प्रयोगांची भरारी

आपटे यांनी ‘अ‍ॅप्ट टेस्टिंग अँड रिसर्च प्रा. लि.’ नावाने कंपनी नोंदणीकृत केली.

डॉ. किशोरी आपटे यांच्या ‘अ‍ॅप्ट टेस्टिंग अँड रिसर्च प्रा.लि.’ या कंपनीमध्ये औषधं बाजारात आणण्यापूर्वी प्राण्यांवरच्या चाचण्या पार पाडल्या जातात. प्री क्लिनिकल टेस्टिंग आणि इको-टॉक्सिसिटी टेस्टिंग करणाऱ्या या ८०० चौ. फू . जागेत सुरू झालेल्या लॅबने आता ६००० चौ. फू. जागा व्यापली आहे. आज देशा-परदेशात त्यांच्या लॅबमध्ये केलेल्या चाचण्या आणि त्यांचे अहवाल प्रमाण मानले जातात. सध्या डॉ. किशोरी विविध वनौषधींवर क्लिनिकल चाचण्या घेत असून ती औषधं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात विक्रीसाठी आणायची आहेत.

आपण सगळेच औषधं कधी ना कधी वापरतो. ती औषधं माणसांनी वापरण्यायोग्य आहेत की नाही हे ठरवण्यासाठी त्यावर अनेक चाचण्या केल्या जातात हेही आपण ऐकलेलं असतं. सुरुवातीला प्राण्यांवर चाचण्या केल्या जातात, त्यांना प्री क्लिनिकल चाचण्या असं म्हटलं जातं. त्यात काही दुष्परिणाम आढळले नाहीत आणि औषध योग्य प्रकारे काम करताना दिसलं की मगच अनेक परवानग्या वगैरे घेऊन मानवावर त्यांच्या चाचण्या घेतल्या जातात. तिथेही चांगले परिणाम आढळले तर मग ते औषध बाजारात विक्रीसाठी आणायची पुढची प्रक्रिया पार पाडता येते. माणसाचं आरोग्य चांगलं राखण्याच्या या प्रक्रियेत प्राण्यांवरच्या चाचण्यांना खूपच महत्त्व आहे.

डॉ. किशोरी आपटे यांच्या ‘अ‍ॅप्ट टेस्टिंग अँड रिसर्च प्रा.लि.’ या कंपनीमध्ये अशा प्रकारच्या प्राण्यांवरच्या चाचण्या पार पाडल्या जातात.

१९८३ मध्ये एमएस्सी पूर्ण केल्यानंतर किशोरी यांनी या टेस्टिंग क्षेत्रात नोकरी करायला सुरुवात केली. सुमारे दहा र्वष त्या तिथे त्यांचे प्रोफेसर एम. बी. भिडे यांच्यासोबत काम करत होत्या. त्याच दरम्यान १९९२ मध्ये त्यांनी आपली पीएच.डी. पूर्ण केली. मात्र

प्रो. भिडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि स्वत:चं काम सुरू करायचं ठरवलं. या क्षेत्रातला दांडगा अनुभव असल्यामुळे अशा प्रकारची टेस्टिंग लॅब सुरू करायचं त्यांच्या मनात होतं. सुरुवातीला फारसा पैसा जवळ नव्हता आणि अशा याप्रकारच्या लॅबसाठी बँकेकडून कर्ज मिळणंही दुरापास्त होतं. त्यामुळे त्यांनी नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांच्याकडून पैसे जमवले. १९९३ मध्ये छोटी जागा घेऊन आठशे चौरस फुटांच्या जागेत ‘नॅशनल टॉक्सिकोलॉजी सेंटर’ या नावाने डॉ. किशोरी आपटे यांची लॅब सुरू झाली.

सुरुवातीला लॅबमध्ये सगळीच कामं त्या एकटय़ाच करत होत्या. सोबत छोटीमोठी कामं करायला फक्त मदतनीस. स्वत:च क्लाएंटकडे जाऊन काम घेऊन यायचं, चाचण्या घ्यायच्या, त्या पार पाडल्या की त्याचे रिपोर्ट पोचवून यायचं असं सगळं एकहाती कारभार होता. हळूहळू बाहेरचे ग्राहक वाढले आणि लॅबमध्ये लोकही वाढले. आज सुमारे २५ जण त्यांच्याकडे काम करतात आणि लॅबचा पसारा सहा हजार चौरस फुटांवर गेला आहे. या सगळ्या चाचण्यांसाठी हजारो पांढरे उंदीर, अनेक ससे आदी प्राणी लागतात. या सगळ्या प्राण्यांना स्वच्छ आणि चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी चांगल्या सोयी तयार कराव्या लागतात. त्या प्राण्यांची काळजी घ्यावी लागते. डॉ आपटे यांच्या लॅबमध्ये ही सगळी काळजी व्यवस्थित प्रकारे घेतली जाते त्यामुळे त्यांच्या ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास बसला आहे. शिवाय प्रत्यक्ष प्राण्यांवर चाचणी घेण्याआधी इन-व्ह्रिटो म्हणजे पेशींवरही चाचणी घेतली जाते. त्यामुळे काही दुष्परिणाम असतील तर आधीच लक्षात येतं. अशी इन-व्ह्रिटो चाचणी घेण्याची सोयही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आता परदेशातूनही काही कंपन्या त्यांच्याकडे चाचण्या घेण्यासाठी येत असतात. कंपनी सुरू केल्यावर काही वर्षांतच हा पसारा वाढल्यावर कंपनी प्रोप्रायटरी असेल तर सगळ्या गोष्टी फक्त आपल्यावर अवलंबून राहतात, आपण नसू तर कंपनी चालणार नाही असा विचार करून डॉ. आपटे यांनी ‘अ‍ॅप्ट टेस्टिंग अँड रिसर्च प्रा. लि.’ नावाने कंपनी नोंदणीकृत केली.

आता ‘अ‍ॅप्ट’मध्ये प्री-क्लिनिकल टेस्टिंग होतं, शिवाय इको-टॉक्सिसिटी टेस्टिंग (म्हणजेच विविध औषधं आणि रसायनं यांचे पर्यावरणावर होणारे परिमाण मोजणं) केलं जातं. कीटकनाशक औषधं किंवा इतर रसायनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांचा पर्यावरणावर काय हानिकारक परिणाम होतो यांच्या चाचण्या केल्या जातात. मासे, माती, विशिष्ट प्रकारचं शेवाळं, कोंबडय़ा, कबुतर, झाडं यांच्यावर चाचण्या घेतल्या जातात. या सगळ्याच चाचण्या Organization for Economic Cooperation and Development (OECD) ने आखून दिल्याप्रमाणे करायच्या असतात. एखादं उत्पादन या गाइडलाइन्सच्या मान्यतेप्रमाणे असेल तर अनेक देशांत ते विक्रीयोग्य असते. त्याचप्रमाणे औषधांना Food and Drug Administration (FDA) ची मान्यता असणं जरुरी असतं. ‘अ‍ॅप्ट’ लॅब ही या दोन्ही संस्थांकडून मान्यताप्राप्त झालेली लॅब आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांचं आणि एकूण कामकाजाचं प्रमाणीकरण व्हावं म्हणून डॉ. आपटे यांनी आयएसओ ९००१ आणि करड ISO 17025 for ISO 10993, CPCSEA मान्यताप्राप्त ही प्रमाणपत्रही प्राप्त केली आहेत. या मान्यता मिळवताना प्राण्यांना त्रास दिला जात नाही, त्यांची योग्य निगा राखली जाते का अशा गोष्टीही पाहिल्या जातात. त्यामुळे ‘अ‍ॅप्ट’ लॅब मधले टेस्टिंग रिपोर्ट हे गुणवत्तेची खात्री असणारे आणि योग्य असतात याची त्यांच्या ग्राहकांनाही खात्री आहे.

या सगळ्या कामात त्यांना त्यांच्या आईकडून नेहमी प्रोत्साहन मिळालं आणि अजूनही मिळत असतं. त्यांची आई मेजर डॉ. उषा आपटे या सैन्यात डॉक्टर होत्या आणि वडील लेफ्टनंट कर्नल होते. घरातल्या सैनिकी वातावरणामुळे शिस्त आणि नैतिकता त्यांच्या अंगातच भिनलेली आहे आणि ती त्यांच्या कामातही दिसून येते. त्यांच्या व्यवसायासाठीसुद्धा त्यांच्या आर्मीतल्या मित्रपरिवाराने, ज्यांना त्या आपल्या परिवारातलेच मानतात अशांनी खूप मदत केली. लग्न न करता राहिल्यामुळे कुठल्याच सांसारिक जाबाबदाऱ्या नाहीत आणि त्यामुळे आपण झोकून देऊन या विषयासाठी काम करू शकतो, असं त्या म्हणतात.

डॉ. आपटे यांनी नोकरी करता करता स्वत:चे शिक्षण पूर्ण केलं. त्या काळात चांगल्या सोयी असलेल्या लॅबमध्ये संशोधन करायला मिळणं फार कठीण होतं. त्या सगळ्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना त्यांच्या पीएच.डी.साठी संशोधन करायला प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने २००६ मध्ये ‘अ‍ॅप्ट’ रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली. या रिसर्च फाऊंडेशनमुळे विद्यार्थ्यांना एक अतिशय चांगली आणि सोयीची प्रयोगशाळा उपलब्ध झाली. डॉ. आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत चार जणांना पीएच.डी. प्राप्त झाली असून आणखी तीन जणांचं संशोधन अखेरच्या टप्प्यात आहे.

या रिसर्च फाऊंडेशनमध्ये डॉ. आपटे विविध झाडांवर संशोधन करत आहेत. काही वेळा एखाद्या खेडय़ात कुठला तरी पाला, कशावर वापरला जातो याची मौखिक माहिती असते. स्थानिक लोक ती वनौषधी बऱ्याचदा वापरात. मात्र अशा वनौषधीवर कुठल्याच चाचण्या झालेल्या नसल्याने खात्रीपूर्वक औषध म्हणून विकता येत नाहीत. अशा माहितीच्या आधारे डॉ. आपटे संशोधन करतात आणि विविध वनस्पतींचे गुणधर्म शोधून काढतात. या वनस्पतींच्या अर्काच्या आधी इन-व्ह्रिटो चाचण्या आणि नंतर प्री क्लिनिकल चाचण्या घेतल्या जातात. आतापर्यंत त्यांनी वजन घटवण्याचं औषध, मधुमेह, जखम लवकर बरी करणारं औषध, कर्करोगावर नियंत्रण आणणारं औषध यावर अनेक यशस्वी प्री क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत. पुढे जाऊन क्लिनिकल ट्रायल म्हणजे मानवावर चाचण्या घेऊन मग ती औषधं बाजारात आणायचा त्यांचा विचार आहेच. मात्र क्लिनिकल ट्रायल या प्रचंड महाग असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतोय. यातली काही औषधं माहितीतल्या लोकांना, डॉक्टरच्या निगराणीखाली देऊनही झाली आहेत, त्यांना फायदा झालेला दिसला आहे. मात्र त्या नोंदी क्लिनिकल टेस्टिंगसाठी पुरेशा नाहीत. निसर्गानं आपल्याला खूप काही दिलं आहे, पण अजून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती नाहीत. त्यातल्या काही औषधी जरी आपल्याला माहिती झाल्या तर खूप फायदा होईल असं त्यांना वाटतं त्यामुळे अशा वनौषधी चाचण्या त्या घेत असतात. अशा चाचण्या घेऊन त्यांची महागडी औषधं करून विकणं आणि खोऱ्यानं पैसा मिळवणं असा त्यांचा दृष्टिकोन नाही. केवळ पैसे मिळवण्यापेक्षा मानवाला उपयुक्त काही तरी शोधून काढून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी ते वापरता यावं अशी त्यांची धारणा आहे. आणखी एखाद् दोन वर्षांत ‘अ‍ॅप्ट रिसर्च फाऊंडेशन’ नक्कीच एखादी उपयोगी वनौषधी परवडणाऱ्या दरात आपल्यासाठी घेऊन येईल हे नक्की.

उद्दिष्ट

लॅबसाठी जीएलपी (गुड लॅब्रोटरी प्रॅक्टीस) हे प्रमाणपत्र मिळवायचं आहे त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या पात्रता अटी पूर्ण करायच्या आहेत. शिवाय वनौषधींवर क्लिनिकल चाचण्या घेऊन ती औषधं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात बाजारात विक्रीसाठी आणायची आहेत.

सल्ला

व्यवसायात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. प्रामाणिकपणे कष्ट केलेत तर नक्की यश मिळणार. त्याशिवाय मुलींनी केवळ लग्न हीच आयुष्याची इतिकर्तव्यता मानू नये. लग्न नाही केलं तरी यशस्वी आणि परिपूर्ण जीवन जगता येतं. त्यामुळे स्वत:च्या पायावर उभं राहणं, सगळ्यात महत्त्वाचं आहे.

 

किशोरी आपटे, पुणे अ‍ॅप्ट टेस्टग अ‍ॅन्ड रिसर्च प्रा. लि. पुणे

ntc-apt.com 

ntcpune@gmail.com 

(०२०)६५३३९२३३  

swapnalim@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The success story of kishor apte

ताज्या बातम्या