मंगला आठलेकर

धर्म आणि रीतिरिवाजांमधल्या बुरसटलेपणावर लेखनातूनच प्रहार करायला हवेत, कारण तेच सर्वदूर पोहोचतं, हे ओळखून लेखन हे पुरुषसत्ताक धर्मव्यवस्थेवरची आपली चीड काढण्याचं माध्यम बनवलेल्या इस्मत चुगताई- ‘इस्मतआपा’. ‘खानदानी मुस्लीम घराण्यात जन्माला आलेली ‘वाह्यात’ मुलगी’ म्हणून त्यांच्या जगण्यावर आणि त्यांच्या लेखनावर खूप टीका झाली. पण त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेला, प्रगत विचारसरणीला आणि त्या विचारांचा साहित्याद्वारे प्रसार करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या बेबंद स्वातंत्र्याला कुणीच लगाम घालू शकलं नाही. आपल्या हक्कांसाठी आपणच आग्रही राहायला हवं, असं सुनावणारं इस्मतआपांचं आत्मचरित्र- ‘कागजी हैं पैरहन’ आत्मभान येण्यासाठी सर्वानीच वाचावं असं.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

उत्तर प्रदेशात बदायूँ इथं २१ ऑगस्ट १९१५ रोजी म्हणजे १०७ वर्षांपूर्वी जन्माला आलेली आणि साहित्य जगतात ‘इस्मतआपा’ म्हणून ओळखली गेलेली अत्यंत आक्रमक आणि पुरोगामी लेखिका म्हणजे इस्मत चुगताई!

इस्मत चुगताई किती प्रगत, आधुनिक विचारांच्या आणि काळाच्या किती पुढचा विचार करणाऱ्या होत्या, याची साक्ष त्यांच्या ‘कागजी हैं पैरहन’ या आत्मचरित्रात मिळते. या आत्मचरित्रातून समोर येणारा आणि वाचकाला केवळ थक्क करून सोडणारा १०० वर्षांपूर्वीचा त्यांचा तर्कशुद्ध वैचारिक जीवनप्रवास प्रत्येकानं वाचावा असाच. ‘कागजी पैरहन’चा अर्थ कागदापासून बनवलेला कपडा. पण इस्मतआपांच्या आत्मचरित्राच्या शीर्षकाचा अर्थ अर्थातच असा शब्दश: घेऊन चालणार नाही. केवळ स्वत:च्या नव्हे, तर समस्त स्त्रीजातीच्या जगण्याला इस्मतआपांनी बहाल केलेलं हे विशेषण आहे. फार प्राचीन काळी इराणमध्ये बादशहासमोर जेव्हा लाचार, असहाय्य, गुन्हेगार लोकांना उभं केलं जात असे, तेव्हा त्यांच्या अंगावर कागदी कपडा असे. कागदी कपडा हे लाचार व्यक्तीचं, दडपल्या गेलेल्या लोकांच्या आक्रोशाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाई. ‘कागजी हैं पैरहन’मधल्या इस्मतआपा स्वत: बंडखोर, समाजाच्या नाकावर टिच्चून स्वत:ला हवं तेच करणाऱ्या आहेतच, पण त्यांच्या या आत्मचरित्रात स्वत:च्या जीवनाबरोबरच त्या काळातल्या बंदिस्त, दडपलेलं जीवन जगणाऱ्या मुस्लीम समाजातल्या स्त्रीबद्दलही त्या बोलतात. साहजिकच १०० वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबातल्या स्त्रिया ज्या जगण्याला सामोऱ्या जात होत्या, त्या जगण्याचा ‘कागजी हैं पैरहन’ हा दस्तावेज आहे असं म्हणायला हरकत नाही.

  समाजव्यवस्था आणि धर्मव्यवस्था या मनुष्यजीवनाशी निगडित असलेल्या दोन मोठय़ा व्यवस्थांनी माणसाचं जीवन अंतर्बाह्य विस्कटून टाकलेलं आहे. लेखकाकडे असलेली या प्रश्नांविषयीची तळमळ आणि त्या प्रश्नांना भिडण्याची संवेदनशीलता समाजानं समजून घ्यायलाच हवी, असं इस्मतआपांचं मत होतं. अशा बाबतीत समाज असंवेदनशील असेल तर लेखक संपतो. समाजाच्या याच असंवेदनशील वृत्तीमुळे आपल्या जिवलग मित्राचं, सआदत हसन मंटोसारख्या प्रतिभावंत, मनस्वी लेखकाचं जगणं अर्थशून्य होऊन गेलं, याचं दु:ख त्या व्यक्त करतात. त्याचबरोबर आपण गतानुगतिकपणे जगणाऱ्या समाजाची भीडभाड न बाळगता अनिष्ट परंपरांवर प्रहार करत जगलो, म्हणूनच टिकलो, हे सांगत ‘मी नशीबवान आहे. मला जिवंतपणी समजून घेणारे लोक भेटले. पण त्या मंटोला बिचाऱ्याला लोकांनी वेडा करून टाकलं. मंटोची माती झाली. प्रगतशील लोकही त्याला समजून घ्यायला कमी पडले,’ अशा शब्दांत स्वत:च्या वाचकांविषयीची कृतज्ञताही व्यक्त करतात.

लहान वयापासून इस्मतआपा अतिशय बोलभांड, समोरच्या माणसाच्या वयाची पर्वा न करता स्वत:च्या बुद्धीला, तर्काला जे पटलंय त्याचा पाठपुरावा करताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता वाद घालणाऱ्या. त्यांच्या तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला की समोरच्यानं हार मान्य करेपर्यंत तो थांबतच नसे. धर्माच्या रीतिरिवाजानुसार बुरख्याची सक्ती त्यांच्यावरही झाली खरी, पण कात्रीसारख्या चालणाऱ्या त्यांच्या जिभेवर मात्र कुणाचाही अंमल चालू शकला नाही. त्यांनी तो चालवूही दिला नाही. स्त्रीच्या जगण्याचा लगाम आपल्या हातात ठेवू पाहणाऱ्या धर्ममरतडांवर तर त्यांनी हल्ला चढवलाच, शिवाय स्वत:ला प्रगतशील म्हणवून घेणारे लोकच बऱ्याचदा समाजात दुही माजवतात, हा फार महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचं, अशा दुटप्पी, ढोंगी समाजाला बेधडकपणे उघडं पाडण्याचं धाडसही इस्मत चुगताईंनी आयुष्यभर केलं. त्यामुळेच त्या ‘लेडी चंगीजखान’ म्हणून ओळखल्या गेल्या.

   विशेषत: बुरख्यापासून अनेक बंधनांत अडकून पडलेल्या स्त्रिया आजूबाजूला पाहात असताना धर्म, रीतिरिवाज या कशालाही भीक न घालता, न पटलेल्या प्रत्येक गोष्टीवर एका मुस्लीम घरात जन्माला आलेल्या मुलीनं हुज्जत घालणं ही अकल्पनीय गोष्ट होती. इस्मतआपांची आई त्यांच्या या वागण्यानं थकून गेली होती. रीतिरिवाजांवरून नात्यातल्या वयस्क लोकांशी तडातड बोलणाऱ्या इस्मतआपांनी आईकडून चपलेचा मारही खाल्लेला आहे. पुरुषासारखी मस्तवालपणे वागणारी, कसलीही मर्यादा न पाळणारी ही आपली मुलगी कुळाला कलंक लावणार, याची आईला सतत धास्ती असे. इस्मतआपांना त्या वयातही हे कळे. हे जग पुरुषांचं आहे, त्यांनीच बनवलेलं आहे आणि त्यांनीच बिघडवलेलंही आहे, हे कळे. आई या पुरुषांच्या जगाला घाबरते हेही कळे. प्रत्येक बाईनं या पुरुषांच्या जगाला घाबरूनच राहायचं असताना आपलीच मुलगी काय हे वेडंवाकडं वागते, याची चिंता आईला आहे, पण आपण त्या चिंतेत अडकून पडायचं नाही, हा ‘कागजी हैं पैरहन’मधून व्यक्त होणारा त्यांचा निर्धार वाचकाला अचंबित करत राहतो. 

 ‘बाई’ तर या पुरुषांसाठी केवळ एक वस्तू आहे, जी त्याच्या रागाला वा त्याच्या भोगाला जागा करून देण्याचं फक्त एक साधन आहे. तिला स्वत:चं ध्येय नाही, मुक्काम नाही, या जाणिवेनं लहान वयातही इस्मतआपा चवताळून उठत. या जाणिवेतूनच त्यांनी सुंदर दिसण्यासाठी पावडर, काजळ, उत्तम कपडे, कशाचाही उपयोग कधीच केला नाही. असं करणं म्हणजे आपले दोष लपवणं असं त्या मानत असत. आजूबाजूच्या कोमेजून गेलेल्या, सासू आणि नणंदांकडून त्रासल्या गेलेल्या, लाचारपणे पुरुषाची सेवा करणाऱ्या स्त्रिया पाहिल्या की आपण स्त्री आहोत याचीच त्यांना घृणा वाटे.

आपल्याला जे म्हणायचं आहे, धर्म, रीतिरिवाजांवर जे प्रहार करायचे आहेत, ते सरळपणे न करता लेखनातून करणं आवश्यक आहे आणि त्याचा परिणामही सर्वदूर होतो, कारण बऱ्याच लोकांपर्यंत ते लेखन पोहोचतं, हे लक्षात आल्यावर त्यांनी ‘लेखन’ हे धर्मव्यवस्थेवरची आपली सगळी चीड काढण्याचं माध्यम बनवलं. १९४२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘लिहाफ’ या पहिल्याच कथेवर लाहोर न्यायालयात खटला भरण्यात आला. ‘लिहाफ’ मध्ये एवढं खटला भरण्यासारखं होतं तरी काय! तर या कथेतल्या बेगमजानच्या नवऱ्याला बायकोत रस नव्हता. आपला नवरा समिलगी संबंधात रमणारा आहे हे कळल्यावर एकाकी, अपमानित, गुदमरलेलं आयुष्य जगणाऱ्या बेगमजानला घरातल्या नोकराणीचा आधार वाटू लागतो. हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण होते. कथेत कुठेही समिलगी शरीरसंबंधाचं चित्रण नाही, की आक्षेपार्ह शब्दांचा वापरही नाही. समिलगी संबंधाकडे निर्देश करणारी सूचकता मात्र होती. या कथेवर अश्लीलतेचा आरोप झाला. वास्तविक त्यांना या कथेतून लक्ष वेधायचं होतं, ते स्त्रीचं आयुष्य गुदमरून टाकणाऱ्या, तिला अपमानित करणाऱ्या, तिला सदैव गृहीत धरणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेकडे! पण ‘समिलगी संबंधाचं सूचन करणारी ‘बाई’नं लिहिलेली कथा’ म्हणून त्यांच्या या कथेवर वादळ उठलं. त्यांच्या लग्नानंतर लगेच त्यांच्या कथेवर अश्लीलतेचा आरोप झाला आणि त्यांचं सांसारिक आयुष्य जणू युद्धाचं मैदान बनलं.  जे घरात तेच बाहेरही. साहित्यिक वर्तुळातही खूप गदारोळ माजला. एका पुरुष लेखकाचा आणि इस्मतआपांचा यावरून बराच वाद झाला. त्याचं म्हणणं असं, की ‘तू एक बाई आहेस आणि बाईला असं लेखन करणं शोभत नाही.’ इस्मतआपांनी त्याच्याच अश्लील कथांची उदाहरणं देऊन, त्याला ‘तुम्ही अश्लील कथा लिहिली तर चालते. कारण काय, तर तुम्ही पुरुष! तुम्हाला देवानं पुरुष बनवलं यात माझा काही हात नाही, की मला देवानं स्त्री बनवलं यात तुमचा हात नाही. मग तसंच तुम्ही काय लिहावं यावर माझा काही आक्षेप नाही आणि मी काय लिहिते यावर तुमचाही आक्षेप असू नये,’ असं सुनावलं. इस्मतआपांच्या या उत्तरानं चवताळलेल्या त्या लेखकानं ‘तू एक स्त्री आहेस. पुरुषाशी बरोबरी करू नकोस,’ असं त्यांना धमकावलं. त्यावर ‘मला पुरुषाशी बरोबरी करायचीच नाही. मी परीक्षेतही त्याच्यापेक्षा जास्त गुण नेहमीच मिळवलेले आहेत. तेव्हा पुरुषाशी बरोबरी सोडाच, मी त्याच्या खूपच पुढे आहे,’ अशा शब्दांत त्यांनी त्याला निरुत्तर करून टाकलं. आपल्या हक्कांसाठी आपणच आग्रही राहायला हवं, नाही तर पुरुषांचं हे जग बाईची माती करून टाकतं, असं स्पष्ट शब्दांत सुनावणारं इस्मतआपांचं हे आत्मचरित्र आत्मभान येण्यासाठी तरी स्त्रियांनी आणि पुरुषांनीही वाचायलाच हवं.

इस्मतआपांनी माफी मागितली तर त्यांना शिक्षा होणार नाही, असं सांगितलं गेल्यावर त्या म्हणाल्या, ‘माफी का मागायची? माझ्या हातून गुन्हा घडला असं सिद्ध झालं, तर मला शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा घेतली की मलाही मन:शांती मिळेल. पण गुन्हा नसेल, तर माफीही मागणार नाही.’ तरीही बाईवर वार करण्याची संधी सोडेल तो समाज कसला? ‘लेखनात असली घाण कशाला हवी?’ असा प्रश्न परत त्यांना विचारला गेला, तेव्हा त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, ‘जगात जर सगळीकडे घाण असेल, तर ती साहित्यात चित्रित झालीच पाहिजे. ती लोकांना दिसेल तेव्हाच ती स्वच्छ झाली पाहिजे याचीही जाणीव लोकांमध्ये निर्माण होईल.’ अर्थातच हा खटला इस्मतआपा जिंकल्या.

पण त्यांच्या आयुष्यातले लढे इथेच संपायचे नव्हते. त्यांच्या मनात एकूणच सर्व तऱ्हेच्या विषमतेविषयी, त्यावरून जोखल्या जाणाऱ्या माणसाच्या प्रतिष्ठेविषयी आणि जगातल्या सर्व धर्मानी स्त्रीला दिलेल्या दु:खाविषयी प्रचंड खदखद होती. त्यांच्या घरातही मुलगा-मुलगी हा फरक केला जात होताच. त्यांच्या घरात दहा भावंडांमध्ये फक्त भावांना शिकण्याची परवानगी होती. ‘मुलींचं तर लग्नच व्हायचं असतं. त्यांना शिवणकाम, विणकाम, स्वयंपाक आला की झालं,’ हीच धारणा होती. अशा धारणा शतकानुशतकं बाळगणाऱ्या समाजापेक्षाही त्यांना स्वत:चाच राग जास्त यायचा. ‘माझ्यातच काही कमी आहे म्हणून असं घडतं. माझ्या भावाला शिकायचं नाही, तर त्याच्यावर शिकण्याची सक्ती. मला शिकायचं आहे, तर माझ्या शिक्षणावर बंदी. भावानं कितीही चुका करून स्वत:चं आयुष्य बरबाद करावं, तो त्याचा हक्क! पण शिकून मी अधिक चांगलं आयुष्य जगावं असं ठरवलं, तर तो हक्क मात्र मला नाही. या जगाचा, माझ्या आयुष्याचा निर्माता कोण आहे? जर हे वडिलांकडून आलं असेल, तर मला लाभलेल्या बुद्धीचं मी काय करू? मला बुद्धी लाभलीच का?’ संतापाचा कडेलोट होऊन अखेर त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार मनात येत. उंच झेप घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक स्त्रीचा हाच तर आक्रोश असतो! या अर्थानं ‘कागजी हैं पैरहन’ ही प्रत्येक स्त्रीची आत्मकथा ठरेल.

आठवीनंतर इस्मतआपांना पुढे शिकण्यासाठी अलिगढला जायचं होतं. त्यांनी आईवडिलांना तसं सांगितलं. त्यांचा नकार अपेक्षित होताच आणि त्यावर इस्मतआपांचं उत्तरही तयार होतं. त्या म्हणाल्या, ‘परवानगी नाही मिळाली तरी मी जाणार. मिळेल त्या वाहनानं अथवा चालत. पण जाण्याचा निश्चय पक्का. फी भरायला पैसे नसतील, तर मी ख्रिश्चन बनेन आणि मिशनरी शाळेत प्रवेश घेईन. मग मला हवं तितकं शिकायला मिळेल. पण मी शिकण्यासाठी अलिगढला जाणार म्हणजे जाणार.’ त्यांचा ‘करो वा मरो’चा निर्धार पाहिल्यानंतर शेवटी त्यांच्या घरून त्यांना परवानगी मिळाली. 

‘मला जगायचं आहे, पण माझ्या छातीवर मोठा पहाड असावा तसं ओझं जाणवतंय. मी धावतेय, धावतेय, मोकळी हवा हवी म्हणून तडफडतेय..’ अशा असह्य तडफडीत लग्न या विषयापासून इस्मतआपा बराच काळ दूर राहिल्या यात नवल नाही. त्यांना वाटे, ‘आपलं लग्न अशा माणसाशी होऊ नये की ज्याच्या घरात बुद्धीवर दगड ठेवून जगावं लागेल. मातीचा गोळा बनून जगणं आपल्याला कधी साध्य होणार नाही. आपण फटकळ आहोत, रूप रंग नाही, बायको होण्याचे कसले गुण नाहीत. संसार वगैरेत रमण्याची आपली वृत्ती नाही. स्वयंपाक, शिवणकाम, मुलांचं संगोपन कशातही आपल्याला रुचीही नाही आणि गतीही नाही. ज्या घरी जाऊ, तिथून दोन दिवसात ‘तलाक’ म्हणून नवरा आपल्याला माहेरी फेकून देईल. मग आपले हाल कोण खाणार! लग्न केलंच तर ते आवडलेल्या, समविचारी माणसाशी करायचं.’ ठरवल्याप्रमाणे इस्मतआपांनी स्वत:ला आवडलेल्या निर्माता, दिग्दर्शक शाहिद लतीफशी लग्न केलं. 

‘खानदानी मुस्लीम घराण्यात जन्माला आलेली वाह्यात मुलगी’ म्हणून त्यांच्या जगण्यावर आणि त्यांच्या लेखनावर खूप टीका झाली. पण त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेला, प्रगत विचारसरणीला आणि त्या विचारांचा साहित्याद्वारे प्रसार करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या बेबंद स्वातंत्र्याला कुणीच लगाम घालू शकलं नाही. ‘कागजी हैं पैरहन’मध्ये त्या चेष्टेत म्हणतात, ‘मी फार चिवट आहे. अशी तशी मरणार नाही. मलेरियासारख्या साथीच्या रोगात घरातले सगळे आजारी पडले. पण मला एक दिवसही ताप आला नाही मलेरियाचे विषारी जंतू माझं विषारी रक्त पिऊन बहुतेक मरून गेले असावेत!’ अतिशय हजरजबाबी, मिश्किल, स्वत:वर विनोद करणारी अशी ही इस्मतआपा!

इस्मतआपा वयाच्या शहात्तराव्या वर्षी जग सोडून गेल्या. पण जग सोडून जातानाही त्यांनी शेवटचं बंड केलंच. ‘मुस्लीम असूनही मेल्यानंतर आपल्या शरीराचं दफन करू नये, तर जाळून टाकावं’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्या इच्छेप्रमाणे मरणोत्तर त्यांचं दहन करण्यात आलं. मृत शरीराचं दहन झालं काय, दफन झालं काय! ते मिसळतं शेवटी मातीतच. शिल्लक राहातो तो तुम्ही दिलेला विचार, तुमचं काम, तीच तुमची खरी ओळख.. धर्माच्या वृथा अभिमानाशी त्याचं काहीच देणंघेणं नसतं. हाच विचार तर इस्मतआपांनी आपल्या अखेरच्या बंडखोर अटीतून जाता जाता जगाला दिला नसेल?..

mangalaathlekar@gmail.com