– डॉ. समिधा गांधी

‘‘काय वो, बगावं तवा त्या मोबाइलात डोचकं घालून बसल्येलं दिसताय. काय कामबीम हाये का न्हाई? आन् काय वं, असं फिदीफिदी हसताय कशापाई?’’ शांती मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेल्या सुरेशवर जामच उखडली होती. दोघांचं नुकतंच लग्न झालं होतं. तसा दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायला मिळायचाच नाही. शेतकर्‍याच्या एकत्र कुटुंबात शांतीचा दिवस कामात उगवायचा आणि कामातच मावळायचा. दुपारी सुरेशला जेवण देण्याच्या निमित्ताने आठवड्यातून एखादा दिवस ती शेतावर येई. तेव्हा तरी आपल्या नवर्‍यानं आपल्याशी बोलावं, असं तिला वाटणं साहजिकच होतं.

‘‘आगं हो हो. किती बोलतियास, जरा आपल्या नावापरमानं शांत बस.’’

‘‘आता, म्हंजी म्या इथं आलू ह्ये बी माजंच चुकलंय. उगाच आलो मी.’’

‘‘ए आगं, आता कशापाई यवडं रागावतिया. आगं, तुला म्हाइत हाये का दोन दिसांनी काय हाय त्ये? आगं वॅलंटाइन नावाचा येक विंग्लिश बाबा होता, त्याच्या नावानं तो दिवस मनवतात. त्याचं वरत करतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्यानं त्ये वरत केल्येलं चांगलं असतंया. त्ये कसं कसं करायचं, त्यासाटी काय काय तयारी लागतिया त्याच बद्दल वाचीत व्हतो म्या.’’

‘‘आसं? बगू द्ये. म्या नीट वाचून घ्येते आणि लगालगा तयारी करत्ये. उगाच काई चूक झाली तर त्या वालंटिन बाबाचा कोप नको व्हायला…’’

‘‘आगं, विंग्रजीत हाय. एकदम हायफाय. मलाच किती येळ लागतूया वाचाया. तुला कसं काय जमंल? म्या बराबर वाचून सांगतो काय ते तुला’.

शांतीनं उत्सुकतेनं विचारलं, ‘‘त्ये वरत करायला कुटं जायला लागंल, म्हंजी कोणत्या गावाला?’

‘‘म्या वाचून सांगतो म्हणलं नव्हं. तू आता घरला जा. आपल्या वरताचा डांगोरा पिटू नगं. म्या बाबास्नी आणि आयेला इचारतू मग जाऊ. काय?’’ बायकोसमोर निष्पाप चेहर्‍याने बसलेल्या सुरेशला आतून मात्र अतिशय हसू येत होतं. त्याने मोबाइलवर ‘व्हॅलेंटाइन्स डे’बद्दल बरंच काही वाचलं होतं. आपणही आपल्या बायकोबरोबर त्या दिवशी हातात हात घालून फिरायला जायचं, तिला एखादी आवडीची वस्तू घेऊन द्यायची. असे मनसुबे तो मनात रचत होता. बापासमोर उभा राहून, बायकोला घेऊन फिरायला जातो म्हणायची हिम्मत त्याच्यात नव्हती. म्हणून ही बाबाची नामी शक्कल त्याला सुचली. बायकोनं आपण घरी जाईपर्यंत आपल्या आईला या व्रताबद्दल सांगितलेलं असणार आणि आईनं बाबा, काकांपर्यंत सार्‍या घरादाराला या व्रताबद्दल सांगितलेलं असणार याची त्याला खात्री होती. संध्याकाळी तो घरी पोचला तर याची प्रचीती त्याला लगेच आली. ओसरीवर त्याचे बाबा नि काका बसले होते. बाबांनी सुरेशला अडवूनच विचारलं, ‘‘काय मग सुरशा, कधी जाताय त्या ‘वालंटिन बाबा’च्या दर्शनाला? तुजी आई म्हणत व्हती की, सुरशाचं नि सूनबाईंचं वरत हाये आनि त्ये लगीन झाल्यावर पयल्या वर्षीच करायला लागतंय. ती म्हणत व्हती, परवाचाच दिवस चांगला हाय.’’ सुरेशची अवस्था, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, ते पण रेबॅनच्या गॉगलसकट! अशी झाली होती.

‘‘व्हय बाबा, तुमची परवानगी असंल तर उद्याच्याला मुंबईला निगतो. परवाच्या दिवशी दर्शन घ्येतो आनि लागोलाग रातच्याला घरला येतो.’’

‘‘बरं नीट जावा. पोचलात की येक मिसकाल द्या. म्हंजी आमाला कळंल की, तुमी ममईस पोचलात. तुज्या आयेकडं पैशेही द्येऊन ठिवलंयत त्येपण र्‍हाऊ द्यात येळ वख्ताला.’’

‘‘व्हंय बाबा.’’ सुरेश मनातल्या मनात हसतच म्हणाला.

आत स्वयंपाकघरात वेगळीच गडबड सुरू होती. एका बाजूला ‘वालंटिन बाबा’समोर ठेवायला म्हणून पाच प्रकारची फळं, तांदूळ, नारळ काढून ठेवलेला होता. सुरेशची आई उपवासासाठी खायचे पदार्थ तयार करत होती. थोडा चिवडा, लाडू. झालंच तर चारदोन भाकर्‍या व कोरड्यास काही तरी… अशी जय्यत तयारी करण्यात येत होती. आई तयार करत असलेले लाडू सुरेशच्या मनात फुटत होते. आपला मोठा भाऊ काही तरी खुसपट काढेल असं सुरेशला वाटत होतं. पण त्याच्या भावानं गप्प राहण्यासाठी अडचणीच्या वेळी सुरेशकडूनही मदत करायचं कबूल करून घेतलं. धाकट्या दोघी बहिणींना येताना बांगड्या, कानातली आणीन, असं सांगून त्यांनाही गप्पं बसवलं होतं.

असे सगळे संभाव्य अडथळे दूर करून ते दोघे दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे मुंबईच्या गाडीत बसले. जाताना त्याच्या आईने हजारभर सूचना दिल्या असतील. सुरशानं मस्त दोन कान उघडे ठेवून त्या सूचना एका कानानं ऐकल्या आणि दुसर्‍या कानानं सोडूनही दिल्या. गाडी सुरू झाली आणि सुरशानं अलगद बायकोच्या खांद्यावरून हात लपेटला. शांतीनं त्याच्याकडे बघून डोळे वटारले. ‘‘अवो, काय करतासा, सासूबाई म्हटल्या की व्रत पूर्न होईस्पातूर त्याला अंगाला हात बी लावू द्येऊ नगंस. या पुरुषांना काय बी कळत न्हाई. आपण बायांनीच सबुरीनं घ्यायला हवं.’’

सुरेशला हसावं का रडावं कळत नव्हतं. त्यानं मग हळू आवाजात तिला आपली शक्कल सांगायला सुरुवात केली. शांतीच्या चेहर्‍यावर मिनिटा-मिनिटाला वेगवेगळे भाव उमटून जात होते. आपला नवरा बराच हुशार आहे आणि त्याला आपण आवडतो या दोन गोष्टी तिला यातून ठळकपणे जाणवल्या. तिला आपल्या नवर्‍याच्या कौतुकाचं आणि प्रेमाचं भरतं आलं. तिच्याही नकळत ती त्याला बिलगली.

दुपारी ही राघू-मैनेची जोडी मुंबईला पोचली. सुरेश आधी काही वेळेला मुंबईत आलेला असल्यानं त्यानं सराईतासारखी शांतीला मुंबई फिरवली. तिला आवडीने नवीन सलवार कमीज घेऊन दिले. लगेच घालायलाही लावले. अगदी तिचा हात हातात घेऊन चौपाटी, राणीची बाग, हँगिंग गार्डन सगळीकडे फिरला. हॉटेलमध्ये जेवला. तिला आईस्क्रीम, पाणीपुरी काय हवं ते खाऊ घातलं. अगदी जिवाची मुंबई केली. शांती एकदम हरखून गेली. आपल्या नवर्‍याचं हे वेगळंच रूप पाहून तिचा जीव सुपाएवढा झाला. त्याला कुठे ठेवू नि कुठे नको असं तिला झालं. संध्याकाळी बॅग उघडताना तिला ओटीचं सामान आणि इतर तयारी दिसली. ‘‘अवो, आता या वरताचं काय करायचं?’ तिनं सुरेशला विचारलं. ‘‘आगं आसं काय करत्येस आपून उद्याच्याला महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊ. तू देवीची वटी भर. आपण धाकट्या दोघीस्नी बांगड्या, डूल बी घेऊ. झालंच तर मायला नि वयनीलाबी कायतरी घेऊ. परसाद नेऊ. ‘‘डार्लिंग, म्या अख्खा तुजा मिस्टर तुज्याबरोबर असताना तू कशापाई तरास घ्येतेस? आरं तिच्या, काय पन लाजली!’’ दोघांचं झोकात व्हॅलेंटाइन वरत सुरू होतं.

इकडे गावात रात्री सुरेशचे आईबाबा शिळोप्याच्या गप्पा मारत बसले होते. ‘‘बगा, माजं पोरगं सुदारलं का न्हाई. माज्या मैतरनीची लेक सून करून आणली. तिला जरा द्येवाबिवाचं करायचा नाद हाये. तिच्यापाई ह्यो पन देवदर्शनाला नि वरतंबितं कराया लागला. माजा घोर मिटला.’’ सुरेशचे बाबा गालातल्या गालात हसत होते.

‘‘हसाय काय झालं म्हनते मी!’’

‘‘आगं, असा कोनी वालंटिन बिलंटिन बाबा नसतोय की त्याचं वरत पन नसतंय. सुरशाला सूनबाईला घ्येऊन फिरायला मुंबईस जायचं व्हतं म्हून त्यानं ही शक्कल काढलीया.’’

‘‘कायच्या बाईच बोलता तुमी. तुमाला काय ठाऊक? आसं कसं करंल त्यो. येऊदे घरला मग बगते दोघास्नी.’’ सुरेशच्या आईचा पारा चढलाच एकदम.

‘‘आगं आगं जरा शांत हो. म्या पन मोबाइलवर गेले काई दिवस बघत व्हतोच ह्ये वालंटिनचं समदं. शहरगावातल्या मुलांची गंमत असतिया गं ती. तेवढीच जरा रोजच्या कामातनं सुटका. प्रेम काय शहरातल्या पोरांनी करावं का? जरा आपल्या मुलांनी क्येली मजा तर काय बिगडलं? तुला याद आहे का? आपून पन असेच आईबाला चोरून जत्रंला ग्येलेलो का नाई? तू इसरलीस व्हय? आता पोरांचं वय हाये. आपल्या म्होर बुजतात ती. त्यांना काय बी बोलू नगंस.’’ सुरेशची आई हसली आणि त्या जुन्या जत्रेत रमली.

‘‘आणखी एक, ह्ये त्यांचं वरत पुरं झालं नं तर म्होरल्या वर्षाला तुज्या मांडीवर नातवंडं खेळंल बग. म्हणा मग, वालंटिन बाबा की जय!’’

samidhaygandhi@gmail.com