अनुराधा सहस्रबुद्धे यांचा १० फेब्रुवारीच्या अंकातील ‘जादू की झप्पी’ हा लेख मनापासून आवडला. त्यातले अनुभव कुठे तरी आम्हालासुद्धा जोडून गेले. आजकाल उच्चभ्रू लोकांमध्ये अगदी लहानपणापासून मुलांना स्वतंत्र खोलीत झोपवले जाते. बालपणापासूनच ही स्पर्शाची कमी मुलांना जाणवत असेल. प्रवासातसुद्धा असे लक्षात येते की, आई-वडील जवळजवळ बसतात आणि मूल एका कडेला. पूर्वी मुलं मध्ये असायची. १२/१२ तासांच्या नोकरीमध्ये अडकलेले आईवडील आणि शाळा-क्लास यांच्या चक्रात फिरणारी मुले. यांच्या वाटय़ाला हा जादूभरा स्पर्श येतच नसेल का? आठवी, नववीच्या वयापासून मुलामुलींच्या जोडय़ा फिरताना दिसतात, त्यातल्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण असेल का? ही स्पर्शाची ओढ म्हातारपणीही असते. स्त्रियांमध्ये तो सहज भाव आहे. त्यामुळे मुली आईवडिलांना सहज मिठी मारतात आणि ही जादूची झप्पी देतात; पण फक्त मुलगे बरेच वेळा यापासून वंचित राहतात. मुलांसारखी वृद्धांनाही या जादूच्या झप्पीची गरज असते.

वाकून नमस्कार केल्याने गुरुत्वाकर्षणामुळे मेंदूकडचा रक्तप्रवाह वाढतो आणि त्या व्यक्तीचाच फायदा होतो हे आज आवर्जून सांगितले जाते आणि पाहिजेही. नमस्कारानंतर उजव्या हाताने समोरच्या व्यक्तीच्या डोक्याच्या डाव्या भागाला स्पर्श होतो, डाव्या मेंदूला संवेदना जातात आणि तो अत्यल्प उद्दीपित होतो हाही एक फायदा. नमस्कार न करण्याने तो राहून जातो हेही लक्षात आणून दिले पाहिजे.

– डॉ. प्राजक्ता देवधर

 

समीरच्या जिद्दीला सलाम

१७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘अपूर्णाक’ सदरातील प्रतिभा हंप्रस यांचा ‘देही मी परिपूर्ण, तरीही..’ हा लेख वाचला. या लेखातील स्वानुभव थरारून टाकणारा आहे. अचूक आणि योग्य शब्दांत अनुभव, वैद्यकीय माहिती यासाठी खास कौतुक. समीरच्या जिद्दीला सलाम. आपल्या सर्व कुटुंबाचे, कौतुक, एकजूट व दुर्दम्य आशावादासाठी अभिनंदन. सेरेब्रल पाल्सी म्हणजे, ‘देही मी परिपूर्ण, अनियंत्रित माझी काया, मनातल्या भावनांना, स्वप्नांना, वेदनेची छाया’ इतक्या अचूक शब्दांत आपण व्यथा व्यक्त केलीत. कुठून आणि कसे गवसले आपल्याला हे शब्द. आपल्या लेखातीलच शब्द ‘दिव्यांग, विकलांग, अपंग’ या शब्दांनाच समीरने आपल्या जिद्द, कष्ट व संघर्षांतून ‘विकल’ बनवले आहे. मग आम्हाला हतबल होऊन कसे चालेल? यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

– रमेश देव, ठाणे</strong>

 

मार्गदर्शक लेख

मंगला जोगळेकर यांनी १७ फेब्रुवारीला लिहिलेला ‘जेव्हा मेंदू असहकार पुकारतो’ हा लेख वाचला. फार तळमळीने लिहिला आहे हा लेख. कारण असे लिखाण फार कमी लिहिले जाते, पण आज ती काळाची गरज आहे. लेख सावकाश वाचला. माझे वय ७० आहे व मागील वर्षी माझ्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले. दोन कर्ती मुले, सुना, एक मुलगी या सर्वाचे लग्न झाले. मला ओसीडी हा आजार १० वर्षांपासून आहे, पण मानसिक उपचार सुरू आहेत. आजार जाणवतही नाही. दररोजचे जीवन सुरळीत आहे, पण स्मरणशक्ती थोडी कमी झाली. काही दररोजच्या वापरातील वस्तू, ओळखीच्या व्यक्तींची नावे आठवत नाही. माझ्यासारख्या अनेक रुग्णांना आपला लेख मार्गदर्शक आहे.

– सखाराम कंचलवार, नांदेड

 

हसण्याचं स्वातंत्र्य आहे का?

मृणाल पांडे यांचा अनुवादित लेख १७ फेब्रुवारीच्या अंकात वाचला. मृणाल पांडे यांनी उपहासात्मक शैलीत लिहिलेला हा लेख स्त्रियांच्या हसण्यावरील सत्य परिस्थिती कथन करतो. माझ्या लहानपणी माझ्या आजी-आजोबा आणि काकांनी माझ्या हसण्यावरती अनेकदा वाईट शब्दांत टीका केली आहे. मी जसजशी मोठी होत गेले तसतसे हसणे हेच माझ्या दु:खावरचा इलाज आहे हे समजत गेले. आज पन्नाशी गाठली असून मी माझ्या हसण्याची शैली अजिबात बदलली नाही; पण माझ्या मनात नेहमी विचार येतो की, आपल्या देशातील किती स्त्रियांना असं हसण्याचं स्वातंत्र्य आहे.

– मनीषा रुद्राक्ष 

 

खरंच लग्न कशासाठी?

‘लग्न कशासाठी’ हा ‘विवाहाचा अर्थ’ या सदरातील अनिल भागवत यांचा लेख आवडला. सर्व मुद्दे पटतील असेच आहेत. व्यसनी/बिघडलेली/मंदबुद्धी मुलांची सुधारतील म्हणून लग्नं लावून देतात. लग्नानंतर सुधारेल म्हणून अनेकदा दारुडय़ा, ड्रग्स वा तत्सम व्यसनं करणाऱ्या मुलांची लग्नं केली जातात.. तो व्यसनी आहे ही गोष्ट बहुधा लपवली जाते. व्यसनं सुटत नाहीच, पण त्या मुलीचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त होतं. याउलट, ओळखीतल्या काहीशा मंद अशा दोन मुलींची लग्नं करून दिलेली मी पाहिली होती. लग्नानंतर सुधारतील म्हणून, पण दोघी वर्षभरात माहेरी परतल्या. एकीला तान्ह्य़ा मुलीसकट परत पाठवलेलं. दोघी श्रीमंत घरातील असल्याने पैशाच्या लालसेमुळे लग्नं झाली, पण ती टिकली नाहीत.

लग्नामुळे व्यसनं खरोखर सुटतात? मानसिक आजार बरे होतात? यावर काही संशोधन, अभ्यास झाला आहे? की लग्नाकडे ‘खडा मारून पाहू या, लागला तर ठीक’ अशा दृष्टीने पाहिलं जातं? की ट्रायल आणि एरर मेथड इथेही?

– उल्का राऊत