मंगला आठलेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सानिया यांची ‘स्थलांतर’ ही कादंबरी मनोव्यापाराच्या मन बैचेन करणाऱ्या प्रश्नांच्या घनदाट जंगलात वाचकाला घेऊन जाते, पण नात्यांकडे बघण्याचं डोळसपणही देते. एकूणच नातेसंबंध समजून घेण्यासाठी आणि जगणं थोडंसं सोपं होण्यासाठी ही कादंबरी प्रत्येकानं वाचायलाच हवी.

माणसाच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्रांतीमागे पुस्तकं ठामपणे उभी असतात, हे जागतिक इतिहास सांगतो. माणसाच्या पदरात फक्त दु:खच टाकणाऱ्या विविध व्यवस्थांनी पिडल्या गेलेल्या जगभरातल्या माणसांच्या दु:खाचा वारंवार उच्चार अनेक विचारशील, प्रगतिशील लेखकांनी आपल्या पुस्तकांतून केलेला आहे आणि आवश्यक त्या बदलासाठी समाजमन तयारही केलं आहे. ही दु:खं बाहेरून लादलेली असतात आणि ती माणसानं निर्माण केली असल्यानं त्यांचा शेवट करणंही माणसाच्याच हातात असतं.

‘वाचायलाच हवं’ या सदरात अशा पुस्तकांचा ऊहापोह होतो आहेच. पण फक्त जाचक व्यवस्थाच माणसाच्या दु:खाला कारणीभूत आहे असं थोडंच आहे! नातेसंबंधांनी निर्माण केलेल्या दु:खाचं आपण काय करणार आहोत? नातेसंबंधात निर्माण होणाऱ्या मानसिक दु:खाचं निर्मूलन करण्यासाठीचा कायदा अजून अस्तित्वात आलेला नाही. परस्परांच्या मनाचं आकलन न होणं आणि त्यातून निर्माण होणारे गैरसमज ही माणसाच्या आयुष्यातली सतत भळभळत राहाणारी जखम! अशी कारणं न उकललेली दु:खं सोबत घेऊन माणसाचा प्रवास कधी संपून जातो हे कळतही नाही. ‘कालपर्यंत जवळची असलेली व्यक्ती आज अचानक बोलायची का बंद होते? सगळे संबंध का संपवते?’,‘बायको अशी का वागते? काय चाललेलं असतं तिच्या मनात?’, ‘आईवडिलांना माझं मन कधी कळलंच नाही का?’, ‘इतकी वर्ष संसार केला, पण माझी एक लहानशी आवडही कधी लक्षात नाही आली माझ्या नवऱ्याच्या’, ‘सख्ख्या भावाच्या मनातही इतका द्वेष.. मग सख्खं असणं म्हणजे काय?’ अशा अनेक टोचण्या घेऊन माणसं जगत असतात. या दुखण्यावर औषध नाही.  सानिया यांची ‘स्थलांतर’ ही कादंबरी अशा मनोव्यापाराच्या मन बेचैन करणाऱ्या प्रश्नांच्या घनदाट जंगलात वाचकाला घेऊन तर जातेच, पण नात्यांकडे बघण्याचं एक डोळसपणही देते. जगण्याची समज प्रगल्भ पातळीवर घेऊन जाणारी ही कादंबरी एकूणच नातेसंबंध समजून घेण्यासाठी आणि जगणं थोडंसं सोपं होण्यासाठी प्रत्येकानं वाचायलाच हवी. इतरांची दु:खं वाचून, इतरांच्या नात्यातले ताण वाचून आपलं जगणं सोपं होतं का? तर नक्कीच नाही. पण माणसाचं मन हे एक अजब रसायन आहे आणि ते इतरांनाच कशाला, खुद्द स्वत:लाही अनेकदा कोडी घालतं. हे वास्तव जरी अशी पुस्तकं वाचताना स्वीकारता आलं तरी खूप झालं. व्यवस्थेनं दिलेल्या दु:खाच्या संदर्भात सानिया कमी लिहितात. या व्यवस्थेच्याही पलीकडे माणसं आपल्या वागण्यानं दुसऱ्या माणसांचं जगणं कसं सुखावह किंवा दु:खद करतात याचा शोध त्या घेतात. दुसऱ्याला आनंद देण्यापेक्षा दु:ख आणि त्रास कसा होईल या प्रेरणेनंच अनेकदा माणसाच्या हातून अधिक कृती घडत असतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याच्या वर्मावर बोट ठेवणं, आईवडील सांगतात ते बरोबर आहे हे मनोमन पटलं असूनही त्यांना त्रास व्हावा म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध वागणं, नात्यांमध्ये गैरसमज जिवंत ठेवणं.. अंतर कमी होण्यापेक्षा ते वाढवत नेणाऱ्या या साऱ्या कृती आणि त्यामुळे बेचैन असलेली मनं!  ‘स्थलांतर’मध्ये अशाच बेचैन, अशांत मनाचा एक शांत शोध सानिया घेताना दिसतात. शांत अशासाठी, की हे करताना त्यात कसला अभिनिवेष नाही, आग्रह नाही, त्रागा नाही, तक्रारी नाहीत. अनेक गोष्टी सहज घेणं, किंबहुना माणसाच्या संदर्भात गृहीत धरणं आणि त्याकडे डोळसपणे पाहाणं हे सानियांचं वैशिष्टय़ आहे आणि त्यांच्या लेखनाचं बळही आहे. म्हणूनच लेखनात त्यांचा अधिक भर आहे तो तटस्थ, शांत वृत्तीनं मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे निरखण्यावर!

खरंतर सानियांचा लेखनकाळ हा स्त्रियांचे प्रश्न आणि स्त्रीमुक्ती या प्रश्नांनी भारलेला असताना सानिया मात्र माणसामाणसांतल्या नातेसंबंधांचा शोध घेत राहिल्या. केवळ स्त्रीचंच नव्हे, तर पुरुषाचं मनही कसा विचार करतं, नातेसंबंध कसे जुळतात, कसे घनिष्ठ होतात, आयुष्य बहरून टाकतात किंवा मग कसे अचानक तुटतात आणि अवघ्या आयुष्यालाच कसं पांगळं करून जातात याविषयी सानिया लिहितात. तटस्थपणे लिहितात. आणि तरीही माणसाच्या जगण्याविषयीची त्यांची आत्मीयताही त्यात प्रतीत होत राहते.

‘स्थलांतर’ या कादंबरीत अशाच एका नातेसंबंधाचा- जगदीश, त्याची बहीण सावित्री, सावित्रीचा नवरा मनोहर आणि त्यांची मुलगी नंदिता यांच्या एकमेकांशी बांधल्या गेलेल्या आयुष्याचा, त्यातल्या अनेक कातर क्षणांचा शोध आहे. ‘स्थलांतर’ ही भावाबहिणीतल्या आणि मामाभाचीतल्या अनोख्या नात्याची कथा आहे. ही खरंतर अशा प्रत्येक मनस्वी माणसाची आयुष्यकथा आहे. जगदीश हा नंदिताचा मामा. या दोघांचं मामाभाचीचं जे नातं कादंबरीतून समोर येतं, ते खूप जवळचं, घनिष्ठ, प्राणापलीकडचं आहे. त्या नात्याला नाव देण्याची गरज त्या दोघांनाही वाटत नाही. मुळात आपल्याला वाटणाऱ्या एकमेकांच्या ओढीचं कोणतंही स्पष्टीकरण द्यायला आपण बांधील आहोत हेच त्यांना मान्य नाही. इतकंच नव्हे, तर आपल्यात असलेल्या प्रेमाचं स्पष्टीकरण कुणाला हवं असेल हा विचारही त्यांच्या मनात येत नाही. विलक्षण जिव्हाळा, वेगळं अस्तित्वच नाही असा सतत मनानं केलेला परस्परांचा विचार, जगदीश किती आपला आहे याची परीक्षा घेताना नंदितानं आपल्या वागण्यानं त्याला दिलेले क्लेष आणि तसाच परस्परांवरच्या हक्काविषयीचा भक्कम विश्वास अशी या नात्याची अनोखी रूपं कादंभरीभर जाणवत राहतात. ‘स्थलांतर’मध्ये मनोगतरूपानं, पत्ररूपानं जगदीश आणि नंदिता गेलेल्या सगळय़ा क्षणांची उजळणी करतात. सावित्री आणि जगदीश ही सावत्र भावंडं, पण गेल्या जन्मीच्या रक्ताच्या नात्याची काही खूण पटावी तसा त्यांच्यात परस्पर आत्मीयतेचा एक घट्ट धागा आहे. सावित्रीला मूल नको असतानाही केवळ जगदीशनं समजूत घातली म्हणून झालेला नंदिताचा जन्म, जन्मापासूनच नंदिताचं आपल्या मामावर- जगदीशवर विसंबणं, तिचं आईशी चाललेलं सततचं बंड, स्वत:च्या बुद्धीची, हुशारीची तिनं हट्टानं केलेली धूळधाण, पुढे शंतनूशी अविचारानं केलेलं लग्न, तिचा घटस्फोट, पुन्हा दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून परदेशात स्थायिक होण्याचा तिचा चाललेला विचार, हे सगळं जगदीश पाहातो आहे. तिच्या एकेका निर्णयानं धास्तावत असतानाही तिचा पाठीराखा म्हणून उभा राहातो आहे आणि तिनं कितीही स्थलांतरं केली तरी तो बांधत असलेल्या नव्या घरात तिच्यासाठी एक खोली राखून ठेवतो आहे. परत आलोच तर आपल्यासाठी इथे जागा आहे, हे तिलाही ठाऊक आहे. एकमेकांवर हे नितांत विसंबणं आहे तोपर्यंतच जगणं शक्य आहे, हाच तर जगण्यासाठी बळ देणाऱ्या नात्याचा अर्थ! माणसं लग्न करतात, आयुष्यभर भांडत एकत्र राहातात, कुटुंब वाढवतात, प्रेम, सुरक्षेची अपेक्षा करतात, परस्परांची फसगतही करत राहातात. एकामागोमाग एक अशा अनेक प्रसंगांच्या कटू गाठी मनाला बसतात आणि ‘आपलं’ म्हणावं असं कुणीच भेटलं नाही हे दु:ख मनात घेऊन खंतावत माणसं एक दिवस संपून जातात. मैत्री असो, संसार असो अथवा कामाचं ठिकाण असो. ‘कुठलीतरीच माणसं एकत्र येत असतात. हवी ती येतच नाहीत’ ही प्रत्येकाची तक्रार असते. अगदी प्रेमात पडून लग्न केलेल्या जोडप्यातसुद्धा कालांतरानं ‘आपण काय पाहून प्रेम केलं?’ असा प्रश्न दोघांच्याही मनाला पडलेला असतो. नातं कोणतंही असो, तिथे जर मोकळय़ा श्वासाला जागा नसेल, तर अंतर वाढतच जातं. अगदी सख्ख्यांबरोबर जमवून घेतानाही जगणं मेटाकुटीला येतं, तिथे जोडलेल्या नात्याची कहाणी अधिक परीक्षा घेणारी! 

 नंदिताच्या वाटय़ाला आलेली दु:खंही अशीच तिनं दुराग्रहापायी ओढवून घेतलेली. कुठल्याही नात्यात सक्तीनं काही साध्य होत नाही. प्रेम कुणावर लादता येत नाही. सावित्री आणि जगदीशच्या नात्यात खोटच नाही कसली. म्हणून त्यांना आपुलकी सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करावे लागत नाहीत. ज्यांना ते लागतात त्यांचं आयुष्य विस्कटून जातं. जसं नंदिताचं आयुष्य विस्कटून गेलंय. नातेसंबंधातलं वैफल्य मनाला जितकं नैराश्य देतं त्याहून अधिक कुरतडणारं दुसरं दु:ख नाही माणसांच्या जगात.

अनेक लहानसहान प्रसंगांतून जगण्याचा हा सारा अर्थ मांडत ही कादंबरी उभी राहाते. इथे जास्त जे घडतं ते मानसिक पातळीवरचं. घटना, प्रसंग खूपच मोजके. बहीणभावंडातलं नातं, मामाभाचीतलं नातं, नवराबायकोतलं नातं.. जगण्याचा दिलासा कोणत्या नात्यात मिळतो? वास्तवात प्रत्येक नात्यात तो असतोच आपल्या जागी. फक्त कळावा लागतो. पण तो कळत नाही ही शोकांतिका आहे माणसाची.

आपल्या ‘टाकलेल्या’ बायकोच्या घरून सहा-सात वर्षांच्या जगदीशला वडिलांनी नव्या घरी आणलं आहे, जिथे त्याची सावत्र आई आणि तिची सावित्री ही मुलगी राहात असतात. या वयात दुसऱ्या बाईला ‘आई’ म्हणणं आणि तिच्या मुलीला बहीण मानणं सहजसाध्य नाही. पण सावित्रीला आणि जगदीशला जमवून घ्यायला प्रयास पडत नाहीत. ते एकमेकांसाठी सर्वकाही होतात. ते कधीच कुठले काथ्याकूट करत नाहीत. त्यामुळे त्यांचं नातं उलट अधिक गाढ, प्रगल्भ होतं. सावित्रीच्या आठवणीत तर जगदीश नेहमीच ‘असलेला’ आहे, कुठून तरी बाहेरून आलेला वगैरे नाही. तिनं त्याचं ‘असणं’ नुसतं गृहीतच धरलेलं नाही, तर ते केवळ आत्मीय आहे हे तिच्या वागण्यातून कळतं. पुढे वाढत्या वयात नातं मध्ये येतच नाही. मैत्री, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं आणि न सांगताही मनातलं सारं समजणं, इथपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे. या नात्याला नाव देण्याची त्यांना गरज वाटत नाही. ‘एकमेकांसाठी असणं’ हाच दृढ विश्वास. हाच विश्वास आपल्या आणि जगदीशच्या नात्यात निर्माण व्हावा हा सावित्रीच्या मुलीचा, नंदिताचा अट्टहास आहे. जगदीशकडून आयुष्यभराच्या विश्वासाचा हात पुढे असतानाही नंदिताचाच त्यावर विश्वास नाही. ती त्याची हरप्रकारे परीक्षा घेऊ पाहाते. जगदीश तिला सांगतो, ‘‘नंदू, या आयुष्यात एक जरी कुणी असं मिळालं, ज्याला आपण असायला हवे असतो तरी ते खूप असतं. कित्येकांना कुणीसुद्धा नसतं. आपल्या आयुष्यातले वेडेवाकडे क्षण उघडे करावेत असं माणूस लाभणं तर कठीणच.. लोकांना कुठे काय कळतं? त्यांचे समज-गैरसमज दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडूही नये. आपल्याला आपल्यापुरत्या माणसांशी संवाद करता आला की झालं.’’ पण हे सगळं इतकं खोलात जाऊन समजून घेण्याची नंदिताची मन:स्थितीच नाही. 

  खरंतर आनंदात राहाण्यासाठी माणसाला काय लागतं? आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे वागू देणं! आणि हेच माणसाला कठीण जातं. सुदृढ नात्यात स्वातंत्र्य अध्याहृत असतं. इतरांच्या वागण्याचे आपण काढत असलेले निष्कर्ष आणि आपल्याला हवं तसं दुसऱ्यानं वागलं पाहिजे ही अपेक्षा सर्व दु:खांचा प्रारंभ असते. या अर्थानं सानियाची ‘स्थलांतर’ कादंबरी वाचकाला आपल्या आत डोकावून बघायला भाग पाडते. 

‘जगदीशवर मला माझ्या आईइतका हक्क का प्रस्थापित करता येत नाहीये’ म्हणून नंदिता सतत स्वत:ला क्लेश करून घेत राहाते. आईनं आणि जगदीशनं बालपणी एकत्र घालवलेले क्षण आणि त्यात निर्माण झालेला घट्ट मैत्रीचा धागा माझ्या आणि जगदीशच्या संबंधातही तसाच घट्ट असला पाहिजे, असा फक्त दु:ख निर्माण करणारा हट्ट करते. सानिया नात्यांचे अर्थ फार नेमकेपणानं जाणतात. नात्याचं घट्टपण हे माणसामाणसा- गणिक कमीअधिक असतं. नात्यातली खोली ही स्पर्धेनं जिंकता येत नाही. त्यासाठी ते नातं आतूनच उमलून यावं लागतं. आणि तसं ते उमलत नसेल तर ते आपलं नाहीच म्हणून सोडून देता यायला हवं, हे बळही या लेखनातून त्या देतात. पण माणसं सारं काही अट्टहासानं करण्यातच जगण्याची सार्थकता मानत असतात आणि यात अनेक मनं घायाळ होत राहतात. सावित्रीला वाटतं, की नंदितानं अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावेत, नीटनेटकं राहावं, तिच्या आयुष्याला शिस्त असावी. तर नंदू नेमकं याच्याविरुद्ध वागून आईला दु:ख दिल्याचा आनंद मिळवत राहाते. शंतनूशी लग्न करण्याला आईची फारशी संमती नाहीये हे लक्षात आल्यावर त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय ती घेते. हा निर्णय पुढे आपल्यालाच दु:ख देणारा असू शकतो, हा विचारही आईला दु:ख देण्याच्या हट्टापुढे धूसर होतो. जगदीशला त्रास होईल असं काय करता येईल, तर त्याचं आपल्या लांब केसांवर प्रेम आहे, ते केसच कापून टाकायचे! नंदिता केस कापून येते तेव्हा त्याला हरवल्याचा, त्याला पराभूत केल्याचा केवढातरी विजयी भाव तिच्या चेहऱ्यावर असतो. यात आपण क्षणिक आनंद मिळवला खरा, पण ज्याचं प्रेम मिळवण्याची धडपड आहे, त्याच्या मनाला   आपण एका कृतीनं जखम केली आहे, हे तिच्या लक्षात येत नाही. सारासार विचार न करता बदला घेण्याचा खेळ तर माणसांचा आवडता! 

माणसाचा स्वभावच असा आहे, की चुकतो तो फक्त दुसरा, सुधारायचं आहे ते फक्त दुसऱ्यानं, मी इतकं सगळं मनापासून करत असताना माझ्यावर कुणी प्रेमच करत नाहीये, माझं आयुष्य फक्त उपेक्षेनंच भरलेलं आहे असे गैरसमज करून घेतात ती माणसंच. ‘आपलं कुणी नाही’ हे कढ काढण्यात त्यांचा वेळ बरा जातो. गमावण्याच्या दु:खात माणसाला रमायला आवडतं. मानवी मन हे दु:खाचं उगमस्थान आहे आणि दु:ख जतन करण्याची एक खास जागाही आहे. इथून दु:खाचा निचरा होतच नाही. कितीही समजुती घाला, हे मन हटवादीपणानं दु:खालाच जवळ करत राहातं.

 ‘आपण एखाद्याला का आवडत नाही याला काही तातडीचं उत्तर असत नाही आणि आत्मीय नात्यांचा शोध लागण्यासाठी कधी कधी प्रत्यक्ष दूरत्वही आवश्यक असतं.’ माणसाच्या आयुष्यातल्या या स्थलांतरांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्या आत डोकावून बघावंसं वाटायला लावणारी ही कादंबरी वाचायलाच हवी.  

mangalaathlekar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vachaylach havit author mangala athlekar migration novel forest reader ysh
First published on: 01-10-2022 at 00:02 IST