scorecardresearch

Premium

लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड!

मी मूळ कर्नाटकमधला असलो तरी सोलापुरात वडील उद्योजक असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो.

लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड!

‘‘.. यापुढेही वाट असणार आहे तोवर त्या वाटेवरची निरनिराळी वळणंही येतच राहणार आहेत. परंतु तरीही माझ्या आयुष्याचं शेवटचं वळण कसं असावं, याबाबत माझी काही निश्चित मतं आहेत. सर्व सोडून अलिप्तपणे मला कुठे तरी जाता आलं पाहिजे. जे. कृष्णमूर्ती म्हणतात, त्याप्रमाणे ‘लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड!’ त्यांच्या या म्हणण्यानुसार मला जगता येईल का?’’

आयुष्य हा एक अखंड प्रवास असतो. त्या प्रवासात खाचखळगे, अडचणी, चढउतार, वळणं ही येतच असतात. या साऱ्यातून तावूनसुलाखून निघत माणूस म्हणून तुम्ही घडत असता. या प्रवासाला, वळणांना काही ना काही कारणं ही असतातच. त्यामुळे वळणांतून निर्माण होणाऱ्या नवनवीन वाटा अशा अर्थानं या सदराचं ‘वळणवाटा’ हे शीर्षक मला विशेष वाटतं. म्हणूनच तुम्ही कुठे जन्मता, कोणत्या घरात, गावात यालाही तितकंच महत्त्व असतं.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

मी मूळ कर्नाटकमधला असलो तरी सोलापुरात वडील उद्योजक असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो. कर्नाटकी असूनही माझ्यावर महाराष्ट्रीय संस्कार होणं, हे महत्त्वाचं वळण वाटतं, कारण त्याचा स्वाभाविक पुढे परिणाम होत गेला. माझं बालपण अतिसामान्य होतं. अभ्यासात, खेळात किंवा कलेतही यथातथाच होतो. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी बेळगावी माझे अजितकाका, अलकाकाकू यांच्याकडे शिकायला गेलो. शालेय वयातून बाहेर पडत जीवनशिक्षणाच्या व्यापक जगाशी तोंडओळख होण्याचं ते वय! अशा वेळी काकाकाकूंनी तोवरच्या सोलापुरात वाढलेल्या टिपिकल अतुलमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. दोन अडीच र्वष त्यांच्याकडे राहिलो. त्यांनी इंग्रजी भाषेची ओळख करून देत माझ्याकडून इंग्रजीतूनच बोलण्याबद्दलचा आग्रह धरत त्या भाषेबद्दलची गोडी वाढवली. आपल्या मातृभाषेइतकीच अन्य भाषा शिकण्याबाबतचा त्यांचा असा दृष्टिकोन आणि अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी नव्याने त्यांच्याकडून, त्या वास्तव्यातून शिकलो. आपण जे घडतो, त्या घडण्यावर आई-वडिलांबरोबरच इतरांचे संस्कारही होतच असतात. मी असं वाचलेलं होतं की, एक मूल वाढायला अख्खं गाव हातभार लावत असतं. वास्तव्याचं ठिकाण, भवताल, तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती या आणि अशा गोष्टींचा परिणाम, संस्करण तुमच्या घडण्यावर होत असतं. आई-वडिलांइतकंच तेही तितकंच महत्त्वाचं असतं. त्याप्रमाणे बेळगावातल्या वास्तव्याच्या काळातले माझी मित्रमंडळी, नातेवाईक, परिस्थिती यांनी मला एका अर्थानं माझ्या कोषातून
बाहेर काढत जगण्याची एक नवी दृष्टी दिली. त्यामुळे हे आयुष्याच्या घडणीतलं हे वळण महत्त्वाचं ठरतं.

मी १२ वीत नापास झालो. ते खूप महत्त्वाचं नि आयुष्याला कलाटणी देणारं वळण होतं. जर मी हुशार विद्यार्थी असतो, बारावी उत्तम गुणांनी पास होऊन इंजिनीअिरगला व्यवस्थित पास झालो असतो तर मी वेगळा माणूस झालो असतो. मात्र बारावीतल्या अपयशाचा काळ माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ होता. खरा माणूस म्हणून मला याच काळानं घडवलं. हे अपयश पचवून त्यापुढील तीन-चार र्वष बीए पूर्ण होईपर्यंत ते अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये याच काळानं बरंच काही शिकवलं. नापास होणं, इंजिनीअिरग सोडून परत येणं आणि त्यानंतर मी बीए होणं ते एनएसडीला जाण्याचा निर्णय घेईपर्यंतचा सात-आठ वर्षांचा काळ मोठ्ठं वळण होतं, थोडक्यात म्हणजे ते ‘यू टर्न’ होतं. त्या सगळ्या काळात खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात असं मला वाटतं.
अभिनयाच्या व्यवसायात आल्यामुळे जे बघायला-करायला मिळतंय, मला जे एक्सपोजर मिळालं आहे, चेहऱ्याच्या ओळखीमुळे तसंच ग्लॅमरमुळे खूप गोष्टी मला करता येऊ शकताहेत. हे अत्यंत वेगळं आयुष्यं मी जगू शकलो आहे, ते केवळ मी नापास झाल्यामुळे जगू शकलो आहे. पास होऊन सुरक्षित चौकट मिळाली असती तर इंजिनीअिरग करता करता असं काही या व्यवसायात करू शकलो असतो का? मला नाही वाटत. जेव्हा मी इंजिनीअिरग सोडलं त्या वेळेस माझ्या घरची परिस्थिती काही फारशी बरी नव्हती. त्यामुळे नक्कीच असं वाटतं की, मी त्याच कोषात राहिलो असतो. मात्र, सुदैवाने या अपयशाने मला रिस्क घ्यायला लावली.

बी.ए. झाल्यानंतर जेव्हा मी अभिनेता म्हणून व्यवसाय करायचं ठरवलं तेव्हा माझ्यापुढे दोन मार्ग होते. पैकी सरळ मुंबईला यायचं किंवा एनएसडी, एफटीआयसारख्या संस्थेत जाऊन रीतसर प्रशिक्षण घेऊनच या व्यवसायात उतरायचं. त्यापूर्वी सोलापुरातल्या ‘नाटय़ आराधना’ या हौशी नाटय़संस्थेमध्ये काम करत होतो. अभिनयाची मुळाक्षरं तिथेच गिरवली. परंतु मला मनापासून असं वाटत होतं की, मी एकाच पठडीत-काही एका मर्यादेतच काम करत राहिलोय. व्यवसाय म्हणून हे स्वीकारायचं असेल तर मला या मर्यादा तोडायला हव्यात. त्यासाठी लागणाऱ्या वेगळ्या अनेक गोष्टी शिकणं अत्यावश्यक वाटलं. कारण, अभिनयाची, नाटकाची एकच एक अशी व्याख्या नसते. अन्य गोष्टींचीही माहिती हवी. त्यासाठी एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणं महत्त्वाचं वाटलं. ती वाट मी निवडली. मुंबईला थेट येऊ शकत होतो. कारण, ‘चाफा’, ‘माणूस नावाचं बेट’, ‘आपण सारेच घोडेगांवकर’ ही माझी सोलापुरातली नाटकं गाजलेली होती. त्याचे पुण्या-मुंबईत प्रयोग झालेले होते. त्यामुळे तशा मला ऑफर्सही येत होत्या. तरीही ते सर्व नाकारून मी एनएसडीला जायचं ठरवलं, तेव्हा मी २७ वर्षांचा होतो. हे समोर दिसत होतं की, शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी ३० वर्षांचा होईन आणि त्यानंतर माझं प्रोफेशन सुरू होईल. तेदेखील अशा क्षेत्रामध्ये की जे अगदीच बेभरवशाचं समजलं जातं. या व्यवसायाच्या दृष्टीने मी अगदी म्हातारा होऊनच इथे आलो होतो. मला फार बरं वाटतं की, मुंबईला थेट येण्याचा मोह टाळून मी एनएसडीला गेलो, हा निर्णय योग्यच होता. ‘नाटय़आराधना’ने घालून दिलेली वाट आणखी पुढे नेत एनएसडीचं वळण त्या निर्णयामुळे आयुष्याला मिळालं, ते सर्वात महत्त्वाचं वाटतं.

दिल्लीच्या एनएसडीमध्ये देशभरातून विद्यार्थी आणि परदेशातून शिकवण्यासाठी येणारे शिक्षक यांच्या सहवासाचा फायदाच मला झाला. तिथे जाण्याच्या, शिकण्याच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे एक व्यावसायिक नट म्हणून अभिनयाकडे पाहण्याचा अभ्यासू दृष्टिकोन तसंच नाटकाचं, वेगवेगळ्या कलांचं, माणसांचं प्रचंड एक्स्पोजर एनएसडीनं दिलं. दहावीनंतरच्या शिक्षणासाठी बेळगांव तेथून पदवी शिक्षणाकरिता पुणे आणि दिल्लीच्या एनएसडी आणि एनएसडीची पदवी घेऊन मुंबईपर्यंतच्या प्रवासाचं हे वळण माझ्या अनुभवाच्या कक्षा रुंदावणारं ठरलं.

वैयक्तिक आयुष्यात मला गीतांजली तिथे भेटली. १९९३ साली एनएसडीमध्ये आम्ही भेटलो. त्याला आता जवळजवळ २२ वर्षे होतील. ही या वळणात मिळालेली खूप चांगली गोष्ट होती. लग्न वगैरे बाबतीत मी फार रोमँटिक नाही परंतु एक व्यक्ती इतक्या जवळ, इतका दीर्घकाळ तुमच्यासोबत असते तेव्हा स्वाभाविक परस्परांवर परिणाम होत असतो. तुम्ही एकत्र एक विश्व उभं करत असता. आम्हाला फक्त घर किंवा नातेवाईकच आहेत असं नव्हे तर ‘क्वेस्ट’ नावाची संस्था एकत्र चालवतो. आमचा वनकुसवडय़ाला जंगल प्रकल्प आहे. सोनाळ्यामध्ये बांधलेल्या आमच्या घरात ‘तारपा’ नावाची संस्था गीतांजलीने सुरू केलेली आहे. असं मोठं विश्व निर्माण होणं हे नवरा-बायकोच्या पलीकडचं आणि म्हणूनच दोघांनी मिळून निर्मिलेलं हे जग अधिक प्रभावी आहे. आमचं घर तर त्यातला फारच छोटासा भाग आहे. नातेवाईक, मित्रमंडळी, सामाजिक काम हे सगळं त्यात आले. एनएसडीला गीतांजली भेटणं, आमचे विचार जुळणं. त्यातले अर्थातच कुठल्याच दोन व्यक्तींमध्ये शंभर टक्के विचार कधीच जुळत नसतात. परंतु आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि ते आजवर राहिलो आहोत. चांगला संवाद आमच्यात होतो, हे महत्त्वाचं वाटतं. दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून आमचा आम्हाला अवकाश आहे किंबहुना तो असावाच, असं मला वाटतं. पारंपरिक नवरा-बायको अशी चौकट काही मला मान्य नाही. एका छताखाली आमची दोघांची वेगळी विश्वं आहेत, हे आम्ही मानतो. आम्ही ठरवून मूल होऊ दिलेलं नाही. आमचं इतर जग हेच आमच्यासाठी सारं काही आहे.

एनएसडीवरून परत आल्यानंतर मला ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे व्यावसायिक नाटक मिळालं आणि ते माझ्या आयुष्यातलं नट म्हणून पहिलं व्यावसायिक वळण ठरलं. या नाटकाने मला ‘अतुल कुलकर्णी’ ही ओळख मिळवून दिली. हिंदी, मराठी आणि गुजराती अशा तिन्ही भाषांतून झालेल्या या नाटकात गांधींच्या भूमिकेसाठी चंद्रकांत कुलकर्णीनी मला निवडलं, त्याला सारं श्रेय जातं. तिन्ही भाषांमध्ये गांधी मीच होतो, अन्य कलाकार बदलले. आमच्या व्यवसायात किती बरं काम करता यापेक्षासुद्धा लोक तुम्हाला ओळखतात की नाही, तुम्हाला ‘ओळख’ आहे की नाही हे महत्त्वाचं ठरतं. ‘गांधी विरुद्ध गांधी’ने मला ही ओळख मिळवून दिली. माझा चेहरा नाटकाच्या वर्तुळात माहीत झाला आणि हे नाटक महत्त्वाचं अशासाठीसुद्धा ठरलं की, त्यामुळे ‘हे राम’ हा पहिला सिनेमा मिळाला. कमल हासन यांनी गांधींबद्दल ऐकलेलं होतं. त्यांनी ‘हे राम’मध्ये गांधींविरोधी असलेल्या श्रीराम अभ्यंकरची भूमिका दिली.

कमल हासन हा माझ्या पुढच्या आयुष्याला मिळालेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठय़ा वळणासाठी कारणीभूत आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी सिनेमाच करतो आहे. ‘हे राम’मुळे ‘चांदनी बार’ मिळाला. ‘चांदनी बार’ गाजला त्याने मोठं व्यावसायिक यश मिळवून दिलं. त्या यशाने पुढच्या वाटचालीकरिता पुढचे चित्रपट मिळत गेले. या दोन्ही चित्रपटांकरिता राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. त्या दृष्टीने ‘चांदनी बार’ हे महत्त्वाचं वळण आहे.

‘हे राम’ माझ्या व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्वाचं वळण याकरिता की, मी नाटकातला माणूस होतो, हे कमल हासन जाणून होते. सिनेमा हे संपूर्णपणे वेगळं माध्यम आहे. हासन यांनी हे माध्यम काय आहे, हे मला छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून समजावून दिलं. सिनेमाचे ‘बेसिक्स’ शिकवले. नाटकाच्या तंत्रापासून ते सिनेमाच्या तंत्रापर्यंतचं शिक्षण याच काळात झालं. विजय तेंडुलकर यांच्याशी माझ्या अगदी शेवटी शेवटी गप्पा झाल्या होत्या, त्या दरम्यान ते म्हणाले होते, की ‘माध्यम हे महत्त्वाचं नाही तर तुमचं सांगणं हे अधिक महत्त्वाचं आहे!’ सिनेमा या माध्यमामधून सांगणं हे मला आवडतंय आणि ही माझी अत्यंत वैयक्तिक निवड आहे. ‘हे राम’ हा सिनेमा तीन भाषांत हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये झाला. त्यामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की, दाक्षिणात्य भाषांमध्ये मी जाऊ शकलो. हिंदीच्या बरोबरीनेच तिथेही सिनेमे करतोय. आजतागायत चारही दाक्षिणात्य भाषांमध्ये काम करतो आहे. दरवर्षी एक किंवा दोन दाक्षिणात्य भाषांमधले चित्रपट प्रदर्शित होतात. ऑक्टोबरमध्ये हिंदीमध्ये ‘जज्बा’, मराठीमध्ये ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ आणि मल्याळम्मधला मोहनलाल सोबतचा ‘कनल’ सिनेमा असे तीन भाषांमधले सिनेमे प्रदर्शित झाले.

‘रंग दे बसंती’ने हिंदी सिनेमामधलं मोठ्ठं व्यावसायिक यश मिळालं. एकूणच हिंदी सिनेमामध्ये हा सिनेमा म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्ट फिल्म आहे ती. वैयक्तिक आयुष्यात मला अत्यंत जवळची मित्रमंडळी या सिनेमामुळे मिळाली. मराठीच्या बाबतीत ‘नटरंग’ हे महत्त्वाचं वळण होतं. तो फार खास सिनेमा होता. त्यामुळे एक वेगळी ओळख मिळाली. झी सिनेमाची टीम आणि रवि जाधव यांना त्याचं सर्व श्रेय जातं. व्यावसायिक यश, आव्हानात्मक भूमिका या अर्थाने तो एक महत्त्वाचा टप्पा मराठी सिनेमा क्षेत्रात सांगता येईल. २००० पासून ते आजपर्यंत अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी आणि दाक्षिणात्य भाषांमधले सिनेमे केले. ‘दहावी फ’, ‘देवराई’, ‘वळू’, ‘सुखान्त’, ‘नटरंग’, ‘पोपट’ ते अगदी अलीकडचा ‘प्रेमाची गोष्ट’, ‘हॅपी जर्नी’पर्यंत तर हिंदीमध्येही ‘चांदनी बार’नंतर ‘८८ अँटॉप हिल’, ‘खाकी’, ‘रंग दे बसंती’, ‘चालीस चौरासी’, ‘पेज थ्री’, ‘सत्ता’, ‘जंजीर’ ते अलीकडच्या ‘डर्टी पॉलिटिक्स’पर्यंत विविध भूमिका साकारल्या. या आणि यांसारख्या सिनेमांतून, त्या त्या वेळच्या अनुभवांतून खूप काही शिकायला मिळालं.

व्ही. शांताराम म्हणाले होते की, ‘सिनेमा म्हणजे २० टक्के कला आणि ८० टक्के व्यवसाय आहे!’ अगदी खरं आहे, त्यांचं म्हणणं. म्हणूनच सिनेमाचा व्यवसायाच्या अंगानेही विचार करत राहणं महत्त्वाचं आहे.
विविध भाषांमधून, इंडस्ट्रीतून काम केल्यामुळे अनुभवाचं क्षेत्रं विस्तारलं. प्रत्येक इंडस्ट्रीची स्वत:ची अशी संस्कृती असते. त्यानुसार तेथील सिनेमे घडत असतात. पूर्वी दाक्षिणात्य सिनेमे हे चेन्नईतच बनवले जात आणि तेथून मग अन्यत्र त्यांचं वितरण होत असे. यामुळे चेन्नईमध्ये आजही तुम्हाला सिनेकल्चर पाहायला मिळतं. मल्याळम्मध्ये साहित्याचा पगडा आहे. तो मला मराठीच्या अधिक जवळ जाणारा वाटतो. या सगळ्याचा फायदा आज मला ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ हा सिनेमा निर्माण करताना एक निर्माता म्हणून नक्कीच झाला. केवळ सिनेमा निर्मित करून सर्व संपत नसतं तर त्याचं प्रदर्शन करणं हेही आव्हानात्मक असतं आणि आज हीच कला, प्रदर्शित करणं, दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. अभिनेता म्हणून असलेला ‘कम्फर्ट झोन’ सोडून निर्माता म्हणून उतरायचं ठरवल्यानंतर त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या या नटापेक्षाही १०० टक्क्यांनी जास्त आहेत. एकाच वेळी युनिट, कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी बांधील असणं, बजेटमध्ये हे सारं बसवणं, योग्य ते निर्णय त्यांच्या जबाबदारीसह योग्य वेळी घेणं ही सारी आव्हानं आज मी तितकीच एन्जॉय करतो आहे. त्यामुळे निर्माता म्हणून आयुष्यातलं हे वळणंही मला बरंच काही देऊन जाईल, असं वाटतं आहे.
अभिनय हा व्यवसाय म्हणून करायचा असं जरी ठरवलेलं असलं तरीदेखील तेच काही आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नव्हतं आणि नाहीए, यावर मी आधीपासूनच ठाम आहे. त्याबरोबरीनेच अनेक गोष्टीही महत्त्वाच्या आहेत, ज्या एक माणूस म्हणून करणं, मला अत्यंत आवश्यक वाटतं.

अभिनय करता करताच वनकुसवडे येथे साधारण २४ एकरांची जमीन घेऊन तिथे आम्ही जंगल प्रकल्प राबवितो आहोत. पर्यावरणाची अपरिमित हानी झाल्याने होत असलेले दुष्परिणाम आपण सारेच पाहतो आहोत. निसर्गाचा हा समतोल आपल्याकडून सांभाळला जावा, या हेतूने मानसी आणि केतकी या मैत्रिणींच्या साह्य़ाने
हा प्रकल्प हिरवा होतो आहे. (www.oikos.in/pages/home.html) त्याचबरोबरीने सध्याच्या शिक्षणपद्धतीबाबतही मी अजिबात समाधानी नाही. केवळ परिस्थिती, व्यवस्थेला नावं ठेवण्यापेक्षा आपण पुढाकार घेऊन काही करू शकतो का, या विचाराला शिक्षणतज्ज्ञ नीलेश निमकर यांची साथ मिळाली आणि मगाशी म्हटलं तसं, ‘क्वेस्ट’ ही आमची संस्था वाडा येथील सोनाळा या गावी आकाराला आली. तिथे आमचं घरही आहे. शिक्षण हे माणसाला विचारप्रवृत्त करणारं असावं, या मताचा मी आहे, परंतु आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ही विचारप्रक्रिया निर्माण होण्याऐवजी केवळ स्पर्धाच होताना दिसते आहे. अशी प्रवृत्ती निर्माण होण्याला खरं तर पालक जबाबदार आहेत.

शिक्षणाचा एक शास्त्र म्हणून विचार आणि संशोधन करून त्याप्रमाणे त्याची आखणी करणं, त्याची अंमलबजावणी होणं हे निकडीचं आहे. आपल्या इथे रुजलेला स्वार्थीपणा, विविध समस्यांचं मूळ हे चुकीच्या शिक्षणपद्धतीमध्ये आहे, त्यामुळे तिच्यातच आमूलाग्र बदल होणं आणि ते अधिकाधिक आधुनिक तंत्राशी जोडत विचारप्रवण करणारं व्हावं, याकरिता आमची ‘क्वेस्ट’ (QUEST-quest.org.in) काम करते. तसं दर्जात्मक शिक्षक प्रशिक्षणही या संस्थेमध्ये दिलं जातं. आज एकूण ५ जिल्ह्य़ांमध्ये १० हजारांहून अधिक मुलं आणि ३०० शिक्षकांबरोबर काम सुरू आहे. सोनाळे इथे काम करत असताना मला व्यक्तिश: तेथील आदिवासी संस्कृतीचा जवळून परिचय झाला. एक वेगळा सामाजिक स्तर अनुभवत असताना आपल्यापेक्षाही त्यांची संस्कृती ही किती तरी प्रगल्भ नि आधुनिक असल्याचा प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणूनही क्वेस्ट संस्थेची उभारणी होणं, त्यानिमित्ताने समाजात एकरूप होत माणूस म्हणून अधिक समृद्ध होताना ते वळणही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

माझा एकच एक कुणीही गुरू नाही किंवा गुरू मी मानतही नाही. आज मी जो कुणी आहे, ते आजवरच्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींकडून, संस्कृती, पुस्तकांतून, अनुभवांतून शिकत गेलो त्या साऱ्या एकत्रित अनुभवांचं ते फलित आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. शिकण्याच्या प्रक्रियेत मी लहान-मोठा असा भेद कधी केला नाही. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’मधल्या माझ्याहून लहान असलेल्या कलाकारांकडूनही बरंच शिकता आलं. निर्माता या वळणानंतर कदाचित पुढे दिग्दर्शन करण्याचंही वळण असू शकेल, तशा सूचनाही आसपासच्या लोकांकडून मला केल्या जाताहेत.

यापुढेही वाट असणार आहे तोवर त्या वाटेवरची निरनिराळी वळणंही येतच राहणार आहेत. परंतु तरीही माझ्या आयुष्याचं शेवटचं वळण कसं असावं, याबाबत माझी काही निश्चित मतं आहेत. या जगामध्ये आपण वस्तू, माणसं, व्यवसाय अशा अनेक बाबींमध्ये गुंतलेले असतो. ते सर्व सोडून अलिप्तपणे मला कुठे तरी जाता आलं पाहिजे. जे. कृष्णमूर्ती म्हणतात, त्याप्रमाणे ‘लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड!’ त्यांच्या या म्हणण्यानुसार मला जगता येईल का?, ते माझ्या आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट असू शकेल का?, म्हणजे मी कधी, कुठे, कसा मेलो हे कुणालाच कळता कामा नये, असं जगून जाता येईल का? किंबहुना, तसं जाता यावं, याच दृष्टीने आयुष्याची वळणवाट असावी असे प्रयत्न सुरू आहेत.
atul@atulkulkarni.com
शब्दांकन – अनुराधा परब
anuradhaparab@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व वळणवाटा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Atul kulkarni talk about his way of life

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×