अरुणा ढेरे

अ‍ॅलिस वॉकर यांची ‘कलर पर्पल’ ही प्रचंड गाजलेली, नावाजलेली कादंबरी, साधी सोपी कथा असलेली. त्यामागचा अर्थ मात्र घनगर्द. या कादंबरीचा गाभा आहे, तो वंशभेद, वर्णभेद आणि लिंगभेदाविरुद्धचा समर्थ आवाज. त्याचं माध्यम आहे कादंबरीची कृष्णवर्णीय नायिका, सेली. स्वत:चीच घृणा करणाऱ्या स्त्रीचा बौद्धिक-मानसिक स्वातंत्र्यापर्यंतचा हा प्रवास आहे. संघर्षांच्या या प्रवासात तिला भेटणाऱ्या तेवढय़ाच सशक्त होत गेलेल्या स्त्रिया म्हणजे भगिनीभावाचं उबदार प्रतीकही या कादंबरीत वेगळय़ा रूपात येतं. एका बाईच्या वैयक्तिक दु:खातून बाईपणाच्या सार्वत्रिक दु:खाला भिडणारी ही कादंबरी म्हणून वाचायलाच हवी.

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

मी ‘द कलर पर्पल’ हा चित्रपट पाहिला,  म्हणजे तो मी अनेकदा पाहिलाय, पण पहिल्यांदा पाहिला तो १९८६ मध्ये. तेव्हा ‘आउट ऑफ आफ्रिका’च्या जोडीनं ‘ऑस्कर’च्या चर्चेत आलेला तो चित्रपट होता. स्टीव्हन स्पिलबर्गनं त्याच्या विज्ञानकथांच्या नेहमीच्या हाताळणीला दूर ठेवून बनवलेला अगदी वेगळय़ा धाटणीचा तो चित्रपट आणि व्हूपी गोल्डबर्गनं उभी केलेली कादंबरीची कृष्णवर्णीय नायिका – सेली यांचा जबरदस्त परिणाम पुढे कितीक काळ मनावर राहिला. ओघानंच मग कादंबरी वाचली.

 To the spirit,

 Without whose assistance

Neither this book,

 Nor I

Would have been

Written

अशी अर्पणपत्रिका असलेली कादंबरी. अ‍ॅलिस वॉकर या अ‍ॅफ्रो-अमेरिकी लेखिकेची १९८२ मध्ये आलेली ही तिसरी कादंबरी. तिला १९८३ चं ‘पुलित्झर’ पारितोषिक मिळालं. पाठोपाठ अमेरिकेचं ‘नॅशनल बुक अ‍ॅवॉर्ड’ही मिळालं. मिळणं स्वाभाविकही होतं. एकाच वेळी राजकीय आणि ऐतिहासिक पातळीवर, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर, सार्वजनिक आणि व्यक्तिगत पातळीवर आणि एकाच वेळी बौद्धिक आणि भावनिक पातळीवरही प्रभाव गाजवणारी ही एक असाधारण कादंबरी आहे. निराशा, क्लेश आणि कडवटपणा यांनी ओसंडून जाणारे कितीतरी प्रसंग या कादंबरीत आहेत, पण तरी ती संपूर्णपणे शोकात्म कादंबरी आहे, असं म्हणवत नाही. ती आहे लढण्याची, चिरडलेल्या जीवानं तग धरून पुन्हा उंच उठण्याची, स्वत:ची ओळख पटल्याच्या सार्थतेची कादंबरी.

अ‍ॅलिस वॉकरचं एकूण लेखन हे इतिहास आणि संस्कृती यांच्यामधलं कृष्णवर्णीयांचं स्थान शोधणारं लेखन आहे. ही तिची कादंबरी ऐतिहासिक कादंबरी आहे, असं ती म्हणते. कारण तिच्या मते इतिहास काही राजेरजवाडय़ांच्या वंशावळींचा नसतो, युद्धांचा नसतो, की भौगोलिक सीमांमधल्या संघर्षांचा नसतो. तो सुरू होतो, जिथे एक बाई दुसऱ्या बाईला तिच्या कपडय़ांचं माप विचारते आणि तिच्या पँट्सची चौकशी करते तिथपासून. कृष्णवर्णीयांचं आत्मिक जगणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यातही या बायकांचं जगणं तिला महत्त्वाचं वाटतं. त्यांच्या निष्ठा, त्यांच्यावरची दडपणं, त्यांचे कष्ट, त्यांचे हाल, त्यांची दुर्दशा यांच्यात ती गुंतलेली आहे.

   ‘द कलर पर्पल’ ही एका कृष्णवर्णीय बाईची – सेलीची कहाणी आहे. सेली अमेरिकेत राहाणारी  आहे. ती लहान असल्यापासूनच तिच्यावर अनेक दडपणं येत राहिली आहेत आणि अवघ्या चौदाव्या वर्षी लैंगिक शोषणाची बळीही पडलेली आहे. तिचे सावत्र वडीलच तिच्यावर अत्याचार करतात आणि दोन वेळा तिच्या वाटय़ाला गर्भारपण येतं. अ‍ॅडम आणि ऑलिव्हिया ही तिची दोन मुलं. तिचे सावत्र वडील मुलांना मात्र तिच्याजवळ ठेवत नाहीत. तिची आई मरण पावते आणि नेट्टी ही एकच बहीण सेलीला तिचं माणूस म्हणून उरते. मात्र बहिणीबरोबर राहाण्याचं सुखही तिला फार काळ मिळत नाही. तिची शाळा तर वडील बंद करतातच, पण तिचं एका विधुराशी-अल्बर्टशी लग्नही लावून द्यायचं ठरवतात. अल्बर्टला नेट्टीशी लग्न करण्याची इच्छा असते, पण वडील त्याला विरोध करतात आणि सेलीशी लग्न करण्यासाठी त्याचं मन वळवतात. सेली दिसायला नेट्टीइतकी चांगली नसली, तरी ती कामाला वाघीण असल्याचं वडील अल्बर्टला पटवून देतात. त्याला चार मुलं असतात, शिवाय तो शग अ‍ॅव्हरी या ‘ब्लूज’ गाणाऱ्या देखण्या बाईच्या प्रेमात पडलेला असतो. तो सेलीशी लग्न करतो कारण त्याचं स्वयंपाकपाणी सांभाळणारी, त्याच्या पोरांची काळजी घेणारी आणि घराची स्वच्छता करणारी एक बाई त्याला हवी असते. शिवाय कधीमधी लहर येईल तेव्हा तिचा भोगही घेता येतच असतो.

सेली वाच्यार्थानं गुलाम म्हणता यायची नाही, पण ती सर्वार्थानं खरी गुलामच आहे. अल्बर्ट तिच्यावर संपूर्ण सत्ता गाजवतो आणि यापरतं आपल्याला वेगळं काही आयुष्य मिळू शकेल असं सेलीला एकदाही- चुकूनसुद्धा कधी वाटलेलं नाही. एक दिवस अल्बर्ट त्याच्या प्रेयसीला- शग अ‍ॅव्हरीला घरीच घेऊन येतो. सेली तिच्या सेवेत गुंतून जाते. प्रथम सेलीला तुच्छतेनं वागवणारी शग हळूहळू सेलीच्या प्रेमात पडते. प्रेम हा शब्द कदाचित फार मोठा होईल, पण असं म्हणू या, की त्या दोघी एकमेकींना समजून घेत एकमेकींच्या खूप जवळ येतात आणि तेच सेलीच्या आयुष्यात बदल घडवणारं महत्त्वाचं नातं ठरतं. नेट्टी- आपली बहीण आपल्याला कायमची दुरावलेली आहे असं समजून चाललेल्या सेलीला तिची नियमित येणारी पत्रं शगमुळे मिळतात. तोपर्यंत अल्बर्ट ती पत्रं तिच्यापर्यंत पोहोचूच देत नसतो. त्या पत्रांमुळे सेलीला नवं बळ मिळतं. एवढंच नव्हे, तर शगमुळे ती मेम्फिससारख्या मोठय़ा शहरात येते, कपडय़ांचा एक छोटासा स्वत:चा व्यवसाय सुरू करते; स्वत: कमवायला शिकते आणि शेवटी तिच्याच आश्रयाला आलेल्या अल्बर्टलाही त्यात सामावून घेते. तिच्या कुमारवयातल्या दोन्ही मुलांना घेऊन नेट्टी तिला भेटायला येते आणि कादंबरी तिथे जणू समंजसपणे थांबते.

पण ही झाली एक सरळ, साधी गोष्ट. अ‍ॅलिस वॉकरला इतकी साधी गोष्ट सांगायची नाही. मुळात गोष्टीचा सारांश सांगता-ऐकतानाही आपल्या लक्षात येतं, की ती साधीशी गोष्ट नाहीच. एका दबलेल्या, शोषित आणि माणूस म्हणून असणाऱ्या सर्व प्रकारच्या मूलभूत प्रतिष्ठेपासून वंचित अशा स्त्रीमधून स्वतंत्र, आत्मनिर्भर आणि आत्मसन्मानयुक्त स्त्री कशी उभी राहाते याची ही गोष्ट आहे. ओझ्याचं गाढव बनून जगणाऱ्या, स्वत:चीच घृणा करणाऱ्या स्त्रीपासून बौद्धिक-मानसिक स्वातंत्र्य जाहीर करणाऱ्या स्त्रीपर्यंत अ‍ॅलिस आपल्याला घेऊन जाते. ही कादंबरी म्हणजे तिच्या त्या प्रवासाची गोष्ट आहे. एका गरीब, चिरडल्या गेलेल्या बाईनं सशक्ततेसाठी केलेल्या संघर्षांची गोष्ट आहे.

शिवाय वंशभेद, वर्णभेद आणि लिंगभेदाविरुद्ध उठलेला हा एक समर्थ आवाजही आहे. किंबहुना तोच या कादंबरीचा गाभा आहे. अ‍ॅलिस सांगते, की तिच्या स्वत:च्या अनुभवांचा खूप खोल ठसा या कादंबरीत उमटला आहे. गौरवर्णीयांकडून अपमान आणि कृष्णवर्णीय पुरुषांकडूनही अमानुष वागणूक, यांनी पिचून गेलेल्या कृष्णवर्णीय बायका हा समाजाच्या अगदी तळातला थर आहे.

  सेलीवर तिच्या कोवळय़ा वयात तिचे सावत्र वडील दोन वेळा गर्भारपण लादतात. तिचा नवराही तिच्यावर अत्याचारच करतो. तो ‘काळा’ आहे, पण आपण ‘गोरे’च असल्याच्या थाटात तो तिच्याशी वागतो. एखाद्या टेबल-खुर्चीविषयी, त्यांच्या उपयुक्ततेविषयी बोलावं, तसं तिच्याविषयीचं तिच्या वडिलांचं आणि अल्बर्टचं बोलणं असतं. सेली अखंड दडपणाखालीच जगणारी स्त्री आहे. ‘चर्चमध्ये तिनं तरुणांकडे बघून डोळे मिचकावले’ असं म्हणत तिचे वडील तिला मारहाण करतात, तेव्हा ती म्हणते, की ‘मी मुळी पुरुषांकडे बघतच नाही, कारण मला त्यांची फार भीती वाटते. मला बायकांची नाही भीती वाटत. मी बघू शकते त्यांच्याकडे.’ सेली पुरुषांना घाबरूनच मोठी झालेली आहे. तिला स्वत:विषयी एक नकोसंपण आहे, घृणा आहे. तिचा देह हाच शोषणाचा अखंड स्रोत आहे आणि ती त्या देहापासूनच दूर जाऊ बघते आहे. अल्बर्ट जेव्हा कधी तिच्या देहावरचा गाऊन वर करतो, तेव्हा ती समजते, की ती तिथे नाहीच. ती एक झाड आहे. अल्बर्टला ते समजतही नाही, याचा तिला दिलासा वाटतो. प्रथमपासून कुरूप आणि केवळ नकोसं झालेलं तिचं शरीर हा तिचाच एक भाग आहे, तिच्या अस्तित्वाचा तो अंश आहे, हे तिला शगमुळे समजतं. स्वत:ची ओळख करून घेण्याची ती तिची सुरुवात आहे. शग आपल्यावर का प्रेम करत असेल हे सेलीला समजत नाही. शग सुंदर आहे, बांधेसूद आहे. सेलीचे केस आखूड आहेत. रंग काळा आहे. कोणाही बाईचं असावं असं तिचं शरीर आहे. कुणाला प्रेम वाटावं असं तिच्यात काही नाही. फक्त तिचं हृदय, ज्यातून रक्त सारखं उसळत राहातं. शगला त्या हृदयाचीच जाण आहे. अल्बर्टनं दासी, मोलकरीण, गुलाम करून टाकलेल्या सेलीला ती मदतीचा हात देते. उठवून उभी करते. स्वत:शी आधी स्वत:चं नातं निर्माण करण्याची वाट तिला शोधून देते.

शगबरोबर मेम्फिसला जाण्याचा निर्णय ती जाहीर करते तेव्हा अल्बर्ट खळबळून जातो, प्रचंड चिडतो. तो तिचा उपहास करतो. तिची यथेच्छ निंदा करतो, अपशब्द वापरून तिला खच्ची करण्याचा प्रयत्न करतो.  You black,  you pore,  you ugly,  you a woman,  goddamn,  you nothing at all – तो म्हणतो. पण तरीही सेली शगबरोबर निघून जातेच. ती शगच्या मोठ्ठय़ा घरात राहाते. कामाला सुरुवातही करते आणि बहिणीला लिहिते, ‘मी खूप आनंदात आहे! मला प्रेम मिळालंय, काम मिळालंय, पैसा मिळालाय, वेळ मिळालाय आणि मित्रपरिवारही.’ ती मजेत असते. तिला आणखी एक मदतनीस मिळते – सोफिया. मग तिच्यासाठी एक पाय जांभळा आणि एक लाल, अशी पँट शिवण्याचा मोठ्ठा आनंद तिला मिळतो.

सोफिया आणि सेली मिळून गोधडी शिवायला घेतात. पुढे स्त्रीवादी लेखनात पुन्हापुन्हा प्रतीक म्हणून येत राहिलेली गोधडी बहुधा अ‍ॅलिस वॉकरने प्रथम या कादंबरीत वापरली असावी. कृष्णवर्णीयांचं सांस्कृतिक संचित म्हणजे ही गोधडी. अ‍ॅलिस म्हणते, की ‘जिच्यात बाई- काळी बाई आपल्या खुणा ठेवू शकली असं काळानं दिलेलं तेवढंच माध्यम तिचं.’ विरलेले गणवेश, फाटके पेटिकोट्स, उसवलेले कपडे- त्यातून तुकडेजोड करत अफ्रिकी डायस्पोरच तयार केला त्या बायकांनी. एक प्रतीक बनून जाते मग ती गोधडी. सेली आणि सोफिया शिवतात. शगही त्यांच्यात येऊन मिळते. मिळून शिवलेली गोधडी! चिंध्यांमधून जोड करत करत एक संपूर्णता निर्माण होते! एकमेकींच्या मनातली ऊब त्या निर्मितीत शिवली जाते. ते प्रतीकात्मक पॅचवर्क म्हणजे भगिनीभावाचं एक उबदार प्रतीक होऊन जातं.

   विशेषत: एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या शंभर वर्षांचा जणू आरसाच अ‍ॅलिसनं आपल्यासमोर या कादंबरीच्या रूपानं ठेवला आहे. या काळातला अमेरिकेतला वंशभेद, वर्णभेद आणि लिंगभेद यांचं इतकं मर्मस्पर्शी चित्र अ‍ॅलिसनं सेलीच्या आयुष्याचा हात धरून रेखाटलं आहे, की थक्क व्हावं. नात्यांमधल्या- विशेषत: स्त्री-पुरुष नात्यांमधल्या हिंसेची धगधगती जाणीवही त्याच आयुष्यातून तिनं आपल्याला करून दिली आहे. या हिंसेचा प्रतिकार करण्याची ताकद कादंबरीतल्या नायिका आपापल्या पद्धतीनं मिळवत जातात. ‘पुरुषांनी भरलेल्या घरात मुलगी कधीच सुरक्षित नसते,’ असं म्हणणारी सोफिया स्वत:च्या अर्थपूर्ण अस्तित्वासाठी संघर्ष करणारी आहे. शग काय, सोफिया काय, पत्रातून भेटणारी नेट्टी काय, सेलीच्या आयुष्यात या बायकांमुळे बदलाची एक साखळीच निर्माण होते. व्यवस्थेच्या मेरेवर  जगणाऱ्या समूहामधून अ‍ॅलिसची सेली पुढे आली आहे.

नेट्टी आणि सेली यांचं जे घट्ट नातं आहे, ते कादंबरीमधलं एक नितांत आश्वासक नातं आहे. या दोघी बहिणी एकमेकींशी फार चिवटपणे बांधल्या गेल्या आहेत. नेट्टी सेलीपेक्षा दिसायला उजवी आहे, शिकलेली आहे आणि तिनं जगही पाहिलेलं आहे. इजिप्तचे पिरॅमिड्स बांधणारे लोक कृष्णवर्णीयच होते ही अभिमानास्पद गोष्ट तिनं आवर्जून सेलीला पत्रातून कळवली आहे. पुरुषानं व्याख्याबद्ध केलेली स्त्रीत्वाची संकल्पना तिनं, शगनं आणि सोफियानं बाजूला सारली आहे. लैंगिक शोषणानं या बायकांना एकत्र बांधलं आहे खरं, पण त्या केवळ एकमेकींच्या वेदनांच्या वा क्लेशांच्या भागीदार नाहीत. त्या एकमेकींना हात देत उठून उभ्या राहिलेल्या आणि दु:खावर मात करणाऱ्या, हसण्यामधल्या भागीदार आहेत. देवावर आणि दैवावर हवाला ठेवणं मंजूर नसणाऱ्या या बायका आहेत. सेली त्यांच्यात सामील झाली आहे आणि तिला त्यांच्यामुळेच स्वत:चा शोध लागला आहे.

  सेलीची देवसंकल्पना हा या कादंबरीतला एक लक्षणीय शोधविषय आहे. अत्याचार करणारा, लाथा घालणारा, मारहाण करणारा, शिव्या देणारा पुरुष इथपासून ही संकल्पना हळूहळू निर्गुण निराकार अशा ईश्वरी तत्त्वापर्यंत विस्तारते. शग तिला याही शोधात मदत करते. गोरा म्हातारा वाटायचा आधी तिला देव; मग हळूहळू माणसांपेक्षा झाडं, पाणी, वारा, पाखरं म्हणजे देव असं तिला वाटायला लागलं. मग एक दिवस ती शांत बसली असता तिच्या लक्षात आलं की, प्रार्थना करायला लागलं, की पुरुषच मध्ये येतो. मग मनातून त्याला जायला सांगायचं आणि मग आठवायची फुलं, वारा, पाणी, खडक- देव तर सगळीकडेच आहे की! शग तिला सांगते की, ‘तुझ्या डोळय़ांमधून आधी पुरुष काढून टाक. मग दिसेल तुला सगळीकडचा देव. तो ‘He’ नाही, तो ‘She’ नाही. तो ‘It’ आहे.’ सेलीचं असं परमतत्त्वापर्यंत पोहोचणं फार हृद्य आहे. कादंबरीतला तो अगदी तरल असा भाग आहे. हिंसेच्या विरोधात असणाऱ्या बायबलखेरीजच्या संहितेचा एक कालवा सतत या कादंबरीची कथा भिजवत विस्तारताना आपल्याला दिसतो.

या कादंबरीचा घाट फार सुंदर आहे. ही पत्रं आहेत. सगळी पत्रंच आहेत. प्रथम देवाला लिहिलेली. कारण नेट्टी जिवंत आहे आणि ती आपल्याला पत्र लिहिते आहे, हेच मुळी सेलीला ठाऊक नाही. पण ते ठाऊक झाल्यानंतरची पत्रं नेट्टीलाही लिहिलेली आहेत. सेलीचं देवाला पत्रं लिहिणं फार स्वाभाविक आहे. कारण सुखदु:ख वाटून घेता येतील असं तिच्या आयुष्यात कोणीही नाही. देवाजवळ ती सगळंच सांगू शकते. तिथे काही लपवणं, काही वगळणं, कसला संकोच बाळगणं याचं कारणच नाही. म्हणून ही पत्रं देवाला आहेत, आणि देवाला आहेत म्हणून ती सेलीच्या ओबडधोबड भाषेमधून आली आहेत. सेली मुळातच अगदी सरळ, साधी, निष्पापपणे अजाण अशी आहे. उपरं, कृत्रिम असं काही तिच्याजवळ नाहीच. भाषाही नाही. अगदी अकृत्रिम बोलीतून ती लिहिते.

एक प्रकारे अ‍ॅलिसने तिच्या मौखिक परंपरेला प्रतिष्ठा दिली आहे. बोलीचा गोडवा, नितळपणा, सहजपणा, अकृत्रिमपणा, सौंदर्य आणि सामथ्र्यही सेलीच्या त्या अनघड भाषेतून व्यक्त होतं. कधी कधी एखाद्या गाण्याच्या ओळींसारखी सुंदर, नेमकी, पारदर्शक अशी ही भाषा हाही कादंबरीच्या यशाचा मोठा भाग आहे. वाचा हरवलेल्या माणसानं प्रारंभी देवाला पत्र लिहिणं आणि मग आपलाच आवाज आपल्याला गवसल्यानंतर माणसाला- जवळच्या माणसाला- जिवलग नेट्टीला पत्र लिहिणं हे किती मार्मिक आणि डोळय़ांत पाणी आणणारं, सुंदर आहे!

अ‍ॅलिसनं पुस्तक अर्पण केलंय ते ‘स्पिरिट’ला. ज्याच्याशिवाय हे लिखाण घडू शकलंच नसतं त्याला. या ‘स्पिरिट’चा सगळय़ा अर्थच्छटांना सामावणारा एक गडद जांभळा – रंगमालिकेतला शेवटचा रंग- उरलेल्या सहांना सामावून घेत आपल्यावर पसरून राहील अशी एक निखळ माणुसकी या कादंबरीतून सर्वभर होणारी आहे.

 एक निश्चय, एक ठामपणा, एक सकारात्मकता, एक आत्मप्रतिष्ठा- अ‍ॅलिस वॉकरचं एक अर्थप्रचलन- एक स्पिरिट – कलर पर्पल!

 aruna.dhere@gmail.com