लता दाभोळकर
मुंबईतल्या एका प्रदर्शनात ‘आदिवासी गुडिया’ प्रथम पाहिल्या होत्या. डोक्यावर ‘बोहनी’ अर्थात बांबूची टोपली, काहींच्या डोक्यावर गाठोडं, लाकडांचा भारा, हातात तीर-कमान, गोफण, असं आदिवासी समाजाचं पुरेपूर प्रतिबिं दिसणाऱ्या या छोटय़ाशा बाहुल्या! सुबक आणि अतिशय आकर्षक. मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्हा या आदिवासी गुडिया बनवण्यासाठी फार प्रसिद्ध आहे.
या ठिकाणचे सगळेच या बाहुल्या बनवण्याच्या कामी मग्न! मध्य प्रदेशातली ही सुंदर आदिवासी गुडिया अर्थात बाहुली आदिवासी समाजातल्या कलेचा उत्तम ठेवा आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली आदिवासींची ही कला जपली झाबुआ गावानं. केवळ जपलीच नाही, तर तिला मानसन्मान मिळवून दिला,अगदी पद्मश्रीपर्यंत!झाबुआतल्या रमेश परमार आणि शांती परमार या दाम्पत्याला या कलेसाठी यंदा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आदिवासी गुडियांना राष्ट्रीय पटलावर नेण्याचं श्रेय जातं ते शांती परमार यांच्याकडे. चरितार्थासाठी त्यांनी या बाहुल्या घडवण्याचं ठरवलं आणि तेच काम आता त्यांचं आयुष्य झालं आहे. या बाहुल्या पूर्णत: हातानं तयार केल्या जातात, त्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. आदिवासींच्या पारंपरिक कलेला प्रकाशझोतात आणण्यात या दोघांची कल्पकता कारणीभूत ठरली.
या बाहुल्या कापड आणि लोखंडाच्या पातळ तारांनी बनवल्या जातात. आपला ‘पद्मश्री’पर्यंतचा प्रवास सांगताना शांती आणि रमेश परमार सांगतात, ‘‘२५ जानेवारीची रात्र आम्ही तहहयात विसरणार नाही. रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास एक फोन आला. आपण दिल्लीतील एक अधिकारी असल्याचं सांगत समोरची व्यक्ती म्हणाली, ‘तुम्ही रमेशीजी बोलत आहात ना?’ मी ‘हो’ म्हणाल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही आणि तुमच्या पत्नीची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे; पण एवढय़ात कुणाला सांगू नका.’ सुरुवातीला वाटलं, कुणी तरी आमची चेष्टा करत असेल; पण थोडय़ा वेळानं स्थानिक अधिकाऱ्यांचेही दूरध्वनी येऊ लागले तेव्हा कुठे या बातमीवर आमचा विश्वास बसला. आम्ही दोघंही ती रात्र झोपू शकलो नाही! आमच्या कलेच्या सन्मानाचा आनंद त्यात सर्वाधिक होता. ज्याचा आम्ही विचारही केला नव्हता ते हाती गवसलं होतं!’’
अगदी काही काळापूर्वीपर्यंत शांती परमार यांचा अडचणींचा फेरा चुकत नव्हता. पती रमेश यांची होमगार्डची नोकरी सुटली होती, त्यामुळे रोजचं जगणं अवघड होऊन बसलं होतं; पण या बाहुल्यांनी त्यांना अचूक मार्ग दाखवला. १९९३ मध्ये त्यांनी झाबुआमध्ये आदिवासी बाहुल्या बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि सहा महिन्यांतच त्यात कौशल्य आत्मसात केलं; पण पुढचा प्रश्न ‘आ’ वासून उभा होता. या बाहुल्यांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक कुठून उभारायची? कारण गाठीशी अजिबातच पैसा नव्हता. या बाहुल्यांसाठी लागणारं कापड आणि अन्य कच्चा माल खूप महाग होता. त्यावर त्यांनी उपाय शोधला. एका शिंप्याकडून दीड रुपया किलो या हिशेबानं कपडय़ांचे तुकडे विकत घेतले आणि त्यापासून बाहुल्या बनवू लागल्या. तरीही तार, रुईचा (लोकरी) धागा आणि रंगांची आवश्यकता होतीच. त्याची जुळवणी त्यांनी केली. या झटापटीत बाहुल्यांच्या निर्मितीनं त्यांना पुरतं झपाटून टाकलं. पुढे याच बाहुल्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आधार बनल्या. शांती भावुक होऊन सांगतात, ‘या बाहुल्यांशी माझं वेगळं असं जिव्हाळय़ाचं नातं आहे. या छोटय़ाशा बाहुल्यांनी माझ्यातला आत्मविश्वास वाढवला, जणू या माझ्या सख्याच बनल्या!’
हळूहळू या कामी त्यांचा जम बसू लागला. पती रमेशसुद्धा त्यांना सहकार्य करताना त्यात निपुण झाले. सुरुवातीला बाहुल्या बनवण्यासाठी ते तुअरच्या काटक्यांचा (एक विशिष्ट वनस्पती) वापर करत. या काटक्या क्रूसासारख्या बांधून त्यावर कपडे शिवत. इंदूरमधील पठाण यांच्या सांगण्यावरून ते पहिल्यांदा झाबुआतून इंदूरला गेले. तिथे या बाहुल्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मग हळूहळू अन्य शहरांमध्ये प्रदर्शनास सुरुवात केली. लोकांना या बाहुल्या आवडू लागल्या. सध्या भोपाळ, मुंबई, अहमदाबादमधूनही बाहुल्यांसाठी मागणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या बाहुल्यांची एक जोडी बनवण्यासाठी त्यांना साधारण एक तास लागतो. छोटय़ामोठय़ा वेगवेगळय़ा आकारांतल्या बाहुल्या बनवल्या जातात. शांती परमार यांनी ही कला फक्त स्वत:पुरती मर्यादित न ठेवता आजपर्यंत सुमारे पाचशे स्त्रियांना प्रशिक्षण देऊन आणि त्यांना रोजगार मिळवून दिला. झाबुआमधील साधारण ३० कुटुंबं बाहुल्या बनवण्याचं काम करतात. हे दाम्पत्य अन्य शहरांतल्या स्त्रियांना प्रशिक्षण देण्यासाठीही जातं. ही कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, अशी त्यांची इच्छा आहे. शांती परमार या रूढार्थानं शिकलेल्या नाहीत, पण त्यांच्या हाती बाहुल्या बनवण्याची अद्भुत कला वसली. या पुरस्कारामुळे केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या प्रशिक्षणाअंतर्गत काम करणाऱ्या अनेक कारागिरांना बळ मिळालं असल्याचं मत त्या नोंदवतात.
या बाहुल्यांचं महाराष्ट्राशीही एक नातं आहे. साठ वर्षांपूर्वी झाबुआमधल्या आदिवासी विभागात महाराष्ट्रातल्या दोन स्त्री अधिकारी कार्यरत होत्या. त्यांनी इथल्या आदिवासींना रोजगार मिळावा म्हणून बाहुल्या बनवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. हळूहळू इथला आदिवासी समाज या प्रशिक्षणाशी जोडला गेला आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळाला. पंधरा वर्षांपूर्वी हे प्रशिक्षण केंद्र बंद झालं; पण बाहुल्या बनवण्याचं काम थांबलं नाही. या बाहुल्या देशभरातील लोकांनी आपल्याशा केल्या आहेत, त्यांची मागणी वाढती आहे.
आता तर या बाहुल्यांना ‘जीआय टॅग’ (जिओग्राफिकल इंडिकेशन) मिळण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. ते मिळालं की या बाहुल्या जागतिक स्तरावरही लोकांना आपल्याशा होतील यात काहीच शंका नाही.