हे सदर लिहिण्यासाठी या सगळ्याच स्त्रियांशी बोलताना मला एक महत्त्वाची बाब जाणवली ती म्हणजे त्या आपली सामाजिक बांधिलकी जपून असतात. कारखान्यात जास्तीत जास्त स्त्रियांना रोजगार देतात; आसपासच्या स्त्रियांना घरगुती स्वरूपात कामकाज पुरवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलतात. त्यामुळेच स्त्री शिकली आणि प्रगती झाली या वाक्प्रचाराला एक नवा आयाम देत स्त्री उद्योजिका झाली आणि समाजाला पुढे घेऊन गेलीम्हणणं जास्त योग्य होईल असं वाटायला लागलं.

माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना माहीतेय की मला दर आठवडय़ाला एक याप्रमाणे नवनवीन व्यवसायाच्या कल्पना सुचत असतात. पण त्या कल्पना नुसत्या मांडण्यापलीकडे मी काही करत नाही. कल्पना विकायचाच एखादा व्यवसाय सुरू करावा अशी कल्पनाही माझ्या डोक्यात अनेकदा येऊन गेलीय! त्यामुळे ‘उद्योगभरारी’ हे स्त्री उद्योजिकांच्या मुलाखतीचे सदर मला लिहायला मिळावं म्हणजे आनंदाची पर्वणीच. पण तरीही गेल्या  वर्षी जेव्हा ‘चतुरंग’कडून हा प्रस्ताव आला तेव्हा ‘नाही शक्य होणार’ असा विचार आलाच. एकतर माझ्याकडे इतकं सलग काही लिहिण्याचा अनुभव नव्हता. त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्त्री उद्योजिकांशी ओळखीही नव्हत्या. बराच विचार केला; एकदा वाटलं, एक वर्षांची जबाबदारी आपल्याला पेलणार नाही. पण आईबाबा, नवरा आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनीही ही जबाबदारीची पण आव्हानात्मक संधी न सोडण्याचा सल्ला दिला आणि मी या वाटेवर पाऊल ठेवलं.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

हे लिखाण कठीण वाटलं का तर हो. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलाखतीसाठी उद्योजिकांचा शोध घेणं जरा कठीण होतं. आपल्या आसपास पाहिलं तर अनेक स्त्रिया घरगुती स्वरूपात उद्योग करत असतात. पण जसजसा विचार करत गेले तसं जाणवलं की आसपास दिसणाऱ्या अनेक स्त्रिया फक्त घरातली पैशांची नड भागवण्यासाठी काहीतरी करायचा विचार करतात. ‘मला व्यवसाय करायचाच आहे.’ या ध्येयाने काम सुरू करणाऱ्या अगदी कमी. त्यातूनही स्वत:चा उद्योग सुरू करायचा म्हटलं की खाद्यपदार्थ, पापड, मसाले असे पदार्थ करणे, भाज्या विकणे, पोळीभाजी केंद्र, कपडे शिवणे/विकणे अशा पारंपरिक पर्यायांचाच स्त्रिया विचार करतात, असं आढळलं. मला या सगळ्यातून बाहेर येऊन वेगळा विचार करणाऱ्या उद्योजिका शोधायच्या होत्या. स्त्रियांनी आजूबाजूला नीट पाहिलं तर व्यवसायाच्या अनेक संधी त्यांना खुणावतील, त्यांनी त्या संधीचं सोन्यात रूपांतर करावं, असं मला मनापासून वाटलं. त्यातूनच पहिलाच लेख सोलापूरच्या ‘उद्योगवर्धिनी’वर घ्यावा असं वाटलं कारण ‘उद्योगवर्धिनी’ स्त्रियांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी सल्ला, मदत आणि आधारही देते. याच माझ्या शोधातून चप्पल कारखाना, पार्लर सामानाचे दुकान, कृषीकेंद्र, बांधकाम व्यवसाय चालवणाऱ्या, दागिने, फर्निचर, युनिफॉर्म, कपडे, आकाशकंदील, प्लास्टिक वस्तू, फायबरच्या वस्तू, कापडी छत, कोअर शूटिंग मशीन्स, एलईडी दिवे, पेपर टय़ूब, हातमोजे इत्यादी विविध उत्पादन करणाऱ्या, प्रयोगशाळा उभारून टेस्टिंग करणाऱ्या अशा असंख्य व्यावसायिक स्त्रियांशी ओळखी झाल्या आणि त्यांचं आभाळाएवढं मोठं यश मी हजार शब्दांच्या मर्यादेत मांडण्याचा प्रयत्न केला.

असे वेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया शोधणं तसं अवघड गेलं. सहसा व्यावसायिक पुरुष आपल्या व्यवसायाची, आपल्या नावाची जाहिरात करतात आणि अर्थातच ते खूप महत्त्वाचं आहे. जाहिरात केल्याशिवाय तुमचं उत्पादन विकलं जाणारच नाही. पण मी अशा अनेक स्त्री उद्योजिका पाहिल्या ज्या केवळ मौखिक प्रसिद्धीवर किंवा संपर्कातून व्यवसाय करतात. त्यांचे व्यवसायही खूप मोठे आहेत, पण तरीही त्यांच्या व्यवसायाबद्दल कुठलीच माहिती आंतरजालावर  उपलब्ध नाही, त्या स्त्रियांची नावंही आंतरजालावर मिळत नाहीत. आजच्या युगात जिथे सगळ्याच गोष्टी आंतरजालावर शोधता येतात, इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ जवळ आली आहे अशा वेळी स्त्रियांनी यात मागे असणं मला फार चकित करून गेलं आणि याच कारणामुळे अनेकजणींपर्यंत मी पोहोचूच शकले नसेन असंही वाटलं.

पहिले दोन-तीन लेख लिहिल्यानंतर अनेक जणांनी मला विचारलं की या स्त्रियांच्या नवऱ्याबद्दल, सासू-सासऱ्यांबद्दल तू काहीच का लिहीत नाहीयेस? त्या कसं मुलांकडे, घराकडे व्यवस्थित लक्ष देऊन व्यवसाय करतात हेपण का लिहीत नाहीयेस? खरं सांगायचं तर हा प्रश्न विचारल्याचा मला मनापासून आनंद झाला. गेली अनेक र्वष मनात खुपत असलेली एक बाब त्यानिमित्ताने बोलता आली. जेव्हा यशस्वी पुरुषांच्या मुलाखती वाचते/ऐकते त्या वेळी मुलाखतकार कधीच त्याला हे प्रश्न विचारत नाहीत की बाबा तुझी बायको काय म्हणते, मग घरातलं रोजचं काम तू कसं करतोस, किंवा मुलांना कसं सांभाळतोस वगैरे. मग स्त्री जेव्हा उद्योजिका, यशस्वी होते तेव्हा तिला तरी हे प्रश्न का विचारावेत? हे प्रश्न विचारून या सगळ्या जबाबदाऱ्या स्त्रीच्याच आहेत, असं आपण अप्रत्यक्षपणे मान्य नाही का करत? जेव्हा अशी मुलाखत एखादी स्त्री वाचते तेव्हा तिलाही असंच वाटतं असेल की व्यवसाय करायचा तरी घरातलं आवरून फावल्या वेळेत करावा किंवा सगळं सगळं एकहाती करणारी ‘सुपर वुमन’ व्हावं. म्हणूनच ही परंपरा तोडत मी घरादाराचे प्रश्न विचारले नाहीत. जेव्हा कुणी उद्योजिका स्वत:हून त्याचा उल्लेख करते तेव्हा नक्कीच लिहिले, मात्र मुख्य महत्त्व तिच्या व्यावसायिक यशाला राहील याचीही काळजी घेतली.

या सगळ्याच स्त्रियांशी बोलताना मला एक महत्त्वाची बाब जाणवली. या व्यावसायिक स्त्रिया व्यवसाय करतानाही आपली सामाजिक बांधिलकी जपून असतात. त्या कायम त्यांच्यासारख्याच दुसऱ्या स्त्रियांचा विचार करतात. कारखान्यात जास्तीत जास्त स्त्रियांना रोजगार देतात; आसपासच्या स्त्रियांना घरगुती स्वरूपात कामकाज पुरवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलतात. त्यामुळेच स्त्री शिकली आणि प्रगती झाली या घासून गुळगुळीत झालेल्या वाक्प्रचाराला एक नवा आयाम देत ‘स्त्री उद्योजिका झाली आणि समाजाला पुढे घेऊन गेली’ म्हणणं जास्त योग्य होईल असं वाटायला लागलं. यातल्या अनेक उद्योजिकांनी आपल्या गावातल्या स्त्रियांना रोजगार पुरवला आहे. जितका वेळ उपलब्ध असेल त्यानुसार घरूनच काम करायचा पर्याय त्यांच्यापुढे ठेवला आहे आणि त्यामुळे त्या गावातल्या स्त्रियांचं आयुष्यही बदललं आहे. ज्या स्त्रिया शेती आणि स्वयंपाकघरात अडकून पडल्या होत्या त्या आता उरलेल्या वेळात घरून काम करून रोजगार मिळवतात, आपल्या पायावर उभं राहून मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतात. त्यातूनच आणखी काही स्त्री उद्योजिकाही नव्याने उभ्या राहतात. ‘ज्योतसे ज्योत जलाते चलो’सारखं हे एक व्यवसायाचं, स्वत:च्या पायावर उभं राहायचं वाण एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे पोचत होतं.

या लेखमालिकेमुळे मला अनेक लोकांचे ई-मेल आले. कधी लेख आवडले हे सांगायला, तर कधी व्यवसायाबद्दल चौकशी करण्यासाठी. अनेक लोकांचे दूरध्वनी आले. हे सगळं माझ्यासाठी अगदी नवीन होतं आणि त्यामुळे खूप छान वाटलं. अशा पोचपावतीमुळे लिहायचा हुरूप वाढला आणि त्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद. बहुतेक ई-मेल्सना मी उत्तर दिलंय, पण क्वचित एखादं राहूनही गेलं असेल तर क्षमस्व. सगळ्या उद्योजिका, ज्यांनी माझ्याशी आधीपासून ओळख नसतानाही खुलेपणाने गप्पा मारल्या, आपल्या व्यवसायाचं गमक मला सांगितलं त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन.

आता सगळ्यात शेवटी एक ‘मन की बात’. या लेखमालिकेमुळे मला स्वत:ला काय मिळालं? अनेक र्वष सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून नोकरी करतानाही स्वत:चा सॉफ्टवेअरपेक्षा वेगळा व्यवसाय उभारावा असं स्वप्न गेलं सात-आठ र्वष मी पाहात होते. एखाद दोन अयशस्वी प्रयोगही करून झालेत. मग मागच्याच वर्षी मात्र सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यवसाय करायचा विचार सुरू केला. हे लेख आणि ते काम असं दोन्ही एकत्र सुरू झालं. या स्त्री उद्योजिकांशी बोलताना मला अनेक अनुभवाच्या गोष्टी ऐकता आल्या, त्यांची झोकून काम करण्याची वृत्ती पाहता आली आणि खूप काही नवीन शिकता आलं. त्यातलं शक्य तेवढं तुमच्यापर्यंत पोचवलं, मात्र त्याहूनही अधिक काही मला स्वत:ला मिळालं आणि माझ्या चुकाही कळल्या. कुठलाही व्यवसाय करायचा तर जोखीम घ्यायलाच हवी हे जाणवलं. हातात काहीच नसताना मोठी स्वप्नं पाहून, कर्ज काढून उद्योग उभारणाऱ्या या स्त्रियांचं मला फार कौतुक वाटतं. दुर्दैवाने निर्णय चुकलाच तर आयुष्य होरपळून निघणार हे कळत असून निर्णयावर ठाम राहून, यशाच्या दिशेने घोडदौड करण्याचं कर्मकठीण काम या उद्योजिका करतात हे मला जाणवलं. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आज मी ही भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. ही उद्योगभरारी मी नक्कीच घेऊ  शकेन, असा विश्वास मनात आहे आणि या उद्योजिकांनी दाखवलेलं आभाळ समोर आव्हान देतंय.

swapnalim@gmail.com

(सदर समाप्त)