चतुरंग नियमित वाचतो. यंदा जी नवीन सदरं सुरू केली आहेत ती केवळ अप्रतिम. त्यातील सानिया भालेराव यांचा १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘तुमसे हासिल हुआ’ हा ‘तिच्या नजरेतून तो’ या सदरातील लेख खूप आवडला. लेखिकेने अतिशय समतोल आणि संवेदनशीलतेने लिहिलं आहे. एक स्त्री पुरुषाला एवढा आदर देऊ शकते हे वाचून अचंबित झालो. त्यांनी एक वेगळा विचार मांडला आहे. आम्हा पुरुषांच्या बाजूने तेही एका स्त्रीने! हे खूप कौतुकास्पद आहे.

निनाद भास्कर, पुणे

 

संयत विचार 

सानिया भालेराव यांचा ‘तुमसे हासिल हुआ’ हा लेख वाचला. पुरुषांची बाजूच जणू कोणी मांडली आहे असं वाटलं. कित्येक दिवसांत इतकी संयत मांडणी असलेला लेख वाचला नव्हता. इतकं छान, मोकळं आणि सुंदर एखादी स्त्री व्यक्त होऊ  शकते यावर विश्वास बसत नाहीये. आम्हालाही कोणी तरी समजून घेऊ  शकतो आणि तेही एक स्त्री ही अविश्वसनीय बाब वाटते आहे. तसं पाहता सर्व स्त्री लेखिका या आम्ही पुरुष कसे भावनाशून्य आणि कोरडे, अत्याचारी आहोत असंच लिहीत आणि दाखवत आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर लेखिकेने लिहिलेला हा लेख म्हणजे केवळ कमाल. लग्नाला ४० र्वष झाली आमच्या. सौभाग्यवतीने देखील हा लेख वाचला आणि म्हणाल्या, मलाही तुम्हाला हेच सांगावंसं वाटत होतं. ते ऐकून छान वाटलं मला.

पंचम दाते

 

चांगल्या मुद्दय़ांचा विचार

‘तिच्या नजरेतून तो’ हे सदर फार आवडलं. ‘तुमसे हासिल हुआ’ हा अप्रतिम लेख वाचायला मिळाला. तसं पाहता आम्हा पुरुषांना प्रेम करताच येत नाही आणि आम्ही फक्त शरीरामध्ये अडकून पडतो असा कित्येक स्त्रियांचा गैरसमज असतो. पुरुषदेखील प्रेम करू शकतो हे लेखिकेने खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केले आहे. आपली ही बाजू घेऊन एक स्त्री लिहू शकते हे पाहून खूप आनंद झाला. लेखात कित्येक चांगले मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजामध्ये आम्हालाही कित्येकदा अपराध्यासारखं पाहिलं जातं. पण आम्हालाही मन असतंच ना.

शेखर माने, पुणे

 

भरून पावलो

‘तुमसे हासिल हुआ’ हा सानिया भालेरावांचा लेख वाचला. एखाद्या स्त्रीने इतकं अलवार लिहावं आणि तेही पुरुषाबद्दल हे वाचून खूप आनंद झाला. समाज आम्हा पुरुषांना एकाच नजरेतून कायम पाहात आला आहे. लेखिकेने एक वेगळाच ‘अँगल’ दिला आहे. या निमित्ताने का होईना पुरुषांकडे बघण्याची दृष्टी बदलू शकेल अशी अशा करतो. माझ्या लग्नाला ५० र्वष झालीत. हा लेख काल बायकोला वाचून दाखवला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणाली, ‘मला तुम्हाला इतक्या वर्षांत हे सांगायला जमलं नाही, हे मीच म्हणते असं समजा.’ भरून पावलो मी. मला जे मिळालं ते शब्दात मांडणे अवघड आहे.

सुमित व्यास, नागपूर

 

लालित्यपूर्ण लिखाण

सानिया भालेराव आपण जे लालित्यपूर्ण लिहिलं ते अप्रतिम आहे. एखाद्या पुरुषाला न सुचेल असा लेख आपण लिहिला हेच मुळात आपलं वेगळेपण सांगतं. पुरुषांचं इतकं छान वर्णन एक स्त्री करते हे अजब गजब. पण आहे कोणीतरी पुरुषांचा विचार करणारं. फारच छान लेखन करता आपण.

संतोष कुलकर्णी

 

प्रभावी, प्रगल्भ शैली

सानिया भालेराव यांनी लिहिलेला ‘तुमसे हासिल हुआ’ हा लेख अप्रतिम होता. अतिशय संयत मांडणी लेखिकेने केली आहे. स्त्रीवादी बायका पुरुषांना पाण्यात पाहतात नेहमीच. या पाश्र्वभूमीवर सानिया यांनी अतिशय तरल शब्दात जे पुरुषी स्वभावाचं दर्शन घडवलं आहे ते काळजात घुसतं. कित्येक वर्षांत इतका सुंदर, समतोल आणि भावनिक करणारा लेख मी वाचला नव्हता. गेल्या कित्येक वर्षांतल्या माझ्या भावना जणू कोणी मांडल्या आहेत असं वाटलं.  प्रभावी, प्रगल्भ शैली आहे त्यांची.

रश्मी कुलकर्णी, मुंबई

 

वास्तव चित्रण

सानिया भालेराव यांनी पुरुषांबद्दल जे वर्णन केले आहे की, ‘सगळ्या पुरुषांना बाईचं फक्त शरीर हवं असतं, असं वाटतं त्यांना ‘तो’ आजवर गवसलाच नाही.’ हे अगदी खरं आहे. ही गोष्ट तमाम स्त्री-पुरुषांना विचार करायला लावणारी आहे.  पुरुषाच्या प्रेम करण्याबद्दल आपली भावना सकारात्मक व खरी आहे. त्यातली शेरोशायरी आवडली. स्त्रीच्या आयुष्य जडणघडणीत पुरुष काय करू शकतो याचे वास्तव चित्रण आपण उभे केले आहे.

दिलीप माणकेश्वर, औरंगाबाद

 

काल सुसंगत आणि चपखल

सानिया भालेराव यांनी अतिशय समतोल आणि तरल विचार लेखात मांडला आहे. सतत कर्कश स्त्रीवादी (?) लेख आजकाल वाचायला मिळतात. स्त्रीवादाचा खरा अर्थ मिटवून टाकणाऱ्या लेखांच्या भाऊगर्दीत कोणीतरी असा समतोल लेख नव्याने लिहावा असं सतत वाटत होतं. आजचा लेख फारच काल सुसंगत आणि चपखल झाला आहे. आपल्या इथे समतोल विचार आणि तसे जगणेही फारच विरळा! एकाच बाजूने विचार होत राहतो, कुठे तरी हे थांबले पाहिजे. त्याची नवी सुरुवात या लेखाने व्हावी.

सोनाली कोलारकर-सोनार, नागपूर