी ते सर्व पाहिलेलं आहे.
अशीच आणखी एक कलाकुसरीला वाव असणारी गोष्ट म्हणजे बाळाला झोपवण्यासाठीच्या पाळण्याची सजावट. स्त्रिया निरनिराळ्या झालरींनी ती करत असत. पाळण्यातल्या बाळाचं लक्ष वेधलं जावं यासाठी त्यावर ‘चिमणाळं’ बांधलं जायचं. चिमणाळं म्हणजे जणू चिमण्या आहेत असं. एक छोटंसं चौकोनी छत करायचं आणि त्याला काचेच्या नळ्या, रंगीबेरंगी मणी आणि कापडाच्या आत कापूस भरून जरा गुबगुबीत असे चिमणीसारखे दिसणारे छोटे त्रिकोणी आकार केले जायचे आणि ते त्या छताला नळ्यांनी जोडायचे. ते छत बाळाच्या पाळण्यावर टांगलं जायचं. हलणार्या त्या चिमणाळ्याकडे बघून बाळं त्यात छान रमतात. हल्ली तशा प्रकारची खूप खेळणी मिळतात.
सांगायचं तात्पर्य, सबंध भारतभर, महाराष्ट्रातच नव्हे, तर विविध प्रकारचं कशिदाकाम, भरतकाम, विणकाम, कपडे शिवणं, निरनिराळ्या प्रसंगपरत्वे केलं जायचं. त्याच्या चालीरीती, रूढीं-परंपरांमध्ये स्त्रिया अखंड गुंतलेल्या असायच्या, पण त्याच्या निर्मितीचा आनंदही घ्यायच्या किंबहुना आजही घेतात. रोजचं घरकाम तर आहेच, परंतु आपण काही तरी सुंदर वस्तू तयार करतो आहोत याचा आनंद मोठा असतो आणि तो आनंद स्त्रिया सणावाराच्या निमित्ताने घेत असत, हा त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा.
chaturang@expressindia.com
