१७ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘सफर खाद्यग्रंथांची’ या सदरात डॉ. मोहसिना मुकादम/ डॉ. सुषमा पौडवाल यांनी लक्ष्मीबाई वैद्य लिखित ‘पाकसिद्धी’ या पुस्तकाचा आणि त्या अनुषंगाने लेखिकेचाही परिचय करून दिला आहे. या लेखामुळे वैद्यबाईंविषयीच्या आमच्या आठवणींना उजाळा मिळाला.

इयत्ता ५ वी ते ७ वीपर्यंत वैद्यबाईंचे गृहजीवनशास्त्र (आता आठवतेय त्याप्रमाणे) हे पुस्तक आमच्या क्रमिक अभ्यासक्रमात होते. त्यात शरीरशास्त्र, सामान्य विज्ञान, सर्वसामान्य आजार, त्यावरील उपचार, पथ्यपाणी इत्यादींची माहिती होती. आमच्या आठवणीप्रमाणे त्यांनी (बाहुलीला घेऊन) बाळाला पायावर घेऊन अंघोळ घालण्यापासून ते लंगोट बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींचे प्रात्यक्षिक करून दाखविले होते.

स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी केस वरती बांधून घेणे, हात धुणे, शेगडीसमोर पाटावर ठरावीक पद्धतीने मांडी घालून बसणे इत्यादी कितीतरी गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलो. कोशिंबिरीसाठी काकडी चोचविण्यापासून बटाटाभजी, शिरा, साबुदाणा खिचडी, भाकरी इत्यादी स्वयंपाकातील बरेच पदार्थ वैद्यबाईंनी शिकविले व आमच्याकडून करून घेतले. कोळशाची शेगडी कशी पेटवायची, कुकर कसा लावायचा, पानात डावीकडे – उजवीकडे कसे व काय वाढायचे अशा अनेक गोष्टी पुण्यातील हुजूरपागेत असताना आम्हाला वैद्यबाईंनी शिकविल्या, ज्या पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडल्या. अशा आमच्या वैद्यबाईंना शतश: प्रणाम आणि धन्यवाद. शाळा सोडून पन्नास वर्षे झाली तरी या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

या लेखाच्या निमित्ताने आमच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. त्याबद्दल डॉ. मोहसिना मुकादम व डॉ. सुषमा पौडवाल यांना मनापासून धन्यवाद.   स्वाती दामले व नयना रणदिवे (दादर)

 

विचार कसे पचवणार?

चित्रा पालेकर यांना खूप खूप धन्यवाद. २४ जूनच्या अंकात ‘लगोरी’ या सदरात ‘वेगळी’ हा लेख लिहून आपण अतिशय महत्त्वाच्या विचाराला वाट मोकळी करून दिलीत. तुमचे विशेष अभिनंदन प्रामाणिकपणे लिखाण केल्याबद्दल. तुमच्या कन्येचे अभिनंदन. त्यांनी दिलेले डावखुऱ्या व्यक्तीचे उदाहरण. मुख्य मुद्दा आम्ही खूप संस्कृतीची बोचकी पाठीवर घेऊन जीवन अस करतो. आर्यलडचे नवे पंतप्रधान आणि आमचे कोकण.. त्यांचे गे असणे जाहीर.. विचार कसे पचवणार?   रंजन जोशी, ठाणे

 

नाटकापलीकडेही काही!

३ जून रोजी प्रसिद्ध झालेला सृजनरंग या सदरातील प्रतिभा निमकर यांचा ‘बालनाटय़ातून बालविकास’ आणि १७ जून रोजी प्रसिद्ध झालेला ‘छोटय़ांच्या मोठय़ा गोष्टी’ दोनही लेख वाचले, आवडले. ‘नाटय़ं भिन्नरूचैर्जनस्य बहुधापि एकं समाराधनम्’ या संस्कृत वाक्याची प्रकर्षांने आठवण झाली. खरंच विविध प्रकारच्या आवडी असणाऱ्या सर्व लोकांचे ‘नाटक’ हे मात्र मनोरंजनाचे साधन असतेच, कारण ‘नाटक’ हे मनुष्याच्या खूप जवळचं आहे. नाटकात दिसणारे अनेक प्रसंग, व्यक्तिरेखा या आपण आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेल्या असतात, म्हणून त्यातून मिळणारा आनंदही अधिक असतो. परंतु यापलीकडे जाऊन बालपणीच्या वेशभूषा स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा यांसारख्या गोष्टींतून आपल्या उज्ज्वल भविष्याचा पायाही रचला जाऊ  शकतो हे उत्कृष्ट रीतीने व्यक्त होते. या लेखातून नाटकाचे विकासाच्या दृष्टीने  विविध महत्त्वपूर्ण पैलू तर उलगडले गेलेच, मात्र त्याचबरोबर नाटकाने व्यापलेले मानवी जीवन व नाटय़वेडातून अनेकांची आयुष्य घडत असताना नाटकाने त्यांना दिलेली शिदोरी ही आयुष्यभर कशी पुरून उरते हेदेखील लेखात रेखाटले गेले. हा प्रतिसाद लिहीत असताना प्रख्यात समीक्षक प्रा.चं.दां.चाकणकरांचे एक वाक्य प्रकर्षांने आठवले, ते म्हणतात, ‘अनुभूती ही अल्पकालीन असली तरी तिची आविष्कृती मात्र दीर्घ असू शकते.’ अगदी असंच बालनाटय़ाबाबतही आहेच. बालवयात या बालनाटय़ाने दिलेली ही अल्पकालीन अनुभूती अनेक नाटय़वेडय़ांच्या आयुष्याची आविष्कृती होऊन जाते. नाटक म्हणजे आजही सामाजिक समस्या लोकांसमोर मांडण्याचा एक सहज आणि सोपा मार्ग. नाटकाने फक्त नटच दिले नाहीत तर आपले सामाजिक भान जपत वेगळा मार्ग निवडत आपलं नाव उज्ज्वल करणारी व्यक्तिमत्त्वेही दिलीत.

अश्विनी काकासाहेब लेंभे, औरंगाबाद

 

भावनिक साक्षरता

डॉ.नंदू मुलमुले यांचा १० जून रोजी ‘मन विकार विचार’ या सदरात प्रसिद्ध झालेला ‘यू टर्न’ हा लेख फारच सुंदर आहे. वाचल्यावर स्वत:चे आत्मपरीक्षण करण्यास प्रेरणा मिळते. खरंच प्रत्येकाने रागाला ‘यू टर्न’ केले तर जीवनात काय बहार येईल. क्रोध ही एक ऊर्जा आहे. क्रोधावर क्रोध एक चक्र निर्माण करतो. त्यास विध्वंसाची धार येते, सगळी सूत्रे मेंदूच्या हाती जातात. विवेकाचा आवाज क्षीण होतो. क्रोधाला (स्वत:ला) ओळखणे आणि समजून घेणे,

हीच भावनिक साक्षरता, ती नसेल तर आम्ही ज्ञानवंत सारे निरक्षर. खरंच आहे चला क्रोधास ‘यू टर्न’ करू या.   प्रभाकर शेकदार, ठाणे      

 

मनोबल वाढले

‘प्रबळ जीवनेच्छा’ हा अंजली पेंडसे यांचा १७ जून रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचून वयाच्या शहात्तराव्या वर्षी मनोबल वाढले. जुन्या पिढीतील लोकांमध्ये त्याग, समर्पण व सद्भावना होती अर्थात त्यापायी अनेकदा त्रास व्हायचा. स्वार्थी लोकांकडून गैरफायदा तसेच सद्य परिस्थितीत पैशाला महत्त्व आल्याने आपण आयुष्यात कमी पडलो असे विचार अनेकांच्या मनात येतात. परंतु वाटय़ाला आलेले आयुष्य आपण नीतिमूल्ये जोपासून व सामंजस्याने जगून माणुसकी सांभाळली हे समाधानसुद्धा मोठे असते. अलीकडे तर वृद्धापकाळात मानसिक क्षमतेचा कस पाहणारे प्रसंग येतात तेव्हा सन्मार्गानेच चालण्याची प्रेरणा देणारे लेख ‘चतुरंग’मध्ये वाचून मनाला दिलासा मिळतो.   सिमंतीनी काळे, सातपूर, नाशिक

 

विसंवादाचे रूपांतर संवादात करण्यासाठी.. 

नीलिमा किराणे यांचा १० जून रोजी प्रसिद्ध झालेला ‘घरं : अस्वस्थ, खदखदणारी’ हा पालक मुलांमधल्या विसंवादावर आणि समस्यांवर भाष्य करणारा लेख चांगला वाटला. नीलिमा किराणे यांनी मांडलेल्या समस्या या वास्तवाला धरून आहेत. लेखात दिल्याप्रमाणे या विसंवादाचे रूपांतर संवादात करण्यासाठी मोकळ्या संवादाचा, मुलांना देण्यात येणाऱ्या अर्थपूर्ण सोबतीचा नक्कीच उपयोग होईल.

एकत्र कुटुंब हे एकल कुटुंब होऊ लागल्यापासून विविध समस्यांवर होणारे मार्गदर्शन आणि मिळणारा भावनिक आधार नाहीसा झाला आणि त्यामुळेच एकल कुटुंबांमध्ये पालक आणि मुलांनी एकमेकांना भावनिक आधार देणे गरजेचे बनले आहे.

स्पर्धेच्या युगात मुलांना जिंकण्यासाठी तयार करताना आपण त्यांना एखादी गोष्ट निखळ आनंदासाठी करावी हे शिकवायला विसरतो. जिंकण्यात आनंद आहेच. पण दुसऱ्याला हरवून जिंकण्याने होणाऱ्या आनंदापेक्षा दुसऱ्यासाठी केलेल्या लहानशा गोष्टीतला आंनद हा अनेक पटीने मोठा असतो हे शिकवण्यात आपण कमी तर पडत नाही ना? मुलांकडून पालकांनी ठेवलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांची स्वप्नं त्यांच्या अपेक्षा दाबल्या जाणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. त्याचबरोबर मुलांच्या अपेक्षा पूर्ण करताना पालकांनी स्वत:च्या स्वप्नांना घातलेली मुरड मुलांनी समजून घेणेही गरजेचे आहे. खरंतर आपल्या आचरणातून मुलांवर आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर आपण कळत-नकळत संस्कार करत असतो. मुलांना आदर्श व्यक्ती बनवण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करत असताना पालकांचे आचरण हे आदर्शच असायला हवे. पालकच जेव्हा मुलांचे रोल मॉडेल होतील तेव्हा आपण एक आदर्श समाज घडवण्याकडे वाटचाल करू शकतो. आपण केलेल्या कृतीमधून किंवा वादातून आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे याचा प्रत्येकाने विचार केला तर विसंवादाचे रूपांतर हे संवादात नक्कीच होईल.   सुशांत जाधव

 

चिंताजनक गुणपद्धती

‘गुणांचे अवगुण!’ हा मेघना जोशी यांचा २४ जून रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षण पद्धती यावर मांडलेली वस्तुस्थिती आणि व्यक्त केलेला खेद अत्यंत योग्य आहे. तसेच ‘घोका आणि ओका’ अशी प्रचलित असलेली सध्याची शिक्षण पद्धत व पालकांची मानसिकता पाहता मुलांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टिकोनातून विचार होताना दिसत नाही. सध्याची शिक्षण पद्धत आणि त्या अनुषंगाने भविष्यातले करिअर आणि मिळणारे गुण पाहता व्यक्त केलेली चिंता खरोखरीच आत्मपरीक्षण करावयास लावणारी आहे. पूर्वी अनुत्तीर्ण झाला तर काळजी वाटायची, परंतु आता उत्तीर्ण झाला तरी काळजी वाटते. त्यातून या वर्षी तर काहींना १०० टक्के गुण मिळाले हे खरोखरीच विचार करण्यासारखे आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्ये १०० टक्के गुण मिळू शकतात, पण भाषा विषयांचे काय? एकूणच शिक्षण पद्धती व पालकांची मानसिकता आणि शिक्षणाचे होत चाललेले बाजारीकरण त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्यातली कला, आवड, अभिरुची याबाबत निवड करणेसुद्धा कठीण होत चालले आहे. या क्षेत्रात आयसीएससी, सीबीएससी आणि एसएससी बोर्डमधील वाढती स्पर्धासुद्धा कारण असू शकते. इतकेच नव्हे तर शासकीय शिक्षण व्यवस्थेलासुद्धा समांतर खासगी कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट टय़ूशनसुद्धा कारणीभूत आहेत. एकूणच आपली शिक्षण पद्धत, समाज व्यवस्था हे जगण्याचे तंत्र आणि मंत्र सांगणारे शिक्षण कसे देता येईल याचा जेव्हा विचार होईल तेव्हा खऱ्या अर्थाने गुण आणि गुणवत्ता यांची जीवनात सांगड घातली जाईल.  पुरुषोत्तम आठलेकर