प्रेमात असताना शरीराच्या पाऊलवाटांनी मनात शिरायचं असतं, पण जेव्हा फक्त शरीराचाच राजमार्ग सजतो तिथे मनाची वाट हरवते. आजच्या तरुणाईत तेच चित्र दिसतंय, प्रेमातली निरागसता, तरलता,अबोधता,अव्यक्तता यांना कळत नाही का? ‘ब्रेकअप सेलिब्रेशन’ करत सहजपणे ‘मूव्ह ऑन’ होणारी ही पिढी प्रेमाची खरी भाषा समजू शकणार आहे का? आजच्या ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ निमित्ताने न्यायमूर्ती (निवृत्त) मृदुला भाटकर यांनी तरुण पिढीशी साधलेला हा संवाद…

माझ्या शेजारच्या बाकावर बसलेल्या तरुण मुला-मुलींचा चिवचिवाट चालला होता. त्यातल्या दोघांचं ‘ब्रेकअप’ झालं होतं. त्यावर उतारा म्हणून ते ‘ब्रेकअप सेलिब्रेट’ करणार होते. त्या दोघांना सल्ला मिळत होता की, आज हे झालं की, हा विषय संपला आणि तुम्ही ‘मूव्ह ऑन’ करायचं. ते दोघंही निश्चयानं ठरवत होते. ‘‘हो, आजपासून सगळं विसरून पुढे जायचं’’. हे ऐकत असताना जाणवलं की, २५-२६ वर्षांपूर्वी त्याच्या/तिच्या आठवणीच्या संदर्भाचा ‘इक छोटासा लम्हा है, जो खत्म नहीं होता। मैं लाख जलाता हूँ, यह भस्म नहीं होता।’’ या गुलजारांच्या ओळी मनात सतत जागवणार्‍या प्रेमातल्या लोकांना हे ‘मूव्ह ऑन’चं गणित समजत होतं का?
‘‘५० लाख रुपये तो देऊ शकतो. मी एक रुपया कमी घेणार नाही.’’
‘‘तिच्या निम्म्या पगाराचं ती काय करते त्याचा हिशेबच नाही.’’
‘‘घरावरचा हक्क सोडायला हवा तिनं, तरच मी बाकीचं मान्य करेन…’’
‘‘माझं सगळं सोनं-स्त्रीधन आहे. लग्नात आलेल्या महाग महाग भेटवस्तू मला परत हव्या आहेत.’’
‘‘त्याच्याकडे घर हवंच स्वत:चं, गाडी असेल तर उत्तमच!’’
‘‘लग्नानंतर आम्ही परदेशात दोन वेळा जाऊन आलो. पैसे मीच दिले.’’
‘‘आठवड्यातून चार वेळा बाहेरचं जेवण तेही उत्तम ठिकाणी हवंच.’’
‘‘सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कंपनीतच वेळ जातो, मग किचनलेस फ्लॅट घेतला. नकोच ते फोडणी, तिखट, मीठ काहीच.’’
‘‘लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये पोटगी मिळेल का?’’
‘‘लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये ‘४९८ ए’ लागू होईल का?’’ आजच्या तरुण मुला-मुलींचे असे सगळे प्रश्न, विधानं जेव्हा मी ऐकते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत मी प्रेमाचा शोध घेते. सगळीकडे ऐकू येतं की, आजकाल ना सगळंच कसं ‘बोल्ड’ झालंय. ‘बोल्ड’ हा व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र मान्यता मिळालेला गुण झाला असला तरी ते फक्त दिसण्यात आणि चुकीचे मार्ग चोखाळण्यात नको ना असायला!
आजच्या तरुण-तरुणींचं प्रेम-ब्रेकअप-मूव्हऑन-पुन्हा दुसर्‍याच्या प्रेमात पडणं…आणि कदाचित पुन्हा तसंच पहिल्यापासून… हे सारं पाहिलं की स्त्री-पुरुषांमधलं प्रेम आणि श्रृंंगाराचं भारतीय मूळ आपण हरवलं आहे का? हे तपासावंसं वाटतं. कारण या नात्यातलं ‘नर-मादीपण’ खूप ठसठशीत झालेलं जाणवतं. त्यातली हळूवारता, अस्फुटता दिसत नाही. श्रृंंगाराशी, विभ्रमाशी स्त्रीचं खरंतर अतूट नातं असतं. स्त्री त्यात जास्त रमते आणि खुलत जाते. किंवा आताच्या काळात म्हणायचं तर, खुलत होती. कारण लाजणं, मोहरणं हे कदाचित आधुनिक जगात तुमच्या व्यक्तिमत्त्वाला मारक ठरतंय. खरं तर लिंगभेद हा जन्मत: नसून समाज, अर्थकारण, संस्कृती यांचा परिपाक असतो. स्त्रीवादाची संकल्पना ही पाश्चिमात्य देशात जन्माला आली. त्यामुळे आपला लिंगवाद हा पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकणारा आहे. जागतिकीकरणाच्या दृष्टीने त्यात गैर काही नाही; परंतु या सर्व प्रक्रियेत आपली भारतीयत्वाची पाळंमुळं सुटता कामा नयेत. ती आपली खर्‍या अर्थाने स्वओळख आहे. स्त्रीवाद हा कायम त्या देशाच्या संस्कृतीमध्ये मिसळायला हवा. अन्यथा त्याचं उपरेपण टोचतं.
आजच्या तरुणांना भारतीय पद्धतीने केलेली रीतसर लग्न हवी आहेत, पण त्यातला संस्काराचा भाग उणा होऊन दिखाऊपणा खूप झाला आहे, असं सतत जाणवत राहातं. लग्नानंतर संसार सुखी करण्यासाठी प्रेमच हवं असतं. एकमेकांबद्दल प्रेम वाटणं ही लग्नाची पहिली पायरी असते. मात्र तेच नेमकं लग्नाच्या नात्यातून उणं होत चाललं आहे हे ठळकपणे लक्षात येतं ते कौटुंबिक न्यायालयात. तेथील समुपदेशकांना हळूहळू मोडून पडणारी कुटुंबसंस्था लक्षात येते आहे. हे असं का घडतं आहे याचं कारण बहुतेकांच्या मते, आताच्या पिढीला जे शिक्षण मिळत आहे त्यात असलेल्या मूल्यांचा आणि संस्कारांचा अभाव! घराघरांत बोकाळलेली पालकांची ‘स्मार्टफोन’ आणि ‘हेही आण -तेही आण’ ही संस्कृती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन मुला-मुलींना आंतरिक प्रेम आणि जबाबदारी या गोष्टींची नीट ओळख होत नाही. ‘तू माझ्यासाठी काय केलं आणि मी तुझ्यासाठी काय केलं,’ ही देण्याघेण्याची भाषा बोलताना त्यांनी खरंतर प्रेमाची अव्यक्त, शब्दावाचूनची गोष्ट ऐकायला हवी असते. पण आता त्यात व्यवहारच जास्त आलेला वाटतो.
आपल्या भारतीयांच्या संस्कृतीत स्त्री-पुरुष संबंधांचीही खूप गंमत आहे. आताच्या मुलामुली वा तरुण-तरुणी घडण्यात इथल्या समाजातल्या रीतिरिवाजांचा जसा परिणाम होतो त्यापेक्षा जास्त स्मार्टफोनवरील ॲप्सचा होतो. तरुण-तरुणींच्या संदर्भात पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मुक्त लैंगिक जीवनाविषयी आपण चुकीच्या कल्पना बाळगतो आणि सर्रास ‘तिकडे काय सगळा स्वैराचार असतो,’ असं म्हणून मोकळे होतो. परंतु काही महिन्यांपूर्वी माझ्या इंग्लंड-अमेरिकास्थित भारतीय मित्र-मैत्रिणींनी तिथल्या आताच्या महाविद्यालयीन युवा पिढीसंदर्भात महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. त्यांच्या मते, ‘‘आता भारतीय तरुण पिढी ज्या प्रमाणात लैंगिक स्वातंत्र्य घेत आहे इतकं लैंगिक स्वातंत्र्य आम्ही जिथे राहतो तिथे नाही.’’ या निरीक्षणाला पाठिंबा देणारं मत वेगवेगळ्या महाविद्यालायामधील तरुण प्राध्यापकांनीही मांडलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘आता तरुण मुलं-मुली ‘ॲडव्हान्स’ झालेली आहेत.’’ एकमेकांबद्दल असणारं नैसर्गिक कुतूहल हे स्वाभाविक असतं; परंतु समाजमाध्यमे, विविध ॲप्समुळे मुक्तपणे आणि पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा वेळ ‘पॉर्न’ बघून दृष्टीत आणि वागणुकीत येणारं वखवखलेपण हे अनैसर्गिक आहे. स्वत:चं लैंगिक स्वातंत्र्य हे योग्य पद्धतीने हाताळता आलं पाहिजे, हे होतंय का आजकाल?
्त्रिरयांच्या संपूर्ण विकासासाठी स्त्रीवादाची अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण चळवळ १९७५ पासून सुरू झाली. त्यातून मिळालेले फायदे सर्वदूर पसरलेले आहेत. गेल्या ५० वर्षांत ्त्रिरयांंना समजून घेण्याच्या पुरुषांच्या विचारांत बराच फरक पडतो आहे. या अनेक सकारात्मक बाजूंबरोबर एक नकारात्मक बाजू मला घटस्फोटाच्या आणि ताब्याच्या खटल्यांमध्ये जाणवते. कुटुंबसंस्था मोडकळीस येण्याची कारणे अनेक आहेत, पण त्यातही एक कारण म्हणजे मुला-मुलींच्या स्वओळखीची जपणूक चुकीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वर येत आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची ओळख असते, परंतु स्वओळख म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आजच्या सर्वच मुलामुलींना समजावण्यात आपण कमी पडत आहोत का? सतत व्यक्त होणं, स्वकेंद्रितता, स्वत:च्या भावनांचं प्रदर्शन किंवा ‘मी तडजोड करणार नाही’ हे म्हणणं म्हणजे मुला-मुलींची स्वओळख नाही. अहिल्याबाई होळकर किंवा सावित्रीबाई फुले यांना खर्‍या अर्थाने स्वओळख (आयडेंटीटी या अर्थाने) आहे. ती जपताना आणि ओळखताना त्यांना कितीतरी तडजोडी कराव्या लागल्या, पण त्या तडजोडींचा स्तर फार वरचा होता. ‘मी स्वयंपाक करते’,‘डोक्यावर पदर घेते’, ‘लग्नात मंगळसूत्र घालते’ यांसारख्या क्षुल्लक तडजोडी त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या.
आज जगण्यातल्या प्राथमिकता खूप स्पष्टपणे ठरलेल्या आहेत. त्यात काहीही गोंधळ नाही. सतत स्पर्धा असते. मानसिक रुग्ण आणि मानसशास्त्रज्ञ यांची संख्या वाढते आहे. हरवलेपण, जोडीदार नसण्याचंही एकटेपण आहे. या सर्व वरील प्रश्नांची उत्तरं शोधताना एकच प्रश्न त्या दोघांसाठी असतो, ‘तुझं तिच्यावर/त्याच्यावर प्रेम आहे का?’ जर हा प्रेमाचा स्पर्श त्या दोघांना झालेला असेल, तर आयुष्य परीस होतं. अन्यथा सगळे सोन्यामोत्यांचे हिशोब मातीमोल असतात. प्रेम प्रेम असतं! उन्मळून, विस्कटून फक्त करणं. आपल्या उत्कट भावनांचं ‘रेड कार्पेट’ आपल्या जोडीदारासाठी पसरणं हे महत्त्वाचं! हळद, संगीत, मेंदी समारंभ आणि लग्न या सगळ्यांमध्ये खूपदा छानशौकीचा दिखाऊपणा इतका असतो की, एकमेकांकडे बघणं हासुद्धा कधीकधी ‘परफॉर्मन्स’चा एक भाग वाटतो.
काळ बदलला, आपल्या भावना, संवेदनाही बदलल्या. मला माझी भाची म्हणाली, ‘‘आम्ही ब्रेकअप किंवा रिलेशनशीप हे सगळं शेअर करतो. का?, तर सगळ्यांना आपल्या नात्याचं स्टेटस समजतं.’’ हे सारखं सगळ्यांच्या भावना गोंजारण्याचं प्रदर्शन कशासाठी? सरळ रोखठोक जगणं का शिकत नाही. भावनांची निरागसता, सूक्ष्मता, तरलपणा आजच्या तरुणाईला अस्वाभाविक प्रकार वाटतो का? वास्तविक, शरीराच्या पाऊलवाटांनी मनात शिरायचं असतं. पण जेव्हा शरीराचाच राजमार्ग सजतो तिथे मनाची वाट हरवते. स्पर्धेच्या जगात ढीगभर शिक्षण घेताना मुलांना आपण जगण्याचं मूल्यशिक्षण द्यायला विसरत आहोत का? वास्तवाचं भान सतत ठेवताना प्रेमाच्या अद्भूत स्पंदनांपासून ही पिढी दूर जातेय का? हा खरा प्रश्न आहे. मला प्रश्न पडतो की, निरुपयोगी असणारे माणसाचे अवयव जसे गळून पडले, तसंच प्रेम नावाची विलक्षण भावनाही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातून हळूहळू हद्दपार होईल का?
‘‘आम्ही सिच्युएशनशिपमध्ये आहोत.’’ छोट्या मैत्रिणीनं मला सांगितलं आणि नंतर माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून समजावलं, की ‘सिच्युएशनशिप’ हे स्टेटस म्हणजे आम्हांला त्यावेळेस एकमेकांमध्ये रस असतो, परंतु आमची कमिटमेंट नसते, तर आम्ही दुसर्‍या इतर कोणाबरोबरही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणून जायला मोकळे असतो.’’ मला असं वाटतं की, खरंतर अशा प्रकारची मैत्री ही आम्ही,आपणही आपल्या कॉलेजच्या वयात अनुभवलेली आहे. पण प्रत्येक मित्र-मैत्रिणींच्या नात्यात एकमेकांचं नर-मादीपण शोधत राहणं हे आजकाल जास्त वाढलेलं दिसतंय. त्यातसुद्धा मैत्रीच्या प्रवासातल्या प्रत्येक वेळेला, काळाला, घटनेला काहीतरी वेगळं ‘रिलेशनशिप’चं विशेषण देणं आणि त्यात हे नातं बांधून टाकणं हे जास्त बोकाळलं आहे. नका नात्याला नावं देऊ, जो प्रवाह असेल तो वाहू द्या. सगळ्या गोष्टी ‘कोडीफाइड’ नका करू, असं आजच्या पिढीला सांगावंसं वाटतंय. अलीकडेच एका महाविद्यालयातल्या बारावीच्या मुलांची ट्रीप गेली होती. तर ती ‘सिच्युएशनशिप’ मधील मैत्रीण पूर्ण ट्रीपभर रुसली होती. कारण ‘त्याने’ तिच्या डोक्याला बाम चोळलं नाही, गोळी दिली नाही. या अशा अपेक्षा घेऊनच या मुलं- मुली पुढे संसार करतात. मुलामुलींना त्याग, उदारता म्हणजे जगण्याची एक प्रक्रिया आहे हे समजणं आणि समजावणं महत्त्वाचं!
मुरत जाणार्‍या नात्याची मजा ही मुलं चाखतील जर ते नातं २५ वर्षांपर्यंत टिकेल. खरंतर तेव्हाच ते जोडीदार असतात एकमेकांचे! परंतु या पिढीच्या किशोर वयात किंवा तारुण्यात संस्कार करणार्‍या आई- वडिलांना हे कळलं नाही, शिक्षकांना हे उमगलं नाही, तर उद्या मोगर्‍याला सुवास नसेल आणि चमेलीचा सुगंध नेणारा वाराही पडलेलाच असेल.
chaturang@expressindia.com