पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी..

पहिल्या सायकलच्या वेळी हा कप मी घरीच वापरत होते.

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी..
‘कथा त्या कपाची’ या एका सुंदर लेखासाठी ‘चतुरंग’ आणि लेखिका गौरी दाभोळकर यांचे आभार. हा लेख वाचल्यावर मलाही हा कप वापरायची खूप इच्छा झाली. म्हणून मग मी यू टय़ूबवर या संबंधीचे भरपूर व्हिडीओ बघितले. एखादी गोष्ट नव्याने वापरायची असेल तर मनात थोडी धाकधूक असते की नीट जमेल नं मला? अशा वेळी त्या गोष्टीची सवय करून घ्यायला हवी. त्यासाठीच मी जोपर्यंत पूर्ण कल्पना येत नव्हती की हा कप वापरायचा कसा तितक्या वेळा हे व्हिडीओ बघितले. त्याचबरोबर या कपासंदर्भातले लेख, ब्लॉग्स इंटरनेटवर वाचत होते. तेव्हा हळूहळू या लक्षात आले की,हे काही खूप कठीण नाही. माझ्या शंका यामुळे दूर झाल्या. या लेखाच्या लेखिका
गौरी दाभोळकर यांच्याशी मी ई-मेल वर संपर्क साधला. त्यांनीही मला सहकार्य केले आणि माझा धीर वाढला. जेव्हा सगळ्या शंका दूर झाल्या तेव्हाच मी तो कप ऑनलाइन मागवला. ज्या वेळी हा कप वापरायची वेळ आली तेव्हा दोन-तीनदा प्रयत्न करूनही मला जमले नाही. मग मी परत व्हिडीओ बघितले, परत प्रयत्न केला आणि अखेर मला जमले. पहिल्या सायकलच्या वेळी हा कप मी घरीच वापरत होते.
मी एक नोकरी करणारी स्त्री आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अवघडलेपणा वाटायला नको म्हणून मग मी मला जेव्हा आत्मविश्वास आला की मी व्यवस्थितपणे हा कप वापरू शकते, तेव्हाच मी घराच्या बाहेर हा कप वापरायला सुरुवात केली. खरेच खूप छान अनुभव आला मला. सॅनिटरी नॅपकीन्स वापरताना काही तासांनी जो अवघडलेपणा येतो तो नकोसा वाटतो. पण हा कप वापरताना मला जाणवायचे नाही की माझे पीरियड चालू आहेत म्हणून. हे खरे की प्रॅक्टिस व्हायला थोडा वेळ लागतो, पण जेव्हा आपण सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला सुरुवात केली तेव्हाही माझ्या मते काही जणींना सवय व्हायला थोडा वेळ लागलाच असणार. त्यामुळे कपाची ही सवय व्हायला थोडा वेळ द्यायला काहीच हरकत नाही. आज इंटरनेट सगळ्यांकडे आहे त्यामुळे यासंदर्भात आपल्याला हवी तेवढी माहिती मिळू शकते. ही प्रतिक्रिया देण्याचा उद्देश हाच की, माझ्या अनुभवातून इतरांनाही हा कप वापरायाची इच्छा व्हावी आणि आपल्याकडून नॅपकिन्समुळे पर्यावरणाची जी हानी होते ती काही अंशी का होईना पण कमी व्हावी.
– निकिता ठाकरे, बोरिवली (प.)

वस्त्रहरण पाहण्याची ओढ
‘दृष्टीआडची सृटी’ या सदरामध्ये ३० एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या गंगाराम गवाणकरांच्या ‘वस्त्रहरण’संबंधीच्या आठवणी एकदम विलक्षण रोमहर्षक आहेत. यावरून असे लक्षात येते की, जिद्द चिकाटी व आपल्या कामावरील प्रेम माणसाला फार काळ यशापासून दूर ठेवू शकत नाही. तसेच त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले की ‘पुलं’ची प्रतिक्रिया त्यांच्यासाठी खरी यशाची वाटचाल ठरली. हा अनुभव वाचकांसाठी खूप रोमांचकारी होता. मी स्वत: हे नाटक पाहिलेले नाही पण हा लेख वाचल्यावर मात्र कधी बघतेय असे झाले आहे.
नीलिमा किराणे यांचे ‘संवादाने रचला पाया’ या सदरातील लेख एकदम मानवी मनाचा विचार करायला लावणारे असतात. वासंती वर्तक यांचे ‘एकला चलो रे’ मधील कुसुम तहराबादकार यांचे तीन पिढय़ांचे पालकत्व कसे प्रेमाने पार पाडले ते वाचले. स्वत:च्या दु:खाचे भांडवल न करता कर्तव्य व्यवस्थित पार पाडणे म्हणजे काय ते कळाले.
– अंकिता शिर्के, कळवा (ठाणे)

प्रसन्न वाटावा असा लेख
हास्य दिनाचे निमित्त साधून डॉ. सुवर्णा दिवेकरांनी (मराठी) विनोदाचा आधार घेत, ‘सवंगतेकडून, सकारात्मकतेकडे’ या लेखाच्या माध्यमातून मराठी साहित्यात होणाऱ्या स्त्रीच्या अवहेलना, अप्रतिष्ठेची खऱ्या अर्थाने सकारात्मकतेकडे चालू असलेली वाटचाल वर्णिली आहे. कटुतेचा लवलेश नसलेली, प्रसन्न वाटावी अशी!
– अनिल ओढेकर, नाशिक

प्राचीन संशोधनाची आपल्याकडूनच उपेक्षा
‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ हे वैद्य हरीश पाटणकर यांचे सदर फार उपयुक्त असते. ‘दातांचे आरोग्य’ या लेखातील ‘कोळशाने किंवा राखेने दात घासा म्हटलं तर कोणी घासणार नाही, मात्र चारकोलयुक्त पेस्टने घासा म्हटले की लगेच विश्वास ठेवून घासतील.’ हे विधान नेमके आहे. बाजारू अर्थव्यवस्थेद्वारे आपल्याला मूर्ख बनवणारी यासारखी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात.
अधिकाधिक नफा ओरबाडणे हा निर्माते आणि व्यापाऱ्यांचा धर्मच आहे. या परिस्थितीला आपण ग्राहकच जबाबदार असतो. आयुर्वेदासारख्या आपल्या प्राचीन संशोधनाची आपणच उपेक्षा करतो आणि परदेशी कंपन्यांच्या चमकदार विक्रीतंत्राची भुरळ पडून त्यांना शरण जातो.
– प्रमोद तावडे, डोंबिवली

पालकांची जबाबदारी घेणारेही अधिक
२६ मार्चच्या पुरवणीमध्ये ‘दिल्या घरचीसुद्धा आहे म्हातारपणाची काठी’ आणि ‘म्हातारपणाची काठी, वंशाचा दिवा वगैरे वगैरे’ हे लेख ज्येष्ठ नागरिकांशी निगडित आहेत. मुला-मुलींवर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून नसणारे अनेक ज्येष्ठ आहेत, पण अवलंबून असणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
कायदा केला तरी मुलं-मुली आई-वडिलांची जबाबदारी घेतीलच याची शाश्वती नाही. प्रेम किंवा कर्तव्याची भावना कायद्याने निर्माण करता येत नाही. याबाबतीत प्रत्येक घराची कहाणी वेगळी असते. आई-वडिलांची जबाबदारी घेणाऱ्या मुली सासूला मात्र वृद्धाश्रमात ठेवतात. लांब राहून दोघांच्या, आई-वडिलांच्या अडचणीच्यावेळी मदत करणारी मुलेही आहेत. आई-वडिलांनी मात्र ‘नटसम्राट’ न होता आपल्या भविष्याची सोय तरुणपणापासूनच करावी. दुसरी बाजू म्हणजे प्रत्येक वेळी मुलेच दोषी असतात असे नाही. नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. वृद्धांनी सतत कुरकुर करू नये. ८०/९० वर्षांच्या वृद्धांची मुलेसुद्धा ‘तरुण वृद्धच’ असतात.
– वासंती सिधये, पुणे.
जबाबदारी ओळखायला हवी
‘आजचं मरण उद्यावर’ हा रेश्मा भुजबळ यांचा लेख आशादायी असला तरी एक दिवस हे मरण अटळ असल्याची जाणीवही करून देतो. मात्र तरीही या वारोळा तांडय़ावरच्या खऱ्या अर्थाने शिक्षित मुलींचा निर्णय कौतुकास पात्र ठरतो. हुंडा देण्यासाठी अथवा मुलीच्या लग्नाच्या दिखाऊ खर्चापायी आत्महत्या करणारे कित्येक बाप आसपास आहेत. समाज शिकला तर तो जाचक रूढी-परंपरांना छेद देईल हा आशावाद आज भाबडा ठरू पाहतोय. शिकलेला अन् त्यातही नोकरीला असलेला मुलगा म्हणजे या पृथ्वीतलावरील अलौकिक गोष्ट झाली आहे. खर तरं शिकलेल्या मुलांनी अजिबात हुंडा न घेता साधेपणाने लग्न करायला हवं.
त्याचप्रमाणे शिक्षितांनी गरीब, शेतकरी, मजूर यांच्या होतकरू मुलींशी लग्न करून त्यांच्या स्वप्नांना नवीन अवकाश उपलब्ध करून द्यायला हवे. आज अशा कित्येक गावांत ज्योती, आरती आहेत ज्यांची आभाळाएवढी स्वप्न फक्त सुशिक्षितांच्या हुंडय़ाच्या मोहापायी पूर्ण होऊ शकत नाहीत. मात्र आजच्या बहुतांश सुशिक्षितांची मानसिकता पाहता सध्या तरी हे एक स्वप्नरंजनच आहे.
आपली मुलगी हेच आपले आयुष्य मानून चटके सोसत जगणारा एखादा गरीब बाप मात्र या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा बळी ठरतो. आपण भोगलेले दारिद्रय़ तरी निदान मुलीच्या वाटय़ाला येऊ नये या त्याच्या इवल्याशा स्वप्नाचा लाखांत सौदा होतो. मग कर्ज काढून, घर शेती विकून ही किंमत मोजली जाते. कधी ही किंमत कित्येक बापांच्या जिवावर उठते.
पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात पसरलेलं हे शैक्षणिक आणि सामाजिक षंढत्व अतिशय धोकादायक आहे. पैशाच्या मोहात वावरणाऱ्या नवरा नामक प्रजातीला वठणीवर आणणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने विचार करता हे मरण निदान उद्यावर ढकलण्यात या मुली यशस्वी ठरल्या आहेत. एक आदर्श समाज म्हणून आपण आपली जबाबदारी ओळखून त्यांना पाठबळ दिले तर निश्चितच हे मरण कायमचे टळू शकते.
– राम पानखडे, शेवगाव, नगर

अनेक बाबींचा ऊहापोह अपेक्षित
९ एप्रिलच्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला ‘या कातरवेळी..’ हा ज्येष्ठ नागरिकांना ‘पाहिजेस तू जवळी’ हा संदेश देणारा मृणालिनी चितळे यांचा लेख वाचला. लेख अतिशय चांगला झाला यात वादच नाही, पण आपण विचारात घेतलेले उदाहरण दोन्ही बाजूकडे अनुकूल परिस्थिती असणारे आहे. जरी दोघांची संमती असली तरी अनेक वेळा मुलांच्याकडून विरोध असणे, आर्थिक हितसंबंध कसे असावेत याबाबतीत लेखात सोदाहरण मार्गदर्शन झाले असते तर नंतर अपयश येण्याचे प्रमाण टाळता येऊ शकेल असे वाटते. तसेच ‘लीव्ह इन’ प्रकारातील अनुभव काय आहेत याचाही सोदाहरण ऊहापोह अपेक्षित होता असे वाटते. आपण एक चांगला विषय निवडलात याबद्दल आपले अभिनंदन. त्यावर विविध स्तरावर (विशेषत: ज्येष्ठ नागरिक संघातून) चर्चा होणे गरजेचे आहे.
– प्रसाद भावे, सातारा.

‘मूल ही टॉप प्रायोरिटी हवी’
९ एप्रिलच्या पुरवणीतील आकाश कंदील करणाऱ्या गोदावरी सातपुते या बाईंचं कौतुक करावं तेवढं थोडंच. ‘काचेचे छत’ हा लेख वाचून असं वाटतं, करिअर या शब्दाला, मोठय़ा पगाराची नोकरी एवढाच अर्थ आहे का? ज्या बाळाला आपण जन्म दिलाय त्याला मोठा करायला सतत दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा का करायची? मूल थोडं मोठं झाल्यावर करण्यासारख्या असंख्य गोष्टी असतात. मोठा पगार म्हणजेच प्रगती का? अर्थात माझे विचार प्रतिगामी वाटण्याची खूपच शक्यता आहे, पण जे मूल आपण आपल्या इच्छेने जगात आणलंय ते आपली टॉप प्रायॉरिटी हवं असं मला वाटतं.
सुरेश खरेंचा लेख ‘पडद्यामागचे नाटक’ सेन्सॉर बोर्डावर चांगले कोरडे ओढणारा आहे. खरंच ते सदस्य आपलं म्हणणं कोणी विचारात घेतलंय का ते बघतात का? रेणू गावस्करांचे लेख नेहमीच हृदयस्पर्शी असतात.
– नंदिनी बसोले

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वाचक प्रतिक्रिया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers response on loksatta chaturang articles

ताज्या बातम्या