आर्थिकदृष्टय़ा पारदर्शकता नात्यात महत्त्वाची
२६ मार्चच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या ‘दिल्या घरची..’ आणि ‘म्हातारपणाची काठी..’ या दोन उद्बोधक लेखाच्या वाचनाने माझ्या मनातील जखम ठसठसू लागली. केवळ वडिलांच्या वृद्धापकाळी त्यांची सेवा केली त्याचे फळ म्हणजे माझी रक्ताची नाती माझ्यापासून कायमची दुरावली.
भावाच्या व्यसनाधीनतेमुळे वहिनी काही वर्षांपूर्वीच मुलांना घेऊन स्वतंत्र राहू लागली होती. बहिणीचे घर दूरवर होते. त्यामुळे बाबांच्या घरापासून माझे घर जवळ (एका स्टेशनचे अंतर) असल्याने साहजिकच त्यांची सर्व जबाबदारी आपसूकच मी घेतली. वहिनीला त्रास नको म्हणून बाबांची आजारपणं, शस्त्रक्रिया यांचा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक ताणही मी आणि माझ्या पतीने सहन केला. बाबांच्या निधनापूर्वी साधारणत दीड वर्षांपूर्वी भावाचेही निधन झाले. अर्थात तो असूनही बाबांच्या वृद्धापकाळी त्याची काहीही मदत नव्हती. बाबांच्या अखेरच्या दिवसात ते एक महिना रुग्णालयात तर दोन महिने माझ्या घरी होते. या दोन महिन्यात ते पूर्णत: रुग्णशय्येवर होते. त्या कालावधीत माझी वहिनी माझ्या अपरोक्ष बाबांची चौकशी करीत असे. बहीणही केवळ मुलाला दोन वेळा आजोबांची चौकशी करायला पाठवून स्वस्थ होती. बाबांच्या अखेरच्या दोन महिन्यात व्यक्तिश भेटायला यावे असेही तिला वाटले नाही. वहिनी आणि बहीण असूनही निर्णय घेण्याची आणि ते अमलात आणण्याची जबाबदारी मलाच घ्यावी लागली. त्याबद्दल मी कधीच तक्रार केली नाही. मी स्वतहून घेतलेली जबाबदारी होती ती. मात्र त्यातल्या त्यात मी बाबांच्या जवळ राहात असल्याने हे जणू माझं कर्तव्यच आहे असा बहीण आणि वहिनीने सोयीस्कर समज करून घेतला होता. माझी त्याबद्दल कधीही तक्रार नव्हती. केवळ मीच नव्हे तर माझे पती, दोन मुलं, इतकंच काय माझे शेजारीही बाबांकरिता तत्पर होते. आम्हा उभयतांनी नोकरी, मुलांचे शिक्षण या सर्व व्यापातून आम्ही बाबांकरिता सदैव उपलब्ध होतो. अखेर तीन वर्षांपूर्वी बाबांचे निधन झाले आणि माझ्या मानसिक त्रासाला सुरुवात झाली.
बाबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे मृत्युपत्र करून ठेवले होते आणि त्यांची शासकीय कार्यालयात नोंदणीही केली होती. त्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी त्यांचे राहते घर तसेच निवृत्तीपश्चात मिळालेली आणि मुदत ठेवींमध्ये गुतंवलेली सर्व रक्कम याकरिता वहिनीला वारस केले होते. इतकेच नाही तर त्यांच्या बचतखात्यातही वहिनीचे नाव समाविष्ट केले होते. म्हणजे बाबांच्या स्थावर मालमत्तेत किंवा बँकेतील ठेवींकरिता मी कुठेही वारसदार नव्हते, ही बाब स्पष्ट होती. तरीही बहिणीला असा संशय आला की बाबांनी काही पैसे तरी मला दिले किंवा माझ्या सांगण्यानुसार सर्व मालमत्ता वहिनीच्या नावे केली. (हे संशयाचे बोल मला त्रयस्थ व्यक्तीकडून समजले.) खरे तर बाबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी ७ वर्षे आधी मृत्युपत्र तयार करून ठेवलं होतं आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी काही महिने आधी वहिनीच्या हाती सुपूर्द केले. बाबांच्या मृत्यू नंतर साधारणत दोन महिन्यातच बहीण तिची मुलं यांनी माझे फोन घेणं बंद केलं. प्रारंभी मला आश्चर्य वाटलं. पण नंतर कर्णोपकर्णी आलेल्या बातम्यांनुसार या अबोल्याला ‘मालमत्ता’ आणि पैसे हे दोनच घटक कारणीभूत असल्याचं आकलन झालं.
वहिनीने तर फोन नंबर बदलल्याचं दिसतंय. त्यामुळे तिलाही मालमत्ता मिळवण्यातच जास्त रस होता असं वाटतंय. मागील ३ वर्षांत वहिनी अथवा बहीण या दोघींनी माझ्याशी अनाकलनीयरीत्या संबंध तोडून टाकलेत. सणासुदीला, इतरांच्या घरी माहेरची माणसं आली की, जीव गलबलतो, वाईट वाटतं. माझा काहीही दोष नसताना मी साऱ्यांना अंतरले.
म्हणूनच माझ्या भगिनींना ज्या आई-वडिलांची जबाबदारी घेऊन त्यांचं वृद्धत्व सुखकारी करत आहेत त्यांना इतकीच हात जोडून विनंती आहे की आर्थिक व्यवहारांपासून दूर राहा. आई-वडिलांची मालमत्ता आणि तिची विल्हेवाट यांबाबत पारदर्शी राहा. इतर भावंड असतील तर आई-बाबांना सूचना द्या की, त्यांनी त्यांचे मृत्युपत्र, इच्छापत्र त्याबाबत स्वत:हून स्पष्ट भूमिका घ्यावी. नाहीतर न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगावी लागते आणि रक्ताची नाती बघता बघता विरून जातात.
– अनामीका

संग्रही ठेवावी अशी सखी
लोकसत्ताची चतुरंग पुरवणी वाचणे माझ्यासाठी एक आवडीचा कार्यक्रम असतो. अधाशासारखं वाचून बाजूला सारणं मला मुळीच मान्य नाही. चतुरंगशी माझं बऱ्याच वर्षांपासूनचं नातं आहे. मी पुरवणी नुसती वाचत नाही तर त्याच्याशी गप्पाही मारते. २०१६ पासून मी ही पुरवणी जमा करून ठेवण्यास सुरुवात केली कारण मधे मधे कधी वाटलं तर वाचता यायला हव्या.
गेल्या काही दिवसांत जमा केलेल्या सगळ्या पुरवण्या काढल्या आणि सुखद आठवणींच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलले. दृष्टी आडची सृष्टी वाचताना वीणा पाटील, गजेंद्र अहिरे, शिरीष कणेकर, मिलिंद मुळीक यांना भेटले. विद्याताई, मंगलाताई यांच्याशी खूप गप्पा मारल्या. उत्तरा केळकर खूप छान गातात हे माहीत होतं, पण गाणारा गळा सकस लिहितो हे ‘उत्तररंग’ वाचताना उमगलं. नीलिमा किराणे, माधवी यांच्या लेखातून वाचनाचा आनंद मिळतो.
– साधना ताम्हाणे, मुंबई</p>

चरित्रकाराचेही चरित्र व्हावे
२३ एप्रिलच्या पुरवणीतील वीणा गवाणकर यांचा ‘दृष्टीआडची सृष्टी’ या सदरातील
आत्मकथनपर लेख अतिशय वाचनीय वाटला. अत्यंत परिश्रमपूर्वक संदर्भ साहित्य गोळा करून ते काळजीपूर्वक तपासून तितक्याच कष्टपूर्वक त्यांची मांडणी करून एखाद्या चरित्र नायक/नायिकाची ओळख करून देण्याच्या त्यांच्या धडपडीचे कौतुक करावे तितके थोडेच. ‘एक होता काव्‍‌र्हर’ सारखा चरित्र ग्रंथ वाचून काव्‍‌र्हरच्या जीवनातील तपशिलाने आपण अचंबित होतो. परंतु त्याच्या मागच्या लेखकाच्या तपश्चर्येचा आपण कधी विचार करत नाही. चरित्र नायक/नायिकेचे आपण जितके कौतुक करतो तितके कौतुक लेखकाचे होत नाही. आमच्या मनावर काव्‍‌र्हरची छाप पडते पण चरित्रकार मात्र नामानिराळाच राहातो.
वीणा गवाणकर यांचा मी एक चाहता वाचक असून चरित्र ग्रंथामागच्या चरित्रकाराचे चरित्र जर कुणी लिहिले तरच त्याच्या परिश्रमाचे, संशोधनाचे, अभ्यासाचे व व्यासंगाचे मोल आपल्याला
कळून येईल.
– हिलरी फर्नाडीस, नवघर (ठाणे)

महिला नेतृत्वाची गरज
३० एप्रिलच्या पुरवणीतील अंजली कुलकर्णी यांचा भटक्या विमुक्तांची अस्तित्वाची लढाई हा खुलासेवार धांडोळा अतिशय भावला. त्यांच्या या झणझणीत व अंजन घालणाऱ्या लेखातून भटक्या विमुक्त समाजातून स्त्री नेतृत्वाची खरोखर गरज आहे हे पटले.

महाराष्ट्र शासनाने थांबवलेला शासन
सेवेतील रोखलेला ए.बी.सी.डी. कोटा पूर्ववत करण्यासाठी या नेतृत्वाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज शासन स्तरावर महिला शिक्षणाचा उदोउदो केला जात असताना याच समाजातील पदवीधर मुली सरकारी सेवेतील रोखलेल्या आरक्षणामुळे सेवेत येण्यापासून वंचित आहेत. काबाडकष्ट करून शिकवलेल्या मुलींना आज वय होऊन गेल्या तरी त्यांना शासन सेवेत दाखल होता येत नसेल तर भटक्या विमुक्त समाजातील महिला नेतृत्त्वानेच सरकारला कोटा पूर्ववत करण्यासाठी भाग पाडावे.
– दिलीप गिरी, पुणे</p>

मागच्या पिढीला गृहीत धरू नये
‘स्त्री’च्या करिअर संबंधातील लेख वाचले. सर्व लेखातील विचार पटण्यासारखेच आहेत.
आज २५/३५ च्या वयोगटातील स्त्रीची मानसिकता पूर्णपणे बदलली आहे. नोकरी /करिअर हा तिला तिचा हक्क वाटतोय आणि समाजानेही ते मान्य केले आहे. सकृतदर्शनी ते योग्यही आहे. परंतु यावेळी हे विसरले जाते की कुटंबातील एकाला न्याय देतांना बाकीच्या घटकांवर अन्याय होत नाही ना?
कुटुंबातील मुलांना केंद्रस्थानी ठेऊन मग बाकीच्यांचा विचार व्हायला पाहिजे हे सगळ्यांना मान्य असायला हरकत नाही. करिअर करू इच्छिणाऱ्या स्त्रीची त्यासाठी असलेली सपोर्ट सिस्टीम म्हणजे मुख्यत: तिचे आई-वडील व सासूसासरे! त्यांचे वय साठीच्या आसपास असते. नातवंडांना सांभाळणे त्यांच्यासाठी खूप दमवणारं असतं, पण नातवंडांच्या मायेपोटी अनेकदा ते निमूटपणे सगळं सोसतात. मुलांना सांभाळायला बाई मिळणं एकतर सोपं नसतं त्यातून मिळाली तर त्यांचे प्रश्न आणखी वेगळे.
या पाश्र्वभूमी वर नवीन पिढीची बदललेली मानसिकता खूप त्रासदायक ठरते. त्यांना त्यांचे करिअर हा हक्क वाटत असल्यामुळे त्याच्याशी तडजोड नाही. मुलांना त्यांच्या पद्धतीनेच आजीआजोबांनी वाढवलं पाहिजे हा अट्टाहास. स्वत:च्या हौसमौज हा पण त्यांचा हक्कच! या सगळ्यामध्ये मागच्या पिढीकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नसतो.
स्त्रीच्या करिअरच्या हक्कासंबद्धी चर्चा होत असतांना या गोष्टी विचारात घेऊन मगच सुवर्णमध्य काढला जावा. मुलं ही केव्हाही आईवडिलांचीच प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. त्यासाठी गरज पडल्यास त्यांच्यापैकी एकाने आपल्या महत्वाकांक्षेला मुरड घालावी. पण त्यासाठी घरातल्या मागच्या पिढीला गृहीत धरू नये.
त्यांना जेवढी जबाबदारी आनंदाने घेता येईल तेवढीच द्यावी. तरच कुटुंबात न्यायिक समतोल साधला जाईल.
– जान्हवी नवरे