माणूस आशावादी प्राणी आहे. आपल्याला जे काही हवं आहे, जे काही मिळवायचं आहे, जे काही साध्य करायचं आहे, ते एकदा का मिळालं की, मग आपलं आयुष्य आनंदी, सुखी, समाधानी होईल अशी एक चिरंतन आशेची ज्योत सतत त्याच्या मनात तेवत असते. ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना’ या उक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्याचे साध्य वेगवेगळे असले तरी ‘प्रेमाच्या गावा जावे’ हे पालुपद लहानपणापासून कानावर पडल्यामुळे त्या प्रेमाच्या गावी जाण्याची ओढ मात्र सगळ्यांनाच वाटत असते. प्रेमाचं गाव सुंदर आहे, नीटनेटकं आहे, तिथलं वातावरण ऊर्जेने भरलेलं आहे, त्यामुळे तिथं गेल्यावर मन:शांती मिळेल अशी सर्वसाधारण लोकांची अपेक्षा असते.

आपण जिथं राहतो ती शहरं, ती गावं वाईटच असतात. आपल्या गावात-शहरात रस्त्यावर एखाद्याचा खून होत असेल तर लोक दूर उभे राहून पाहतात. खून करणार्‍यांना अडवत नाहीत, पोलिसांत तक्रार करीत नाहीत, पोलिसांनी विचारले तर साक्ष द्यायलाही तयार होत नाहीत. पण, रस्त्यावर कुणी प्रेम करीत असेल तर मात्र लोकांना बघवत नाही. प्रेम करणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी लोकांचे हात सतत शिवशिवत असतात. म्हणूनच तर डोळ्यात प्रेमाची गुलाबी स्वप्नं घेऊन वावरणार्‍यांना, आपल्या प्रेम-द्वेष्ट्या गावातून बाहेर पडून प्रेमाच्या गावी जावंसं वाटणं साहजिकच आहे.

आपल्या सगळ्याच अपेक्षा प्रेमाचं गाव पूर्ण करू शकत नसलं तरीही प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी प्रेमाच्या गावी जायलाच हवं, असा सल्ला मी तुम्हाला न मागताच देऊ इच्छितो. कसं आहे की, एखाद्या जंगलात गेल्यावर तिथे हिंस्र प्राणी असू शकतात, आपण रस्ता चुकू शकतो, चकवा लागू शकतो, जीवावर बेतू शकतं हे सारं ठाऊक असूनही जंगलात जातोच ना? त्याचप्रमाणे बरेवाईट अनुभव घेऊन समृद्ध होण्यासाठी प्रेमाच्या गावीदेखील जायलाच हवं.

प्रेमाचं गाव हे असं एकमेव ठिकाण आहे, जिथे मन सहजी प्रवेश करू शकतं, पण अक्कल मात्र गावाकुसाबाहेरच राहते. मुख्य प्रवेशद्वारातून या गावात शिरतानाच आपलं डोकं प्रवेशद्वारापाशीच जमा करावं लागतं. बदल्यात मिळतं, अपेक्षांचं ओझं आणि ‘ती किंवा तो जगापेक्षा वेगळी आहे, खास आहे,’ हा भ्रम. प्रेमाच्या गावाचा विचार करताच आपल्या डोळ्यांत जी चमक येते, तो प्रेमाच्या गावचा व्हिसा असतो.

डोळ्यातील हीच चमक तिकडे गेल्यावर अंधत्वात बदलते. प्रेमाच्या गावी जायचं असेल तर फार तयारी लागत नाही. फक्त स्वत:चा विचार, वेळ आणि आत्मसन्मान घरातच ठेवावा लागतो, कारण तिकडे त्याची किंमत शून्य आहे. प्रवेशद्वारातून आत जाताच ‘वेलकम टू कन्फ्युजन’ असा भला मोठा फलक लागलेला असतो. त्याच्याच बाजूला ‘स्वत:ला विसरा… यू डोन्ट मॅटर हिअर’ हे प्रेमनगरीचं घोषवाक्य ठळक अक्षरात लिहिलेलं असतं. प्रवेशद्वाराजवळचे सुरक्षारक्षक तुम्हाला चोवीस तास गळ्यात घालण्यासाठी एक ओळखपत्र देतो. त्यावर लिहिलेलं असतं, ‘तू खूप समजूतदार आहेस.’ प्रेमाच्या गावच्या शब्दकोशात डोकावून पाहिल्यास, ‘तू खूप समजूतदार आहेस,’ या वाक्प्रचाराचा अर्थ ‘तुला सहनशक्ती खूप वाढवावी लागणार आहे,’ असा दिलेला आहे.

प्रेमाच्या गावी लोकांच्या साध्या-साध्या कृतीतदेखील ‘रोमँटिसिझम’ ठासून भरलेला असतो. वातावरण गुलाबी असते. हवेत एक मंद, नशीला गंध असतो. एखाद्या दैवी सुरावटीची रोमँटिक सिम्फनी कानाला सुखावत असते.. अशा प्रेमभरल्या लवीडवी वातावरणात ती आणि तो… दोघेच सूर्यास्त पाहात समुद्रकिनारी बसलेले असतात. एकदम शांत… समुद्राच्या लाटांचा तेवढा आवाज येत असतो… बराच वेळ असा जातो, शेवटी न राहवून ती त्याला विचारते, ‘‘का रे, एवढा शांत का? काही बोलत का नाहीस?’’ तो काही क्षण मावळत्या सूर्याकडे पाहतो, अर्धोन्मीलित नजरेनं अथांग सागराकडे एक कटाक्ष टाकतो. क्षणभर तिच्या खोल गहिर्‍या डोळ्यात पाहतो आणि निरव शांततेच्या चादरीला सुरकुतीही पडू न देता, मूकपणे किनार्‍यावरच्या वाळूत लिहितो, ‘‘तोंडात मावा आहे!’’.

प्रेमाचं गाव जितकं लोभस तितकंच धोकादायक. इथं स्वप्नांच्या समृद्धी हायवेवरून प्रेमाची गाडी सुसाट जाते. प्रेमाला ‘साइडमिरर’ नाही, ‘हॉर्न’ नाही, ‘ब्रेक’ नाही, प्रेमाला वेगाची मर्यादादेखील नाही! जिथे धोक्याचे फलक लागलेले असतात तिथे सांभाळावे लागतेच, मात्र जिथं,असे फलक नसतात तिथं अधिक काळजी घ्यावी लागते. मित्र आधीच सांगून गेलेले असतात, ‘‘जाशील तसा परत येणार नाहीस, परत येताना स्वत:सारखा राहणार नाहीस,’’ तरीही जातीच्या प्रेमविव्हळ माणसाचं मन तिथं धाव घेतंच. प्रेमाच्या गावी वास्तवाच्या वीजपुरवठ्याचं ‘लोडशेडिंग’ सुरू असतं. तिथे कल्पनांचा ‘जनरेटर’ दिवसरात्र सुरू असतो. तो सुरू असेपर्यंत सगळं सुंदर वाटतं. तो बंद पडला की, सगळं गाव हवा गेलेल्या फुग्यासारखं मलूल होऊन जातं.

‘‘प्लिज, मला समजून घे’’ ही प्रेमाच्या गावी क्वचित बोलली जाणारी बोलीभाषा असून, ‘‘तुला काहीच समजत नाही,’’ ही नेहमीच्या वापरातील प्रमाण भाषा आहे. प्रेमनगरीच्या या प्रमाण भाषेला, आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायच्या कित्येक शतकांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. इथे प्रश्न विचारणं गुन्हा आहे. स्पष्टीकरण देणं म्हणजे गुंतागुंत वाढवणं आणि गप्प बसणं हेच शहाणपण आहे.

प्रेमाच्या गावात प्रेक्षणीय ठिकाणंदेखील खूप आहेत. ‘संशय चौक’ हा या गावाचे प्रमुख ‘टुरिष्ट ऍट्रॅक्शन’ आहे. इथे आलेल्या व्यक्तीला संशय चौक टाळताच येत नाही. या चौकात तुमच्या खिशातील, कपाटातील, बॅगेतील, ताब्यातील इतकंच नव्हे तर अगदी ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या यादीतील प्रत्येक गोष्ट कुणाची आहे, कुणासाठी आहे याचा कसून तपास केला जातो. इथल्या मौन सरोवराच्या काठी बसल्यास तुमच्याशी कुणी बोलत नाही, तुम्हाला कुणी ‘मेसेज’ करीत नाही की तुमच्या कुठल्याही उक्ती-कृतीला प्रतिसाद मिळत नाही.

मौन सरोवराच्या किनार्‍यावर बसलेले असताना तुम्हाला, रात्री होऊ घातलेल्या भांडणातील बचावात्मक पवित्र्याची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. गावाच्या दक्षिणेकडे असलेला अतिशय उंच असा अपेक्षा बुरुज, तिथे रोप-वे असल्याने चढायला अत्यंत सोपा असला तरी तिथून उतरताना मात्र प्राण कंठाशी आल्या वाचून राहत नाहीत. ‘इग्नोर सर्कल’ हा गावचा मध्यबिंदू आहे. इथे तुमची प्रतिष्ठा ‘भगवान के नाम पे अटेन्शन दे दे बाबा!’ अशी भीक मागत उपासमारीने मरते.

प्रेमाच्या गावातले लोक सुरुवातीला स्वभावाने खूप प्रेमळ असतात. नंतर हळूहळू ते बदलतात आणि शेवटी म्हणतात,‘‘मी पहिल्यापासून असाच/अशीच आहे.’’ प्रेमाच्या गावात नियम आणि कायदे फार सोपे आहेत; प्रश्न विचारू नयेत, अपेक्षा ठेवू नयेत, दुखावल्यावरही समजून घ्यावे, आणि शेवटी दोष स्वत:चाच मानावा. याव्यतिरिक्त काही नवे कायदे नोटबंदी लागू व्हावी, तसे कधीही एकतर्फी लागू होऊ शकतात किंवा हिंदीसक्तीच्या कायद्यासारखे गुपचूप मागे घेतले जाऊ शकतात.

इथले रस्ते सरळ नाहीत. पहिल्या वळणावर आशा, दुसर्‍या वळणावर संशय, आणि तिसर्‍या वळणावर थेट ‘ओव्हरथिंकिंग’ कडा नावाचा ‘सुसाइड पॉइंट’ आहे. हे रस्ते गोल गोल फिरतात. आपण पुढे चालत असल्याचा आपल्याला भास होतो; पण प्रत्यक्षात आपलीच शेपटी पकडायचा प्रयत्न करणार्‍या बोक्याप्रमाणे आपण एकाच जागी गोल गोल फिरत असतो. इथं खाण्यापिण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ‘हॉटेल गैरसमज’ २४ तास खुलं असतं.

गावच्या पश्चिमेला असलेल्या भांडण संग्रहालयात तुमच्या जुन्या चुका, तुम्ही उच्चारलेली वाक्ये, संदर्भांचा शेंडा-बुडखा कापून जपून ठेवलेली असतात. त्यामुळे आजच्या भांडणात, पंचवीस वर्षांपूर्वीचं तुमचं वाक्य पुरावा म्हणून सादर केलं जाऊ शकतं. इथलं हवामान ब्रिटनच्या हवामानापेक्षाही अधिक बेभरवशाचं. क्षणात थंड तर घटकेत गरम. आज प्रेमाचं ऊन तर उद्या दुर्लक्षाचा गारठा. या हवामानाचा अचूक अंदाज सांगू शकेल, असं डॉप्लर रडार अजून बनलेलंच नाही.

प्रेमाच्या गावी, स्वत:व्यतिरिक्त अन्य कुणीही तुम्हाला फसवत नाही. इथे अपेक्षा ठेवणं गुन्हा ठरतं, सहन करणं सद्गुण असतो आणि दुखावलं जाणं ही सवयीची बाब! अशा वेळी एकीकडे तुम्ही स्वत:लाच रोज समजावत असता की हे सगळं ‘प्रेम’ आहे आणि त्याच वेळी या गावातून बाहेर पडण्याची संधी शोधत असता, पण प्रेमाच्या गावातून परतीचा मार्ग इतका सोपा नसतो. तो सहजासहजी सापडत नाही. जागोजागी गावाबाहेर पडण्याचे फलक दिसतात, मात्र रस्ते कुठेच जात नाहीत. बाहेर पडण्याची इच्छा असलेल्यांपैकी फार थोडे लोक शेवटी कसेबसे बाहेर येण्यात यशस्वी होतात. बराचसा थकवा, थोडासा कडवटपणा आणि थोडंसं शहाणपण गाठीशी घेऊन!

प्रेमाच्या गावी जायचं कारण एकच असतं, ‘कोहं’चा शोध घ्यायचा असतो, स्वत:ची किंमत शून्यावर आणण्याचा अनुभव घ्यायचा असतो तिथून परत येताना ‘कस्टम्स’मधे आपल्या आत्मसन्मानाची तपासणी होते. प्रेमाच्या गावात शिरताना आपल्या प्रियेच्या लेखी ‘माझं पिल्लू’ असलेला तो, ब्रेकअप होऊन गावाबाहेर पडेस्तोवर त्याचा प्रवास, ‘जा रे कुत्र्या’पर्यंत होतो, तेव्हा तो तुटलेला नसतो तर तो परिपक्व झालेला असतो. ते शहाणपण त्याला आणि आपल्याला इतकंच शिकवतं की, प्रेमाच्या गावी जरूर जावं, पण ‘पाहुणा’ म्हणून, मुक्कामाला नव्हे!

usabypereira@gmail.com