शिष्यवृत्ती ठरली संजीवनी

जेव्हा आकाशात एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण सीमेबाहेर जाईपर्यंतच सगळा संघर्ष असतो. मात्र एकदा का त्याने स्वत:ची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप सुकर होतो. असंच माणसाचं आहे..

जेव्हा आकाशात एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण सीमेबाहेर  जाईपर्यंतच सगळा संघर्ष असतो. मात्र  एकदा का त्याने स्वत:ची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप सुकर होतो. असंच माणसाचं आहे..
जून १९७२ ला अकरावी (मॅट्रिक) पास झाले. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक. वडील सोनार काम करीत होते. १९७२-७३ चा तो भीषण दुष्काळ. अन्न-पाणी मिळविण्यासाठी जिथं दररोजची धडपड, तिथं सोन्याचे दागिने बनविण्याचा विचार तरी कोण करणार? एक पैशाचंही काम वडिलांना मिळत नव्हतं, त्यातून दहा माणसांचं कुटुंब चालवायचं. जमा केलेल्या थोडय़ाफार पुंजीवरच घर चालवावं लागे.
  रेशन दुकानासमोर तासन्तास रांगेत उभे राहू तेव्हा कुठे मिलो (लाल ज्वारी) मिळत असे. ज्वारीच्या भाकरीसोबत अगदी कमी तेलातील कुठली तरी स्वस्तात मिळणारी भाजी किंवा मिरचीच्या पाण्याबरोबर भाकरी खाऊन त्या वेळी आमच्याप्रमाणे बरेच लोक दिवस काढत होते. जेवणावरही रेशनिंग. प्रत्येकाला दिवसातून एकच भाकरी मिळे.
पाण्याचं दुर्भिक्ष तर विचारूच नका. सर्व नद्या, तलाव, विहिरी आटलेल्या. नदीमध्ये झरे खणून, वाटीने पाणी काढून हंडे भरावयाचे. ते पाणी वापरण्यासाठी. पिण्याचं पाणी, सरकारी नळावर, तेही आठवडय़ातून एकदाच मिळे. नळाला पाणी केव्हा येईल सांगता येत नसे. म्हणून दिवस-दिवस रांगेत उभे राहून पाण्याची वाट पाहत बसणं एवढंच हातात असे.
अन्नपाण्यासाठी रात्रंदिवस झटणं चालू असताना पुढील शिक्षणाचं स्वप्न तरी कसं पाहणार? परंतु शिक्षणाची जबरदस्त ओढ शांत बसू देईना. विज्ञान शाखेची आवड; परंतु खर्च तरी कसा परवडणार? त्या वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले माझे मोठे बंधू. त्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या अथक प्रयत्नाने ‘राष्ट्रीय कर्जाऊ शिष्यवृत्ती’ मला मंजूर झाली. दरमहा ६० रुपयेप्रमाणे पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मला मिळत होती. तोच माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला.
मालेगाव (जि. नाशिक) येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पुस्तकं घेणं परवडत नव्हतं. वाचनालयात जाऊन नोट्स काढणं (सकाळी ८ ते ११) त्यानंतर १० ते ५ कॉलेज असा दिनक्रम सुरू झाला. त्या वेळी वाहनांची जास्त सोय नव्हती. त्याचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी माझ्याप्रमाणेच ४-५ कि.मी. अंतर कॉलेजात पायीच जात होते.
दरवर्षी फर्स्ट क्लास मिळविण्याच्या अटीमुळे शिष्यवृत्ती, पदवीपर्यंत (बी.एससी.) मिळत होती. पुढे बी.एड. पूर्ण करून रामचंद्र हिराजी सावे विद्यालय, तारापूर येथे विज्ञान शिक्षिका होते. गेल्याच वर्षी मी निवृत्त झाले. शिक्षकी पेशात असल्यामुळे कर्जाऊ शिष्यवृत्ती माफ झाली.
भारत सरकारने दिलेली ‘राष्ट्रीय कर्जाऊ शिष्यवृत्ती’ माझ्या आयुष्यातील ‘टर्निग पॉइंट’ ठरली. म्हणून मी सरकारचे आभार मानते. सदैव ऋणी राहून माझ्यासारख्या गरजू व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
समाजात विशिष्ट पदवी गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा का अपेक्षित पदवीपर्यंत, उंचीपर्यंत पोहोचलात की आयुष्याच्या अनेक समस्या ती पदवी, उंचीच सोडविते. हेच खरं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Turning point scholarship helped out

ताज्या बातम्या