scorecardresearch

सुत्तडगुत्तड : तुका आकाशाएवढा !

गावगाडय़ाचा आणि वारकरी संप्रदायाचा सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न आजवर जाणीवपूर्वक कोणी केल्याचं वाचनात नाही

सुत्तडगुत्तड : तुका आकाशाएवढा !
(संग्रहित छायाचित्र)

राजन गवस

समाजवादी चळवळीतील मारोतराव जाधव तळाशीकर गुरुजींनी वीस वर्षे अभ्यास करून लिहिलेलं तुकाराम गाथेचं निरूपण दोन खंडांत प्रकाशित झालंय. महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांत असे कितीतरी निरूपणकार असतील ज्यांची निरूपणं तशीच  पडून राहिली असतील. त्या वारकरी संप्रदायाच्या अज्ञात अभ्यासकांना कोणीतरी शोधायला हवं. त्यांच्या मांडणीतील नवता अधोरेखित करायला हवी हे सांगणारा या सदराचा अंतिम लेख..

गावगाडय़ाचा आणि वारकरी संप्रदायाचा सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न आजवर जाणीवपूर्वक कोणी केल्याचं वाचनात नाही. गाव तिथं वारकरी. कुठं ना कुठं असतंच विठ्ठलाचं मंदिर. संध्याकाळ झाली, श्रमले-भागलेले लोक घराकडं परतले, की टाळ मृदंगाची साय अंधाराबरोबरच गडद होऊन पसरू लागते गावावर. प्रत्येक गावात होतोच हरिनाम सप्ताह. वीणेचा झंकार, टाळांची लय आणि मृदंगाची साथ. हमखास महाप्रसाद. प्रत्येक गावातला कोणी ना कोणी चालतोच कधीतरी पंढरीची वाट. आपल्यालाही कधीतरी दिसावी पंढरी अशी असतेच प्रत्येकाची आकांक्षा!

विठ्ठल हाच असतो अनेकांचा विसावा. जात-पात, स्त्री-पुरुष, हे सगळं विरून जातं विठ्ठलनामाच्या गजरात. जगण्याच्या पसाऱ्यात सज्जन माणसाचे मोजमाप म्हणजे वारकरी. त्याच्या असण्याने होत जातात गावाचे श्वास निर्मळ. त्याच्या पायाचे दर्शन म्हणजे विठ्ठल दर्शन. प्रत्येक गावात वर्षांतून एकदा तरी होतेच कीर्तन. काळ बदलला. जगण्याची गती बदलली. माणसाची वृत्ती बदलली. मूल्यांची पडझड सुरू झाली. पसा जगण्याच्या केंद्रभागी आला. काम न करणाऱ्या ऐतखाऊस गावात कधीच नव्हती, ती प्रतिष्ठा प्राप्त झाली. गावात शहर घुसलं. नातीगोती धोक्यात आली. माणमाणसांतली माया पातळ झाली. गाव लडबडलं. तळामुळातून हादरलं. भयचकित झाली माणसं. अनेक बुवाबाबा आले. सत्संग सुरू झाले. साथीच्या रोगासारखे महाराज, त्यांचे आश्रम उगवले काही ठिकाणी.

तरी गावातून विठ्ठलाला हद्दपार करणे जमलंच नाही कोणाला. उलट गावात आलेल्या नवीन साथीला, व्यसनाला आळा घालण्यासाठी कंबर कसून उभा राहिला विठ्ठल! बेवडय़ाला उचलून न्यायचं पंढरीला. चंद्रभागेत बुडवून काढून गळ्यात तुळशीमाळ घालून आणला, की सुतासारखा सरळ होऊन जगू लागतो, असा सार्वत्रिक समज आणि वास्तव. विठ्ठल गावगाडय़ातल्या अनेक रोगांवरचं रामबाण औषध. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथीपेक्षा जालीम ठरलेली आहे ही ‘विठोबापॅथी’. पण या विठोबापॅथीचा, विठोबा औषधपद्धतीचा शिस्तशीर अभ्यास करावा, असं वाटलेलं नाही अजून कोणाला.

या विठोबापॅथीतलं गावगाडय़ाला झपाटून टाकणारं सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुकाराम. त्याचा अभंग असतोच प्रत्येकाच्या तोंडात. कष्टकऱ्याचा विसावा तुकाराम. त्याची चतन्यचुर्णवटी तुकोबा. बायाबापडय़ांचा, रंजल्यागांजल्यांचा आधारच तुकोबा. तुकारामबुवाची गाथा वाचलेली असतेच असं नाही पण, त्याचे अभंग मात्र भिनलेले असतात अंगात. कधी कधी आपला अनुभवच सांगितला जातो ‘तुका म्हणे’ असं म्हणत. तुकोबांचीच साक्ष काढली जाते प्रत्येक ठिकाणी. तो अख्ख्या जगण्याचा, जन्माचा साक्षीदार. गावाच्या धमन्यांतून वाहत असतो तुकोबा. हे भाग्य दुसऱ्या कोणाला नाही.

प्रत्येक दहा-पाच गावांत असतोच एक गाथेचा निरूपणकार. त्याची त्याची स्वत:ची अन्वयपद्धती असते. त्यानुसार तुकोबाचा एकच अभंग अनेक प्रकारे निरूपित करण्याची त्याची चाललेली असते धडपड. त्याची कधी कधी होत असते तुकोबाशी झटापट. कधी हळुवार संवाद. हे सगळं चाललेलं असतं त्याचं त्याच्यापुरतं. त्याला ते कुणाला दाखवायचंही नसतं आणि कुठं प्रसिद्धही करायचं नसतं. असं कैक खेडय़ापाडय़ांत होत असतं.

अशातलेच एक मारोतराव जाधव तळाशीकर गुरुजी. कुठं आलं हे तळाशी? तर दुनियेच्या तळाशी. हे गाव संपलं, की सह्य़ाद्रीच्या रांगा. कोरडवाहू शेतकऱ्यांचं गाव. पीक काय, तर फक्त भात. तेही पिकलं तर. नाही तर नदीकाठच्या गावांतून करायला जायचं मोलमजुरी. अशा या तळाशीचे जाधव गुरुजी. म्हणून तळाशीकर गुरुजी. एकदम इरसाल माणूस. प्रचंड स्मरणशक्ती. स्वत:ची अशी खास विकसित केलेली कथनपद्धती. बोलायला लागले की हजारोंचा समुदाय हसून हसून बेजार. निवडणूककाळात त्यांच्या सभा ऐकायला वीस-पंचवीस मलांवरनं माणसं यायची. त्या वेळी शंकर धोंडी पाटील, क्रांतिवीर काका देसाई आणि जाधव गुरुजी व्यासपीठावर असले, की लोक अन्नपाणी विसरून जायचे. शंकर धोंडी आणि काका देसाई भूमिहीन, अल्पभूधारक, धरणग्रस्त चळवळीचे नेते. वंचितांच्या प्रश्नासाठी त्यांनी सारी हयात वेचली. वाडय़ावस्त्यांतून, जंगल-दऱ्यांतून त्यांची अखंड भ्रमंती. गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत. फक्त हाक मारली तरी पाच-पन्नास माणसं सहज कामधंदा टाकून गोळा व्हायची. त्यांनी केलेल्या अनेक चळवळींचे कोणी दस्तावेजीकरण केले नाही. त्यामुळे उद्याच्या इतिहासात यांची नोंदही असणार नाही. या बिचाऱ्यांनी केलेल्या चळवळी यशस्वी झाल्या; पण ग्रंथनोंदीशिवाय वाऱ्यावरच विरून गेल्या. अशा चळवळकर्त्यां नायकांबरोबर जाधव गुरुजी असायचे. तिघांच्या तीन कथनपद्धती. एकासारखा दुसरा बोलणार नाही. तिघेही समाजवादी चळवळीतील कार्यकत्रे. जनसामान्यांबद्दल प्रचंड कळवळा.

असे हे मारोतराव जाधव तळाशीकर गुरुजी, आपला फौजफाटा घेऊन विद्यापीठाच्या मराठी विभागात आले. अलीकडच्या कैक वर्षांत त्यांची भेट झाली नव्हती. त्यांना बघितल्या बघितल्या त्यांची भाषणं आठवून एकदम हसूच आलं. जे आवरता आलं नाही. त्यांना खुर्चीवर बसवलं. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनं माझ्यासमोर भगव्या कपडय़ात बांधलेले दोन दप्तराचे गठ्ठे ठेवले. त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होतो, पण त्याकडं त्यांचं लक्षच नव्हतं. स्वत:च्याच तंद्रीत ते म्हणाले, हे दोन गठ्ठे सोडा. आज्ञाधारकपणे ते भगव्या कपडय़ातील दप्तर सोडले तर प्रत्येक गठ्ठय़ात तीन-चार हजार पानांचा हस्ताक्षरात लिहिलेला मजकूर. गुरुजींना प्राचीन पोथ्या कुठंतरी सापडल्या वाटतं, असं मनात म्हणतच त्यांनी तयार केलेला एक खंड समोर घेतला. असे वीस खंड. गुरुजींनी आपले खास विकसित केलेले कथन सुरू केलं, ‘‘आमचं घर वारकरी. कैक पिढय़ांत चालत आलेलं. हे गाथेचं निरूपण केलंय..’’ ऐकताक्षणीच उडालो. गुरुजी आणि गाथेचं निरूपण?

गुरुजी पूर्ण लोहियावादी. लोहियांचा शब्दन् शब्द त्यांनी वाचलेला. त्यांच्या भाषणातून त्याचा प्रत्यय यायचा. समाजवादी लोक वारकरी संप्रदायाशी थोडे फटकूनच वागल्याचे माझे निरीक्षण. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते ते भाई वैद्य या साऱ्यांना मी अनेक वेळा ऐकलंय पण त्यांनी आपल्या विवेचनाच्या केंद्रभागी वारकरी चळवळीला आणल्याचं मला स्मरत नाही. फक्त साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी केलेले उपोषण तेवढंच ठळक ध्यानात. अशा समाजवादी चळवळीतील जाधव गुरुजी संपूर्ण गाथेचे निरूपण करतात, हे थोडे अचंबित करणारेच होते. त्यात त्यांच्याबद्दल माझ्याकडे जी माहिती होती, त्यात ते वारकरी संप्रदायातील आहेत असं कोणी बोलल्याचंही आठवायला तयार नव्हतं.

गुरुजी बरंच काय काय बोलत होते, त्याकडं माझं लक्षच नव्हतं. डोक्यात तिसरंच काय काय चाललं होतं. समाजवादी माणूस गाथेकडं कसं पाहत असेल? गुरुजींचं म्हणणं होतं, हे सगळं मी वाचावं. अभिप्राय द्यावा. ते निघून गेले आणि मी ते खंड चाळायला सुरुवात केली. नेटक्या अक्षरात लिहिलेलं प्रत्येक पान. पहिल्या पाच-सहा पानांतच ध्यानात आलं, की हे काही तरी वेगळं आहे. जाधव गुरुजी गाथेचा अन्वय आपल्या पद्धतीने लावताहेत. हे फक्त वरवर चाळता उपयोगी नाही.

तुकारामबावाच्या गाथेबद्दल जे मिळेल ते आजवर वाचून घेतलेलं होतं. कधी अभ्यासाच्या निमित्तानं, कधी पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी, तर कधी तुकाराम समजून घेण्यासाठी. त्र्यंबक कासार, तुकाराम तात्या पडवळ ते बाबूराव हरी देवडीकर यांच्यापर्यंतच्या अभ्यासकांच्या प्रयत्नांची यथासांग ओळख होती. सांप्रदायिक पद्धतीने केलेली गाथेची विविध निरूपणं वाचनात होती.

तुकारामाचा शोध वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी घेतलेला आहे. सांप्रदायिक लोकांना दिसणारा तुकाराम, डॉ. सदानंद मोरे, भालचंद्र नेमाडे यांना दिसणारा तुकाराम आणि विद्रोही अभ्यासकांना दिसणारा तुकाराम, या साऱ्यांच्या मांडणीचा परिचय होता. सखोल नसला तरी जुजबी तरी. पण जाधव गुरुजींची तुकाराम शोधण्याची रीत वेगळीच जाणवायला लागली. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, श्रमिकाच्या नजरेतून गुरुजी गाथेचे निरूपण करत आहेत, हे विलक्षण वेगळं वाटाय लागलं.

अभ्यासक आपल्या संशोधकीय पद्धतीने तुकारामाच्या अभंगाचे वर्गीकरण करत आले आहेत, पण गुरुजींनी केलेले वर्गीकरण गावगाडय़ाच्या खास पद्धतीनं केलेलं वर्गीकरण आहे. आशयसूत्रांनुसार केलेलं ते वर्गीकरण सर्वसामान्य वाचकांना, कष्टकरी माणसाला आकर्षति करणारं, असं आहे. याबरोबरच निरूपणाची पद्धती सर्वस्वी वेगळी. शेतकरी-कष्टकरी-श्रमिकाच्या नजरेतून केलेलं निरूपण. त्यात बदलती परिस्थिती, स्वातंत्र्यानंतरची स्थितीगती, भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वं, लोहियांची दृष्टी, महात्मा गांधीजींचा परिप्रेक्ष्य या साऱ्यांतून गुरुजी निरूपण करत आहेत. त्यात त्यांची खास कथनपद्धती आहे. आपल्या खास जीवनदृष्टीतून, शैलीतून, त्यांनी गाथेचे हे निरूपण रचले आहे.

तळाशीसारख्या दुर्गम खेडय़ात, बदलत्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बजबजपुरीला कंटाळलेला माणूस, आपल्या आयुष्याची वीस वर्षे गाथेच्या सोबत घालवतो, हे आजच्या काळात केवळ अद्भुत आहे. वीस वर्षे सलग ध्यानी, मनी आणि स्वप्नी तुकाराम आणि गाथा. यातूनच आकाराला आलेलं हे कथन. स्वत:च्या दृष्टीतून. चार हजार पानांचा स्वहस्ताक्षरातला मजकूर. भारावून तर गेलोच, पण दीड-दोन लाख रुपये पगार घेणाऱ्या आमच्या जमातीचीच लाज वाटाय लागली. या निरूपणाचं काही तरी केलं पाहिजे म्हणून आमच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख नंदकुमार मोरे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. त्यांनी व त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेऊन चार हजार पानांचा मजकूर सोळाशे पानांत संपादित केला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रशासनानं हे निरूपण दोन खंडांत, अल्प किमतीत उपलब्ध करून देण्याचे ठरवले. यात मोठा वाटा डी. टी. शिर्के या माणसाचा. शेवटी गुरुजींचे निरूपण दोन खंडांत प्रकाशित झाले. ध्यानीमनी नसताना गुरुजींना हा सुखद धक्काच होता.

हे खरे असले तरी महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांत असे कितीतरी निरूपणकार असतील ज्यांची निरूपणं तशी सांदीखोपडय़ातच पडून राहिली असतील. त्या वारकरी संप्रदायाच्या अज्ञात अभ्यासकांना कोणीतरी शोधायला हवं. त्यांच्या मांडणीतील नवता अधोरेखित करायला हवी. त्यातून नव्या दृष्टीचा, नव्या कथनांचा शोध लागेल. ते न करता आपण ‘संत साहित्याची आता गरज उरली आहे का?’ असले भंपक परिसंवाद घेऊन व्यासपीठं उबविण्यात काय अर्थ आहे?

(सदर समाप्त)

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या