आपलं नाव हा व्यक्तीच्या जिव्हाळय़ाचा विषय असतो. पण हे नावच ‘नकुशी’ असतं तेव्हा? ऐकल्यावर चेहरा कसानुसा व्हावा. असं हे नाव बदललं गेलं. एकटी-दुकटीचं नाही, ७५० मुलींचं! आता मात्र नकुशी हे नाव देणंच फार कमी झालं आहे. कोल्हापूरमध्ये गेल्या १४ वर्षांत घडलेली ही गोष्ट. आपल्या आवडीचं नाव घ्यायला मिळालेल्या या मुलींच्या चेहऱ्यावर नवा आत्मविश्वास आला त्याची ‘राष्ट्रीय कन्या दिवसा’च्या (२४ जानेवारी) निमित्तानं गोष्ट सांगताहेत कोल्हापूर येथील ‘आनंदीबाई महिला बहुद्देशीय संस्थे’च्या अध्यक्ष वैशाली महाडिक.‘ नकुशी’ या नावाचा शोध घेण्याबरोबरच शाळाशाळांमध्ये जाऊन मुलींना मार्गदर्शनही केलं जायचं.
तशी मी ग्रामीण भागातलीच. लहानपणी माझ्या काही ‘नकुशी’ नावाच्या मैत्रिणी होत्या. मी विचार करायचे, की त्यांचं असं नाव का ठेवलं असावं? मलाच वाईट वाटायचं, पण तेव्हा माझ्या हातात काहीच नव्हतं. माझी एक मैत्रीण होती- नकुशी पाटील. वर्गात ती पहिली यायची. मात्र ज्या वेळी वर्गात तिचं नाव मोठय़ानं घेतलं जायचं, तेव्हा तिला आपला पहिला नंबर आलाय याचं सुख असायचं, पण त्याचवेळी ‘नकुशी’ या नावाचं दु:खही तिच्या चेहऱ्यावर दिसायचं. मोठेपणीही हे नाव स्त्रियांच्या, मुलींच्या तोंडी ऐकायला मिळायचं. तेव्हाही फार त्रास व्हायचा आणि असं वाटायचं, की आपण या ‘नकुशी’बाबत काही तरी करायला हवं.
२००७ मध्ये ‘नाबार्ड’कडून शाहूवाडीमध्ये ‘आनंदीबाई महिला बहुद्देशीय संस्थे’च्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. योगायोगानं शाहूवाडीच्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल अशा डोंगराळ भागात काम करायला मिळालं. काम चालू झालं. महिना, दोन महिने, बघता बघता वर्ष होत आलं. बचत गटाचं काम करत असल्यामुळे सतत स्त्रियांमध्ये वावर. ग्रामपंचायतीच्या बैठकीत बचत गटाविषयी माहिती सांगितली जायची. १५ ते २० स्त्रियांचा बचत गट करायचा असायचा. नेमकी त्यात दोन-तीन ‘नकुशी’, ‘अंबू’, ‘दगडू’ ही नावं यायचीच. सहज त्यांना विचारलं की, ‘‘तुझं नाव नकुशी का ठेवलं?’’ त्या सांगायच्या, की ‘‘मी आमच्या आई-वडिलांची पाचवी मुलगी/ सातवी मुलगी.. त्यांना मी नको होते तरी झाले, म्हणून माझं नाव नकुशी!’’ वाईट वाटायचं. पण या स्त्रिया चाळिशीच्या, पन्नाशीच्या असत. त्यांच्या या नावाबद्दल आपण काय करणार, असं वाटे. सतत डोक्यात विचार सुरू होता आणि सुचलं, की आपण शाळा-शाळांमध्ये जाऊ या आणि अजूनही किती ‘नकुशी’ आहेत ते पाहू या. माझं काम सुरू झालं. जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या एका तरी शाळेत जायचं आणि ‘नकुशी’ किती हे मोजायचं! त्यावेळी प्रत्येक शाळेत चक्क पाच-पंचवीस नकुशी सापडू लागल्या. बघता-बघता आमच्याकडचा आकडा हजार-दीड हजारच्या आसपास पोहोचला.
आता माझा आत्मविश्वास वाढला होता. त्यांच्या पालकांना भेटायचं ठरवलं. वाडय़ावस्त्यांत बचत गटाचं काम करत असताना त्या पालकांना विचारायचं, की ‘या मुलींना तुम्ही ‘नकुशी’ हे जे नाव ठेवलं आहे, त्यात आपण बदल करून घेऊ या. शासनदरबारी जी काही मदत लागते ती आम्ही करून देऊ.’ कारण तालुक्यावरून शहरात यायचं, गॅजेट करायचं, नाव बदलायचं एवढी तसदी घेणारे ते पालक नव्हते. काही पालकांनी तर आम्हाला सांगितलं, ‘‘मॅडम, हे कशाला काय नवीन काढलसा? कशाला यात पडताय? बचत गटाचं काम करायला आलाय तेवढं करा आणि तुम्ही परत जावा. या विषयावर आमच्याशी बोलू नका. पिढीजात चालत आलेल्या परंपरेत खेट घालू नका.’’ ही नावं बदलली तर काही तरी अनर्थ घडेल, असंही काही पालकांनी मला सांगितलं. समोरून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. मात्र ठरवलं, की एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा त्यांच्या घरी जावं लागलं तरी चालेल. पण या मुलींना त्यांच्या आवडीचं नाव दिल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही.
अनेक लोकांमध्ये मुलीचं नाव ‘नकुशी’ ठेवल्यानंतर मुलगा होतो अशी अंधश्रद्धा होती. ‘नकुशी’बरोबर किती तरी ‘दगडी’, ‘धोंडी’, ‘आंबू’(आंबलेली या अर्थाने), ‘उपरी’ ही उपरोधिक नावंही होतीच. अशी नावं कशी कुणाला आवडतील बरं? नकुशी नावामुळे त्या मुलींना आपण आपल्या पालकांनाच नको आहोत असं वाटून खूप निराश वाटू शकतं, ही बाब आहेच.
मग मी मार्ग बदलला. पालकांशी बोलायचं बंद केलं आणि थेट ज्या मुलींचं नाव नकुशी आहे त्याच मुलींशी बोलू लागले. शाळेची मधली सुट्टी असते तेव्हा आम्ही जायचो आणि त्यांना विचारायचो, की ‘‘तुझं नाव नकुशी आहे ते तुला आवडतं का?’’ काही जणी बोलायच्या, तर काही जणी अजिबात बोलायच्या नाहीत. पण जेव्हा आम्ही विचारायचो, की ‘‘तुमचं नाव बदललं तर आवडेल का?’’ तेव्हा सगळय़ांचं एकच उत्तर असायचं- ‘‘हो! आवडेल.’’
याच आत्मविश्वासावर आम्ही ठरवलं, की या मुलींची नावं बदलायची. एकदा मुलींची मानसिकता तयार झाली की त्यांनाच त्यांच्या पालकांशी बोलून नाव बदलण्यासाठी मान्यता घ्यायला लावली. काही जणांनी होकार दिला, काहींनी नकार. नकार दिलेल्यांना पुन्हा समुपदेशन करून प्रयत्न सुरू ठेवला. आणि काय सांगू.. प्रयत्नांना यश आलं. सुरुवातीला एका मुलीचं नाव बदललं गेलं. बघता बघता दहा मुली, दहाच्या शंभर, शंभरच्या दोनशे.. आता शाळा-कॉलेजमध्ये समजलं, की या संस्थेद्वारे मोफत नकुशी नाव बदलून गॅझेट करून पाहिजे असेल ते नाव लावून दिलं जातं. मग मला संपूर्ण जिल्ह्यातून फोन यायला लागले!
असं करता करता २०१८ पर्यंत ७५० मुली-स्त्रियांची नावं बदलली गेली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि इतर तालुक्यांतल्या दुर्गम भागात राहणाऱ्या या मुलींचं हे नामकरण. आता २०१८ ते २०२२ या काळात मात्र मला शंभरसुद्धा केसेस मिळालेल्या नाहीत. म्हणजे आम्ही जे काम करत होतो त्याला प्रबोधनात्मक आकार मिळतोय आणि ही प्रथा बंद व्हावीशी वाटत होती, तसं होऊ लागलंय असं वाटतं. थोडा वेळ लागेल खरा, पण भविष्यात एकही ‘नकुशी’ भेटणार नाही अशी आशा वाटते.
जेव्हा मी मुलींशी बोलायचे, की ‘‘बाळा, तुझं नवीन नाव काय ठेवायचं? तुला कोणतं नाव आवडतं?’’ मुली ऐश्वर्या, कोमल, सुस्मिता अशी नावं सांगायच्या. त्यांना वाटायचं, की इतरांसारखं आमचं नावही सुंदर असावं. आमचं नाव उच्चारल्यावर समोरच्याला आनंद वाटला पाहिजे. ‘नकुशी नाव घेताना मात्र लोकांचा चेहरा बघण्यासारखा होतो,’ असं एका मुलीनं मला सांगितलं. त्या मुलीचं नाव मी जेव्हा ‘ऐश्वर्या’ असं गॅझेटवर बदलून दिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो अजूनही माझ्या डोळय़ांसमोरून जात नाही.
असे अनेक अनुभव मला त्या काळात आले. हे सर्व करून काय मिळवलं, असंही मला अनेक जण मला विचारतात. पण त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मिळवला, असं मी प्रत्येक वेळी सांगते.परवाच एका कॉलेजच्या गॅदिरगला मी प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते. अचानक एक मुलगी माझ्यासमोर आली आणि म्हणाली, ‘‘मॅडम, मला ओळखलंत का?’’ मी तिच्याकडे बघत राहिले. मग तीच म्हणाली, ‘‘मॅडम, अहो तुम्हीच मला माझं नवीन नाव दिलं होतं.’’ आताचं तिचं नाव कोमल जांभळे. तिच्याशी थोडा वेळ हितगुज करताना तिच्या चेहऱ्यावर मला आनंद आणि आत्मविश्वास दिसत होता. आपण केलेल्या कामाचं सार्थक झालं, असंच वाटण्याचा तो क्षण होता.
ही कविता या मुलींच्या भावना चपखलपणे मांडते असं वाटतं-
‘सांगशील का देवा मला का बनवलं नकोशी म्हणून, उदरी आली पणती म्हणून,
घुसमटणे हे गुदमरणे हे
असह्य झाल्या वेदना
एकच प्रश्न देवा तुला
काय होता माझा गुन्हा
दिव्याच्या मोहापायी
किती पणत्या विझवणार
जन्मलीच नाही जिजाऊ तर
शिवबा कसा घडणार
मी अहिल्या मीच सावित्री
कोण जगाला सांगणार
उडण्याआधी पंख छाटले
सांग कशी मर्दानी लढणार
देवघरातील समई मी
उजळून टाकीन साऱ्या घराला
नकुशी म्हणून हिणवू नका
जाऊन सांग माझ्या आईबापाला..’
anandibaikop@yahoo.com