scorecardresearch

वाचायलाच हवीत : हवा आहे ‘चौथा कमरा’!

इंग्रजी साहित्यजगतावर आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचा अमीट ठसा उमटवणारी ब्रिटिश कादंबरीकार व्हर्जिनिया वूल्फ.

– मीना वैशंपायन

इंग्रजी साहित्यजगतावर आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचा अमीट ठसा उमटवणारी ब्रिटिश कादंबरीकार व्हर्जिनिया वूल्फ. आधुनिक काळातील विचारवंत आणि स्त्री-पुरुष समानतेविषयी आग्रही असणाऱ्या व्हर्जिनियाच्या या विचारप्रधान पुस्तकाची गणना अभिजात इंग्रजी पुस्तकांमध्ये झालेली आहे आणि नव्वदी पार करूनही ते पुस्तक अजूनही देशोदेशी वाचकप्रिय आहे. आपल्या कलाविष्कारासाठी स्त्रीजवळ ‘तिचा अवकाश आणि तो मिळवण्यासाठी थोडा पसा हवा’ हे आवर्जून सांगणाऱ्या, प्रत्येक वाचनावेळी नवीन दृष्टी देणाऱ्या A Room of One’s Own या पुस्तकाविषयी..

‘तुम्हाला हवं असेल तर खुशाल तुमच्या ग्रंथालयांना कुलुपं घाला, आम्हाला त्या ग्रंथालयांमध्ये जाण्यापासून वंचित ठेवा, पण आमच्या स्वतंत्र मनाला, विचारांना कोंडून ठेवणारं, बंद करणारं ना कोणतं कुलूप आहे, ना कोणते कडय़ाकोयंडे आहेत आणि ना कोणती दारं आहेत!’ असं मोठय़ा निर्धारानं म्हणणारी ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ! तिचे हे तळमळीचे, निषेधाचे उद्गार! पुरुषसत्ताक समाजव्यवस्था जरी स्त्रियांच्या प्रगतीला ठिकठिकाणी अडसर घालत असली तरी स्त्रिया त्याविरुद्ध कधीतरी जाग्या होतील, आपल्या प्रतिभेला नवनव्या वाटा मिळाव्यात अशी धडपड करतील, अशी व्हर्जिनियाला आशा वाटते. ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ या आपल्या वैचारिक निबंधातून तिनं स्त्रीस्वातंत्र्याचा आणि स्त्रीशिक्षणाचा आग्रह धरला आहे. अतिशय सडेतोड, मार्मिक, पण समतोल लेखनामुळे तिचं हे पुस्तक आणि त्याचं शीर्षक म्हणजे स्त्रीवादी चळवळीसाठी पुढच्या काळात एक घोषणा, एक परवलीचा शब्दच झालं. आपल्या कलाविष्कारासाठी स्त्रीजवळ ‘तिचा अवकाश आणि तो मिळवण्यासाठी थोडा पसा’ हवा, हे तिचं मुख्य विधान स्त्रियांनी उचलून धरलं. आपल्या वाचनप्रवासात, काही पुस्तकं, काही लेखक आपल्याला खूप गुंतवून ठेवतात. आपल्या जुन्या प्रिय मित्रांसारखीच असतात ती पुस्तकं! दरवेळी वाचताना काही तरी नवीनच आकलन झाल्यासारखं वाटत असतं. आपल्या जीवनानुभवाबरोबर त्यांचा अर्थ अधिकाधिक उलगडतो असं वाटतं. ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ हे पुस्तकही असंच आपल्याला प्रत्येक वाचनावेळी नवीन दृष्टी देतं. इंग्रजी साहित्यजगतावर आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचा अमीट ठसा उमटवणारी ब्रिटिश कादंबरीकार व्हर्जिनिया वूल्फ. आधुनिक काळातील विचारवंत आणि स्त्री-पुरुष समानतेविषयी आग्रही असणाऱ्या व्हर्जिनिया यांच्या या विचारप्रधान पुस्तकाची गणना अभिजात इंग्रजी पुस्तकांमध्ये झालेली आहे आणि नव्वदी पार करूनही ते पुस्तक अजूनही देशोदेशी वाचकप्रिय आहे (प्रथम प्रकाशन- १९२९)(त्याचं प्रतिबिंब असणारं ‘चौथा कमरा’ आठवेलच.)

खरं पाहता वूल्फनं दिलेल्या दोन व्याख्यानांवर आधारित निबंध असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. ही व्याख्यानं तिनं त्या काळी फक्त स्त्रियांसाठी असणाऱ्या गर्टन आणि न्यून्हॅम कॉलेजांमध्ये दिली होती. तिला विषय दिला होता, ‘स्त्रिया आणि ललित साहित्य’. या व्याख्यानांच्या निमित्तानं तिच्या मनात कसे विचार आणि विविध कल्पना येत गेल्या, त्या साऱ्या मानसिक प्रवासाचं- ज्याला ती विचारांची गाडी म्हणते, त्याचं वर्णन ती इथे करते. विषयाच्या शीर्षकाची व्याप्ती ठरवण्यापासून तिचा हा प्रवास चालू होतो. तिची कथनशैली संवादी, तरल आहे. जणू वाचकाला ती आपलं बोट धरूनच, स्वत:बरोबर फिरवते. उपहास, उपरोध, चटकदार कथन, विपुल संदर्भ यामुळे तिचं प्रतिपादन प्रभावी ठरतं. विषयाच्या तयारीसाठी ग्रंथालयात जाऊन पुस्तकं पहावीत या हेतूनं निघालेल्या वूल्फला जे धक्के बसत जातात, त्यातूनच तिच्या तोंडून आरंभी दिलेले उद्गार निघालेले आहेत. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या जगप्रसिद्ध विद्यापीठांच्या नावाचं मिश्रण करून तिनं ‘ऑक्सब्रिज’ हे काल्पनिक नाव वापरलं असलं तरी ऑक्सफर्ड आणि केंब्रिजबद्दलच ती बोलते आहे हे लक्षात येतं. विचारात बुडून ती नकळत कॉलेजच्या राखीव हिरवळीवर पाऊल ठेवते, तोच तिथल्या चर्चचा अधिकारी तिला अडवतो. त्या हिरवळीवर जाण्याची परवानगी केवळ पुरुषांनाच आणि त्यातही जे विद्यापीठाचे फेलो आहेत त्यांना आणि त्यांच्या बरोबरीच्या पुरुषांना आहे. आपण स्त्री म्हणून आपल्याला मनाई करण्यात आली, हे लक्षात येऊन ती अपमानित होते. पुढे ग्रंथालयात गेल्यावरही तिला प्रवेश नाकारला जातो. तिथेही पुन्हा स्त्रीनं अभ्यासासाठी ग्रंथालयात जाणं हा अपराध असतो. ती म्हणते, ‘माझ्या मनात आलं, अशा प्रकारे प्रवेश नाकारला जाणं हे किती त्रासदायक आहे, पण त्यापेक्षा आतल्या आत कोंडलं जाणं अधिक वाईट नाही का?’

या प्रसंगानं तिच्या मनात तरळत असलेल्या कल्पना, विचारसूत्र विस्कटतं आणि त्यातून स्त्रियांसंबंधित विचारांची गाडी भरधाव निघते. ती म्हणते, ‘केवळ स्त्री म्हणून मला या गोष्टी नाकारल्या गेल्या. त्यामुळे हातात येऊन सुटलेल्या मासोळीसारख्या माझ्या मनातील कल्पना सुळकन् मनातून सुटून गेल्या. एखाद्या कल्पनेशी मनोमन संवाद करावा, त्यातून काही नवीन आकारावं, एवढंही निवांतपण मला मिळू नये का? खरोखरी स्त्रीलाच का ही बंधनं? आपण यातून स्वतला मुक्त केलंच पाहिजे. आपले मूलभूत अधिकार आपण मिळवलेच पाहिजेत.’ विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली ही घटना. इंग्लंडमधील स्त्रियांना मतदानाचा अधिकार १९२८ मध्ये मिळाला. त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला. केवळ तो अधिकार हेच स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं गेलं. (भारतीय स्त्रियांना मात्र हा अधिकार पुरुषांबरोबरच मिळाला होता.) पण त्यानं स्त्रियांना कितपत लाभ झाला? इंग्रजांमुळे आपल्याकडे जरी शिक्षणाला चालना मिळाली असली, तरी खुद्द इंग्लंडमध्ये मात्र स्त्रियांना जुजबी शिक्षणापलीकडे शिक्षण घेता येत नव्हतं. स्वत: वूल्फचे वडील सर लेस्ली स्टीफन यांचा मुलींच्या औपचारिक शिक्षणाला विरोध असल्यानं तिचे भाऊ केंब्रिजला शिकले तरी ती आणि तिची बहीण यांना केवळ घरच्या ग्रंथालयावरच अवलंबून राहावं लागलं होतं. तिच्या प्रतिभाशक्तीची, विलक्षण शब्दसामर्थ्यांची जाणीव झाल्यानं तिच्या लेखनाला मात्र वडिलांनी सतत प्रोत्साहन दिलं होतं.

विद्यापीठ आवारातल्या महाविद्यालयीन इमारती (अर्थात स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या) पाहताना तिला जाणवलं होतं, की या पुरुषांच्या महाविद्यालयाला केवढी मोठी विद्वत्परंपरा आहे. त्यांच्या इमारती देखण्या आहेत. तिथे सर्वत्र ज्ञानसंपादनाचा माहोल जाणवतो. पण स्त्रियांच्या महाविद्यालयीन इमारती साध्या, पशाअभावी अगदीच कशातरी बांधलेल्या, चालणाऱ्या आहेत. तेथे अशा ज्ञानपरंपरा नाहीत, कारण आजवर ती परंपरा निर्माणच होऊ दिलेली नाही. स्त्रियांच्या अंगभूत कलागुणांना विकसित होऊ द्यायचंच नाही, असा या पुरुषसत्ताक व्यवस्थेचा दंडक आहे. विसाव्या शतकापर्यंत स्त्रियांनी काय लिहावं, कसं लिहावं याचे समाजसंकेत पक्के होते. आपल्या स्वत:च्या नावानं त्यांना कादंबऱ्या लिहिण्याची परवानगी नव्हती, कारण तसे केल्यास पावित्र्यभंग होई. त्यामुळेच तर जॉर्ज सॅन्ड, जॉर्ज इलियट, अशी व इतर टोपणनावं घेत स्त्रियांना लिहावं लागलं. त्यांच्या कमाईचा विचार होत नसे. यासाठी वूल्फ म्हणते, स्त्रीने पसा मिळवला पाहिजे. त्या काळात लेखनाद्वारे पसे मिळवणारी एकमेव स्त्री म्हणजे अफ्राबहन. सतराव्या शतकातील ही लेखिका पुढच्या लेखिकांसमोरचं आदर्श उदाहरण होतं. पण हा अपवादच.

ब्रिटिश म्युझियमच्या खुल्या ग्रंथालयातील कपाटं धुंडाळताना तिच्या विचारांची गाडी एकापुढे एक स्थानकं घेत निघते. तिथे तिच्या लक्षात येतं, की येथील साऱ्या पुस्तकांत स्त्रीलिखित पुस्तकंच नाहीत. इतिहासाच्या पुस्तकांत स्त्रिया अभावानंच आहेत. बहुतांशी आहेत त्या कटकारस्थानं करणाऱ्या राण्या! सगळी पुस्तकं पुरुषलिखितच असल्यानं तत्कालीन सामान्य स्त्रीजीवन आपल्यापुढे येतच नाही. तसं जीवन इतिहासातून मुळी लुप्तच झालं आहे. त्यामुळे स्त्रियांनी इतिहासलेखन केलं तर स्त्रियांचं वेगळ्या प्रकारचं कर्तृत्व जगापुढे येईल. त्यांच्या दृष्टीतून पुरुषचित्रण होईल. ती म्हणते,  ‘शिवाय या पुस्तकांमध्ये स्त्रियांबद्दल मोठय़ा प्रमाणावर उलटसुलट विधानं केलेली दिसताहेत आणि त्यांचा प्रतिवाद एकाही स्त्रीनं करू नये?  हे पुरुष एका ठिकाणी तिचं चारित्र्यहनन करतात, तिचा अपमान करतात आणि लगेच दुसरीकडे तिला डोक्यावर बसवतात. याला काय म्हणावं?’ ती एका प्राध्यापकाच्या पुस्तकाचं शीर्षक पाहते, ‘The mental, moral and physical inferiority of the female sex’, आणि वूल्फचा संताप आणखी वाढतो. शेजारचं पुस्तक असतं, केंब्रिजमधील ऑस्कर ब्राऊन या फेलोचं. त्यातील एक वाक्य तिला खटकतं, तो म्हणतो, ‘सगळ्यात बुद्धिमान स्त्रीच्या बुद्धीचा दर्जादेखील सर्वात निकृष्ट बुद्धीच्या पुरुषापेक्षा कमी असतो.’ तिला वाटतं, या साऱ्यांनी तिला इतकी खालच्या दर्जाची का समजावं? एकतर स्त्रीचा दैनंदिन संघर्ष चालू असतो, त्यात जगाकडून तिची सतत होणारी अवहेलना आणि तुच्छता यामुळे तिचा न्यूनगंड मात्र वाढतो आणि तिच्या अंगच्या गुणांना वावच मिळत नाही.

वूल्फ म्हणते, स्त्रियांची ज्ञानपरंपरा निर्माण होऊ शकली नाही, कारण अतिशय समृद्ध अशी ज्ञानपरंपरा निर्माण करण्यासाठी जो वेळ देणं आवश्यक असतं, तो वेळ स्त्रिया देऊ शकत नाहीत. त्यांच्यावरच नेहमी कौटुंबिक जबाबदाऱ्या टाकल्या जातात. ती परंपरा निर्माण होऊ नये म्हणून पुरुष व समाज दक्ष असतो. महाकाव्यं लिहिण्यासारखी किंवा अलीकडच्या काळात विविध क्षेत्रातले मोठमोठे प्रकल्प हाती घेण्याची स्वप्नं स्त्री क्वचितच पाहते. कारण कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्या कामांसाठी आवश्यक एकाग्रता मिळणं तिला अशक्य होतं. पुरुष विनाव्यत्यय काम करू शकतो, कारण तो काम करतोय म्हणून घरदार त्याच्या तनातीत असतं. ही चन स्त्रीला करता येत नाही. त्यामुळे मोठमोठी कामं हाती घेण्यात ती चालढकल करते. तशी कामं करण्याची तिची कुवत तिला सिद्ध करता यायला हवी, त्यासाठी तिला संधी आणि अवकाश द्यायला हवा. स्त्रीवरील अन्यायाच्या भावनेनं तिचा संताप अनावर होतो, पण आपलं प्रतिपादन करताना तिचा तोल जात नाही किंवा तिची भाषा आपला आब सोडत नाही. ती आग्रहपूर्वक म्हणते, की ‘स्त्रीच्या बाबतीत आंतरिक प्रेम आणि नातेसंबंध यात नेहमीच अन्याय केला जातो. एवढंच नाही, तर असं वाटतं, की पुरुषप्रधान समाज आणि तिचं निसर्गदत्त शरीर यांनी तिला कोणतीही संधी घेताच येऊ नये असा तिच्याविरुद्ध कट केलाय की काय? येणारी संधी तिला कशी घेता येणार नाही हेच जणू ती दोघं पाहत असतात.’

सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत तर स्त्रीला पूर्णपणे घरातच डांबलेलं असे. तिच्याजवळ कितीही उच्च दर्जाची प्रतिभा असली, तरी तिचं मानसिक खच्चीकरण केलं जाई. हे सांगताना ती ज्युडिथ शेक्सपिअर नावाची महाकवी शेक्सपिअरची काल्पनिक बहीण आपल्यासमोर आणते. विल्यमला मिळणाऱ्या संधींपकी एकही संधी तिला दिली जात नाही आणि तिच्या प्रतिभेचे पंख छाटून टाकले जातात. व्हर्जिनियाच्या मते, स्त्रियांना पुरुष तर कमी लेखतातच, पण त्याही स्वत:कडे कमीपणा घेऊन पुरुषांच्या तालावर नाचतात आणि आपलं स्वत्व सहज सोडतात. पुरुषांना आपलं स्वामित्व, श्रेष्ठत्व धोक्यात येतं आहे असं दिसलं की ते आक्रमक होतात. आजवर एवढी शतकं स्त्रियांनी पुरुषांची प्रतिमा आहे त्यापेक्षा दुप्पट मोठी करून दाखवण्याऱ्या आरशांचंच काम केलं आहे. पितृप्रधान संस्कृती रुजवण्यात त्यांचा फार मोठा सहभाग आहे, हे कुणाला आवडो न आवडो, आपण मान्य करायला हवं. यामुळेच तर पुरुष जेव्हा ‘मी’-‘आय’ म्हणतो, लिहितो तेव्हा, त्या ‘आय’मध्ये सावलीत अदृश्य स्त्री उभी असते. ‘पूर्वीपासूनच स्त्रीचा संपत्तीवर हक्क नाही. स्त्री म्हणजे आपलीच मालमत्ता असं समजणारा पुरुष तिच्या संपत्तीवरही मालकी सांगतो. स्त्रीनं  कमावलेला पसा खर्च करण्याचा अधिकार पुरुषाचा. एकोणिसावं शतक संपेपर्यंत युरोपियन देशात बऱ्याच ठिकाणी तसा सर्वमान्य संकेत होता. आमच्या पूर्वज स्त्रियांना पैसा आपल्या मनासारखा कधी खर्च करताच आला नाही. त्यामुळे आधुनिक काळात स्त्रियांना जसा निवांतपणा हवा, तसाच आपला पसाही हवा’.

वूल्फ म्हणते, की ‘भरपूर पुरावे, संदर्भ दिले तरी माझा हा दृष्टिकोन तुम्हाला केवळ ऐहिक, आर्थिक पायावर आधारलेला वाटेल. पण तो आवश्यक, विचारार्ह आहे. स्त्रीच्या प्रगतीसाठी आर्थिक स्वातंत्र्य गरजेचंच आहे.’ इथे आग्रह आहे तो ‘चौथा कमरा’ या संकल्पनेचा. स्त्रीचा अवकाश खरं पाहता तिचा मानसिक अवकाश आहे. तिचा आत्मशोध आहे. तिची ‘निजखूण’ तिला सापडायला हवी. तिच्या मूलभूत हक्कांवर आलेली गदा दूर झाली आणि तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व सापडलं, की मग ती खरोखरी कितीतरी अशक्य बाबी शक्य करेल, असा विश्वास वूल्फला आहे. आधुनिक काळात शहरी जीवनाचं यांत्रिकीकरण झालं आहे, यंत्रं आणि माणसं हातात हात घालून जातील ही अपेक्षा चुकीची ठरून, प्रत्यक्षात माणसं एकमेकांपासून दूर जाताहेत, व्यक्तिवाद वाढतो आहे. स्त्री-पुरुषांची तोंडं विरुद्ध दिशेला होताहेत याची जाणीव तिला तेव्हाही होतीच. त्यामुळे ती म्हणतेय, स्त्री-पुरुषांनी आपल्यातील स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व यांचं भान ठेवून समतोल साधण्यातच दोघांची प्रगती आहे, एकमेकांवर कुरघोडी करण्यात नाही.

शेवटी आपल्यासमोरील तरुणींना उद्देशून ती म्हणते आहे, ‘तुम्ही आत्मशोध घ्या, तुमची सर्जनशीलता आगळीवेगळी आहे. पुरुषांचं अनुकरण करू नका, आपल्या मनाला अनुसरा. म्हणजे तुम्ही त्या ज्युडिथ शेक्सपिअरवर आणि तत्कालीन प्रतिभावंत स्त्रियांवर झालेला अन्याय आपल्या कर्तृत्वानं दूर कराल.’ वूल्फनं सांगितलेली उदाहरणं, दिलेले संदर्भ आज परिचित वाटतीलही. परंतु वर्गभेद आणि वर्णभेद यांत सतत रुंदावणाऱ्या दरीचं तिनं दाखवलेलं चित्र आजही भयावह वाटेल. तिनं म्हटल्याप्रमाणे आत्मपरीक्षण करणं सर्वानाच आवश्यक आहे. पुरुषी अहंकार आणि स्त्रियांची होणारी चिडचिड, मनातील धुमसता राग, त्यामुळे त्यांच्या लेखनात येणारा कडवटपणा, याविषयी ती इशारा देते. त्यामुळे त्यांच्या लेखनात डोकावणारी नाद-लय-विहीनता यांचा विचार करावा असं ती म्हणते, तेही महत्त्वाचं आहे. आपलं लेखन विधायक दिशेला वळवणं आवश्यक आहे. आज शहरी भागात स्त्रियांची प्रगती झालीय असं भासतं. ते काही अंशी खरं असलं तरी जगभरच्या स्त्रिया अजूनही मोठय़ा प्रमाणावर वंचित व अन्यायग्रस्त आहेत. त्यांच्यावर कौटुंबिक आणि स्वत:च्या करिअरची अशी दुहेरी जबाबदारी आलीय. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी जोडीनं आपल्याला काय हवंय हे पाहणं गरजेचं आहे. ही जाणीव करून देण्याचं काम अशी पुस्तकं करतात आणि मनाच्या मशागतीसाठी ती आवश्यक असतात.

meenaulhas@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vachaylach havit author mina vaishanpayan literary world novel talent ysh