डॉ. अंजली जोशी

वैचारिक स्वावलंबन ही नेतृत्वगुणासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची क्षमता. मात्र अनेकदा आईवडीलच मुलांसाठीचे निर्णय घेत असतात. त्यांनी कुठे, कोणतं शिक्षण घ्यायचं, इथपासून काय खायचं, काय घालायचं, इथपर्यंत. आईवडिलांसाठी त्यांनी मुलांना दिलेलं हे संरक्षक कवच असलं, तरी ते मुलांना वैचारिक पंगुत्व देतं. स्वनिर्णय घेता येत नसतील, तर त्यांच्या पुढच्या आयुष्यात काय घडू शकतं?..  

live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

‘‘सर..’’ मी घुटमळलो.

‘‘श्रेयस, तुला कितीदा सांगितलंय, मला सर म्हणू नकोस. फक्त सुश्रुत म्हण.’’  

‘‘हो. पुढल्या वेळेपासून सुधारीन.’’ मी चाचरत म्हणालो. सुश्रुत टीमलीडर आहे. त्याला एकेरी नावानं संबोधायला मन धजावायचं नाही. शेवटी तो बॉस आहे ना! त्याचा आत्मविश्वास मला नेहमीच अचंबित करायचा. तो स्वबळावर इथवर येऊन पोहोचला होता.

‘‘बोल, काय काम होतं तुझं?’’  त्यानं विचारलं. 

‘‘..’’ मला काय बोलावं तेच सुचेना. त्याला सर म्हटल्यानं तो माझ्यावर नाराज तर झाला नाही ना? आता बोलू की नको?

‘‘श्रेयस, अरे, बोल पटपट.’’ सुश्रुत माझ्याकडे रोखून बघत म्हणाला.

मला घाम फुटला. पण कसाबसा धीर गोळा करत मी म्हटलं, ‘‘मी हे विचारायला आलो होतो, की माझा परफॉरमन्स रिव्ह्यू तर चांगला आहे.. मग लीडरशिपच्या ट्रेनिंगसाठी माझी निवड का झाली नाही?’’ 

नुकतंच कंपनीतल्या सगळय़ांचं ‘परफॉरमन्स अप्रेझल’ झालं होतं. प्रत्येक डिपार्टमेंटच्या टीमलीडरनी त्यांच्या टीममधून ‘हाय परफॉरमन्स’ दाखवलेल्या कर्मचाऱ्यांची निवड केली होती. या कर्मचाऱ्यांना लीडरशिपचं फास्ट ट्रॅक ट्रेनिंग दिलं जाणार होतं. त्यांची प्रमोशन्स, ‘करिअर ग्रोथ’ झटपट होणार होती.  त्यांना मॅनेजमेंट रोल्स दिले जाणार होते. या ट्रेनिंगसाठी सुश्रुतनं माझी निवड न केल्याचं शल्य माझ्या मनात खुपत होतं. 

‘‘हं!’’ सुश्रुत खुर्चीत रेलून बसत म्हणाला. ‘‘आपली परफॉरमन्स रिव्ह्यूची मीटिंग झाली तेव्हा मी काय म्हणालो होतो ते आठवतं का? तुझी टेक्निकल स्किल्स चांगली आहेत. तू दिलेलं काम चोख करतोस. पण स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीस. तू सतत वरिष्ठांवर अवलंबून असतोस. छोटय़ा-मोठय़ा गोष्टींतही तुला वरिष्ठांच्या संमतीची गरज लागते. आपल्या एका क्लायंटने तातडीच्या सोल्युशन्ससाठी माझ्याशी संपर्क होत नव्हता म्हणून तुझ्याशी संपर्क साधला होता ते लक्षात आहे ना? तुला ते जमणारं होतं, पण तू माझ्या सूचनांची वाट पाहात बसलास आणि क्लायंट हातातून जायची वेळ आली होती.’’ मी मान हलवली.

‘‘श्रेयस, लक्षात ठेव, वैचारिक स्वावलंबन ही नेतृत्वगुणासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची क्षमता आहे. स्वतंत्र निर्णय घेण्याच्या अनेक संधी आयुष्यात येतात. तुला त्या साधता आल्या तर ही क्षमता तू विकसित करू शकशील. तसे प्रयत्न केलेस तर मी तुला आपणहून या ट्रेनिंगला पाठवीन. सगळे निर्णय इतरांवर अवलंबून ठेवलेस तर तू उत्तम नेता कसा होणार? मी सांगतो त्यात तथ्य वाटत असेल तर तूच आठवून बघ तुझ्या आयुष्यातले किती महत्त्वाचे निर्णय तू स्वत:हून घेतले आहेस? नसशील तर घ्यायला सुरुवात कर.’’

मी सुश्रुतच्या केबिनमधून बाहेर पडलो, पण त्याचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. मी आतापर्यंत कुठले निर्णय स्वत:हून घेतले आहेत? लहानपणी मी तबला शिकायचो. मी आठवायला लागलो.. स्वत:हून मला तबला आवडतो किंवा शिकायचा आहे, असं मी म्हटलं होतं का? पण काही केल्या मला ते आठवेना. हे मात्र चांगलं आठवतंय, की आईबाबा म्हणायचे, लहानपणी म्हणे मी टेबलावर ताल धरायचो. म्हणून त्यांनी ठरवलं की मला तबल्यात गती आहे. अर्थात मी त्यात फार प्रगती केली नाही, त्यामुळे ते आपोआप मागे पडलं. शाळेत असताना अ‍ॅबॅकस, वेदिक मॅथ्स, बुद्धिबळ, टेनिस, पोहणं अशा इतरही अनेक गोष्टी मी शिकलो होतो. त्यातली कुठलीही मला खास आवडायची किंवा मी स्वत:हून निवडली नव्हती. पण आईबाबा म्हणायचे, ‘‘तुझा सर्वागीण विकास व्हायला पाहिजे. त्यासाठी नवनवीन शिकत राहिलं पाहिजे.’’ अर्थात सर्वागीण विकास म्हणजे नक्की काय, तसा तो झाला का, किंवा यातल्या कशातही मी प्रावीण्य का मिळवू शकलो नाही, असले प्रश्न मला पडले नाहीत. कारण त्यांची उत्तरं आईबाबांना माहीत असतील, याची मला खात्री होती.

कित्येकदा सुट्टीच्या दिवशी लवकर उठून क्लासला जायला लागायचं तेव्हा मात्र मी कुरकुर करायचो. त्यावर आईबाबा म्हणायचे, ‘‘श्रेयस, अरे इतर मुलांना नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळत नाहीत. म्हणून नुसतं मोकाट खेळण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. आम्ही तुझ्यासाठी एवढं करतोय, तर तुला एवढीही कळ सोसता येत नाही?’’ ते म्हणतात म्हणजे ते बरोबरच असणार. मग यातल्या कुठल्या गोष्टीत आपल्याला रस आहे का नाही, याची उत्तरं कशाला शोधत बसायची? नाही म्हणायला फोटो काढणं मला मनापासून आवडायचं. कॅमेऱ्याचा कोन कसा पकडायचा, ‘बॅकग्राऊंड’ कुठून नीट दिसतं, चेहऱ्यावरचे भाव नेमके कसे टिपले पाहिजेत, याचं संशोधन मी करत बसायचो. ‘फोटोग्राफीचा क्लास करू का?’ असं मी बाबांना विचारलंही होतं. त्यावर बाबा म्हणाले, ‘‘त्याचा क्लास कशाला करायला पाहिजे? तुला फोटोग्राफर थोडंच व्हायचंय? ‘यूटय़ूब’वर बघून शीक काय शिकायचं ते.’’ बाबा म्हणतात त्यात तथ्य असलं पाहिजे. मी फोटोग्राफर थोडाच होणार होतो?  

मग मी कोण होणार होतो? वर्गात एकदा ‘मोठेपणी तुम्ही कोण होणार?’ या विषयावर निबंध लिहायला दिला होता. मला तेव्हा रेल्वेतल्या मोटरमनचं फार आकर्षण होतं. मी लिहिलं होतं, ‘मी मोठेपणी मोटरमन होणार.’ बाबांनी तो निबंध वाचला. ते ओरडले. ‘‘हे काय ध्येय झालं? अरे, आपण नेहमी उच्च ध्येय ठेवलं पाहिजे!’’ म्हणजे कुठलं ध्येय? हा प्रश्न मला पडला नाही. कारण आईबाबांनी माझं ध्येय ठरवलं असणार, याची मला खात्री होती. मी पुढे काय करायला हवं, याबाबत आठवीपासूनच आईबाबांचा काथ्याकूट चालला होता. मी त्यांच्या संभाषणात भाग घेत नसलो तरी ते कानांवर पडत असे. लवकरच त्यांनी ते जाहीरही केलं. ते होतं- नावाजलेल्या शिक्षणसंस्थेतून इंजिनीयर होणं. आईबाबा म्हणाले, ‘‘आम्हाला तुला शहराच्या बाहेर पाठवायचं नाही. तू डोळय़ांसमोर असलेला बरा!’’ आणि अर्थातच मलाही आईबाबांशिवाय राहणं झेपलं नसतं. कारण आईबाबा माझं सगळंच करतात. शाळा-कॉलेजला निघालो की बाबा दप्तर उचलायचे. आई ते आदल्या दिवशी भरून ठेवायची. अजूनही बाहेर निघालो, की बाबा बॅग हातात ठेवतात. पाण्याची बाटली देतात. कधी कधी सोडायलाही येतात. घरी आलं की आई गरम ताट वाढते. अंथरूण-पांघरूण तयार ठेवते. मला इकडची काडी तिकडेही करायला लागत नाही.

आईबाबांच्या मनात होता तसा चांगल्या शिक्षणसंस्थेत मला प्रवेश मिळाला. इंजिनीअरिंग करत असताना मला एका मार्केटिंग स्टार्ट-अपची कल्पना सुचली. दुकानांना प्रत्यक्ष भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या कशी वाढवता येईल, याचं एक मॉडेल मी आणि माझ्या मित्रानं बनवलं होतं. ते आईबाबांच्या उच्च ध्येयात बसणार नाही हे माहीत असूनही धीर करून मी विचारलं, तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘स्टार्ट-अप फार बेभरवशी असतात. हल्ली तर बहुतेक स्टार्ट-अप आपटतानाच दिसताहेत. त्यापेक्षा नोकरी कर. स्थिर उत्पन्न मिळेल.’’ आईबाबा माझ्या भल्यासाठीच सांगत आहेत हे माहीत असल्यामुळे मी तो विषय परत काढला नाही. आईबाबा सांगत होते, की इंजिनीअरिंगला कॉम्प्युटर सायन्स घे. पण मला ‘आयटी’मध्ये रस नव्हता. त्यामुळे मी सिव्हिल इंजिनीअरिंग निवडलं. आईबाबांच्या मनाविरुद्ध घेतलेला तो पहिलाच स्वतंत्र निर्णय होता. पण तो चुकीचा होता, हे माझ्या नंतर लक्षात आलं. कोअर इंजिनीअरिंग शाखेच्या मुलांना फारशा नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या आणि ज्या होत्या त्यात ‘आयटी’च्या तुलनेत फार कमी पगार होता. त्यामुळे इंजिनीअरिंग झाल्यावर कॉलेजमधून मला नोकरी मिळाली नाही.

आईबाबा सांगत राहिले, ‘‘बघ, आम्ही सांगितलं ते ऐकलं नाहीस. स्वत:च निर्णय घेतलास. आम्हाला जगाचा अनुभव आहे. आम्ही म्हणत होतो ती शाखा निवडली असतीस तर ही वेळ आली नसती!’’ ते म्हणत होते ते बरोबर होतं. मोठी, अनुभवी माणसंच योग्य निर्णय घेतात. आईबाबांना ठरवू दे पुढे काय करायचं ते! मी कशाला डोक्याला ताप करून घेऊ? नुसतं ध्येयच नाही, तर माझ्यासाठी चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य काय आहे, हेही आईबाबाबांनी आधीच आखून दिलं होतं. मग मी ठरवूनच टाकलं की प्रश्न विचारायचे नाहीत. मोठय़ा माणसांनी उत्तरं शोधलेलीच असतात. ती निमूटपणे स्वीकारायची. मग मी आईबाबांच्या सल्ल्यानुसारच ‘आयटी’चे कोर्सेस केले. बाबांनी मग त्यांच्या ओळखीनं या कंपनीत नोकरी लावून दिली.

ऑफिसमधून घरी परतलो तरी विचारांत हरवलो होतो. निर्णय घेण्याची वेळच आजवर माझ्यावर आली नव्हती किंवा येऊनही मी तिच्याकडे कानाडोळा करत होतो. आईबाबा ते काम माझ्यासाठी करत होते. स्वतंत्र विचारशक्ती वापरणं मी बंद केलं होतं. सुश्रुत म्हणत होता ते बरोबर होतं. पहिलं पाऊल उचलण्याची वेळ येऊन ठेपली होती.   

‘‘विचारलंस का ट्रेनिंगला निवड का झाली नाही म्हणून?’’ बाबांच्या प्रश्नानं माझी तंद्री भंग पावली. सुश्रुतला जाऊन विचारण्यासाठी बाबांनीच सुचवलं होतं.

‘‘स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली की निवड करतील, असं म्हणाले.’’ 

‘‘अरे तू सांगितलं नाहीस का त्यांना, की घरात तुला किती निर्णय-स्वातंत्र्य आहे ते! जेवायला काय करायचं यासाठीही तुझाच निर्णय विचारात घेतला जातो. आवडीच्या पदार्थाची फर्माईश तूच करतोस ना? कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं किंवा कुठले कपडे हवेत हे तूच ठरवतोस ना?’’ आई म्हणाली. सुश्रुत म्हणाला होता, की ‘मी फुटकळ निर्णयांबाबत बोलत नाही. मला अभिप्रेत आहेत ते महत्त्वाचे निर्णय! आयुष्याचे निर्णय. ते तुला स्वतंत्रपणे घेता येतात का?’’    

‘‘श्रेयस, ज्यांच्या ओळखीनं नोकरी लागली त्यांच्याशी मी बोलून घेतो. त्यांनी तुझं नाव सुचवलं तर ट्रेनिंगसाठी तुझी निवड होऊ शकेल.’’ बाबा म्हणाले.  ‘‘नको.’’ मी उत्स्फूर्तपणे म्हणालो. ‘‘आईबाबा, तुम्ही आतापर्यंत सगळंच मांडून दिलंत. यापुढे तसं करू नका. आता मी स्वत:च्या पायावर उभा आहे. हा निर्णय मला स्वतंत्रपणे घेऊ द्या. मला वैचारिक स्वावलंबन अंगात बाणवायचं आहे. स्वत:वर विसंबून राहायला शिकायचं आहे. ते शिकताना कदाचित माझे काही निर्णय चुकतीलही. पण त्या चुकांची जबाबदारी घेणं आणि त्यातून पुढे जाणंही मला शिकायचं आहे. अतिसुरक्षित वातावरणामुळे आलेलं वैचारिक पंगुत्व मला झटकून टाकायचं आहे.’’ आईबाबा चकित होऊन माझ्याकडे पाहत राहिले..