scorecardresearch

Premium

देव तारी त्याला..

औरंगाबाद विमानतळावर विमान उतरणार तोच अचानक वातावरणात बदल व्हायला लागला.

देव तारी त्याला..

रात्रीचे अकरासव्वाअकरा झाले होते. गप्पा रंगात आल्या होत्या. एवढय़ात आमचं लक्ष खिडकीच्या काचांकडे गेलं आणि आम्ही दचकलोच! दोन माणसांच्या आकृत्या त्या काचेवर अगदी स्पष्टपणे दिसत होत्या. हातवारे करत, ते दोघे काही तरी कुजबुजत होते. पण आम्हाला त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं. फक्त तोंडं हलताना दिसत होती. भीतीने नुसता थरकाप उडाला आमचा! काय उद्देशानं ते दोघे इथे आले होते?..

आपल्या सर्वाच्याच आयुष्यात असे प्रसंग येतात, म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वेळेवर न पोहोचता येणं किंवा एखादं काम वेळेवर न होणं किंवा अचानक कठीण परिस्थिती उद्भवून आपलं काम आणखी कठीण होऊन बसणं वगैरे वगैरे.. अशा वेळी आपण अगदी हताश आणि हतबल होऊन जातो, पण अशा आणीबाणीच्या प्रसंगी, कधी तरी असंही होतं की नियती म्हणा, किंवा नशीब जोरावर असतं म्हणा किंवा देवासारखा माणूस भेटतो म्हणून म्हणा, अचानक अंधारलेल्या मार्गावर प्रकाशाचा किरण दिसू लागतो. समोरचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो आणि चुटकीसरशी आपलं काम होऊन जातं. असा काही तरी चमत्कार घडतो की, आपण अगदी थक्क होऊन जातो. असे प्रसंग माझ्या आयुष्यात बरेच घडलेत त्यातलेच हे काही प्रसंग!

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…

२/३ वर्षांपूर्वीची गोष्ट! औरंगाबादला संध्याकाळी साडेसहाला एक कार्यक्रम होता. मला सेलेब्रिटी गेस्ट म्हणून बोलावलं होतं. काही गाणी गायची होती. दुपारी साधारण तीनची फ्लाइट होती माझी. म्हणजे सुमारे पावणेचारला मी औरंगाबादला पोहोचणार होते. विमान मुंबईहून वेळेवर निघालं. तिथे वेळेवर पोहोचलंसुद्धा! पण औरंगाबाद विमानतळावर विमान उतरणार तोच अचानक वातावरणात बदल व्हायला लागला. खिडकीतून बघितलं तर बाहेर पूर्णपणे अंधारून आलं होतं. पावसाळी दिवस नसूनसुद्धा गोलाकार वादळ सुरू झालं आणि विमान हेलकावे खात घिरटय़ा मारू लागलं. एवढय़ात विमानात घोषणा झाली ‘खराब हवामानामुळे आपण औरंगाबादहून परत मुंबईला जातोय.’ बापरे! आता कार्यक्रमाचं काय? शेवटी  मुंबईला विमान आलं. पुढची घोषणा होईपर्यंत आम्हाला विमानातच बसायला सांगितलं गेलं. सर्व परिस्थिती मी कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगितली. आता कशी मी औरंगाबादला पोहोचणार? पण तेवढय़ात घोषणा झाली की, औरंगाबादचं वातावरण आता नॉर्मल झालंय आणि आपण परत औरंगाबादला जातोय. तोपर्यंत ५.३० वाजले होते. सुटकेचा नि:श्वास टाकला मी! काही क्षणातच विमान आकाशात झेपावलं आणि औरंगाबादला पोहोचलं. पण परत आधीसारखीच परिस्थिती. वाटलं, आज काही खरं नाही आपलं, पण ५ मिनिटं घिरटय़ा घातल्यावर विमान औरंगाबाद विमानतळावर अगदी अलगद उतरलं. लोकन्यायला आलीच होती. त्यांच्याबरोबर हॉटेल गाठलं, तयार होऊन लगेचच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. २०/२५ मिनिटं उशीर झाला, पण कार्यक्रमाला पोहोचू शकले हे काय कमी होतं?

असाच काही वर्षांपूर्वी भुसावळला सकाळी दहाचा कार्यक्रम होता. मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. थोडं गायचंही होतं. आयोजकांनी जवळ जवळ दीड महिना अगोदर टू टायर एसीची तिकिटंसुद्धा पाठवली होती. आदल्या दिवशी रात्रीची ट्रेन होती, ती सकाळी सातला भुसावळला पोहोचणार होती. माझ्या घरापासून दादर स्टेशन खरं तर १५/२० मिनिटांच्या अंतरावर! पण संध्याकाळी उशिराची वेळ ट्रॅफिक, गर्दी लागेल म्हणून एक तास अगोदर मी घरातून निघाले. ५/७ मिनिटं गाडी पुढे पुढे जात होती. पण अचानक ट्रॅफिक वाढला आणि मुंगीच्या पावलाने गाडी पुढे सरकायला लागली. छातीची धडधड मात्र वेगाने वाढायला लागली. चहूबाजूंनी इतक्या मोटारी की, ड्रायव्हरला वाट काढणंसुद्धा मुश्कील होऊ लागलं. मी स्टेशनवर पोहोचले आणि माझ्या डोळ्यांसमोरून भुसावळची ट्रेन निघून गेली. देवा! आता काय? धावत धावत मी पूल ओलांडून तिकीट खिडकीपाशी गेले आणि आता दुसरी गाडी आहे का याची चौकशी केली. तिकीट खिडकीवरच्या माणसाने पंधरा मिनिटांतच दुसरी गाडी आहे असं सांगितलं. मी नवीन तिकीट मागितलं. त्या भल्या गृहस्थाने मला ओळखलं! त्याने सांगितलं की तुम्हाला या आधीच्या तिकिटाचे थोडे पैसे मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला लांब जाऊन अर्ज करावा लागेल आणि त्यात तुमची ही गाडीसुद्धा चुकेल. तेव्हा मी नंतर आमच्या माणसाला तेथे पाठवून तुमचे पैसे घेईन. फक्त वरचे पैसे तुम्ही आता भरा! खरं तर असं कुणी करेल का? पण मला ओळखल्यामुळे त्या माणसानं माझं हे काम लगेचच केलं. माणसाच्या रूपात देवदूतच भेटला मला आणि कार्यक्रमस्थळी मी अगदी वेळेवर पोहोचले.

ही साधारण १२/१३ वर्षांपूर्वीची गोष्ट! तेव्हा आम्ही लोणावळ्याच्या आधीच्या बंगल्यात राहत होतो. मी, माझी मुलगी मानसी आणि तिचा अगदी दोन अडीच वर्षांचा मुलगा अक्षत असे तिघं दोन-तीन दिवसांकरता राहायला आलो होतो. आम्हाला सोडून, गाडी बंगल्यापाशी ठेवून ड्रायव्हर आपल्या घरी परत गेला होता. बंगल्याचं जोतं खूप उंच होतं. प्रथम ६/७ पायऱ्या व मग बंगल्याचं मुख्य दार. ते जाळीचं होतं. ते उघडलं की प्रथम व्हरांडा येई. याच जाळीच्या दारासमोर एक मोठी खिडकी होती. त्याला दणकट गज होते आणि त्याची दारं दुधी काचेची होती. खिडकीच्या दोन्ही बाजूला आतल्या हॉलमध्ये जाण्यासाठी दोन भले मोठे दरवाजे होते. त्या रात्री, बाहेरचा जाळीचा मुख्य दरवाजा बंद केला. खिडकीच्या काचाही लावून घेतल्या. उगाच डासांचा त्रास नको. शिवाय हॉलचे दोन्ही दरवाजे आतून लावून घेतले. दिवे बंद केले आणि एक नाइट लॅम्प लावून मंद प्रकाशात दोघी गप्पा मारत बसलो. नातू शांत झोपी गेला होता. रात्रीचे अकरा-सव्वाअकरा झाले होते. गप्पा रंगात आल्या होत्या. एवढय़ात आमचं लक्ष खिडकीच्या काचांकडे गेलं आणि आम्ही दचकलोच! दोन माणसांच्या आकृत्या त्या काचेवर अगदी स्पष्टपणे दिसत होत्या. बाहेरच्या जाळीच्या दाराबाहेर वर दिवा चालू होता. त्याचा प्रकाश त्या माणसांवर पडला होता आणि त्यांच्या सावल्या त्या खिडकीच्या काचेवर पडल्या होत्या. हातवारे करत, ते दोघं काही तरी कुजबुजत होते. पण आम्हाला त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं. फक्त तोंडं हलताना दिसत होती. हातवारे केलेले दिसत होते. भीतीने नुसता थरकाप उडाला आमचा! काय उद्देशानं ते दोघे इथे आले होते? सोसायटीच्या गेटपाशी वॉचमन होता आणि आमचा बंगला तर मुख्य गेटपासून बराच लांब होता. सगळीकडे शांतता होती. फक्त झाडांचा सळसळणारा आवाज तेवढा ऐकू येत होता. एवढय़ा मोठय़ा सोसायटीत फक्त दोन-तीन घरात लोक असतील. त्यांना किंवा वॉचमनला हाक मारणंही शक्य नव्हतं. ती माणसं बेलसुद्धा वाजवत नव्हती. खरं तर ती माणसं आम्हाला काहीही करणं शक्य नव्हतं. कारण ती सर्व मजबूत दारं आतून लावून घेतलेली होती. तरीही एका अनामिक भीतीनं आम्ही दोघी अगदी थिजून गेलो होतो. वॉचमनचा डोळा चुकवून तर ती आली नसतील? आम्ही नुसत्या गप्प बसून राहिलो. साधारण अध्र्या तासाने त्या सावल्या दिसेनाशा झाल्या. ती माणसं निघून गेली होती. घाबरलेल्या आम्ही दोघींनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण झोप लागेना. मग पहाटे केव्हा तरी झोप लागली.

सकाळ झाली, व्हरांडा उन्हाने न्हाऊन निघाला. आम्ही उठलो, दारं उघडली. त्या प्रसन्न सकाळी कालच्या रात्रीच्या भयावह घटनेचा मागमूसही नव्हता. सकाळच्या उजेडात, रात्रीचा अंधार, किल्मिष, भय, निराशा, सारं सारं लोप पावलं होतं. जाळीचा मुख्य दरवाजा उघडला. समोरच असलेल्या देवळाकडे बघून हात जोडले. रात्रीचं वाईट स्वप्नासारखं भासणारं सत्य आता संपलेलं होतं. आम्ही अगदी सुखरूप होतो. इतकी र्वष झाली या घटनेला, तरी मनात विचार येतोच, कोण होते ते दोघं? वाट चुकलेले वाटसरू, चोर, की आणखी कुणी?

काही महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रसंग! औरंगाबादलाच संध्याकाळी साडेसातचा कार्यक्रम आणि तीच दुपारची तीनची फ्लाइट! सवयीप्रमाणे एक तास आधी मी डोमेस्टिक एअरपोर्टला पोहोचले, पण तिथे गेल्यावर कळलं की फ्लाइट आता आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जाते. वर्षांनुर्वष मी डोमेस्टिक विमानतळावरून औरंगाबादला जाते, पण हा बदल अलीकडेच झाला होता आणि मला तो माहीत नव्हता. आता कशी वेळेवर पोहोचणार मी त्या विमानतळावर! तरीसुद्धा टॅक्सीवाल्याला गाडी वेगात चालवायला सांगितली. प्रयत्नांची शिकस्त केली आणि तेथे पोहोचले, पण ७/८ मिनिटे उशिरा! बोर्डिग पासचा काऊंटर बंद झाला होता. एकदा तो बंद झाला की बोर्डिग पास मिळतच नाही. हताश होऊन मी आयोजकांना येत नसल्याचं कळवलं. ते पण फार निराश झाले. तितक्यात तिथल्याच एका कर्मचाऱ्याला मी विचारलं, ‘‘काही होऊ शकेल का?’’ त्याने एका बाईंकडे बोट दाखवलं. म्हणाला, ‘‘त्या मुख्य आहेत. त्यांना विचारा!’’ मी धावत त्यांच्याकडे गेले आणि उशीर होण्याचं कारण सांगितलं, पण त्या काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. तेवढय़ात, तिथेच असलेल्या त्या बाईंच्या पदापेक्षा वरच्या पोस्टवर असलेल्या माणसाने मला अदबीनं विचारलं, ‘‘तुम्ही उत्तराताई ना? औरंगाबादला कार्यक्रम आहे का? थांबा, मी देतो तुम्हाला बोर्डिग पास! लगेच त्याने तो दिला. एवढंच नव्हे, तर फ्लाइटपर्यंत – पोचवण्यासाठी मला माणूसही बरोबर दिला. त्यांचे परत परत आभार मानत मी धावत विमानाकडे निघाले. सुमारे अर्धा तासात विमान उडालं. ना ओळख ना पाळख! तरी ही त्या भल्या माणसाने माझा गहन प्रश्न अगदी सहजपणे सोडवला!

या सर्व अनुभवांवरून मला एक सत्य पटलेलं आहे, की आपण सर्व माणसं, त्या एका अज्ञात शक्तीच्या हातातल्या कठपुतल्या आहोत. तिने जरा जरी दोर खेचून धरले तरी संकटांचे पाश आपल्याभोवती आवळले जातात. आणि त्यातला एक दोर जरी ढिला सोडला ना, तरी त्या संकटांना बाय बाय करीत आपण पुढे निघून जातो.

uttarakelkar63@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व उत्तररंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-11-2016 at 01:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×