मंगला आठलेकर

पुरुषप्रधान संस्कृतीत घडलेली समाजाची मानसिकता आणि ती घडायला बळ देणाऱ्या धर्मपोथ्या, यांवर तस्लिमा नासरिन या बांगलादेशी लेखिकेनं सातत्यानं झोड उठवली. त्यांच्या तीस वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘निर्वाचित कलाम’ या पुस्तकात त्यांनी आपल्याला आलेल्या अनुभवांसह अनेक स्त्रियांना भोगावं लागणारं वर्तमान प्रखरतेनं मांडत स्त्रीनं याविरोधात बंड उभारायलाच हवं, असं आवाहन केलं. सुमारे तीस वर्षांपूर्वी अत्यंत थेट, जळजळीत भाषा वापरत निर्भीडपणे लिहिलेलं हे पुस्तक स्त्रीच्या पारंपरिक जगण्याचे आयाम दाखवणारंच आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

‘एके दिवशी ‘ते’ माझी हत्या करतील याबद्दल मला मुळीच शंका नाही! मी अजिबात घाबरत नाही. रस्त्यात अपघात होतात हे माहीत असतानाही आपण रस्त्यातून जात नाही का? विजेचा शॉक बसला तर माणूस मरतो, म्हणून आपण विजेची उपकरणं वापरणं सोडून देतो का? नाही. मला याच समाजात राहायचं आहे. समाज वारंवार फणा काढून मला दंशही करतो आहे. माझी बाजू सत्याची असून आणि ती समजत असूनही कोणीही माझ्यासोबत उभं नाही.. बहुतेक नि:शब्दपणे स्वत:ची कत्तल करून घेऊन मला स्त्रीजन्माचं प्रायश्चित्त करावं लागणार.’

 तीस वर्षांपूर्वीचे हे उद्गार आहेत तस्लिमा नासरिन यांचे! समजायला लागल्यापासून स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता स्त्रियांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या तस्लिमा नासरिन यांचे! स्त्रीच्या अधिकारांविषयी आत्मीयतेनं आणि त्याचबरोबर पोटतिडकीनं बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या जेवढय़ा म्हणून लढाऊ वृत्तीच्या स्त्रिया जगभरात आहेत, त्यात बांगलादेशची लेखिका तस्लिमा नासरिन हे नाव आघाडीवर आहे. तस्लिमांच्या मते, शरियत, हादिसमधून स्त्रीभोवती जाचक आणि अन्याय्य निर्बंधांचा चिरेबंदी तुरुंग निर्माण केला, म्हणूनच त्या त्यांच्या लेखनातून विजेच्या लोळाप्रमाणे कडाडत, कोसळत, प्रहार करत राहिल्या. त्यासाठी त्यांच्या कट्टर लोकांनी दिलेल्या शिक्षा भोगत राहिल्या.

 वारंवार तस्लिमांना या देशातून त्या देशात परागंदा अवस्थेत आश्रय घ्यावे लागले, वारंवार त्यांच्यावर हल्ले झाले. त्यांचं मस्तक उडवण्यासाठी, ठार मारण्यासाठी, तोंडाला काळं फासण्यासाठी मोठमोठय़ा बक्षिसांच्या रकमा जाहीर झाल्या, त्यांच्या हकालपट्टीसाठी फतवे काढले गेले, पण तरीही त्या तसूभरही मागे हटल्या नाहीत. सगळय़ा शिक्षा भोगत त्या लढतच राहिल्या. हे सारे अनुभव तस्लिमांनी शब्दबद्ध केले आहेत ‘निर्वाचित कलाम’ या पुस्तकामध्ये! ‘निर्वाचित कलाम’ म्हणजे निवडक स्तंभलेख. हे सारे लेख स्त्री-स्वातंत्र्याचा उद्गार आहेत.

 पुस्तकाच्या सुरुवातीला तस्लिमा म्हणतात, ‘अजून कोणी अ‍ॅसिड टाकून माझा चेहरा भाजला नाही, मला आंधळं केलं नाही, म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजते. अजून कोणी माझ्यावर बलात्कार केला नाही. त्यापासून मी अजून बचावले आहे हे माझं केवढं भाग्य! अशा अत्याचारांना घाबरण्यासारखा कोणता अपराध मी केलाय? माझा अपराध एकच- मी स्त्री आहे. माझं शिक्षण, माझी बुद्धिमत्ता, माझी आवड मला ‘माणूस’ करू शकलेली नाही.’ ‘निर्वाचित कलाम’चं मर्म या चार वाक्यांतच पुरेसं स्पष्ट होतं.

 हे पुस्तक धर्म आणि व्यवस्थेनं स्त्रीवर केलेले अन्याय तिच्या स्वत:च्या अनुभवांच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवतं. ‘बाई’ म्हणून जन्म घेणं हाच घोर अपराध! पुरुषाशिवाय ती अपूर्ण! तिच्या अवघ्या आयुष्याचा केंद्रिबदू पुरुष. समाजाला एकटी स्त्री पाहायची सवय नाही. स्त्री भावाबरोबर, वडिलांबरोबर अथवा नवऱ्याबरोबरच दिसली पाहिजे. चित्रपटाला, नाटकाला, भटकायला एकटी बाहेर पडणारी स्त्री उठवळच! तस्लिमांना स्त्रीभोवतीच्या या पहाऱ्याची विलक्षण चीड आहे. त्या म्हणतात, ‘समजा, मला समुद्र पाहायचा आहे, सीताकुंड पर्वतावर जायचं आहे, बिहारमधल्या शालबनला भेट द्यायची आहे, काप्ताई लेकमध्ये स्पीड बोटीतून संपूर्ण दुपार फिरायचं आहे, तर मला काय करायला हवं?.. एक पुरुष मिळवायला हवा!’  बाईनं पुरुषाच्या सोबतीशिवाय एकटीनं फिरायचं हा साऱ्या पुरुषजातीचा अपमान! तिच्या रक्षणाचाच विचार त्याच्या मनात आहे म्हणावं, तर तिच्या रक्षणाची भूमिका घेणारा हा पुरुष तिचा खरंच रक्षणकर्ता आहे का? आज स्त्रीनं स्वत:ला हा प्रश्न विचारला तर तिला उत्तर हेच मिळेल, की रस्त्यानं जाता-येता तिला धक्के मारणारा पुरुषच असतो. तिच्यावर अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप करणारा पुरुषच असतो, तिचं अपहरण करणारा, तिच्यावर बलात्कार करणारा पुरुषच असतो. बलात्कारामागे संभोगाच्या इच्छेबरोबरच स्त्रीद्वेष, सत्तेचा उद्दामपणा, स्त्रीला नमवणं, वाकवणं, तिची हिंमत मोडणं, हा पुरुषी अहंकारही आहे. शिवाय हा कुणी अनोळखी, परका पुरुष असतो म्हणावं, तर तिचे स्वकीयही तिच्यावर वेगळय़ा तऱ्हेचे अन्याय करत असतातच.

  तस्लिमांचं ‘निर्वाचित कलाम’ हे पुस्तक स्त्रीवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचारांसाठी पुरुषी मानसिकतेला आणि ही मानसिकता घडवणाऱ्या धर्मपोथ्यांना जबाबदार धरतं. स्त्रीविषयी एकूणच समाजाकडे ममत्वभाव नाही. वडील, भाऊ, प्रियकर, नवरा, या नात्यांनी स्त्रीच्या आयुष्यात येणारे पुरुष तिचं आयुष्य कितपत सुखी आणि सुरक्षित करतात, याविषयी तस्लिमांच्या मनात असलेलं प्रश्नचिन्ह या पुस्तकाच्या द्वारे वाचकाला समाजव्यवस्थेतल्या क्रौर्याचं नेमकं भान देतं आणि जगण्याची वाटचाल माणूसपणाच्या दिशेनं होण्याची आवश्यकताही स्पष्ट करतं.

  विशेषत: लग्न स्त्रीला सुरक्षितता, सुख, मन:स्वास्थ्य देतं, यावर तस्लिमांचा विश्वास नाही. तस्लिमांनी तीन लग्नं केली. पण लग्न त्यांच्यासाठी सुखकारक झालं नाही. साहजिकच लग्नव्यवस्थेतल्या जाचक अटी त्यांच्या लेखनाचं लक्ष्य बनल्या. स्वत:ला असहाय्य समजणाऱ्या स्त्रियांना बळ देताना ‘निर्वाचित कलाम’मध्ये त्या म्हणतात,‘.. कोण म्हणतं स्त्री एकटी राहू शकत नाही? माझं सर्वस्व लुटून, मला दारिद्रय़ात ढकलून जेव्हा ते फसवे, लबाड पुरुष त्यांना पाहिजे तिथं पळाले, तेव्हा मी धूळ झटकून व्यवस्थित उभी राहिले. मी फिरू शकते, धावते, मोडक्या जिन्यावरून चढते, उतरते. मला काही त्रास होत नाही. उलट एखाद्या लंपट पुरुषाच्या ताब्यात राहून आयुष्य घालवावं लागत नाही. आपण ज्या पुरुषाला देव मानायचं, त्यानं वेश्येची सोबत करून तृप्तीचा ढेकर देत घरी यायचं आणि सवय म्हणून आपल्याशी प्रेमाचं नाटक करायचं, असं आयुष्य वाटय़ाला आलं नाही म्हणून मला खूप आनंद होतो. अशा जीवनात स्त्रीचं पाठपोट असतं ते नवऱ्याचा मार खाण्यासाठी!’ विशेष म्हणजे हे सगळं समाजमान्य असतं.

 ‘निर्वाचित कलाम’च्या माध्यमातून या समाजमान्य अन्यायांच्या विरोधात तस्लिमा सर्व ताकदीनिशी उभ्या राहताना दिसतात. त्यांच्या मते कधी कधी गोष्टी खूप साध्या वाटतात, पण अशा साध्या, क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीतूनही स्त्रीच्या जगण्यावर कसे प्रचंड दबाव आहेत हे लक्षात येतं. पुरुषाचं घरात लक्ष नसलं तरी चालतं, पण बाईनं घरातल्या सगळय़ा गोष्टी- अगदी स्वयंपाकपाणी, शिवण-टिपण, मुलांचा अभ्यास, त्यांच्या तब्येती, सारं निगुतीनं पाहिलं पाहिजे. मन, इच्छा वगैरे तिला नाहीच. सुंदर स्त्रीकडे पुरुष वळून पाहू शकतो, पण सुंदर पुरुषाकडे स्त्रीनं वळून पाहणं म्हणजे केवढा निलाजरेपणा! तस्लिमा म्हणतात, ‘साधारणत: पुरुषच स्त्रियांकडे वळून बघतात. पण मी एकदा एका देखण्या पुरुषाकडे पुन्हा पुन्हा वळून पाहिलं, तर माझ्या बरोबरच्यांनी माझी छी: थू केली.’

वर वर छोटय़ा वाटणाऱ्या, पण अपमानकारक गोष्टी बायका कशा चालवून घेतात, हा ‘निर्वाचित कलाम’मधून त्यांनी स्त्रियांना विचारलेला प्रश्न प्रत्येक स्त्री वाचकाला आणि पुरुष वाचकालाही अंतर्मुख करणारा आहे. मुलगी पसंत करताना मुलाकडची मंडळी मुलीला पारखून घेतात. गोरा रंग, लांब केस, उन्नत उरोज, शेलाटी अंगकाठी, अशा साऱ्या अपेक्षा बाळगत तिची परीक्षा होते. मुलाची पारख करण्याची प्रथा नाही. मुलीची अशी पारख करण्यात तिचा अपमान नसेल, तर मुलाचीही अशीच परीक्षा मुलीकडच्या माणसांनी केली पाहिजे. तस्लिमा म्हणतात, ‘पुरुषाच्या जशा वधू निवडताना अपेक्षा असतात, तसंच स्त्रीनंही पुरुषाकडे रातांब्याप्रमाणे ओठ, फणसाच्या आठळीसारखा रंग, बांधलेल्या परातीसारखी छाती, अशी विलक्षण मागणी केली पाहिजे! स्त्रीच्या इच्छेप्रमाणे सर्वाग असलेला पुरुष तिला हवा असेल, तर तसं म्हणायला तिनं का लाजावं? पुरुषाला तर अशा मागण्या करताना काही लाज वाटत नाही.’

तस्लिमांनी हे जवळपास तीस वर्षांपूर्वी लिहिलेलं असलं, तरी आजही या अपेक्षेत आणि या चित्रात फारसा बदल झालेला नाही. आणि याचं कारण आहे सर्व धर्मानी सर्व बाबतीत पुरुषांना दिलेली सूट आणि स्त्रियांवर घातलेली बंधनं! धर्मपोथ्यांकडे बघण्याचा डोळसपणा हे या पुस्तकाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़! लहान वयातच तस्लिमांनी आंधळेपणानं धर्मग्रंथांचं पठण करायला नकार दिला,असा उल्लेखही या पुस्तकात येतो.

 तस्लिमा स्त्रीला बिलकूल दुबळी मानत नाहीत. स्त्रीकडे असलेल्या अंगभूत सामर्थ्यांविषयी त्या बोलतात. त्यांच्या मते, स्त्रीचा पिंडच मुळात अत्यंत कणखर आहे. कितीही प्रतिकूल परिस्थितीत ती तग धरू शकते. आपण पाहतो, बायको निधन पावली तर नवऱ्याचा धीर सुटतो, त्याचा संसार तिच्याविना वाऱ्यावर जातो. पण नवरा गेला तरी स्त्री संसार उभा करते, मुलांना वाढवते. तिची आंतरिक शक्ती इतकी पहाडासारखी भक्कम आहे. म्हणूनच शिक्षांची विविध फर्मानं सुटूनही तस्लिमा सांस्कृतिक चौकटी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांच्या विरोधात बेडरपणे लिहीत आहेत.

 तस्लिमा वेगवेगळय़ा सुरात स्त्रीला जागं करू पाहतात, भानावर आणू पाहतात. नवरा मनात आलं की बायकोला मारझोड करू शकतो, घराबाहेर हाकलू शकतो, अत्यंत क्षुल्लक कारण शोधून घटस्फोट देऊ शकतो, उपाशी ठेवू शकतो, बाहेरख्यालीपणा करू शकतो आणि एवढं झालं तरी स्त्री आपली याचकाच्याच भूमिकेत! तस्लिमा म्हणतात, ‘इतकं झाल्यावरही जी स्त्री धर्माचं सर्वव्यापी ओझं तिच्या शरीरावर आणि मनावर वाहील तिला बिनडोक आणि निर्लज्ज म्हणून तिचा धिक्कार केल्याशिवाय मला राहावणार नाही.’

 कधी परिस्थितीला दोष देत त्या म्हणतात, ‘स्त्रिया जगू शकतात. अश्वत्थाप्रमाणे चांगल्या उंच होऊ शकतात. पण मातीला कस नाही. दगडगोटे इतके, की त्यात पाणी मिळत नाही. खडकाळ जमिनीत झाड वाढत नाही, तसं आमचं आहे..’ कधी भावनिक आवाहन करत त्या म्हणतात, ‘ते तुम्हाला चितेवर चढवतील, स्त्रीत्व म्हणजे काय ते समजावून सांगतील, मातृत्वाचं माहात्म्य वर्णन करतील, हा सगळा कट आहे. तुम्ही जर माणूस असाल तर  शृंखला तोडून टाका. दोन्ही हातांनी शृंखला तोडा. हे तुमचेच हात आहेत. पळून जा. हे तुमचेच पाय आहेत. तुम्हाला दोन डोळे आहेत, त्यांनी जीवन पाहा. खळखळून हसा, भरभरून बोला, कारण हे ओठ, ही जीभ हे सर्व तुमचंच आहे. तुम्ही आपादमस्तक तुमच्या स्वत:च्या आहात. आमूलाग्र तुमच्या स्वत:च्या आहात.’

१९६२ मध्ये जन्मलेल्या तस्लिमांना त्यांच्या या बंडासाठी १९९४ मध्ये- म्हणजे वयाच्या बत्तिसाव्या वर्षी बांगलादेशातून हद्दपार करण्यात आलं. तेव्हापासून स्वीडन, जर्मनी, अमेरिका, भारत, अशा अनेक देशांत आश्रय शोधत त्या फिरल्या. आज भारतात दिल्लीमध्ये त्या सुरक्षेचा उपाय म्हणून एका घरात नजरकैदेतलं एकाकी जीवन जगत आहेत. सोबतीला आहे फक्त एक मांजर! आयुष्यात जेवढय़ा म्हणून शक्य आहेत तेवढय़ा साऱ्या दुर्घटना त्यांच्याबरोबर घडल्या आहेत. आपल्या जगण्याचा सारांश ‘निर्वाचित कलाम’मधून मांडताना त्या म्हणतात, ‘आमच्या समाजातील मंडळींनी सरकारकडे मला शिक्षा देण्याची मागणी केलीय. त्यांच्या असं करण्याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण पाया

नसलेल्या आणि अतार्किक गोष्टींना मी विरोध करते. आणि धर्माला ते स्वत:ची खासगी मालमत्ता समजत असल्यानं मी जिवंत असेपर्यंत ते आज सजा, उद्या फाशी.. अशी मागणी करणारच हे मला ठाऊक आहे. पण प्रगतिशील म्हणवणाऱ्या शक्ती उघड किंवा आडून माझ्यावर हल्ला करतात, त्यांचा भयंकर, भेसूर आणि हिंस्र चेहरा मला दिसून येतो, तेव्हा मात्र माझ्या आश्चर्याला पारावार राहत नाही.. मी एकटी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. कपटी पुरुषांच्या थोबाडीत ठेवून देण्याची शक्ती माझ्यात आहे. सर्व निंदेच्या तोंडावर थुंकून, सर्व अशुभ शक्तींच्या विरोधात मी उभी आहे.. विटंबना झालेली, विपन्नावस्थेतली, दुर्दैवी, निराश्रित स्त्री अशी उभी राहू शकते. मी उभी राहू शकते, तर इतर स्त्रिया का नाही उभ्या राहू शकणार?’ 

 पुस्तकांत समाज बदलण्याची आस असते. ‘निर्वाचित कलाम’सारखी पुस्तकं ही आस बाळगूनच लिहिली जातात. समाजाला आत्मपरीक्षणासाठी प्रेरित करतात. त्यासाठी हे सारं मुळातूनच वाचायला हवं.

mangalaathlekar@gmail.com