‘‘स्टुडियोत आल्या की लतादीदी जराही वेळ न घालवता कामाला लागत. संगीतकार त्यांना चाल समजावून देई, त्या एकाग्रतेने, विद्यार्थ्यांच्या नम्रतेने चाल शिकत, तालीम करून माईकसमोर उभ्या राहात. पुढचा एक-दीड तास मग भारल्यासारखा जाई. एखाद्या हुशार विद्यार्थ्यांने तीन तासांचा गणिताचा अवघड पेपर अवघ्या अध्र्या तासात सोडवून निघून जावं त्याप्रमाणे अगदी थोडय़ा वेळात, अवघड गाणं सोपं वाटावं अशा तऱ्हेने सादर करत त्या सहजतेने पुढल्या रेकॉर्डिगला निघूनही जात. त्या गाण्याचा परिणामच एवढा विलक्षण असे, की सर्वच आश्चर्याने थक्क होत.’’ २८ सप्टेंबरच्या लता मंगेशकर यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त खास लेख.

लहानपणचा काळ आठवला की आठवतो तो ग्रँटरोड मधला भला मोठा नाना चौक! तिथून जाणाऱ्या ट्रॅम्स. या नाना चौकातूनच असंख्य रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. एक ग्रँटरोड स्टेशनकडे, दुसरा अप्सरा टॉकीजकडे, तिसरा गिरगावकडे, चौथा चौपाटीकडे, पाचवा आमच्या सेंट कोलंबा शाळेकडे आणि सहावा ताडदेवकडे. याच ताडदेवच्या रस्त्यावर शास्त्री हॉलमध्ये आम्ही राहायचो. बाजूला शंकराचं देऊळ होतं, आजही आहे. शास्त्री हॉल आणि देऊळ यामध्ये एक वास्तू होती. साक्षात स्वरसम्राज्ञीचं घर होतं ते! विश्वास बसत नाही ना! पण मी ते पाह्य़लंय.

फारच लहान होते मी तेव्हा. आजही ते घर मला स्पष्टपणे आठवतं! पण लतादीदींना तेथे पाहिल्याचं मात्र आठवत नाही. माझ्या बालवर्गात शाम नावाचा मुलगा होता. तो अभिमानाने मला नेहमी सांगे, ‘‘आमच्या शेजारी ना लता मंगेशकर राहतात.’’ मला काही कळत नसे. मी घरी येऊन आईला विचारी, ‘‘आई लता मंगेशकर म्हणजे कोण गं?’’ आई म्हणे, ‘‘अगं! त्या फार मोठय़ा गायिका आहेत. पण ते समजण्याचं माझं वयच नव्हतं. पण शामकडे मात्र गर्वानं आणि अभिमानानं सांगण्यासारखं काही तरी आहे, जे आपल्याकडे नाही, एवढं मात्र मला नक्की कळत असे.. हळूहळू मोठं व्हायला लागल्यावर मात्र ‘लता मंगेशकर’ या नावाचा चमत्कार आणि जादू कळायला लागली. त्याकाळी ‘बिनाका गीतमाला’ हा रेडिओवरचा खूप गाजलेला कार्यक्रम असायचा. तो लागला की ज्याच्याकडे रेडिओ असे, त्याच्याकडे रेडिओभोवती कोडाळं करून, जीवाचा कान करून लोक हा कार्यक्रम ऐकीत. त्या त्या वेळच्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणी त्या कार्यक्रमात लागत.

साधारणपणे १९५३ पासून १९९७ पर्यंत ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम चालला. दरवर्षी एका सर्वोत्तम गाण्याची निवड व्हायची. त्यात सर्वात जास्त सर्वोत्तम गाणी ही लतादीदींची होती. उदाहरणादाखल ही काही गाणी १९५३- ये जिंदगी उसी की है (अनारकली), १९६०- जिंदगी भर नही भूलेंगे (बरसात की रात), १९६३- जो वादा किया वो (ताजमहल), १९७०- बिन्दीया चमकेगी (दो रास्ते), १९७६- कभी कभी मेरे दिल में (कभी कभी), १९८०- डफलीवाले (सरगम), १९८५- सुन सायबा सुन (राम तेरी गंगा मैली) आणि १९९४- दीदी तेरा देवर दिवाना (हम आपके है कौन). एकीकडे ही फिल्मी गाणी गाजत असतानाच, तुकाराम, ज्ञानेश्वरांचे अभंग, कोळीगीतं, शिवाजी महाराजांवरची, गणपतीची गाणी, गालिब, मीराबाई, यातील गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. या अलौकिक गळ्याची मालकीण मला कधी तरी प्रत्यक्ष दिसेल का, असं खूप वाटत होतं. पण ते कसं शक्य होतं?.. तो योग मात्र अचानक आला. एकदा कॉलेजमधून (विल्सन) परत येत असताना, सेसिल रेस्टॉरंटच्या सिग्नलपाशी मी रस्ता क्रॉस करायला थांबले होते. लाल सिग्नल झाल्यावर गाडय़ा थांबल्या, मी क्रॉस करणार इतक्यात माझं लक्ष एका थांबलेल्या गाडीकडे गेलं. लतादीदीच होत्या त्यात! भान हरपून मी त्यांच्याकडे पाहात राहिले आणि रस्ता क्रॉस करायचंसुद्धा विसरून गेले. गाडीत बसून त्या खिडकीबाहेर बघत होत्या. त्यामुळेच मी त्यांना नीट बघू शकले. त्या तेवढय़ा एका मिनिटात लक्षात राहिलं ते त्यांचं साधेपण आणि तेजस्वी डोळे!

कॉलेजचं शिक्षण संपता संपता माझं लग्न झालं. शास्त्रीय आणि सुगम संगीताचं शिक्षण चालूच होतं. हळूहळू ओळखी होत होत्या. मग थोडा काळ कोरसच्या निमित्ताने माझा फिल्मी दुनियेशी संबंध येऊ लागला. विचार केला, कोरसच्या निमित्ताने का होईना लतादीदी व आशाताई या दोघींना जवळून बघता येईल, त्यांचं गाणं जवळून ऐकता येईल. मग ते योग वारंवार यायला लागले. स्वर्गीय गाणं आता हाताच्या अंतरावर आलं आणि माझे डोळे व कान त्यांना जास्तीत जास्त साठवू लागले. लतादीदी स्टुडिओत येणार म्हणजे गाण्याची चालसुद्धा खासच असणार याबद्दल सर्वानाच खात्री असे. अरेंजर, संगीतकार, वादक सर्व जण मनापासून कामाला लागत. त्या येईपर्यंत म्युझिक व्यवस्थित ठासवून ठेवीत. रेकॉर्डिगची पूर्ण तयारी झाल्यावर मग दीदींना फोन जाई. ‘दीदी घरातून निघाल्या’, ‘आता फेमस स्टुडिओच्या बाहेर आल्यात’, ‘आता कुठल्याही क्षणी त्या आत येतील’, अशी आम्हाला खबर मिळे. आम्हा सर्वाची उत्सुकता ताणली जाई आणि पटकन त्या आत येत. बरेच जण पुढे येऊन त्यांना वाकून नमस्कार करीत. त्यासुद्धा स्मित वदनाने सर्वाकडे बघत, संकोचून नमस्कार स्वीकारत आणि जराही वेळ न घालवता, कामाला लागत. संगीतकार त्यांना चाल समजावून देई, त्या एकाग्रतेने, विद्यार्थ्यांच्या नम्रतेने चाल शिकत व दोन/चार वेळा तालीम करून माईकसमोर उभ्या राहात. पुढचा एक-दीड तास मग भारल्यासारखा जाई. एखाद्या हुशार विद्यार्थ्यांने तीन तासांचा गणिताचा अवघड पेपर अवघ्या अध्र्या तासात सोडवून निघून जावं त्याप्रमाणे अगदी थोडय़ा वेळात, अवघड गाणं सोपं वाटावं अशा तऱ्हेने सादर करत त्या सहजतेने पुढल्या रेकॉर्डिगला निघूनही जात. रेकॉर्ड झालेलं गाणं ऐकायलाही थांबत नसत. त्या गाण्याचा परिणामच एवढा विलक्षण असे, की सर्वच आश्चर्याने थक्क होत. अशी त्यांची अनेक गाणी ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. त्याच काळात मी लतादीदींची डबिंगही गाऊ लागले. बप्पी लाहिरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल व इतरही काही संगीतकार जेव्हा लतादीदींना रेकॉर्डिगला यायला वेळ नसे, तेव्हा मला बोलावीत व शूटिंगपुरते माझ्याकडून गाणे गाऊन घेत. आयत्या वेळी चाल पिकअप करून गाणं गाताना वेगवेगळ्या निर्मात्यांना या निमित्ताने माझा आवाज ऐकवता येईल, या दृष्टीने या संधीचा मी लाभ घेतला! दोन-अडीच वर्षे या कोरस आणि डबिंगचा मी अनुभव घेतला. मग मात्र मी हे सोडलं, कारण हळूहळू मला स्वतंत्र रेकॉर्डिगस् मिळू लागली.

दीदींची ही अवाक् करणारी कारकीर्द बघितली की वाटतं, यांनी आपलं आयुष्य घरापेक्षा स्टुडिओमध्येच जास्त काळ घालवलेलं असणार. कारण तो पूर्वीचा काळ लाइव्ह रेकॉर्डिगचा होता. म्हणजे गायकाबरोबर एकाच वेळी वादक वाजवीत, रेकॉर्डिस्ट रेकॉर्डिग करीत. जरा जरी कोणाचीही चूक झाली तरी गायकाला पूर्ण गाणं परत गावं लागे, खूप थकवणारी आणि गायकाचा कस लावणारी ही पद्धत होती. त्यामुळे एकेक गाणं तीन/चार तास कधी त्याहूनही जास्त काळ चाले.

अशी दिवसाला तीन/चार गाणी, तीही सर्व गाणी उभं राहून गायची, म्हणजे काही सोपं काम नव्हतं. वर्षांनुवर्षे हे सर्व चालू होतं. पण एवढय़ा अडचणींवर मात करूनही एकापेक्षा एक सरस गाणी त्याकाळी जन्माला आली. त्यातलं परफेक्शन तर स्तिमित करणारं आहे. वाटतं, देवाने फारच विचार करून हा असामान्य आवाज घडवलाय! या आवाजाचं वर्णन तरी कसं करावं? खूप ‘रेंज’ असलेला हा एवढा मधाळ आवाज, तरी तो भावनेत चिंब भिजलेला आहे. जितका नाजूक तितकाच वजनदार! जितका पवित्र, खानदानी तितकाच बाणासारखा हृदयाला थेट जाऊन भिडणारा, भेदणारा आणि आक्रमक! हजारो लोक गाणी गात असतात, पण यांच्या हरकती, ताना, मुरक्या अशा काही परफेक्ट टायमिंगने येतात, की मन आणि शरीर शहारून जावं. त्यातली सहजता तर थक्क करणारी. गाण्यातली कुठलीही जागा घेताना, त्यात आता मी ही जाग घेतेय, हा आविर्भाव किंवा अभिनिवेश नसतो. अगदी सहजतेने त्या जागा येतात. त्यामुळेच त्यांची सर्व गाणी ऐकायला सोपी पण गायला मात्र तितकीच अवघड असतात! एवढी कठीण आणि लांब लांब  ओळींची गाणी गाताना, त्या श्वास कुठे घेतात, हे एक  कोडंच आहे! तो कुठेही जाणवत नाही की ऐकूही येत नाही. आजच्या जमान्यात ‘ब्रेथलेस’ गाण्यांचा खूप बोलबाला आहे. ती गाणाऱ्यांचं नक्कीच कौतुकही वाटतं. पण मला वाटतं, पूर्वीपासून दीदी गात असलेली ही सर्व गाणी ‘ब्रेथलेसच’ वाटतात. असा अलौकिक, असामान्य आवाज अनेक शतकांतून देव एखाद्यालाच देतो अणि अशी अद्वितीय कामगिरी बजावण्यासाठीच देवाने त्या व्यक्तीला भूतलावर पाठवलेलं असतं.

गेल्या ३०/४० वर्षांत लतादीदींना भेटण्याचा काही वेळा योग आला. दरवेळी त्यांच्या कर्तृत्वानं एवढं अचंबित व्हायला होतं, की त्या समोर आल्या तरी जास्त बोलण्याचं धैर्य होत नाही. त्यासुद्धा समोरच्याशी आदराने, गोड पण मोजकंच बोलतात. कदाचित गेली कित्येक वर्षे या झगमगत्या फिल्मी दुनियेत त्यांनी भरपूर अनुभव घेतला असेल किंवा टोकाची गरिबी आणि टोकाची श्रीमंती अनुभवल्यामुळे म्हणा, त्यांच्या अंगी एक प्रकारची अलिप्तता, स्थितप्रज्ञता आली असावी असं वाटतं. अण्णा जोशींच्या कार्यक्रमात मी गायचे, तेव्हा त्या प्रमुख पाहुणे म्हणून एकदा आल्या होत्या. ‘भावसरगम’ या कार्यक्रमाला २५ वर्षे झाली, तेव्हा मा. दीनानाथ स्मृती महोत्सवात त्यांनी आम्हा कलाकारांना गायला बोलावलं. त्या वेळी त्या होस्ट बनून सर्वाचं स्वागत करीत होत्या. काही वर्षांपूर्वी चिंचवड येथे आशा भोसले पुरस्काराच्या त्या मानकरी म्हणून आल्या होत्या. तेव्हा माझा ‘सलाम आशा’ हा कार्यक्रम झाला होता. हे सर्वच क्षण मी हृदयात खोलवर जपून ठेवलेत.

१९९८ मध्ये माझ्या भाच्याच्या मोठय़ा ऑपरेशनसाठी दीदींनी आपणहून आर्थिक मदत पाठवली, हे मी सविस्तरपणे माझ्या पूर्वीच्या लेखात लिहिले आहेच. त्या वेळी माणुसकीचा एक अनोखा व सुखद अनुभव मी त्यांच्याकडून घेतला. त्या वेळी आभार मानण्यासाठी मी दीदींना फोन केला, पण फोनवर त्यांची भेट होऊ शकली नाही. बाळासाहेबांनी फोन घेतला. पण दीदी नसल्याने त्यांनी माझा निरोप त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवू असे सांगितले. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलता आले नाही ही रुखरुख मात्र मनात होतीच. २८ सप्टेंबर २००३. दीदींचा ७५वा वाढदिवस! मी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. पण माझ्या वतीने स्वरसम्राज्ञीला फुलांचा गुच्छ देण्यासाठी मी माझ्या त्या भाच्याला पाठवले. लोकांची आणि बुकेंची प्रचंड रांग बघून सिक्युरिटीवाल्यांकडेच बुके देऊन खट्टू होऊनच त्याला परत यावे लागले. पण माझ्या मनाला मात्र एकच समाधान होते की, वाढदिवसाच्या दिवशी स्वरसम्राज्ञीच्या स्वरांच्या पूजेसाठी माझी ही फुले तिथे हजर होती!

हल्लीच काही वर्षांपूर्वी मात्र मात्र उषाताईंनी, माझी दीदींना भेटण्याची इच्छा पूर्ण केली! आधी वेळ ठरवूनच मी त्यांना भेटायला गेले. त्यांच्या बेडरूममध्ये उषाताई मला घेऊन गेल्या. पाय दुखत असल्याने त्या बेडवरच बसल्या होत्या. त्यांचा चेहरा बघितला मात्र आणि त्या चेहऱ्याच्या आजूबाजूला मला त्यांची असंख्य गाणीच दिसू लागली. खोलीत फक्त त्या, उषाताई आणि मी! जवळ जवळ पाऊण तास मी तिथे होते. त्या अगदी शांतपणे, आस्थेने माझ्याशी बोलत होत्या. फारच अविस्मरणीय क्षण होता तो! कॉलेजमध्ये असताना केवळ त्यांच्या दर्शनाने हरवून गेलेल्या मला त्यांच्याशी इतका वेळ बोलण्याची संधी मिळाली.

इतक्या वर्षांच्या दगदगी, धावपळीनंतर आता कुठे दीदींना उसंत मिळत असेल! त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी देवाजवळ प्रार्थना करते की, उर्वरित आयुष्यात आता त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करता येवोत आणि त्यासाठी त्यांना तब्येतीची साथ मिळो!

आज ताडदेव रोडवरून नाना चौकाकडे जात असताना, शास्त्री हॉल आणि देऊळ, यामध्ये एक उंच बिल्डिंग दिसते. तळमजल्यावर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बरोबर त्याच जागेवर दीदींचं घर होतं. ज्या वास्तूत राहून त्यांनी आयुष्याशी झगडत, आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली, ती वास्तू मात्र पाडायला नको होती, ‘भारतरत्न’ असलेल्या लतादीदींचे पाय ज्या घराला लागले, ते घर पाडले जावे हे केवढे मोठे दुर्दैव!

पूर्वी त्या वास्तूत राहणारा माझा बालमित्र शाम जर आता कधी आयुष्यात मला भेटला, तर आता मी त्याला अभिमानानं सांगेन, अरे तुझ्या शेजारी लता मंगेशकर राहायच्या ना त्यांना मी नुसतीच भेटले नाही, तर त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत आणि मदतही!’’

मोबाइल क्रमांक- ९८२१०७४१७३

uttarakelkar63@gmail.com