दिल्लीत भरलेल्या शासकीय अधिकार्यांच्या पहिल्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’निमित्त हेमराज बागुल यांचा ‘दंडसत्तेतील बाईचं लिहिणं …!’ तसेच व्ही. राधा यांचा ‘चहा, प्रशासन आणि परिवर्तन’ हे दोन लेख ( ११ एप्रिल) वाचले. सेवेत असताना लिखाण करणार्या महिला अधिकार्यांची यादी करावयाची झाल्यास नीला सत्यनारायण, मीरा बोरवणकर, मनीषा म्हैसकर, मृदुला भाटकर आदी नावे चटकन डोळ्यासमोर येतात. महाराष्ट्राची निर्मिती झाल्याला यंदा ६६ वर्षे पूर्ण होतील. ओडिशा, प. बंगाल, राजस्थान राज्यातील जनतेने महिला मुख्यमंत्री झाल्याचे पाहिले, पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेस असे काही पाहण्याचा अजून योग आलेला नाही. व्ही.राधा यांच्या लेखामधून एखाद्या अधिकार्यास आवश्यक ते स्वातंत्र्य मिळाल्यास, प्रशासनात सकारात्मक बदल घडविण्याची क्षमता त्याच्यात असते हे अधोरेखित होते. पुढील काळात प्रशासनात अधिकाधिक महिलांना संधी मिळावी व मुख्य म्हणजे त्यांना निर्णयस्वातंत्र्य मिळावे जेणेकरून बदल होईलच, शिवाय त्यांतील काही अनुभव त्या वाचकांसमोर मांडू शकतील.
- शैलेश न. पुरोहित, मुलुंड (पूर्व)
प्रेम विसरले जात आहे?
वंदना कुलकर्णी यांनी लिहिलेला १८ एप्रिलच्या पुरवणीतला ‘इथे असावा प्रेम जिव्हाळा’ हा लेख मला प्रचंड आवडला. बदलत्या काळाचे स्वरूप त्यांनी खूप चांगल्या शब्दांत व्यक्त केले आहे. बदलत्या काळाबरोबर सर्व बदलत चालले आहे. आयुष्यात फक्त पैशालाच महत्त्व आले आहे. भावना, प्रेम, जिव्हाळा, शेजारधर्म, सर्व लोक विसरत चालले आहेत. आपली मुलंही कुणाशी लग्न करतील, कुणाचे जोडीदार होतील हे आपण सांगू शकच नाही. प्रेम जिव्हाळा फक्त आता काही चित्रपटांतच बघायला मिळतो.
- नामदेव गणपत राव, नवीन पनवेल.
आदर्श खेळाडू
‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती!’ या अनुपमा गोखले यांच्या लेखात (१८ एप्रिल) दिव्यांग महिला खेळाडूंनी विविध स्पर्धा तसेच पॅराऑलिम्पिक स्पर्धेत अनेक अडचणींवर मात करून मिळविलेल्या यशाची माहिती दिली आहे. हा लेख प्रेरक असून जिद्द असेल तर कोणतेही अडथळे मोठे नसतात हेच यातून सिद्ध होते. साध्या साध्या अडचणी आल्या तरी हातपाय गाळून बसणारे लोक पाहताना या खेळाडूंनी किती मोठे धैर्य दाखवून यश मिळवले याची जाणीव होते.
- अर्चना काळे
