इझिएस्ट डिफिकल्ट पोएट’ हा सुप्रसिद्ध लेखक त्रिभुवन यांचा गणेश विसपुते यांनी भाषांतर केलेला लेख वाचून लक्षात आलं की, ॲन कार्सन यांना मिळालेला नोबेल पुरस्कार किती योग्य आहे. त्यांच्या साहित्याचा दर्जा किती उच्च आणि प्रगल्भ असेल! लेखात म्हटल्याप्रमाणे विद्वत्ता आणि विनोद, विक्षिप्तपणा आणि खेळकरपणा, कठीण संहितांना सुलभपणे आजच्या संदर्भात जोडणं, हे सगळं त्यांच्यात आहे. याची जाणीव या लेखातूनच होते. ‘ऑटोबायोग्राफी ऑफ रेड’, ‘इरॉस द बिटरस्वीट’, ‘द ग्लास एसे’ ही पुस्तकं वाचायला हवीत, असं वाटू लागलं आहे. कार्सन यांच्यातला भाषांतरकार, अध्यापक, प्राचीन अभिजात साहित्याचा अभ्यासक आणि प्रयोगकला हाताळणारी कलावंत यांची ओळख त्यांचं साहित्य अभ्यासल्यावरच होईल. अरुण गंगाराम वावधाने, हिंगोली
वाचनातून भाषेचा प्रसार
२४ ऑक्टोबरचा दुलारी देशपांडे यांचा ‘वाचनाचा खजिना’ हा लेख वाचताना, एक व्यक्ती काय करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरयू पाटोळे-देसाई, असं वाटलं. त्यांनी सुरू केलेली वाचनचळवळ अतिशय स्तुत्य आहे. मुलांची वाचनाची आवड त्यांनी महाराष्ट्रात पसरवली आहे. त्यांचं हे म्हणणं पटलं की, आपल्याकडे कुठलाही विशेष दिवस हा त्या दिवसापुरताच मर्यादित असतो. हे दुर्दैवी वास्तव आहे. वाचनाची आवड वाढली की असंख्य नवे वाचक तयार होतील आणि त्यातून भाषेचा प्रसार व वापरही वाढेल. यातून काही रंगकर्मी आणि साहित्यिकसुद्धा तयार होतील. ही एक साखळी आहे. ती तुटता कामा नये. ही मुलं वाचनाची परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतील, असा विश्वास वाटतो. नीता शेरे
अंध क्रीडापटूंचं कौतुक
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी ‘क्रीडा संस्कृती’ या सदरात प्रसिद्ध झालेला डॉक्टर नीता ताटके यांचा लेख वाचला. अंध मुलींनी मिळवलेलं यश वाचताना खरंच आपण स्तिमित होतो. त्यांचं, त्यांच्या पालकांचं आणि त्यांना घडवणार्या प्रशिक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. डोळस माणसाला डोळे बंद करून पाच पावलंही सरळपणे टाकणं कठीण जातं. लाईट गेले की आपली कशी तारांबळ उडते, हे आठवलं की अंध व्यक्ती सगळ्या हालचाली इतक्या अचूकपणे कशा करत असतील, याचं नेहमीच आश्चर्य वाटतं. त्याही पुढे जाऊन सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खेळात प्रावीण्य मिळवणं, ही तर अगदीच अविश्वसनीय गोष्ट आहे.
लेखात उल्लेख केलेली ‘गर्भासन’, ‘लटकते पद्मासन’ ही नावं वाचूनच अंगावर काटा उभा राहिला आणि या खेळाडूंबद्दल अपार आदर वाटला. नारीशक्ती, दुर्गेचा अवतार वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या जातात, तरी पुरुष आणि स्त्री खेळाडूंच्या मानधनातली तफावत कायम आहेच. ती चीड आणतेच. म्हणूनच प्रश्न पडतो की, डोळस (?) माणसांचे आणि संघटनांचे डोळे कधी तरी खरंच उघडतील का? शोभा श्रीयान, अंधेरी
