ते र्वष २०१० असावं!  ‘मी मराठी’ने वाहिनीतर्फे ‘छोटय़ांसाठी एक गाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. साधारण सहा-सात वर्षांपासून पंधरा वर्षांपर्यंतची मुलं-मुली होती त्यात! आरे कॉलनी (गोरेगाव) परिसरात एका स्टुडिओत त्याचं शूटिंग होतं. मुलांना मार्गदर्शन करायला संगीत-दिग्दर्शक मिलिंद जोशी होते. परीक्षक म्हणून मी आणि प्रसिद्ध कवी संदीप खरे होतो आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले करीत होते. ही स्पर्धा १२ एपिसोडमध्येच पूर्ण होणार होती. प्रत्येक एपिसोडमध्ये वीस-बावीस मिनिटांची स्पर्धा आणि शेवटची पाच मिनिटे वाहिनीने, अपंग, मतिमंद किंवा दुर्धर आजार असलेल्या एखाद्या मुलामुलीला, गाणं म्हणायला किंवा नृत्य करायला दिली होती. ते स्पर्धक नव्हते, पण एक सामाजिक बांधिलकी आणि प्रोत्साहन म्हणून अशा मुलांना ‘मी मराठी’ने रंगमंच उपलब्ध करून दिला होता. स्तुत्य उपक्रम होता तो! कार्यक्रमाचं शीर्षक होतं, ‘छोटय़ांची धमाल, सुरांची कमाल’. सकाळी दहापासून ते रात्री दहा/ अकरापर्यंत शूटिंग चालायचं. पाच दिवसात शूटिंग आटपायचे असल्याने दररोज दोन/ तीन एपिसोडचं शूटिंग होई. मेकअप करायला, कपडे बदलायला, मुलामुलींना वेगवेगळ्या पण कॉमन रुम्स दिल्या होत्या. त्यांच्या आणि त्यांच्या पालकांची खाण्यापिण्याची व्यवस्थाही ‘मी मराठी’च करत होती. माझ्यासाठी, संदीप खरे व प्रशांत दामले यांच्यासाठी स्वतंत्र एसी रुम्स होत्या.

शूटिंगचा पहिला दिवस पार पडला. दुसऱ्या दिवशीचे पहिल्या एपिसोडचे शूटिंग संपले आणि मी माझ्या खोलीत आले. बघते तर, पलंगावर एक दहा/ बारा वर्षांची मुलगी झोपलेली आणि तिची आई खुर्चीवर बसलेली. जरा नाराजीतच मी त्यांना विचारलं, ‘‘कोण तुम्ही? आणि इथे काय करताय?’’ त्यावर त्या बाई शांतपणे म्हणाल्या, ‘‘ही झोपलेली माझी मुलगी संगीता, पुढच्या एपिसोडमध्ये तिचं शूटिंग आहे. रक्ताचा कर्करोग झालाय तिला, प्रवास करून आल्यामुळे थकल्येय ती. म्हणून झोपलीय.’’ मी एकदम ओशाळून म्हटलं, ‘‘अहो! काही हरकत नाही. झोपू दे तिला.’’ मग ती बाई सांगू लागली, ‘‘गेले वर्षभर आम्ही नाशिकहून आठवडय़ातून तीनदा टाटा कर्करोग रुग्णालयामध्ये येतो. पहाटे उठायचं, स्वयंपाक करायचा, निघायचं, इथे रुग्णालयात पोहोचायचं, उपचार घ्यायचे आणि मग संध्याकाळच्या ट्रेनने नाशिकला परत! परत जाताना भयंकर गर्दी असते गाडीला! आणि उपचारामुळे सारख्या उलटय़ा होत असतात संगीताला! मग कुणी तरी दया येऊन आम्हाला बसायला जागा देतं. रात्री मोठय़ा मुलीने थोडासा स्वयंपाक केलेला असतो. उरलेले तीन दिवस संगीता शाळेत जाते आणि त्राण नसताना जिद्दीने नाचतेसुद्धा! माझे पती एका शाळेत शिक्षक आहेत, पण त्यांच्या पगारात कसं भागणार सर्व! बचत केलेले पैसे आताच संपत आलेत. पुढे कधी हिला बरं वाटणार कोण जाणे! प्रत्येक दिवस तणावात जातो नुसता!’’ हे सर्व ऐकल्यावर माझं हृदय पिळवटलं. देव एकेकाची किती परीक्षा घेतो! थोडय़ा वेळातच पुढल्या एपिसोडचं शूटिंग सुरू झालं. शेवटच्या पाच मिनिटात संगीताने नृत्य केलं. एवढी बारीक असूनही बेभान होऊन नाचत होती ती! आपला आजार विसरून, खुशीत वेगळ्याच दुनियेत होती ती! आम्ही परीक्षकांनीसुद्धा तोंड भरून तिचं कौतुक केलं. एपिसोड संपल्यावर त्या दोघी माझ्या खोलीत कपडे बदलायला गेल्या. ‘‘मला तुमच्याशी बोलायचंय,’’ असं सांगून मीही पाठोपाठ खोलीत गेले.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
farmer protest marathi news, farmer protest for msp, minimum support price marathi news
टीकाकारांना हमीदर मागणाऱ्या शेतकऱ्यांइतकी समज कधी येणार?

खोलीत पोचले, बघते तो, संगीताची आई ओक्साबोक्सी रडत होती. मी त्यांच्या पाठीवर हात फिरवत रडण्याचं कारण विचारत होते. पण त्या हमसून हमसून रडतच होत्या. जरा शांत झाल्यावर म्हणाल्या, ‘‘ताई, संगीताच्या वडिलांचा नाशिकहून फोन होता. आज त्यांच्या पण तिकडे काही टेस्ट्स होत्या आणि आता त्यांनासुद्धा कर्करोग झालाय हो!’’ असं म्हणत त्यांनी हंबरडा फोडला. ‘‘आता कसं निभावू हो मी हे सगळं?’’ हे ऐकून तर माझ्या पोटात खड्डाच पडला! काय बोलावं काही सुचेना! त्यांना म्हटलं, ‘‘आज तुम्ही मुंबईतच राहणार आहात ना? मग उद्या सकाळी लवकर माझ्या घरी याल? मी व माझी मुलगी तुम्हाला थोडी आर्थिक मदत करू.’’

खरं तर त्यांच्या खर्चापुढे आमची मदत अगदीच तुटपुंजी होती. पण आम्हाला काही केल्याचं थोडंसं समाधान! दुसऱ्या दिवशी त्या आल्या. त्यांना आम्ही यथाशक्ती मदत केली. आभाळाला ठिगळ लावण्यासारखंच होतं ते! निवेदक हेमंत बर्वे शूटिंगला असायचे. त्यानेही त्या बाईंना खूप मदत केली. ते त्यांना ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात घेऊन गेले. दानशूर व्यक्तींसाठी संगीताच्या आजाराबद्दल एक पत्रक काढून ते त्यात छापलं गेलं. त्याचा त्यांना फायदा झाला. तीन/चार दिवसांनी संगीताच्या आईचा नाशिकहून मला फोन आला. म्हणाल्या, ‘‘लोकसत्तात छापून आल्यावर खूप लोकांनी आम्हाला पैशांची मदत केली.’’ मी आनंदले. म्हटलं, ‘‘वा वा! आता चांगले उपचार होतील संगीतावर!’’ असेच पंधरा दिवस गेले.. एके दिवशी सकाळीच संगीताच्या आईचा रडवेल्या आवाजात फोन आला. ‘‘ताई! काल संगीता गेली!’’ ‘‘काय?’’ मी ओरडलेच! थोडं शांत होत म्हटलं, ‘‘फार वाईट झालं. स्वत:च्या मुलीचं मरण बघावं लागणं यासारखी दु:खद गोष्ट नाही. हे अपार दु:ख सोसण्याची ताकद मात्र देव तुम्हाला देवो.’’

हे म्हणताच, त्या पलीकडून म्हणाल्या, ‘‘ताई! संगीता तर गेली, पण आता नवऱ्याच्या आजाराशी झुंज देण्याची ताकद द्यायला सांगाना देवाला!’’

मानधन

ती दोन माणसं, एक संगीताची आई आणि एक पंकजभाई! एकीला परिस्थितीने शरण जाणं भाग पाडलेलं तर दुसऱ्याने कृतघ्नपणे वागून स्वत:च स्वत:वर नामुष्कीची परिस्थिती आणलेली. संगीताच्या आईला मुलीनंतर नवऱ्याचा कर्करोगही पचवायचाहोता त्यासाठी ती बळ मागत होती, तर पंकजभाई खोटं वागण्यासाठी विनम्रपणाचं उसनं बळ आणत होता.. का होतं असं?

परळच्या त्या दोन स्टुडिओमध्ये मी रेकॉर्डिगला बऱ्याच वेळा जात असते. एकाच मालकाचे वर आणि खाली असे दोन स्टुडिओ आहेत. खालचा मोठा व वरचा छोटा! कित्येकवेळा बाहेरच्या ‘पाटर्य़ा’ रेकॉर्डेड ट्रॅक्स घेऊन येतात. त्या वेळी फक्त आवाज डब करण्यासाठी मोठय़ा स्टुडिओची आवश्यकता नसते. अशा वेळी छोटा स्टुडिओ फारच सोयीस्कर पडतो. वरच्या स्टुडिओत रेकॉर्डिस्ट आहेत, पंकज! माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत ते! तरी मी त्यांना ‘अहो पंकजभाई’ म्हणते.

सकाळी सकाळीच पंकजभाई स्टुडिओत हजर राहाणार. मी साडेदहाला येते सांगितले की ते दहालाच स्टुडिओत पोहोचणार. आल्या आल्या अगदी अदबीने, हसतमुखाने माझं स्वागत करणार. स्टुडिओ पण छान ठेवलाय त्यांनी. घरून स्टुडिओत येताना ते नेहमी देवदर्शन करून येणार. कपाळाला अंगारा लावलेला असतो ना, त्यावरून कळतं! मग आल्यावर स्टुडिओतल्या गणपतीची, देवीची, साईबाबांची पूजा! उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न करणार आणि मग विनम्रपणे मला विचारणार, ‘‘काय ताई! काय मागवू तुमच्यासाठी, गरम चहा की कॉफी!’’ रेकॉर्डिगला दोन -अडीच वाजले तर जेवूनच जायचा आग्रह करणार. रेकॉर्डिगसुद्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडणार. जिथे चांगल्या जागा, चांगलं एक्स्प्रेशन, चांगले सूर येतील तिथे माझं भरभरून कौतुक करणार. नवशिके कोणी गायक तिथे असतील तर त्यांना आवर्जून माझं गाणं ऐकवणार. रेकॉर्डिगसुद्धा फार सुंदर करतात ते, इतकं की माझ्याकडे महाराष्ट्रातून कोणी ट्रॅक्स घेऊन आले तर मी सुद्धा त्यांच्याकडेच माझा आवाज डब करण्यासाठी आग्रह धरते. कधी कधी ‘पाटर्य़ा’ थेट त्यांच्याकडे स्टुडिओचे बुकिंग करून मला गायला बोलावतात. तर कधी कधी पंकजभाई ‘पार्टी’शी बोलून मला स्वत: फोन करून बोलावतात. ‘‘ताई पुढल्या आठवडय़ात या या तारखेला तीन गाणी रेकॉर्ड करायची आहेत, पण बजेट कमी आहे.’’ मी सुद्धा त्यांना सहकार्य करते. त्या वेळी ‘पार्टी’कडून पैसे घेऊन ते स्वत: मला पैसे देतात. पण गाणी चांगली झाली की पैसे कमी मिळाल्याचं दु:ख नसतं.

असंच एकदा पंकजभाईंनी मला विचारलं, ‘‘अमुक तारखेला चार गाणी रेकॉर्ड करायला याल का?’’ नेहमीप्रमाणे बजेटही कमी आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. मीही हसून ‘हो’ म्हटलं! ठरलेल्या वेळी त्यांच्या स्टुडिओत गेले. पण जी ‘पार्टी’ रेकॉर्डिग करत होती, ती माझ्या ओळखीची होती. त्यांची रेकॉर्डिग्स् मी आधीसुद्धा गायलेली होती. गेल्यावर दुपापर्यंत सर्व गाणी रेकॉर्ड झाली. मग फोटोचे वगैरे सोपस्कार झाले आणि मी जायला निघाले. पंकजभाईंनी नेहमीप्रमाणे जेवायचा आग्रह केला पण मी नम्रपणे नाही म्हटलं. मग आर्टिस्ट रूममध्ये पंकजभाईंनी मला पाकीट दिलं. त्यातले पैसे मोजले, ठरलेल्या रकमेपेक्षा दहा हजार जास्त होते. मी पंकजभाईंना म्हटलं, ‘‘ठरल्यापेक्षा दहा हजार जास्त आहेत.’’ त्यांनी ते पैसे ओशाळून माझ्या हातून झटकन स्वत:कडे घेतले अणि  म्हणाले, ‘‘हां हां! ते कोरसचे दहा हजार आहेत.’’  हे ऐकून मी विचारात पडले. कुठचीही ‘पार्टी’ कोरसचे पैसे मुख्य गायिकेच्या पाकिटात ठेवत नाही. मी जरी प्रामाणिकपणे पंकजभाईंना दहा हजार रुपये परत केले, तरी डोक्यात विचार चालूच होते. या आधीसुद्धा मी या ‘पार्टी’ची गाणी गायल्येय आणि त्यांनी दर वेळी व्यवस्थित मानधन दिलंय मला. शिवाय जसजशी वर्षे पुढे जातात, तसतसे पैसे वाढत जातात, कमी नाही होत. मी त्या ‘पार्टी’शी लगेच बोलले. त्यांनी मला सांगितले की आम्ही बिलकूल कमी पैसे दिलेले नाहीत. उलट ते पंकजभाईंना परत केलेले दहा हजारही तुमचेच आहेत. हे ऐकल्यावर मात्र मी अवाक् झाले! यावेळी ‘पार्टी’ने माझ्या मानधनाचं पाकीट माझ्यासमोरच पंकजभाईंना दिलं. त्यामुळे त्यातले पैसे काढून घ्यायला त्यांना संधीच मिळाली नाही.

केवढी फसगत केली होती माझी पंकजभाईने! आज केवळ निर्माते माझ्या ओळखीचे होते, म्हणून मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकले आणि पंकजभाईंची ही चोरी उघडी पडली. अरे देवा! म्हणजे या आधीसुद्धा अनेक  वर्षे जेव्हा जेव्हा पंकजभाई मला स्वत: बोलवीत, तेव्हा तेव्हा बजेट कमी असण्याचा अर्थ हा होता तर! दर वेळी ते माझे काही हजार स्वत:च्या खिशात टाकत होते. पण हे निर्माते एवढे सच्चे होते की त्यांनी दोन दिवसांनी माझ्या घरी येऊन उरलेले दहा हजार रुपये मला दिले.

आजही मला राहून राहून प्रश्न पडतो की इतका गोड, विनम्र, अदबशीर माणूस एवढा विश्वासघात करू शकतो? का दर वेळी विश्वासघात करत होता, म्हणूनच तो विनम्रपणाचा आव आणत होता? या गोष्टीला बरेच महिने झाले, पण त्यानंतर त्यांनी मला कधीच रेकॉर्डिगला स्वत: बोलावले नाही. कारण आता यापुढे माझे पैसे त्यांना खाता येणार नव्हते ना. अजूनही पंकजभाई जेव्हा जेव्हा भेटतात, तेव्हा मी नेहमीसारखीच त्यांच्याशी वागते; ते जरा संकोचतात पण ही गोष्ट मी माझ्यापाशीच ठेवली आहे. बऱ्याचवेळा कानावर येतं की, आजकाल पंकजभाईंकडे विशेष काम नाही. खूप लोकांना गंडवलंय त्यांनी. त्यामुळे निर्मात्यांना त्यांच्याकडे जावंसं वाटत नाही, वगैरे वगैरे. लोकांचं माहीत नाही, पण मी मात्र त्यांना आता पुरती जाणून आहे!

(संगीता व पंकजभाई यांचं नाव बदललेले आहे.)

-उत्तरा केळकर

(संपर्क : ९८२१०७४१७३)

uttarakelkar63@gmail.com