आयुष्याला कलाटणी देणारे पुस्तक

समुपदेशन, पालकांशी सुसंवाद होण्यात मध्यस्थी यांसारख्या मानसिक समाधान देणाऱ्या गोष्टी केवळ कर्मवीरांच्या प्रेरणेने व रयत शिक्षण संस्थेने नोकरी करण्याची संधी दिल्यामुळे घडल्या.

समुपदेशन, पालकांशी सुसंवाद होण्यात मध्यस्थी यांसारख्या मानसिक समाधान देणाऱ्या गोष्टी केवळ कर्मवीरांच्या प्रेरणेने व रयत शिक्षण संस्थेने नोकरी करण्याची संधी दिल्यामुळे घडल्या. काम करण्यातील आनंद वेळोवेळी मिळाला व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील खुशी व आपल्या थोडय़ाशा मदतीने त्यांच्या जीवनात आलेला आनंदही अनुभवायला मिळाला.
बालवयात कळत-नकळत आपल्यासमोर काही आदर्श असतात. लहानपणापासून आईमुळे वाचनाची आवड निर्माण झाली. कदाचित त्यामुळेच शिक्षकी पेशाचे आकर्षण वाटू लागले. एकदा कराडला मावशीकडे गेले होते. तिने मला कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र वाचावयास दिले आणि या पुस्तकाने माझ्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.
रयत शिक्षण संस्थेची अनेक महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र हे माझे विषय. हे विषय शिकवायला ग्रामीण भागात जायला त्या काळी कोणी तयार नसत आणि हे विषय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनीही शिकले पाहिजेत.  कारण ते काही प्रमाणात तरी जीवन जगायला, विचार करायला उपयोगी पडतात असे माझे मत. मी नोकरीसाठी रयत शिक्षण संस्थेत अर्ज केला. अपेक्षेप्रमाणे मुलाखतीला बोलावले गेले. मुलाखतीचा प्रसंग अजूनही आठवतो. शिपायापासून ते प्राचार्यापर्यंत सगळ्यांच्या मुलाखती एकाच दिवशी. हॉलमध्ये मुलाखतीला जाणारी मी पहिली व्यक्ती होते. मुलाखत घेण्यासाठी संस्थेच्या सगळ्या महाविद्यालयांचे प्राचार्य, विषयतज्ज्ञ आणि पदाधिकारी असे जवळजवळ चाळीसेक लोक होते. एका प्रश्नाचे उत्तर देईपर्यंत दुसरा प्रश्न अंगावर येई. माझा आत्मविश्वास दांडगा होता. अपेक्षेप्रमाणे निवड झाली. मला नेमणुकीचे पत्र मिळाले ते गाव होते कोपरगाव! पुण्यातली नोकरी सोडून जाऊ नये असे सगळ्यांचे मत पडले. पण माझा निश्चय ठाम होता. पुन्हा एकदा माझा एकटीचा संसार घेऊन कोपरगावला निघाले. त्या वेळी माझे वय होते २३ वर्षांचे. मी त्या धुळीने माखलेल्या आणि मळीच्या वासाने व्यापलेल्या अनोळखी गावात प्रवेश केला. प्राचार्याना रुजू झाल्याचे लिहून दिले. आणि लेडीज हॉस्टेलची चौकशी केली तेव्हा कॉलेजला लेडीज हॉस्टेल नव्हते. मी या अनोळखी गावात राहणार कोठे? माझी हतबलता ओळखून प्राचार्य एस. डी. पाटील यांनी स्टाफपैकी अलका रत्नपारखी यांना बोलावून घेतले. त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबाची घटक होऊन पंधरा दिवस राहिले. तिच्या घरापासून जवळच तिच्या मामांच्या बंगल्यात मला भाडय़ाने जागा मिळाली. बाबासाहेब कुलकर्णी-घरमालक त्यांनी त्यांच्या घरातील एक कॉट व टेबल-खुर्ची आणून दिली. भिंतीत भरपूर कपाटे असल्यामुळे कपडे, भांडी आणि पुस्तके यांची चांगली सोय झाली. ती माझी खोली विलक्षण चैतन्याने भरून गेली होती. माझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा तो जन्मक्षण होता.
कोपरगावमुळे माझ्या आयुष्याला वेगळे वळण लागले. मी रुजू झाले त्याच वर्षी कला व वाणिज्य या शाखा सुरू झाल्या. सुरुवातीला फक्त शास्त्र शाखा होती. वर्ग खोल्या कमी होत्या. माझे वर्ग मैदानात झाडाखाली व पावसाळ्यात जिन्याच्या पायऱ्यांवर भरत. असे माझे वर्ग ‘बिनभिंतीच्या’ वातावरणात होत असत. नवीन वर्गासाठी निधी जमवायचा होता. स्टाफच्या मदतीने नाटक करावे असे मी सुचवले आणि आम्ही ‘गारंबीचा बापू’ हे नाटक सादर केले. दोन्ही साखर कारखान्यांच्या मदतीने आणि आता नाटकाच्या तिकीट विक्रीतून गावाचाही सहभाग वाढला. या पैशांतून आणि श्रमदानातून आम्ही सहा वर्ग बांधले. सामाजिक शास्त्रांचा अभ्यास केवळ शिकण्या-शिकवण्यापुरता न करता सामाजिक परिवर्तनाची दिशा शोधण्यासाठी करण्याची प्रेरणा कर्मवीरांच्या कार्यामुळे मिळाली.
मी निवडलेल्या माझ्या या वाटेवरचा प्रवास मनाप्रमाणेच चालला होता. ७७ साली व.ॅ.उ. ची टीचर फेलोशिप ही योजना आली. त्यात माझी निवड झाली. प्राचार्य एस. डी. पाटील यांच्या सहकार्यामुळे संस्थेकडून परवानगी मिळाली आणि मी पुण्यात आले. या काळात युक्रांदच्या विवेक पुरंदरे या कार्यकर्त्यांशी परिचय झाला आणि माझ्या जोडीदाराचा प्रश्न मी सोडवला. त्याच्यामुळे माझी प्रसिद्ध विचारवंत प्रा. अ. भि. शहा, प्रा. मे. पुं. रेगे व राम बापट अशा माझ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांशी ओळख झाली आणि माझी पीएच.डी.ची वाट या लोकांच्या मार्गदर्शनामुळे सोपी झाली. डॉक्टरेट मिळवणारी कोपरगावातील व कर्मचारी वर्गामधली पहिली महिला ठरले. महाविद्यालयातील माझ्या सत्काराला गावातील लोक व विद्यार्थी यांनी उभे राहून दहा मिनिटे टाळ्यांचा गजर केला. माझ्यासाठी अगदी भारावून टाकणारा तो क्षण होता.
माझी शिक्षण क्षेत्रातली आवड व प्रगती बघून विवेकने पुण्यातली नोकरी सोडून कोपरगावला फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. विवेकमुळे डाव्या चळवळीतल्या लोकांचे जाणे-येणे वाढले. त्यांच्यामुळे माझ्या विचारांना प्रगल्भता आली. मलाही कोपरगावची ‘नस’ सापडली होती. मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी विद्यार्थिनींना घेऊन वाडय़ा-वस्त्यांवर ‘मुलगी झाली हो’चे प्रयोग केले. ८० साली कै. डॉ. अरुण लिमये यांनी डॉ. अब्राहम कोवूर यांचे शिष्य बी. प्रेमानंद यांच्या कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. सर्व जण माझ्याकडेच उतरले होते. हा त्यांचा दौरा कमालीचा यशस्वी झाला. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी असे यापूर्वी इथे काही घडले नव्हते. त्यामुळे मला आणखी हुरूप आला आणि मी संजय पवार यांच्या ‘मी मंजुश्री’ या चित्रप्रदर्शनाचे सेवा दलाच्या ‘सावळीविहीर’ येथल्या मुरुगकर मॅडम यांच्या सहकार्याने तालुकाभर प्रदर्शन भरवले. निळू फुले व राम नगरकर यांची विवेकशी चांगली मैत्री होती. आमचे व त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे बरेच होते. सामाजिक क्षेत्राविषयी त्यांचे विचार व कार्य प्रेरणा देणारे होते. त्यांनी फुले-आंबेडकर पदवीपरीक्षेचे कोपरगावचे काम माझ्यावर सोपवले होते व ते मी निवृत्त होईपर्यंत करीत राहिले. कै. नरेंद्र दाभोलकर यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा म्हणून विवेक वाहिनीचा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाच्या स्थापनेपासून मी तो निवृत्त होईपर्यंत यशस्वीपणे राबवू शकले. दाभोलकरांच्या कार्यात माझा अल्पसा का होईना वाटा आहे याचे मोठे समाधान आहे.
प्राध्यापिका होण्याची महत्त्वाकांक्षा होती. राज्य व राष्ट्रीय पातळींवरील चर्चासत्रात भाग घेण्याची तज्ज्ञ म्हणून शोधनिबंध सादर करण्याची संधी प्राध्यापिका असल्यानेच मिळाली. राज्य पातळीवरील निबंध स्पर्धेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा प्रथम पुरस्कार मिळाला. अनेक विद्यार्थ्यांना मानसिक आधार, समुपदेशन, पालकांशी सुसंवाद होण्यात मध्यस्थी यांसारख्या मानसिक समाधान देणाऱ्या गोष्टी केवळ कर्मवीरांच्या प्रेरणेने व रयत शिक्षण संस्थेने नोकरी करण्याची संधी दिल्यामुळे घडल्या.
काम करण्यातील आनंद वेळोवेळी मिळाला व असंख्य विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील खुशी व आपल्या थोडय़ाशा मदतीने त्यांच्या जीवनात आलेला आनंदही अनुभवायला मिळाला. कर्मवीरांपासून प्रेरणा घेतलेल्या या वळणावरून मी केलेला प्रवास हा मातीच्या पाऊलवाटेवरचा व खडबडीत असला तरी शहरातल्या गुळगुळीत रस्त्यांपेक्षा समाधान देणारा होता.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Turning point books turn life