आरती कदम

‘फेसबुक’च्या ‘सीओओ’ असणाऱ्या शेरील सॅन्डबर्ग यांचं ‘लीन इन- विमेन, वर्क, अँड द विल टू लीड’ हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक जाहीरनामाच म्हणायला हवा. त्यात म्हटल्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी स्त्रीला सक्षम करायला हवं, तर घरासाठी पुरुषाला सक्षम करणं गरजेचं आहे. स्त्री नोकरदार झाली, पण अधिकारी पदावर येण्यासाठी अजूनही अडखळते आहे. त्यामागे सामाजिक मानसिकता जेवढी आहे, त्यापेक्षा किती तरी जास्त तिची स्वत:ला कमी लेखण्याची  मानसिकता कारणीभूत आहे. काय करायला हवं या मानसिकतेवर मात करण्यासाठी, हे सांगणारं हे पुस्तक वाचायलाच हवं.

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

बाई आजही तिथेच आहे, काही दशकं मागे. खास करून करिअरच्या बाबतीत. मनानं आणि साहजिकच कृतीनंही. आजही तिचा स्वत:बद्दलचा न्यूनगंड इतका मोठा आहे, की गुणवत्ता असूनही ती मागे राहते आहे. गर्दीमध्ये  ‘हात उंच करून’ स्वत:चं वेगळं अस्तित्व जाणवू देत नाहीए.. म्हणूनच ‘जगात खऱ्या अर्थानं स्त्री-पुरुष समानता आणायची असेल, तर अर्ध जग स्त्रियांनी चालवायला हवं आणि स्वत:चं अर्ध घर पुरुषानं चालवायला हवं.’- ते कसं, हे सांगणारं ‘फेसबुक’च्या ‘सीओओ’ (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) शेरील सॅन्डबर्ग यांचं पुस्तक ‘लीन इन’ प्रत्येकानं वाचायलाच हवं.

  अर्थात वर सांगितलेल्या मानसिकतेचा अपवाद करणाऱ्या काही नक्कीच आहेत, अनेक जणी मोठमोठय़ा पदांवर पोहोचल्या आहेत, नोकरी करणाऱ्यांची संख्या तर खूपच वाढली आहे, यात शंकाच नाही; पण तरीही बहुसंख्य स्त्रिया आजही याच मानसिकतेमुळे उच्च पदावर पोहोचलेल्या नाहीत. त्यांना

 ‘लीन इन- आत या’ हे सांगणारं हे पुस्तक २०१३ मध्ये प्रसिद्ध झालं आणि करिअरमध्ये  वेगळं काही करू पाहणाऱ्या स्त्रियांसाठी ते पुस्तक महत्त्वाचं ठरलं आहे. त्या तमाम स्त्रियांसाठी- ज्यांनी इतकी वर्ष स्वत:ला ओळखलेलंच नाही. करिअरसाठी आपल्याला काय करायचं आहे, कुठे पोहोचायचं आहे, हेच त्यातल्या कित्येकींना माहीत नाही आणि ज्यांना माहीत आहे त्यांना त्यासाठी नेमकं काय करायचं हेच माहीत नाही. त्या सर्व गुणी स्त्रियांसाठी, कारण ‘Women leave before they leave’ हा अनुभव कित्येकींच्या बाबतीत येतो. शेरील लिहितात, न्यूनगंड किंवा आत्मविश्वासाचा अभाव यामुळे स्त्रियांनी आधीच नांगी टाकलेली असते. एखाद्या कामातून प्रत्यक्ष बाहेर पडण्याआधीच स्त्री मनानं बाहेर पडलेली असते. किंवा हे काम माझं नाहीच, हे तिच्या मनानं स्वीकारलेलं असतं आणि एकदा का तुम्ही विचारानं स्वत:ला थांबवता, तेव्हा तुम्हाला कुणीच पुढे नेऊ शकत नाही.

 हे पुस्तक म्हणजे शेरील यांचे वेगवेगळय़ा ठिकाणी नोकरी करतानाचे प्रत्यक्ष अनुभव आणि या पुस्तकाच्या निमित्तानं गोळा केलेली माहिती, (पुस्तकाच्या शेवटी असणारी संदर्भसूची ४४ पानांची आहे) – सर्वेक्षण, मुलाखती, इतरांचे लेख, अनुभव यांचं सार आहे. आता ‘फेसबुक’मध्ये असणाऱ्या शेरील तत्पूर्वी ‘गूगल’मध्ये होत्या. त्यापूर्वीही त्यांनी उच्च ठिकाणी नोकऱ्या केल्या, मोठमोठी पदं भूषवली; त्यासाठी स्वत:ला तयार केलं ते ‘हॉर्वर्ड बिझनेस स्कूल’मध्ये चांगल्या गुणांनी ‘एमबीए’ होऊन. एखाद्या कंपनीच्या उच्च पदावर जेव्हा तुम्ही पोहोचता, तेव्हा तेथील काम हे लिंगभेदविरहितच असतं. तिथे तुम्ही स्त्री आहात की पुरुष यानं फरक पडत नाही. तुम्ही तिथे बदल घडवत आहात की नाही, कंपनी तुमच्या नेतृत्वाखाली यशस्वी होतेय की नाही, हेच महत्त्वाचं असतं. शेरील या अशा उच्च पदावर पोहोचल्या असल्यानं तिथून खाली जे दिसलं ते त्यांनी या पुस्तकातून मांडलं आहे.

‘द बिझनेस मॅन्युअल ऑफ द इयर’ असं जे या पुस्तकाबद्दल म्हटलं गेलं, ते योग्य आहेच, मात्र त्यापलीकडे या पुस्तकानं फार मोठा आवाका कवेत घेतला आहे. तो आहे, करिअरमध्ये स्वत:ला मागे ठेवण्याच्या स्त्रीच्या मानसिकतेचा.

‘जेंडर स्टीरिओटाइप’ वा लिंगभेद भारतातच काय, सर्व जगात, अगदी अमेरिकेतही आहे. पुरुषप्रधान मानसिकतेनं अमेरिकेतल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकारही दिला नव्हता, जो त्यांना आंदोलन करून मिळवावा लागला होता. त्यामुळे भेदाची ही बीजं प्रत्येकाच्या मनात लहानपणापासूनच रुजली गेली, जी पुढल्या आयुष्यभरातल्या अनुभवांतून अधिक खोलवर जात राहिली. या मानसिकतेतून तमाम स्त्रियांना बाहेर कोण काढू शकेल तर, ‘शोले’ तल्या गब्बरसिंगच्या भाषेत- ‘खुद बाई’- कारण बाईनंच स्वत:साठी, स्वत:भोवती हे चक्रव्यूह आखून ठेवलं आहे. शेरील यांनी त्यांच्या एका भाषणाच्या शेवटी, ‘आता शेवटचे दोन प्रश्न घेऊ या,’ असं म्हणूनही हात वर असणाऱ्यांपैकींच्या पाच-सहा प्रश्नांना उत्तरं दिली. ते हात उंच ठेवणारे सगळे पुरुष होते. कार्यक्रम संपल्यावर एक बाई त्यांना भेटायला आली आणि म्हणाली, ‘मी उंचावलेला हात खाली घेतला म्हणून मला उत्तर मिळालं नाही. हात उंच ठेवून माझं अस्तित्व मी दाखवू शकले असते, पण मी मागे हटले.’ त्यामागे संकोच होता, हा साक्षात्कार त्या बाईला झाला होता. हीच स्त्रीची मानसिकता या पुस्तकात मांडली आहे. म्हणूनच हे पुस्तक वास्तवदर्शी झालं आहे.

 बाईचा आणखी एक स्वभावदोष त्यांनी यात मांडला आहे, तो म्हणजे ‘रिस्क’ न घेणं. नोकरीत पुढे जायचं असेल तर नोकऱ्या बदलणं आवश्यक असतं. काही वेळा पुढच्या चांगल्या संधीसाठी सुरुवात कनिष्ठ पदानं करायची असेल तरी ते स्वीकारायला हवं. जसं ‘गूगल’ सोडताना शेरील यांच्याकडे दुसऱ्या ‘सीईओ’ पद देणाऱ्या नोकऱ्या होत्या, परंतु त्यांनी त्या वेळी फारसं नाव नसलेल्या ‘फेसबुक’चं ‘सीओओ’ पद स्वीकारलं, कारण तेव्हा सोशल मीडिया ‘फास्ट ग्रोइंग’ होतं. जेव्हा अशी खात्री असते तेव्हा रिस्क घ्यावीच लागते, ज्याचा शेरील यांना फायदा झाला, मात्र तशी धमक प्रत्येकीत असतेच असं नाही. त्यामुळे ‘गूगल’ सोडून त्यांच्याबरोबर ‘फेसबुक’मध्ये जाणाऱ्यांमध्ये पुरुष होते, स्त्रिया नव्हत्या. आणखी एक अनुभव शेरील सांगतात, तो म्हणजे, अनेक स्त्रिया दुसरी नोकरी स्वीकारताना जे शंभर टक्के येतंय तेच करायचं असेल तरच ती स्वीकारतात. त्याउलट पुरुष त्यांना त्यातलं ६० टक्के जरी येत असेल तरी नव्या नोकरीत उडी मारतात. म्हणून स्त्रियांनी, ‘मला हे करता येत नाही’ यापासून ‘मला हे करायचं आहे आणि त्यासाठी शिकण्याची माझी तयारी आहे,’अशी मानसिकता बदलायला हवी, असं सांगताना त्या म्हणतात, ‘एका ठिकाणीच स्थिर (स्टॅगन्ट) राहण्याची एक किंमत असते. ती तुमच्या वाढीची संधी संपवते.’ आपल्या स्त्री सहकारीचा एक वेगळा अनुभव त्या सांगतात, ‘फेसबुक’मध्ये नोकरभरती सुरू असताना एका मोठय़ा कंपनीत वरिष्ठ पदावर असणाऱ्या एकीनं त्यांना फोन केला आणि तिच्या मिळवलेल्या पदव्यांची यादी न सांगता तिनं शेरील यांनाच प्रश्न विचारला, की ‘फेसबुक’मध्ये या पदावर काम करत असताना तुला कोणत्या समस्या येत आहेत आणि मी त्या कशा सोडवू शकते? तिच्या या वेगळय़ा ‘अ‍ॅप्रोच’मुळे साहजिकच तिला नोकरी मिळाली हे सांगायला नकोच.

  उच्च पदावर जाण्यासाठी स्त्रियांना त्या आणखी एक, त्यांना पटलेला सल्ला देतात-

तो म्हणजे, ‘करिअर हे लॅडर- म्हणजेच शिडी नाही, तर ते ‘जंगल जिम’ (वेगवेगळय़ा दिशेनं कसरती करता येणारं मॉडेल)आहे.’ अनेकदा नोकरी वा करिअर निवडताना एकाच दिशेनं जाणं तुम्हाला मर्यादित करतं; पण जंगल जिम तुम्हाला वेगवेगळय़ा दिशेनं वर नेतं. तिथे ‘डेड एंड’ आला तरी मागे फिरून पुढे जाता येतं. त्यामुळे बायकांनी करिअरकडे जंगल जिम म्हणूनच पाहायला हवं, असंही त्या विविध उदाहरणांनी समजावून सांगतात. बायकांचा संकोच त्यांच्या प्रगतीच्या आड कसा येतो हे सांगताना खूप चांगला शब्दप्रयोग त्या करतात, ‘टियारा सिन्ड्रोम’. मी मनापासून, चांगलं काम करते आहे, माझं हे काम पाहून वरिष्ठ नक्की ‘टियारा’- मुकुट मला बक्षीस देतील, असा विचार त्या करतात आणि वरिष्ठांच्या लक्षात आलं नाही की नाराज होतात. त्यांचा कामातला रस कमी होतो. त्यांना शेरील सल्ला देतात, वरिष्ठाचं तुमच्या कामाकडे लक्ष जाईलच असं नाही. त्यासाठी आवश्यकता आहे तुम्ही तुमचं वेगळं काम त्यांच्या नजरेत आणून देण्याची, अर्थात सौम्यपणे. त्यामुळे प्रगती होत असलेल्या ठिकाणी जाणं, रिस्क घेणं, स्वत:लाच आव्हान देणं आणि केलेल्या कामाचं मूल्य- बढती (प्रमोशन) मागणं हे करिअर व्यवस्थापनाचं महत्त्वाचं सूत्र त्या सांगतात.

 एक व्यक्ती म्हणून करिअर करताना स्वत:तल्या गुणांना वाढवणं आणि दोषांवर मात करणं गरजेचं आहे आणि हे स्त्री-पुरुष दोघांनाही लागू होतं. पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्यांचं पत्नी आणि आई असणं हे नेहमीच करिअरमधला मोठा अडथळा- असतोच असं नाही, पण मानला जातो. त्यावर या पुस्तकात भर देण्यात आला आहे. मुळात या पुस्तकाचं नावच ‘लीन इन – विमेन, वर्क,अँड द विल टू लीड’ असं आहे, ते याचमुळे. स्वत: शेरील दोन मुलांची आई असल्यानं त्यांनाही संसार आणि करिअर यांच्यातला तोल सांभाळावा लागलाच.  तो सांभाळता येतो, असं आग्रही प्रतिपादन या पुस्तकात येतं. ‘विमेन मस्ट बी एम्पॉवर्ड अ‍ॅट वर्क अ‍ॅन्ड मेन मस्ट बी अ‍ॅट होम’ असं त्या म्हणतात. या पुस्तकातलं एक प्रकरणच ‘मेक युवर पार्टनर अ रीअल पार्टनर’ असं आहे. तुमचं कुटुंब हा तुमचा खरा आधार असतो, त्यामुळे नोकरदार स्त्रीसाठी तिचा नवरा तिच्या मागे ठामपणे उभा राहिला, तर तिला करिअरमधली आव्हानं स्वीकारता येतात. (अर्थात डेव्ह गोल्डबर्ग सारखा तिला शंभर टक्के पाठिंबा, साथ देणारा नवरा मिळणं फारच कमी स्त्रियांच्या नशिबी येतं हेही तितकंच खरं.) पण त्यासाठी स्त्रियांनी ‘मॅटर्नल गेटकीपिंग’ सोडलं पाहिजे, असं त्या म्हणतात. म्हणजे, नवरा घरात जे काम करतो ते अनेकींना पसंत पडत नाही, मग त्या टीका करत राहतात. त्यांना ‘कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न करतात. साहजिकच पुरुषांना ते आवडत नाही आणि ते काम करणं बंद करतात. परिणामी सगळा ताण बायकांवर पडतो आणि नोकरी करणं गरजेचं नसेल, तर त्या सरळ नोकरी सोडून देतात किंवा कमी ताणाची नोकरी स्वीकारतात. ‘हॉर्वर्ड’च्या सव्‍‌र्हेनुसार पुरुषांचं पूर्णवेळ नोकरी करण्याचं प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कधीच कमी होत नाही. स्त्रियांमध्ये मात्र ५६ टक्के जणीच नोकरीत टिकतात. अनेकदा यात स्त्रीची आवडनिवड नसते. त्यातच ‘तुझ्या बाळाला तुझी गरज असताना तुला कशाला करिअरमागे धावायचं आहे,’ असं लोकांचं, समाजाचं दडपण तिच्यावर येतं. त्यासाठी स्त्रियांनी ‘गिल्ट मॅनेज’ करायला शिकणं हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे, असं त्या सांगतात. (हे पुस्तक २०१३ मधलं असल्यानं २०२२ मध्ये यातले काही वाक्यप्रयोग माहीत झाले आहेत.)

शेरील सॅन्डबर्ग यांचं हे पुस्तक खरंच करिअर करणाऱ्या वा करू इच्छिणाऱ्या सर्वासाठीच उपयुक्त आहे; जरी या पुस्तकावर टीकाही झालेली असली तरी. कारण हे पुस्तक लिहिणाऱ्या शेरील याचं उच्च शिक्षण, गूगल, फेसबुकमधील उच्च पदं, त्यामुळे निर्णयस्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे ‘बेटर हाफ’ म्हणावा असा पती अशा खूप गोष्टी त्यांच्याकडे होत्या- आहेत ज्या सगळय़ांकडेच असतातच असं नाही.

 असं असलं तरी एकूणच व्यक्ती म्हणून आणि स्त्री म्हणून स्वत:ला उंच करत नेणं, निदान त्यासाठी प्रयत्न करत राहणं, ते मिळवणं, हे प्रयत्नसाध्य नक्कीच आहे. कारण नोकरी करणं म्हणजे फक्त पैसे कमावणं नसतं, तर त्यापलीकडे जात आपल्या आतला शोध घेत स्वत:ला विस्तारणं असतं. हात उंच करून- स्वत:चं अस्तित्व इतरांना जाणवून देत त्यांनाही बरोबर नेण्यातूनच बाई पुढे पुढे जात राहणार आहे.. त्यातूनच स्त्री-पुरुष समानतेचं हवं असलेलं जग प्रत्यक्षात येऊ शकणार आहे.

arati.kadam@expressindia.com